' ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील संघातही स्थान न मिळालेल्या सूर्यकुमारमुळे आज येतेय अमोल मुझुमदारची आठवण! – InMarathi

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील संघातही स्थान न मिळालेल्या सूर्यकुमारमुळे आज येतेय अमोल मुझुमदारची आठवण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे 

===

राजकारण हे कुठल्याही क्षेत्रापासून दूर राहिलेलं नाही. अगदी छोट्या-मोठ्या कामासाठी आपल्या ओळखीच्या माणसाला संधी देण्यापासून ते मोठ्यामोठ्या कंपनीमध्ये टेंडर भरण्यापर्यंत पर्यंत सगळ्याच क्षेत्रांमध्ये राजकारण होत असलेलं पाहायला मिळतं.

जिथे शिक्षण क्षेत्र सुद्धा या राजकारणापासून दूर नाही, तिथे क्रीडाक्षेत्राची तर बातच सोडा! आपल्या लाडक्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी प्राधान्य देण्याची कर्णधारांची मानसिकता आजवर आपण पाहत आलो आहोत.

सौरव गांगुलीसारख्या उत्तम कर्णधाराने सुद्धा लक्ष्मणला डावलून दिनेश मोंगियाला संघात घेतलंच होतं. २००३ च्या विश्वचषकात भारताने अंतिम फेरीत धडक मारली याची जेवढी चर्चा होती तेवढीच दिनेश मोंगिया त्या संघात का होता हीदेखील होती.

पुढे कॅप्टन कूल अर्थात, सगळ्यांचा लाडका माही कप्तान झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघातील खेळाडू मोठ्या प्रमाणात भारतीय संघात दिसू लागले.

 

msd-jadeja-inmarathi

 

त्यांनी संघात आल्यावर उत्तम कामगिरी केलीच नाही, असं अजिबातच म्हणणं नाही पण जे घडलंय ते नाकारता येणार नाहीच.

सर्रास घडणाऱ्या या अशा गोष्टींमुळे, मग खरोखर लायक असणारा खेळाडू संघाबाहेर राहण्याच्या घटना अगदी सहजपणे घडत असतात. कधीकधी अधिक दर्जा असणारा खेळाडू संघाबाहेर असल्याचं पाहायला मिळतं.

हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणासाठी निवडलेल्या भारतीय संघात ‘सूर्यकुमार यादव’ हे नाव पाहायला न मिळणं. गेली काही वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करणारा सूर्यकुमार आजही ‘इंडियन जर्सी’पासून दूरच आहे.

 

suryakumar-yadav-inmarathi

 

मनीष पांडे या खेळाडूला असंख्यवेळा संधी दिली जाऊ शकते, तर मग सुर्यकुमारला अशी संधी का दिली जाऊ नये हा प्रश्न त्यानिमित्ताने निर्माण होतोच. आयपीएलमध्ये तर गेली काही वर्षे सातत्याने त्याची बॅट तळपते आहे.

अगदी यंदाचीच गोष्ट सांगायची झाली तर, पहिल्या १२ सामन्यांमध्ये ४०च्या सरासरीने त्याने ३५०हून अधिक धावा केल्या आहेत. मॅचविनिंग इनिंग्स सुद्धा खेळल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा संघ जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने ७९ धावांची दमदार खेळी करून दाखवली. त्याला संघात न घेणं चुकीचं आहे हे त्याच्या मुखातून नाही, तर चक्क बॅटमधून ऐकू आलं.

‘या संघात सूर्या नाही’ हाच मुद्दा नाही तर, इतर सुद्धा काही चर्चेचे विषय ठरले. वरुण चक्रवर्तीला अचानक संघात घेणं अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे.

एका सामन्यात ५ गडी बाद केले आणि थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं तिकीट त्याच्या हातात आलं अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु आहे. 

रोहित शर्मा जायबंदी आहे. मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तो आयपीएल सामन्यांमध्येही खेळत नाही हे सुद्धा क्रिकेटप्रेमींनी पाहिलं. असं सगळं असून सुद्धा, ‘रोहितला मुद्दाम संघात स्थान देण्यात आलं नाही का?’ अशी चर्चा घडलीच.

 

rohit-virat-rahul-collage-inmarathi

 

राहुलला उपकर्णधार करणं आणि रोहितला संघातून वगळणे हा कोहलीचा काहीतरी डाव असल्याच्या उलटसुलट चर्चा सुद्धा रंगल्या. यात काही तथ्य नसेलही कदाचित! मात्र अशी शंका भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात येणं, म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय हे मात्र नक्की!

कसोटी उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेला, अंतिम ११ जणांच्या संघात स्थान न देण्याचा कोहलीचा निर्णय सुद्धा कधीकाळी आपण पाहिला आहे. कुठेतरी राजकारण घडतंय असं म्हणायला वाव आहे.

या सगळ्यात वाईट वाटतं ते तिशीत पोचलेल्या सूर्यकुमार यादवसाठी… त्याच्या हातातून वेळ निसटून चालली आहे. ‘भगवान कें घर देर हैं, अंधेर नहीं’ असं म्हटलं जातं, ते मनात ठेऊन त्याला आज ना उद्या संधी मिळेल अशी इच्छा मनात बाळगली आहे.

 

sachin-amol-inmarathi

 

अमोल मुझुमदार हे असंच भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. कधीकाळी सचिनचा संघासहकारी असणारा आणि नंतर रणजी क्रिकेटमधील एक अनमोल हिरा ठरलेला अमोल कधीही भारतीय संघात दिसला नाही.

रणजी संघाचा कप्तान म्हणून सुद्धा सूर्याने भूमिका बजावली आहे. रणजी, दुलीप, मुश्ताक अली आणि अर्थात आयपीएल अशा सगळ्याच स्पर्धांमध्ये तो आपली छाप पाडत आला आहे.

 

surya-yadav-inmarathi

 

भारतीय संघासाठी ‘अमोल’ ठरू शकेल असा हा खेळाडू नव्या पिढीतील ‘अमोल’ ठरू नये, एवढीच माफक अपेक्षा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?