' मृत्यूला हसत हसत आलिंगन देणा-या महाराष्ट्राच्या या सुपुत्राला सलाम!

मृत्यूला हसत हसत आलिंगन देणा-या महाराष्ट्राच्या या सुपुत्राला सलाम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्वीकारले.

त्या क्रांतिकारांकांची आठवण होताच तीन चेहरे आपसूकच डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे –भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव!

 

sukhdev inmarathi

 

भगतसिंगांबद्दल तर सगळेच जाणतात. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे तरुणांसाठी नवचैतन्याचे प्रतिक आहे.

सुखदेव यांचा जीवनप्रवास देखील लोकांना माहित आहे.

पण राजगुरू नावाचे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व मात्र अजूनही लोकांपर्यंत म्हणावे तितके पोचलेले नाही.

एक क्रांतिकारक म्हणून ते कसे घडले? त्यांची पार्श्वभूमी काय? याबद्दल आजही सामान्यजण अनभिज्ञ आहेत.

आज हीच अनभिज्ञता दूर करण्यासाठी आम्ही उलगडतोय या थोर क्रांतिकारकाची ‘अज्ञातगाथा’!

 

rajguru-inmarathi

स्रोत

 

 

आपण जरी यांना राजगुरू म्हणून ओळखत असलो तरी त्यांचे पूर्ण नाव होते ‘शिवराम हरी राजगुरू’!

लहानपणी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने देखील हाक मारली जायची.

राजगुरू म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र! २४ ऑगस्ट१९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड गावात त्यांचा जन्म झाला.

अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्ती या दोन गुणांचे त्यांना जणू वरदान लाभले होते.

देशस्थ ब्राह्मण कुटुंबातील असल्याने ग्रंथांशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यातूनच त्यांच्या बुद्धीला देखील खाद्य पुरवले जात होते.

वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडले. घर सोडण्यामागे त्यांचे कारण देखील वेगळे होते. इंग्रजी विषयात नापास झाल्याने मोठ्या भावाने त्यांना आपल्या नववधूसमोर इंग्रजी धडा वाचायची शिक्षा सुनावली. अर्थातच राजगुरूंना ते काही जमले नाही आणि झाला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला.

शेवटी संधी साधून जसे होते तसे, आईने तेल आणायला दिलेले ९ पैसे आणि बहिणीने अंजीर आणायला दिलेले २ पैसे असे एकूण ११ पैसे घेऊन त्यांनी घरातून धूम ठोकली ती कायमचीच!

सर्वप्रथम त्यांनी नाशिकला काही काळ वास्तव्य केले आणि नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय वातावरणात आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले.

काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे साऱ्या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असतं.

याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूंचे निडर व्यक्तिमत्त्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले.

त्या क्रांतिमय वातावरणात वावरताना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला.

कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असतं. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.

 

rajguru-inmarathi
http://www.indiaonline.in

 

याचवेळेस शिव शर्मा नावाच्या एका सहकाऱ्यासोबत दिल्लीमधील एका फितुराला ठार करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली. पण पिस्तुल एकच असल्याने पंचाईत होती. कारण तो फितूर क्वचितच घराबाहेर पडत असे.

त्यामुळे जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हाच त्याला मारणे सोयीचे होते. त्यासाठी दोघांकडे पिस्तुल असणे आवश्यक होते, अन्यथा जोखीम पत्करावी लागली असती.

राजगुरूंना थांबायला सांगून शिव शर्मा पिस्तुल आणण्यासाठी लाहोरला गेले. पण त्यांना पिस्तुल काही मिळाली नाही.

जवळपास तीन दिवसांनी ते दिल्लीला परतले आणि फितुराच्या घराजवळ पाहतात तो काय भलामोठा पोलीस पहारा आणि सर्चलाईट्स होत्या.

शिव शर्मा  काय समजायचे ते समजले.

तो फितूर संध्याकाळच्या वेळेस ७ ते ८ च्या दरम्यान बाहेर पडत असे. त्याच संधीचा फायदा घेऊन राजगुरूंनी एकट्याने मोहीम फत्ते केली होती.

पाठी लागलेल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवीत राजगुरू पळत मथुरेच्या दिशेने निघाले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी दिल्लीच्या पुढील दोन स्थानके काळ्याकुट्ट अंधारात रेल्वे पटरींतून पळत पार केली.

पुढे राजगुरूंनी केलेली अजून एक जबरदस्त कामगिरी म्हणजे सॉंंडर्सचा वध होय.

पंजाबकेसरी लाल लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला.

राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालीवर पाळत ठेवून होता. पण ४-५ दिवस स्कॉट त्या भाग आलाच नाही.

अखेर दुसऱ्या दिवशी एक गोरा अधिकारी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून त्याने दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरूंना खुण केली.

पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली, परंतु राजगुरूंचं त्यांच्याकडे लक्षच नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरूंनी त्या गोऱ्या अधिकाऱ्यावर गोळी झाडली.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गोऱ्या अधिकाऱ्याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पाडण्यात मात्र ते यशस्वी झाले.

नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून सॉंंडर्स होता. माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले.

 

rajguru-inmarathi
http://indiatoday.intoday.in

 

इकडे मारेकऱ्यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते, पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळ्या एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले.

पुन्हा काशीत परतल्यावर राजगुरू उघडपणे वावरू लागले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत आणि १९२९ सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.

त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरूंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते.

पुढे कारावासात शिक्षा भोगत असताना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपलं क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही.

अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ.स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या निखाऱ्यांची धग विझली.

त्यांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.

 

rajguru-inmarathi
http://guruprasad.net

 

स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपार्वात अढळ करणाऱ्या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “मृत्यूला हसत हसत आलिंगन देणा-या महाराष्ट्राच्या या सुपुत्राला सलाम!

 • October 28, 2017 at 11:05 am
  Permalink

  धन्यवाद खुप सविस्तर आणि
  अप्रतिम लिखाण केलं
  सुंदर खुप खुप धन्यवाद

  Reply
 • March 23, 2018 at 3:37 pm
  Permalink

  प्रेरणादायी लेख!

  Reply
 • April 23, 2020 at 8:44 pm
  Permalink

  nice

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?