' कोजागिरीला मसाला दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ ग्रहण का करतात? – InMarathi

कोजागिरीला मसाला दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ ग्रहण का करतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दसऱ्यानंतर येणारी अश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच “कोजागिरी पौर्णिमा”. शरद ऋतुत येत असल्याने तिला “शरद पौर्णिमा” देखील म्हटले जाते. हिंदू धर्मात ह्या पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे.

 

kojagiri paurnima inmarathi

 

या दिवशी बरीच शुभ कार्ये घडून गेल्याचे पुरणांत दिलेले आहे. असे म्हणतात, की याच दिवशी सागर मंथनातून देवी लक्ष्मी भूतलावर प्रगट झाल्या होत्या, याच दिवशी वृंदावनात कृष्णाने राधा आणि बाकी गोपिकांबरोबर “रास लीला” रचली होती.

कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचे सबंध भारतात विविध प्रकार आहेत. ओडिसामध्ये मुली दिवस भर उपवास करतात आणि रात्री पनीर, केळी, वेलची पूड आणि मध ह्यांना एकत्र करून त्याचे लाडू प्रसाद म्हणून ग्रहण केले जातात.

गुजरातमध्ये जागरण करून व दूध पोहे प्रसादला देऊन कोजागिरी साजरी केली जाते, तर तिकडे वृंदावनात वैष्णवपंथी लोक आजही रासलीलेचे आयोजन करून, तांदळाच्या खीरेचा नैवेद्य वाटून ह्या पौर्णिमेचा आनंद लुटतात.

आपल्या महाराष्ट्रात पूर्वीपासून घराच्या गच्चीवर चंद्रप्रकाशात मसाल्याचे दूध ठेऊन सेवन करण्याची पद्धत आहे, पण शरद पौर्णिमेस मसाला दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थच का ग्रहण करतात ह्याचा कधी विचार केलाय?

आपल्या प्रत्येक सणांमध्ये काही ना काही महत्त्वाचे कारण आणि संदेश दडलेले असतात. जाणून घेऊया, मसाला दूध पिण्यामागची काही कारणे : 

१) ऋतु बदल –

 

masala milk inmarathi3

 

शरद ऋतु पासूनच वातावरण बदलायला सुरुवात होते. वातावरणात हळू हळू गारवा वाढू लागतो. अशातच शरदानंतर येणारे हेमंत व शिशिर हे थंडीचेच ऋतु.

हिवाळ्यात हाडांना तेल आणि कॅल्शिअम मिळण्यासाठी, दूध आणि दुधाची साय हे अत्यंत आवश्यक असते.

या ऋतुंमध्ये माणसाच्या शरीरातील उष्णता संतुलित राहावी, ती कमी होऊन सर्दी -पडसे, अस्थमा यांसारखे आजार होऊ नये, म्हणून याच दुधात विविध मसाले जसे, दालचिनी, वेलची पुड, जायफळ, चारोळी, मनुका सगळे घालून दूध घेतल्यास त्याचे औषधी गुण भरपूर वाढतात.

कोजागिरीला दुधात बदाम, बेदाणे, पिस्ता, अक्रोड असे सुकेमेवे घातले जातात, यामुळे शरीराला लागणारी ऊर्जा मिळते.

२) पित्तावर गुणकारी  –

 

masala milk inmarathi

 

मान्सूनच्या शेवटी माणसाच्या शरीरातील पित्त गुण प्रबळ होतो. ज्यामुळे सतत अॅसिडिटी, जळती लागणे, फोड येणे, अल्सर होणे, डोळ्यांची आग होणे, अॅसिड घशाशी येऊन घशाला जखम होणे असे प्रकार सुरू होतात.

यामुळे, मान्सूननंतर हे औषधी दूध घेतल्याने पित्ताच्या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

 

३) चंद्राचे गुण उतरलेलं दूध  –

 

masala milk inmarathi2

 

आयुर्वेदानुसार, चंद्रात जे गुण आहेत, ते सगळे दुधात आढळतात. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत निकट असतो, त्यामुळे चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील रोग नाहीसे होतात.

४) अमृत वर्षाव –

कोजागिरीच्या रात्री, चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो. म्हणून त्या पौर्णिमेला चंद्रकिरण हे अमृतासमान गुणकारी असतात.

यामुळे आपण जर दुधात हॉर्मोन्स संतुलित करण्याचे, दम्याचे किंवा श्वसनक्रिये संबंधी कुठल्याही आजाराचे औषध मिसळून ते चंद्र प्रकशात ठेवले, तर त्या औषधाचा प्रभाव वाढतो. जलद गतीने रोग्याला आजारापासून मुक्ती मिळून तो पूर्णपणे बरा होतो.

 ५) पूर्णान्न –

 

kojagiri paurnima inmarathi2

 

दुधात प्रोटीन्सपासून कार्बोहायड्रेट्सपर्यंत सगळी पौष्टिक तत्व असतात, म्हणून त्याला पूर्णान्न म्हणतात. ह्याच दुधात तांदूळ, सूकेमेवे घातल्याने ते दूध रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते.

कोजागिरी साजरी करण्याची काही पौराणिक कारणे आणि पद्धती –

१) लक्ष्मी पूजन –

 

kojagiri paurnima inmarathi1

 

असे म्हणतात, की शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मी भगवान विष्णू बरोबर, गरुडारुढ होऊन भुतला वर येते आणि “को जागर्ती?” असा प्रश्न विचारते. जी माणसाने जागी असतात, त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होते.

म्हणून या रात्री जागरण करून देवीला केशर, काजू, बदाम व इतर सगळे सुकेमेवे घातलेला नैवेद्य अर्पण करतात. ह्यामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ही प्रथा बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रचलित आहे.

धान्य पूजन –

शरद पौर्णिमा ही “हंगाम बदल” झाल्याचे दर्शविते. शरद ऋतु सरताना शेतकऱ्याच्या घरात तांदूळ, नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी, वगैरे नवीन धान्य आले असते.

या दिवशी मनुष्याचे पालन पोषण करणाऱ्या निसर्गाला मान म्हणून, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून धान्याची पूजा केली जाते व शेतकऱ्यांसाठी ही पौर्णिमा विशेष महत्त्वाची असते.

इंद्र पूजन –

असे म्हटले आहे, की कोजागिरीला पहिल्या प्रहरी इंद्र आणि लक्ष्मीची सोबत पूजा करून त्यांना दूध, नारळ पाणी व पोह्यांचा नैवेद्य अर्पण करतात. बऱ्याच मंदिरांत ही पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

सगळ्याच भारतीय सणांमागे वैज्ञानिक कारणाचा भक्कम आधार असतो, तो जाणून घेतला तर अंधश्रद्धांना खतपाणी न घालता आपण सणाचा आनंद लुटू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?