' बळीराजाला अक्षरशः रडवणाऱ्या कांदा समस्येवर तरुणीने शोधला नामी उपाय!

बळीराजाला अक्षरशः रडवणाऱ्या कांदा समस्येवर तरुणीने शोधला नामी उपाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतातील शेती हा शेतकऱ्यांकडून खेळला जाणारा जुगार आहे. बेभरवशाचा मौसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, उत्पादकांना योग्य भाव न मिळणं, मजुरांची टंचाई, मजुरीचे वाढलेले दर, चढ्या भावाने होणारी खतांची विक्री, बँकांकडून कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी, खासगी सावकारीचा वेढा, नैराश्यातून वाढलेलं आत्महत्त्यांचं प्रमाण अशा नाना समस्यांनी वेढलेल्या शेतकऱ्यांना शेती नको म्हणायची वेळ आली आहे.

हे कमी म्हणून की काय निर्यातबंदी, आयात धोरण यांनी शेतकऱ्यांना जगणं अवघड करुन सोडलं आहे. कांदा उत्पादक शेतकरी तर हैराण झाले आहेत.

कधी कांद्याचं उत्पादन वाढतं…कधी कमी होतं, लागली तर लाॅटरी नाहीतर कचरा अशी अवस्था या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. हे लहानपणापासून बघत असलेल्या एका तरुणीने काय कमाल केली हे वाचून लोक नक्की प्रेरीत होतील.

लासलगाव हे गाव कांद्यासाठी आशिया खंडात सुप्रसिद्ध आहे. येथेच लहानाची मोठी झालेली कल्याणी शिंदे. काँप्युटर सायन्सची पदवी घेतलेल्या कल्याणीने लहानपणापासून कांद्याची लागवड, बाजारभावात तेजीमंदीने येणारे चढ उतार हे पाहून शिक्षण पूर्ण झाल्यावर या समस्येवर काही तरी तोडगा काढला पाहिजे असा विचार केला.

 

godaam innovation inmarathi

 

कांद्याच्या दरात एकतर इतकी तेजी यायची की जॅकपॉट वाटावा, नाहीतर दर इतके कोसळत की पिकाची माती व्हावी. हा दोलक बाजारभावात ८००% पर्यंत वाढ करायचा किंवा घट करायचा. ही टक्केवारी म्हणजे अगदी जीवघेणी ठरावी.

नाशिक जिल्हा कांदा उत्पादन आणि द्राक्ष लागवड यासाठीच प्रसिद्ध. कांद्याच्या प्रमाणातच तिथे द्राक्षांच्या बागा, पण या अनियमितता असलेल्या बाजारामुळे शेतकऱ्यांना दे माय धरणी ठाय करुन सोडलं.

आजही या आशेवर शेतकरी कांदा पिकवतात, की आज नाही तर पुढे हा तोटा भरुन निघेल आणि आपल्या उत्पन्नात घसघशीत वाढ होईल. हे लक्षात घेऊन कल्याणी शिंदेनं यावर एक उपाय शोधून काढला.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फाऊंडेशनकडून नाशिक पीक प्रकल्पासाठी तिची निवड झाली. या प्रकल्पावर काम करत असताना २३ वर्षाच्या या तरुणीला एक महत्त्वाचा भाग लक्षात आला, चांगल्या पीकाला देशी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मागणी आहे. मग अडचण कुठे येते? तर साठवणूक करताना! त्यावर तोडगा म्हणून तिनं गोदाम इनोव्हेशन चालू केलं.

गोदामचं काम कसं चालतं?

 

godaam innovation inmarathi1

 

कांद्याचं पीक घेताना लावण, पेरणी, काढणी, कांदा वेचणं हे सारं साधारण १२० दिवसांत होतं. मग साठवणीसाठी कांदा गोदामात पाठवला जातो. त्याठिकाणी तो सडण्याचा धोका असतो.

