' गरोदरपणात झोपावं कसं? काय काळजी घ्यावी? शांत झोपेसाठी टिप्स!

गरोदरपणात झोपावं कसं? काय काळजी घ्यावी? शांत झोपेसाठी टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

ईश्वराची सर्वात मोठी निर्मिती म्हणजे आई! आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. एका जीवातून दुसरा जीव तयार करणं हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे.

आपल्याच रक्त मांसावर एक जीव पोटात नऊ महिने सांभाळायचा आणि प्राणांतिक वेदना सहन करुन त्या बाळाला सही सलामत जगात आणायचं हे काम आईच करते.

बाळाचं वाढणं, पोटातल्या पोटात त्याचं फिरणं, लाथा मारणं हे गोड अनुभव केवळ आईच घेऊ शकते.  त्या दिवसांत असलेले ते गोड अनुभव ती जन्मभर मनात सांभाळून ठेवते. पुरुष मात्र फक्त हे ऐकू शकतो आईकडून.. बाळ कसं करतं.. ती अनुभूती मात्र फक्त नी फक्त आईलाच येते.

 

pregnant women inmarathi

 

ती गरोदर असल्याची बातमी समजल्यानंतर अवघं घर आनंदात न्हाऊन निघत असतं. कुणाला डोहाळे कडक असतात. कुणाला अगदी सहजावारी गरोदरपण लाभतं. मग डोहाळे जेवणं करुन कौतुकाचा वर्षाव केला जातो. चांदण्यातलं, बागेतलं, नावेतलं अशी नवलाईची कौतुकं निव्वळ आईच्याच वाट्याला येतात.

सुखाचे हे सुख अशीच आयुष्यातील ती अवस्था असते. कुणाचं गरोदरपण कसलाही त्रास न होता सहजसोपं असतं. त्यात पहिलीच वेळ असेल तर मग विचारायलाच नको.

हे ही वाचा

===

 

हा आई होण्याचा अनुभव नवा असतो. काही गोष्टी समजत नसतात. हार्मोन्समध्ये बदल होत असतात. मनाची अवस्था वेगवेगळ्या पातळीवर बदलते. शरीरात बदल होत असतात. झोप लागणं कमी होतं. पोट जसजसं मोठं होऊ लागतं तसतसं हालचालींवर मर्यादा येऊ लागतात.

मुख्य प्रश्न पडतो तो झोपण्याचा. गर्भवतीने कसं झोपावं? ज्यामुळे तिला पोटावर ताण येणार नाही. खूप मुलींना पालथं झोपायची सवय असते. त्यांना हा बदल अंगवळणी पडताना, त्याच्याशी जुळवून घेत असताना जागरुक रहावं लागतं. झोपेच्या तक्रारी वाढतात. नीट झोपता येत नाही. शांत झोप लागत नाही अशा नाना तऱ्हेच्या बदलांना या दिवसांत तोंड द्यावं लागतं.

 

pregnancy inmarathi

 

जर शांत झोप नाही झाली तर पित्त वाढतं, दिवसभर सुस्तपणा राहतो. हे होऊ नये म्हणून काय कराल? कशी मिळेल गर्भवतीला शांत झोप?

पहिल्या तीन महिन्यांत झोपेचा फारसा त्रास होत नाही. कारण गर्भाची वाढ झालेली नसते. पोट वाढायला सुरुवात झालेली असते, पण त्यामुळे काही झोपण्यावर फार मर्यादा येत नाहीत.

तीन महीने झाले की थोडं थोडं पोट दिसू लागतं. त्याचवेळी जसं जसं बाळ वाढू लागतं, तसं तसं आईचं पोट वाढू लागतं. मग सैल कपडे घालायची गरज वाटू लागते. घरी असलेल्या आज्या, मावशा, सगळ्यांचे याबाबत विविध प्रकारचे सल्ले देऊन होतात.

