'वयाच्या १०५ व्या वर्षीही या आजी करतायत असं काही, की सगळीकडे होतंय कौतुक!

वयाच्या १०५ व्या वर्षीही या आजी करतायत असं काही, की सगळीकडे होतंय कौतुक!

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा शेतीप्रधान देश आहे. संपूर्ण जगाला शेतीबद्दलचं ज्ञान हे भारताकडूनच मिळालं आहे असं म्हटल्यास चूक होणार नाही. भारतात जितक्या वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन घेतलं जातं, तितकं क्वचितच इतर कोणत्या देशात होत असावं.

प्रत्येक प्रांतातील भौगोलिक वातावरण हे त्या भागातील महत्वाचं अन्न कोणतं असेल ते ठरवत असते. जसं की, भारताच्या दक्षिणेकडे भाताचं उत्पादन जास्त घेतलं जातं. उत्तरेकडे गहू, डाळ या अन्नपदार्थांचं उत्पादन जास्त घेतलं जातं.

भारतात झालेल्या ‘हरित क्रांती’नंतर शेतीमुळे किती तरी लोकांना उत्पन्नाचं एक साधन निर्माण झालं आहे. सध्या असलेल्या अस्थिर आर्थिक वातावरणात सुद्धा आपण बघत आहोत, की कित्येक लोक हे नोकरी करतांना शेतीकडे सुद्धा तितकंच लक्ष देत आहेत.

काही कारणास्तव ज्या लोकांना मागच्या सहा महिन्यात जॉब सोडावा लागला ते लोक सुद्धा आनंदाने शेती करत आहेत. पारंपरिक शेती पद्धती सोबतच मागच्या काही वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करणे हे सुद्धा खूप लोकप्रिय होत आहे.

तमिळनाडू मधलं उदाहरण म्हणजे एक १०५ वर्षांच्या आजी या स्वतः सेंद्रिय शेतीद्वारे स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. होय, १०५ वर्ष. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल!

 

pappamal grandmother inmarathi

 

पपम्मल आज्जी या तमिळनाडू मधील कोईम्बतूर येथे राहतात. १०५ व्या वर्षी अडीच एकर शेतीमध्ये एकट्या काम करतात. दुपारी त्यांना कोणी फोन केला तर, स्वतः फोन उचलतात आणि सांगतात, “मी सध्या शेतात काम करत आहे. मी तुमच्याशी संध्याकाळी बोललं तर चालेल का?”

१९१४ मध्ये जन्म झालेल्या पपम्मल आज्जी यांचा जन्म देवळापुरम या तमिळनाडू मधील गावात झाला. त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू त्यांच्या लहानपणीच झाला. थेक्कमपट्टी इथे राहणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या आईकडे त्या राहत होत्या.

पपम्मल आज्जी यांच्या दिनचर्येकडे आणि उत्साहाकडे बघितलं, की “age is just a number” चा प्रत्यय नक्की येतो. मागच्या एका शतकात त्यांनी दोन महायुद्ध, भारताचा स्वातंत्र्य लढा, कित्येक नैसर्गिक अडथळे आणि सध्या असलेल्या कोरोना सारखी वैश्विक महामारी त्यांनी बघितली आहे.

एक महिला असूनही त्यांना कधीच कोणत्या कौटुंबिक किंवा शारीरिक अडचणींमुळे घरातच थांबावं लागलं नाही. त्यांनी जे ठरवलं ते नेहमीच मिळवलं. पपम्मल आज्जींनी त्यांच्या जगण्यातून सर्वांना जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला आहे.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, की त्यांच्या लहानपणी त्या शाळेत कधीच जाऊ शकल्या नाहीत. त्या ‘पल्लगूझी’ या दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या खेळातून गणित शिकल्या. त्या काळात एखादी व्यक्ती पाचवी पर्यंत शिकली, की शिक्षक होण्यासाठी पात्र असायची. लहानपणी पासूनच पपम्मल आज्जी यांना शेती करण्याबद्दल खूप कुतूहल होतं.

 

pappamal grandmother inmarathi2

 

५० वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या आईचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांनी थेक्कमपट्टी या गावात त्यांनी एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं आणि तिथे त्या एक स्नॅक्स सेंटर चालवायच्या.

लहानपणापासूनच बचतीची आवड असलेल्या पपम्मल आजींनी पैसे बचत करून दहा एकर जमीन विकत घेतली. कणीस, डाळी, फळं, भाज्यांचं उत्पादन त्या घेऊ लागल्या.

काही वर्षांनी त्यांनी तमिळनाडू शेतकीय विद्यापीठात प्रवेश घेतला आणि शेतीचं रीतसर शिक्षण घेतलं. या अभ्यासक्रमात पपम्मल आज्जी शिक्षकांना खूप प्रश्न विचारायच्या आणि त्यामुळे त्या पूर्ण विद्यापीठात सगळ्यांच्या ओळखीच्या झाल्या होत्या.

विद्यापीठाचे कुलगुरू पपम्मल आज्जी यांना ‘सगळ्यात वयस्कर शेतकरी’ म्हणून हाक मारायचे.

 

pappamal grandmother inmarathi1

 

आज पपम्मल आज्जी यांना विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जातं. वाढत्या वयोमानामुळे १० एकर शेतीपैकी त्या आता केवळ अडीच एकर शेतीचं काम बघतात. आज आपली पिढी ‘५० व्या वर्षी निवृत्त व्हावं’ असं म्हणते, त्याच वेळी पपम्मल आज्जीसारख्या व्यक्ती सेंद्रिय शेतीसारखं उशिरा फळ दिसणारं क्षेत्र निवडतात हे सर्वांसाठीच एक आश्चर्य आहे.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा पपम्मल आज्जी यांनी वयाची शंभरी गाठली, तेव्हा ग्रामपंचायतीने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा जवळपास ३००० हून अधिक लोकांनी त्यांचा सहभाग नोंदवला होता. गावात आजींचे होर्डिंग लावण्यात आले होते. आज गावात होणाऱ्या प्रत्येक लग्नाला पपम्मल आज्जी यांना आशीर्वाद देण्यासाठी नेलं जातं.

आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी कित्येक लोकांना प्रेरित केलं. थेक्कमपट्टी गावातील प्रत्येक राजकीय व्यक्ती आजींचा आशीर्वाद घ्यायला नेहमीच त्यांच्या घरी येत असतात.

१०५ वर्ष वय असलेल्या पपम्मल आज्जी या आजही तितक्याच उत्साही आहेत. कठीण परिश्रमाला पर्याय नाहीये हे त्या नेहमी सांगतात. वाढत्या वयानुसार कामाचा कंटाळा न करता स्वतःला कामात झोकून देऊन सुंदर आयुष्य कसं जगता येऊ शकतं याचं पपम्मल आज्जी या मूर्तिमंत उदाहरण आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?