' …म्हणून सरडा स्वतःचा रंग बदलतो? निसर्गानेच सरड्याला दिले रंग बदलण्याचे सामर्थ्य! – InMarathi

…म्हणून सरडा स्वतःचा रंग बदलतो? निसर्गानेच सरड्याला दिले रंग बदलण्याचे सामर्थ्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही माणसं परिस्थिती पाहून वेगवेगळे निर्णय घेत असतात. पण या सर्वांमध्ये माणसाचा स्वार्थ दडलेला असतो. अशा प्रकारचे लोक जास्त करून राजकारणामध्ये पाहायला मिळतात.

अशाप्रकारच्या लोकांना मराठी मध्ये “सरड्याप्रमाणे रंग बदलणारी माणसं” असं म्हटलं जातं.

मराठी मध्ये ही म्हण रुजू होण्याचे कारण म्हणजे सरडा. सरडा वेगवेगळे रंग घेत असतो. साधारणतः असा समज आहे की सरडा हा आजूबाजूच्या परिस्थितीनुसार रंग बदलत असतो.

म्हणजे एखाद्या झाडावर असेल तर तो त्या झाडाच्या रंगाप्रमाणे रंग धारण करतो. पानाफुलात असेल तर त्याप्रमाणे रंग धारण करतो.

 

sarda inmarathi

 

रंग बदलण्यासाठी सरड्याला फार वेळ देखील लागत नाही अक्षरश: पापणी लवते न लवते तोवर सरड्याने त्याचा रंग बदललेला असतो. परंतु आता सरड्यांचा नवीन प्रकारे अभ्यास करण्यात आला आहे.

आणि त्या अभ्यासावरूनच आजूबाजूच्या परिस्थितीनुसार सरडा रंग बदलतो हा समज आता चुकीचा ठरला आहे.

आताच्या अभ्यासानुसार सरडा रंग बदलतो, कारण तो आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच इतर सरड्यांना आपला मूड कसा आहे हे दाखवण्यासाठीही तो रंग बदलत असतो.

या पृथ्वीवर सरड्यांच्या १६० जाती अस्तित्वात आहेत. आणि त्या जाती रेन फॉरेस्ट तसेच वाळवंटातही तग धरू शकतात.

सरड्यांच्या रंग बदलाचा जो अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच प्रौढ नर, चार प्रौढ मादी तर चार किशोरवयीन सरडे यांचा समावेश होता.

आजूबाजूच्या परिस्थितीपेक्षा तापमानाचा त्यांच्या रंग बदलावर परिणाम होतो असे दिसून आले आहे. जिनिव्हा विद्यापीठात यावर संशोधन करण्यात आले.

उत्क्रांतीवंशशास्त्रज्ञ आणि प्राण्यांचे तज्ज्ञ मिशेल मिलिंकोविच म्हणतात की,’ लोकांना वाटते की बुद्धिबळाच्या पटावर जर सरडा ठेवला तर तो त्याच प्रमाणे रंग धारण करेल, अर्थातच हे चुकीचं आहे.’

मिलिंकोविच यांच्या म्हणण्यानुसार सरड्यांना निसर्गात लगेच ओळखता येणे अवघड जातं. कारण सर्ड्यांकडे लढण्याची क्षमता कमी असते.

 

sarda 2 inmarathi

 

त्यांनी घेतलेले चावे विषारी नसतात. त्यांच्या त्वचेवर विष नसते. तसंच ते वेगाने पळू शकतात पण वेगाने हालचाल करून प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करू शकत नाहीत. त्यांच्या जवळ एकच शस्त्र असते आणि ते म्हणजे लपणे.

निसर्गानेच त्यांच्यात नैसर्गिक रंग भरलेत असं म्हणायला हरकत नाही.

पानांचा, झाडांचा, खोडांचा रंग सरड्यांकडे नैसर्गिक असतोच. पण निसर्गाने या रंगांमध्ये बदल करण्याची क्षमता त्यांना दिली आहे. त्यामुळे ते स्वतःचे रक्षण करू शकतात तसंच आपल्याविरुद्ध जातीय सरड्यांना आकर्षितही करू शकतात.

त्यांच्या शरीरात शरीराचे तापमान एक सारखे राहण्यासाठी तशी कोणतीही व्यवस्था नाही. म्हणजे त्यांच्या चयापचयातून ते स्वतःमध्ये तापमान निर्माण करू शकत नाहीत.

फक्त रंग बदलल्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणारे तापमान कायम राहते. त्यांच्या शरीराचे तापमान कमी होते तेव्हा तापमान वाढवण्यासाठी ते गडद रंग धारण करतात.

