' "त्या"दिवशी इंदिरा गांधींनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलं नव्हतं, कारण....

“त्या”दिवशी इंदिरा गांधींनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलं नव्हतं, कारण….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

३१ ऑक्टोबर १९८४. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. आपल्या नेतृत्वकौशल्याने आणि धडाडीने जगभर भारताचे नाव पुढे नेणाऱ्या माजी पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली!

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या असलेल्या इंदिरा गांधी १९५५ पासून राजकारणात सक्रिय होत्या. १९६४ साली पंडित नेहरूंच्या निधनानंतर त्या राज्यसभेवर नियुक्त झाल्या. त्याबरोबरच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.

१९६६ साली त्यांनी भारताच्या ३ ऱ्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आपल्या कारकीर्दीत त्यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये इंदिरा गांधींची गणना होते.

 

indira gandhi featured inmarathi

 

१९७१ सालचे युद्ध, त्यातून झालेली बांगलादेशची निर्मिती, सिमला करार, पोखरणची अणुस्फोट चाचणी, १९८३ चे ऑपरेशन ब्लू स्टार या इंदिरा गांधींच्या कार्यकाळात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना होत.

१९७७ साली जाहीर केलेल्या आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान पदापासून दूर व्हावे लागले, परंतु १९८० साली पुन्हा त्या बहुमताने निवडून आल्या आणि त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली.

याच दरम्यान भारतात खलिस्तानवादी चळवळ वाढू लागली होती. पंजाब व आसपासचा प्रदेश स्वतंत्र खलिस्तान म्हणून घोषित करण्यासाठी ही चळवळ होती.

खलिस्तानवादी अतिरेकी जर्नलसिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध इंदिरा गांधींच्या निर्देशांनुसार भारतीय सैन्याने ऑपरेशन ब्लू स्टार राबवले. यात शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अमृतसर येथील सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई केली गेली.

याचाच सूड म्हणून पुढे ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये प्रमुख भूमिका असणाऱ्या दोन व्यक्तींची म्हणजेच स्वतः इंदिरा गांधी आणि तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य यांची हत्या करण्यात आली.

 

indira gandhi death inmarathi 1

हे ही वाचा – इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्यात ‘ह्या’ तमिळ नेत्याचा “सिंहाचा” वाटा होता!

३१ ऑक्टोबरचा दिवस इंदिराजींसाठी नेहमी प्रमाणेच होता. रोजच्या कामाव्यतिरिक्त आज त्यांना एक मुलाखतही द्यायची होती. पीटर उत्सिनोव्ह हा एक इंग्लिश मुलाखतकार त्यांची मुलाखत घेणार होता. आपल्या नियमित दिनचर्येप्रमाणे इंदिराजी तयार झाल्या.

ऑपरेशन ब्लू स्टार झाल्यानंतर इंदिराजी उग्रवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून समजले होतेच. त्यामुळे बाहेर फिरताना त्या कायम बुलेटप्रूफ जॅकेट वापरत असत, पण आज त्यांना आपल्या कार्यालयातच मुलाखत द्यायची होती आणि तिचे चित्रीकरणही होणार होते. मुलाखतीला बुलेटप्रूफ जॅकेट घालून बसणे योग्य दिसणार नाही, म्हणून त्यांनी त्या दिवशी जॅकेट परिधान केलेले नव्हते.

दररोज सकाळी इंदिराजींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉ. माथूर येत असत. १९६६ साली इंदिराजी पंतप्रधान झाल्यापासून हा क्रम ठरलेला होता. ३१ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे डॉ. माथूरांनी इंदिराजींची तपासणी केली.

बोलता बोलता सहजच डॉ. माथूरांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा उल्लेख केला. “टाइम” या प्रसिद्ध अंकात आलेल्या माहितीनुसार, रोनाल्ड रेगन कोणत्याही मुलाखतीपूर्वी मेकअप करत नाहीत, असे ते बोलताना म्हणाले.

त्याच वेळेस इंदिराजींच्या स्वीय सहाय्यक त्यांना तयार होण्यासाठी मदत करत होत्या. इंदिराजींनी माथूरांचे म्हणणे खोडून काढत सांगितले, की ही माहिती निव्वळ छापील असून त्यात काही तथ्य नाही.