पालथी झोपू नकोस गं असं आई, आजी मावशी सांगतात. कारण या काळात बाळाची वाढ सुरू झालेली असते. जर आई पालथी झोपली, तर त्याचा परिणाम गर्भाशयावर दाब येऊन ते संकुचित होऊ शकतं आणि त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो.

पाचव्या महिन्यापासून मात्र गर्भवती महिलेचं‌ पोट चांगलंच वाढायला लागतं. अगदी पहिल्या तीन महिन्यांत जराही न दिसणारं पोट पाचव्या महिन्यापासून वाढायला सुरुवात होते. ते दिसू लागतं. ती गरोदर आहे हे लक्षात येईल इतपत पोट दिसू लागतं. तिच्या हालचालींवर थोडीशी मर्यादा येऊ लागते.

 

हे ही वाचा

===

 

pregnancy inmarathi2

 

 

या दरम्यान ती पालथी झोपूच शकत नाही, पण तिला उताणं झोपण्यावरही मर्यादा येतात. बाळ वाढू लागलेलं असतं. पाठीवर, मणक्यावर थोडा ताण यायला लागतो. मग ती आडवी झाली, की सासूबाई, आई, आजी या घरातील अनुभवी बायका तिला पाठीवर झोपू नको असं सांगतात.

याचं कारण असं, बाळाच्या वजनानं आणि उताणं, पाठीवर झोपल्यामुळं महाधमनी संकुचित होऊ शकते. ही महाधमनी हृदयापासून संपूर्ण शरीरभर रक्तपुरवठा करायचं काम करत असते. जर ती संकोच पावली, तर शरीराच्या खालच्या बाजूला म्हणजे गर्भाशय, पाय यांना रक्तपुरवठा कमी होतो.

हे होऊ नये म्हणून एका कुशीवर झोपावे. डाव्या उजव्या कुशीवर आलटून पालटून झोपलं, तर हा रक्तपुरवठा सुरळीत होतो, पण कधीकधी पाठ दुखू लागते तेव्हा पाठीवर झोपावसं वाटतं. अशावेळी पाठीखाली उशी घ्यावी म्हणजे शरीर १५ अंशाने तिरके होते. बाळाचा भार महाधमनीवर येत नाही आणि रक्तपुरवठा सुरळीत होतो.

यानंतर आठवा आणि नववा महिना हे बाळंतपणाआधीचे जास्त काळजी घेण्याचे महिने. बाळाची वाढ वेगाने होत असते. काही कमी जास्त होऊन बाळंतपण वेळेआधी करावे लागू नये म्हणून काळजी घ्यावी लागते.

आता तंत्रज्ञानात विलक्षण सुधारणा झाल्या आहेत. वेळीच मिळालेले उपचार आई आणि बाळ दोघांसाठीही वरदान आहेत, पण नैसर्गिकरित्या बाळ जन्मलं तर कधीही उत्तमच असतं.

या आठव्या आणि नवव्या महिन्यात गर्भवती स्त्रीची झोप खूप कमी होते. बाळाची वाढ झालेली असल्यामुळे गर्भाशय मोठं होतं आणि त्याचा दाब मूत्राशयावर येऊन वारंवार लघवीला जावे लागते, मग या दिवसांत झोपत असताना अजून थोडीशी काळजी घ्यावी लागते.

या काळात डाव्या कुशीवर झोपणं हे जास्त श्रेयस्कर. कारण या शेवटच्या टप्प्यात गर्भाशय वाढून उजवीकडं सरकलेलं असतं. त्यामुळे जर गर्भवती महिला उजव्या कुशीवर झोपली, तर महाधमनीवर दाब निर्माण होतो आणि रक्तपुरवठा कमी होतो. काही त्रास होऊ नये म्हणून डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि कसलाही त्रास उद्भवत नाही.

 

pregnancy inmarathi1

 

थोडक्यात सांगायचं तर, गरोदरपण, बाळंतपण या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टी आहेत. एका मुलीला पूर्ण स्त्री बनवणारा हा एक टप्पा आहे. हा टप्पा आनंददायी अनुभव ठरावा यासाठी काळजी घ्यावी लागते.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?