' भज्जीची विकेट आणि गिलीचं खास सेलिब्रेशन… आयपीएलमधील अविस्मरणीय अनुभव! – InMarathi

भज्जीची विकेट आणि गिलीचं खास सेलिब्रेशन… आयपीएलमधील अविस्मरणीय अनुभव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे 

===

ॲडम गिलख्रिस्ट… ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज आणि एक अफलातून खेळाडू! हेडनसोबत सलामीला येणाऱ्या या फलंदाजांची भल्या भल्या गोलंदाजांना भीती वाटायची.

 

gilchrist-inmarathi

 

खरंतर तो यष्ट्यांमागे उभं राहायचा तेव्हा फलंदाजांना सुद्धा धडकी भरायची. त्या माणसाचा क्लासच वेगळा होता. एक खेळाडू म्हणून, यष्टीरक्षक म्हणून आणि एक माणूस म्हणून सुद्धा तो भन्नाट होता. गिली हे त्याचं टोपण नाव!

स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग वगैरे दिग्गज खेळाडू कप्तान असतानाचा तो काळ होता. त्या संघाचं उपकर्णधारपद सुद्धा गिलीनं बऱ्याच काळ भूषवलं होतं. या काळात ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटविश्वावर दबदबा होता.

 

australia-team-inmartathi

 

ऑस्ट्रेलियन संघासाठी, तो काळ म्हणजे सर्वोत्तम कामगिरी आणि त्यामुळे आपसूकच चढलेली धुंदी असा होता. त्याच काळात ॲडम गिलख्रिस्ट अर्थातच गिली हा एक गुणी आणि समंजस खेळाडू म्हणून सुद्धा प्रसिद्ध होता.

त्यामुळेच त्याचे असंख्य चाहते होते, आहेत आणि राहतीलच…

ऑस्ट्रेलिया संघच सतत जिंकत असल्यामुळे, त्यांचा राग येणं आणि तरीही गिलीबद्दल मात्र एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर… तो काळच वेगळा होता.

२००३ च्या विश्वचषकात तो ९९ धावांवर बाद झाला तेव्हा फक्त ऑस्ट्रेलियनच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहते हळहळले होते.

असा हा असंख्य चाहत्यांचं प्रेम लाभलेला खेळाडू आयपीएलमुळे अधिकच आपलासा वाटू लागला. २००९ साली या पठ्ठ्याने त्याच्या डेक्कन चार्जर्स या संघाला विजेतेपद सुद्धा मिळवून दिलं.

 

rohit-deccan-chargers-inmarathi

 

मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा तेव्हा युवा खेळाडू म्हणून गिलीच्या संघात खेळत होता. आयपीएलच्या दुसऱ्याच मोसमात विजेतेपद मिळवून गिलीने चाहत्यांची मनं पुन्हा एकदा जिंकली.

त्याच्या भारतीय चाहत्यांची संख्या अधिक वाढली. आयपीएलमधून तो खऱ्या अर्थाने तुमच्या-आमच्या गळ्यातला ताईत बनला.

जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक हे बिरुद तो आजही मिरवतो. संगकारा, धोनी, बाऊचर वगैरे इतर उत्तम यष्टीरक्षक आंतरराष्ट्रीय पातळीवर येऊन गेले, पण गिलीची बरोबरी मात्र कुणालाच करता आली नाही.

तो यष्टीरक्षकांमधला अर्जुन ठरला… अर्थात “या सम हा!” 

 

dhoni with Gilchrist Inmarathi

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती  घेतली असली तरी आयपीएलमध्ये त्याची हवा होतीच… यष्टीरक्षक म्हणून , कप्तान म्हणून आणि फलंदाज म्हणून सुद्धा!

गम्मत अशी की, कर्णधार असताना त्यानं त्याची आणखी एक इच्छा पूर्ण करून घेतली. आठवतोय ना, गिली कर्णधार असतानाचा तो किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्सचा तो सामना!

आयपीएल २०१३… मुंबई विरुद्ध पंजाब.. सामन्याचं अखेरचं षटक, मुंबई संघाला जिंकायला ५१ धावा हव्या होत्या. हरभजन सिंग म्हणजेच भज्जी स्ट्राईकवर; १८ चेंडूत ५ धावा करून तो खेळात होता.

प्रवीण कुमार गोलंदाजीला येणार म्हणून सगळेजण वाट बघत होते. पण घडलं ते काहीतरी भलतंच… गिलीने त्याचे ग्लोज उतरवले. त्याच्यापर्यंत पोचलेला प्रवीण कुमार ते ग्लोज चढवून तयार झाला.

गिलीच्या हाती चेंडू आणि यष्टीमागे चक्क प्रवीण कुमार उभा!

सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात, ही तर फक्त सुरुवात होती. खरी गम्मत तर अजून बाकी होती. फिल्मी स्टाईलने सांगायचं तर “पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त” असं नियती म्हणत होती. मनातल्या मनात!

गिलीने गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. त्यानं त्याआधी फर्स्टक्लास सामन्यात २ षटकं टाकली होती. पण त्यात १० धावा देण्याव्यतिरिक्त त्यानं काहीही केलं नव्हतं.

गिलीचा पहिलाच चेंडू भज्जीने हवेत टोलवला. गुरुकिरत सिंग मान याने त्याचा झेल घेतला आणि मुंबईचा खेळ खल्लास! गिलीला पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली.

सामन्यातील धमाल इथेही थांबली नाही. या विकेटचं सेलिब्रेशन झालं ते गिलीने केलेल्या गन्नम स्टाईल डान्सने!

 

adam-gilchrist-inmarathi

 

यष्टिरक्षकाचे ग्लोज आणि पॅड्स घातलेला प्रवीण या डान्स पुढे फिका पडला. चर्चा झाली ती फक्त आणि फक्त गिलीची… यष्टीरक्षणाचे असंख्य विक्रम ज्याच्या नावावर होते, त्यानं पहिल्याच चेंडूवर बळी घेतला.

एकही धाव न देता १ गडी बाद करून एक अनोखा विक्रम रचणारा हा पहिलावहिला खेळाडू ठरला…

गिलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आणि अर्थातच चाहत्यांच्या संख्येत नव्याने भर पडली

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?