रेगन हे प्रत्येकाप्रमाणेच मेकअप करतात, इतकेच नव्हे तर कानात एक मायक्रोफोनही वापरतात. जर मुलाखतीत कोणता अडचणीचा प्रश्न आला, तर त्यांचे सहकारी मायक्रोफोन मधून त्यांना त्याचे उत्तर देण्यास मदत करू शकतील.

इंदिराजींची माहिती ऐकून डॉ. माथूर यांना आश्चर्य वाटले. नेहमीप्रमाणेच हास्यविनोदात त्यांची ही नैमित्तिक भेट संपली आणि इंदिराजी मुलाखतीसाठी रवाना झाल्या.

 

indira gandhi inmarathi

 

इंदिराजींचे निवासस्थान दिल्लीतील १, सफदरजंग रोड हे होते. त्यांचे कार्यालय तेव्हा तिथूनच जवळ १, अकबर रोड येथे होते. निवासस्थान आणि कार्यालय दोन्हीही जवळजवळ असल्याने शक्यतो इंदिराजी पायीच कार्यालयात जात.

डॉ. माथूरांचा निरोप घेऊन त्या कार्यालयाकडे निघाल्या. त्यांच्यासह दिल्ली पोलिसांचा एक कॉन्स्टेबल, त्यांचे स्वीय सचिव राजेंद्र कुमार धवन, आणखी एक शिपाई आणि एक पोलीस एवढे लोक होते.

त्यांचा अंगरक्षक बिअंत सिंग त्यांना सामोरा आला. याआधी ९ वर्षे बिअंत सिंग इंदिराजींच्या सुरक्षेत होता. इंदिराजींच्या परदेश दौऱ्यातही तो त्यांच्या बरोबर असे.

त्या दरम्यान भारताची गुप्तचर संस्था RAWचे प्रमुख आर. एन. काव यांनी बिअंत सिंग आणि इतर शीख अंगरक्षकांना इंदिराजींच्या सुरक्षाव्यवस्थेतून काढण्याची शिफारस केली होती, पण इंदिराजींनी मात्र “माझा माझ्या शीख सुरक्षा रक्षकांवर पूर्ण विश्वास आहे” असे सांगून त्यांना कायम ठेवले होते.

समोर बिअंत सिंगला पाहून इंदिराजींना तो नेहमीप्रमाणे नमस्कार करेल असे वाटले, पण प्रत्यक्षात बिअंत सिंगने आपले सर्व्हिस रिव्हॉल्वर काढले आणि इंदिराजींवर रोखले. पुढचे काही कळायच्या आत त्याने पिस्तूलातील गोळ्या इंदिराजींवर झाडल्या.

 

indira gandhi inmarathi1

 

तेवढ्यात तेथे अजून एक रक्षक, सतवंत सिंग आला. अवघ्या २२ वर्षांच्या सतवंत सिंगनेही आपली बंदूक इंदिराजींवर रोखली. बिअंत सिंगने ओरडून त्याला गोळी चालवायला सांगितले. भारताच्या तिसऱ्या पंतप्रधानांची राहत्या निवासस्थानी निर्घृण हत्या करण्यात आली.

सोनिया गांधी आणि धवन यांनी इंदिराजींना एम्स मध्ये दाखल केले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

या घटनेनंतर बिअंत सिंगने स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तो फसला, पण जवळच असणाऱ्या आयटीबीपी जवानांनी त्याला जागीच ठार केले.

सतवंत सिंग आणि यात सहभागी असणाऱ्या केहर सिंग यांना पकडण्यात आले आणि खटला चालवून न्यायालयाच्या निर्णयानुसार फाशी देण्यात आले.

नेमके त्या दिवशी इंदिराजी मुलाखत असल्याने बुलेटप्रूफ जॅकेट घालून बाहेर पडल्या नाहीत. जर नेहमी प्रमाणे त्यांनी जॅकेट घातले असते, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते, इंदिराजी वाचू शकल्या असत्या.

ज्या ठिकाणी इंदिराजींवर गोळ्या झाडल्या गेल्या त्या त्यांच्या निवासस्थानी सफदरजंग रोड येथे आता त्यांचे स्मारक उभारले आहे.

===

हे ही वाचा – “आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘ह्या’ चुका त्यांना प्रचंड महागात पडल्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?