तसंच शरीरात वाढलेले तापमान कमी करण्यासाठी देखील ते फिकट रंग धारण करतात. म्हणजेच सूर्यप्रकाशावर त्यांचे तापमान अवलंबून आहे.

त्याचप्रमाणे सरडे एकमेकांना आपला मूड सांगण्यासाठी देखील रंग बदलत असतात. जर नर जातीच्या सरड्यांचा मूड आक्रमक असेल त्यावेळेस त्यांचा रंग गडद होतो. असेच स्त्री जातीचे सरडे देखील आपला मूड रंगाद्वारे दाखवतात.

 

sarda 3 inmarathi

 

सरडे हे इतक्या पटापट रंग कसे बदलत असतील? कारण सरड्यांच्या त्वचेची बाहेरची बाजू ही पारदर्शक असते. त्वचेवरच्या पडद्याखाली असे अनेक स्तर असतात. त्यातल्या प्रत्येक स्तरामध्ये विशेष पेशी असतात.

त्यातल्या या ज्या विशेष पेशी असतात त्यांना क्रोमॅटोफोर्स म्हटलं जातं. प्रत्येक स्तरावरील क्रोमेटोफोर्स वेगवेगळ्या प्रकारच्या रंगद्रव्याच्या थैल्यांनी भरलेले असतात.

सर्वात आतल्या थरात मेलेनोफॉरेस असतात, जे तपकिरी रंगाच्या मेलॅनिनने भरलेले असतात. हे तेच रंगद्रव्य आहे ज्यामुळे मानवी त्वचेला देखील अनेक छटा दिसतात.

त्या थराच्या शेवटी आयरीडोफॉरेस नावाच्या पेशी आहेत ज्यात निळ्या रंगाचे रंगद्रव्य आहे. ज्यामध्ये निळा आणि पांढरा प्रकाश प्रतिबिंबित होतो.

त्या पेशींच्या वरच्या थरांवर झेंथोफॉरेस आणि एरिथ्रोफोरेस आहेत जे अनुक्रमे पिवळ्या आणि लाल रंगद्रद्रव्यांनी भरलेले असतात.

असं म्हणायला हरकत नाही की सरड्याच्या शरीरातील ही सगळे रंगद्रव्य अगदी कुलूपबंद असतात. परंतु त्यांच्या शरीराच्या तापमानात बदल झाला की त्यांच्या शरीरातील मज्जातंतू हे क्रोमेटोफोर्सना आज्ञा देतात की शरीराचे तापमान कमी करायचे आहे की जास्त ठेवायचे आहे.

त्यानुसार हे कुलूप उघडते आणि रंग बाहेर पडतात. त्वचेच्या सर्व थरांमध्ये क्रोमेटोफोर्स रंग बदलतात. सरडे हे सर्वसाधारणपणे सगळ्या रंगांची उधळण आपल्या शरीरभर करू शकतात.

सांगायचं झालं तर जेव्हा सरडे उत्साही असतात त्यावेळेस ते एरेथरोफॉर्स च्या मदतीने लगेच लाल रंग धारण करतात आणि बाकीच्या रंगांना बाहेर येऊ देत नाहीत.

तर सरडे जेव्हा शांत असतात त्यावेळेस त्यांचा रंग हिरवा होतो. त्याचप्रकारे सरडे लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, निळा, ब्राऊन रंग धारण करतात.

 

sardaa 4 inmarathi

 

सरड्यांचे आपापलं क्षेत्रही ठरलेलं असतं. जेव्हा दोन नर जातीचे सरडे समोरासमोर येतात त्यावेळेस ते दोघेही आपले रंग अधिक भडक करतात. याचा अर्थ ते आपली आक्रमकता दाखवतात. दुबळा नर सरडा आपले रंग फिकट करतो आणि आपल्याला भांडण करायचं नाही असं दर्शवतो.

त्याचप्रमाणे मादी सरड्याला आकर्षित करण्यासाठी देखील सरडे आपला रंग बदलतात. त्यातही मादी सरड्याला जर समोरचा सरडा आवडला नाही तर तीदेखील आपले रंग बदलते आणि आपली नाराजी दाखवते.

एखादी मादी सरडा जर गरोदर असेल आणि त्यावेळेस जर दुसऱ्या नर सरड्याने तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर तिचे रंग अधिक भडक होतात आणि ती आक्रमक बनते.

नर सरडे हिंसक बनतात त्यावेळेस मादी सरडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मादी सरडा स्वतःहून आपली उपलब्धता सांगत नाही त्यावेळेस ती जास्त रंग न दाखवता हिरवट तपकिरी राहते.

खरोखरच प्राण्यांची दुनिया वेगळीच असते एकाच वेळेस ते कित्येक गोष्टी करून ते आपणास आश्चर्यचकित करीत असतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?