यांचा अभ्यास करताना कल्याणीच्या लक्षात आलं, दहा किलो कांदा जेव्हा शेतकरी साठवणूक करण्यासाठी गोदामात पाठवतो, तेव्हा त्यातील ४०-५०% कांदा खराब होतो. या समस्येवर उपाय योजना गरजेची आहे हे तिला जाणवलं.

त्यासाठी तिने IOT तंत्रज्ञान वापरुन उपकरण तयार केलं. यामुळे गोदामातील खराब झालेल्या कांद्याचा वास ओळखून ते कांदे बाजूला काढून इतर कांद्याची नासाडी टाळता येणं शक्य झालं. त्यानं कांदा खराब होण्याचं प्रमाण ५० टक्क्यावरुन २५ टक्के कमी झालं.

शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असल्यामुळे कल्याणीला शेतकरी लोकांच्या अडचणींची तंतोतंत माहिती होती. त्यामुळे तिने लासलगाव बरोबरच इतर ठिकाणी असणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या प्रकल्पात सहभागी करुन त्यांची समस्या सोडवायची तयारी दाखवली.

 

onion farmers inmarathi

 

बरं, नुसतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नव्हे, तर लसूण उत्पादकांना पण यात तिने सामिल करुन घेतलं आहे. नाफेड, नाबार्ड यांच्याही महत्त्वपूर्ण सहभागाने हा प्रकल्प तिनं यशस्वीपणे राबविला आहे.

सध्या कल्याणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. त्यापैकी ८०% शेतकरी पारंपरिक पद्धतीने कांद्याची साठवण करतात. आता गोदाम इन्व्हेन्शन कडून या गोदामात हवा खेळती रहाण्यासाठी, कांद्यातील पाण्याचे प्रमाण ३०% पर्यंत रहावे यासाठी आणि गोदामाचं स्वरुप बदलण्याची गरज लक्षात घेऊन त्यानुसार त्यात बदल करण्यात आला.

कल्याणीने शोधून काढलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर करून हे उपकरण जोडल्यामुळे मुळात खराब झालेले कांदे, वातावरणातील सूक्ष्म बदल शेतकऱ्यांना माहिती होऊन त्यानुसार पुढील निर्णय घेणं सोपं जातं. खराब कांदा आधीच काढून टाकला, की इतर कांद्याची नासाडी टाळणं शक्य होतं.

 

onion farmers inmarathi1

 

गोदामातील साठवण क्षमता लक्षात घेऊन उच्च क्षमता, मध्यम क्षमता आणि कमी क्षमतेची गोदामे यांना त्यानुसार सर्व्हिस देण्यासाठी पॅकेजेस दिली आहेत. त्या गोदामांना सोलर पॅनल जोडून दिलं आहे.

गेल्या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री कै. अरुण जेटली यांनी या प्रकल्पाचा उल्लेख आपल्या भाषणात अतिशय कौतुकास्पद प्रकल्प असा केला होता. त्याचं नामकरण त्यांनी “आॅपरेशन ग्रीन” असा केला होता.

भविष्यात अशी तंत्रज्ञान वापरुन बनवलेली गोदामं असणं हे खरोखरच आवश्यक आहे आणि त्याच्या वापराने शेतकऱ्यांना आजवर जे नुकसान सोसावे लागले आहे ते सोसावं लागणार नाही.

आपल्या देशातील बुद्धिमान तरुण पिढी परदेशात जाऊन आपल्या बुद्धीच्या जोरावर परदेशाला नवनवीन तंत्रज्ञान विकसित करायला मदत करते, पण कल्याणी सारखे लोक आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशबांधवांना होईल असा विचार करुन त्यावर काम करतात. अशाच हुशार पिढीनं आपला देश प्रगतीपथावर न्यायचं व्रत पुढं चालू ठेवलं आहे,  याहून अधिक आनंददायी गोष्ट काय असू शकते?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?