' ‘हजार’ म्हणण्याऐवजी सध्या 4k, 5k असं म्हटलं जातं, हा ‘k’ आलाय कुठून? – InMarathi

‘हजार’ म्हणण्याऐवजी सध्या 4k, 5k असं म्हटलं जातं, हा ‘k’ आलाय कुठून?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताने जगाला शून्याची देणगी दिली, हे आपण जाणतोच. हाच शून्य ज्यावेळेस एखाद्या अंकाच्या उजव्या बाजूस जाऊन बसतो, तेव्हा त्याची किंमत दसपटीने वाढते. दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र अशा प्रकारे आकड्याच्या पुढे १८ वेळेस शून्य येईपर्यंतची गणना आपण भारतीय गणितानुसार करू शकतो.

इंग्लिशमध्येही hundred, thousand, million, billion अशा प्रकारे संख्यांची गणना केली जाते. यांपैकी Thousand हा शब्द लिहिताना मात्र बऱ्याच वेळेस तो ८ अक्षरी पूर्ण शब्द न लिहिता k हे अक्षर लिहिले जाते. उदा. 1000 = 1k. हे लघुरुप सर्रास वापरले जाते.

 

why we use k inmarathi1

 

तसे पाहिले, तर Thousand या शब्दात k या अक्षराचा मागमूस देखील नाही. असे असूनही या शब्दाचे लघुरुप हे k असे केले जाते, आहे की नाही गंमत! यामागेही एक मजेशीर कथा आहे. याचा संबंध इंग्लिशच्या आधी फ्रेंच आणि त्याही आधी ग्रीकांपर्यंत जाऊन पोहचतो. कसा हे आता आपण पाहू!

K या लघुरूपाचे उगमस्थान आत्ताचे नसून फार पुरातन आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, एक ग्रीक शब्द यासाठी कारणीभूत आहे. ग्रीक भाषेत Chilioi (की’लिऑई) हा शब्द Thousand या अर्थी वापरला जातो.

या ग्रीक शब्दाचा अर्थ कालगणनेशी निगडित आहे, पण आणखी खोलात शिरून पाहिले असता या शब्दाचा अर्थ ‘अनिश्चित काळाचे मापन’ असा होतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर हा अर्थ ‘हजार’ असा नसून ‘हजारो’ असा आहे!

काहींच्या मते, याचा संबंध बायबलमध्ये आहे. बायबलमध्ये २०:२ या प्रकटीकरणात “त्याने ड्रॅगनवर, जो सैतानही आहे, नियंत्रण मिळवले आणि त्याला हजारो वर्षे बांधून ठेवले” अशा प्रकारचा एक उल्लेख आहे (He laid hold of the dragon, that serpent of old, who is the Devil and Satan, and bound him for a thousand years).

 

bible inmarathi

 

यात thousand या शब्दाचा मूळ अर्थ ‘अनिश्चित, मोठ्या कालावधीसाठी’ असा होतो. परंतु काळाच्या ओघात thousand या शब्दाचा मूळ अर्थ मागे पडून ‘हजार’ हाच अर्थ रूढ झाला.

ग्रीकांमध्ये वापरला जाणारा chilioi हा शब्द पुढे फ्रेंचांनी आपलासा केला. युरोपात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेची बोलण्याची ढब वेगळी आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या मध्ये फक्त एक इंग्लिश खाडी आहे, पण असे असूनही फ्रेंच भाषा आणि इंग्लिश यात बराच फरक दिसून येतो.

फ्रेंच लोकांनी chilioi या ग्रीसमधून आयात केलेल्या शब्दाचे आपल्या हिशोबाने बारसे केले आणि सुटसुटीत असे ‘kilo’ हे रूप दिले.

इ. स. १७९० नंतर फ्रान्समध्ये मेट्रिक मापन प्रणालीचा उदय झाला. सर्वत्र सोप्या पद्धतीने वापरली जात येईल अशा प्रकारची रचना असलेली ही प्रणाली शेजारच्या ब्रिटनने नाकारली असली, तरी आज जगभर हीच मापन प्रणाली प्रमाण मानली जाते.

 

why we use k inmarathi2

 

या मापन प्रणालीत मोजमापाची परिमाणे १० च्या पटीत बसवली गेली. यात मीटर हे एक एकक असेल तर दहा मीटर म्हणजे डेकामीटर, शंभर मीटर साठी हेक्टोमीटर याचप्रमाणे हजार मीटर साठी ‘किलो’मीटर असे संबोधले जाऊ लागले.

त्यामुळे हजार या संख्येला ‘किलो’ चे संबोधन कायमचे चिकटले! याप्रमाणेच सगळ्या परिमाणांमध्ये किलोलीटर, किलोग्रॅम, किलोटन अशा प्रकारे मापनास सुरुवात झाली. ही मापन प्रणाली जगभर वापरली जात असल्याने ‘किलो’ चा प्रसार सर्वत्र झाला आणि हळू हळू आर्थिक व्यवहारातही या शब्दाने शिरकाव केला.

त्यामुळेच आता एक हजार, दहा हजार, पंधरा हजार यांसाठी 1k, 10k, 15k असे लघुरुप सर्रास वापरले जाते!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?