' मानवी स्पर्शाने समृद्ध झालेलं औरंगाबादचं हे दुर्मिळ कलात्मक उत्पादन आपण टिकवायलाच हवं! – InMarathi

मानवी स्पर्शाने समृद्ध झालेलं औरंगाबादचं हे दुर्मिळ कलात्मक उत्पादन आपण टिकवायलाच हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लहानपणी शाळेत अभ्यासाच्या पुस्तकात एवढंच वाचलं होतं, अजिंठा वेरूळ आणि हिमरु शाली ही औरंगाबादची खासियत आहे. तेही आता इतकं धूसर होऊन गेलं, की कितीजणांना ते आठवतं कोण जाणे!

भारतात कित्येक लोककला आहेत. त्याचबरोबरीने अशा काही हस्तकला आहेत, ज्या पाहील्या की मन थक्क होतं. गुजरातमध्ये असणारी बाटीक बांधणी कला, पंजाबमधील असणारी फुलकारी, महाष्ट्रातील पैठणी, कर्नाटकी कशिदा, काश्मिरी, मधुबनी, वारली अशा विविध प्रकारच्या कला आणि त्यांच्या कलाकृती तयार करणारे हात पाहीले, की त्यांचं कसब पाहून कौतुक करावं‌ की आश्चर्य हे पण समजत नाही.

एखाद्या यंत्रापेक्षाही सुबकपणाने तयार केलेल्या या अद्वितीय कलाकृती “हात फिरे तिथे लक्ष्मी वसे” या उक्तीचं प्रत्यंतर देतात.

यापैकी काही कला लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या कलांसाठी त्या कारागिरांना खूप प्रसिद्धी, कामं आणि पैसाही मिळाला आहे.

आता इंटरनेटमुळे जग इतकं जवळ आलं आहे, की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हिंडत बसायची गरज पडत नाही. एका क्लिकवर हवं ते उत्पादन तुमच्या समोर हजर होतं, पण अशातही काही कला अशा आहेत, की त्या उपेक्षित राहील्या आहेत, लोकाश्रयापासून वंचित आहेत. औरंगाबादमध्ये असणारी हिमरु शाली तयार करण्याची कला ही त्या पैकीच एक!

 

himroo art inmarathi

 

केवळ औरंगाबादमध्ये असणारी हिमरु ही शाली तयार करण्याची कला अन्यत्र कोठेही ही कला आढळत नाही. इराणमधील किनख्वाबी या जरीबुट्टीच्या सोनेरी, रुपेरी दोऱ्यांच्या विणकामातून उगम पावलेली ही विणकामाची कला. मराठीत याला किनखापी असंही म्हणतात.

इराणमध्ये सोन्या चांदीची जर वापरुन हे किनख्वाबी वस्त्र बनवलं जायचं. महंमद तुघलकाने आपल्यासोबत आणलेले कारागिर दिल्लीत होते. पुढं काही कारणानं त्यानं आपली राजधानी दिल्लीहून खुलताबाद येथे हलवली.

त्याचे कारागिरही त्याच्यासोबत खुलताबाद येथे आले. ते विणकर आठ वर्षाच्या कालावधीत जालना, खुलताबाद, औरंगाबाद खडकी याठिकाणी रहात होते. त्यांनी ही विणकामाची कला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही शिकवली.

त्यात सोनं चांदी यांची जर वापरण्याऐवजी कापूस आणि रेशीम यांचे धागे वापरुन विणकाम सुरू केले. कारण सोनं चांदी यांची जर वापरणं हे फक्त अमीर उमराव आणि राजे राजवाडे यांनच शक्य होते. सर्वसामान्य लोकांना कसं परवडणार ते? मग जसं त्यातील मटेरियल बदललं तसं नांवही बदललं.

फारसी शब्द हम रुह म्हणजे मिळता जुळता..हमरुह- किनखापी कामाशी मिळतं जुळतं विणकाम. आणि मग त्याचं नांव झालं हिमरु! फार गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेल्या कामाला म्हटलं जातं मशरु!

 

himroo art inmarathi1

 

आठ वर्षांनी तुघलक दिल्लीला परत गेला, पण त्यानं सोबत आणलेले विणकाम करणारे कारागीर मात्र तिथेच राहिले. नंतरच्या काळात आदिलशहाचा अतिशय हुशार वजीर मलिक अंबर याने या विणकरांना या कामासाठी खूप प्रोत्साहन दिलं. त्या काळी हे सारं विणकाम हातावर केलं जायचं. नंतर मात्र यासाठी हातमागांचा वापर केला जाऊ लागला.

१९२५ साली औरंगाबाद सिल्क मिलची स्थापना झाली आणि हिमरु शाली बनवण्याचं काम जे कुटीरोद्योग होतं ते मोठ्या प्रमाणात मशीनवर होऊ लागले. गेली सातशे वर्षे हे हिमरु शालींचं उत्पादन औरंगाबाद येथे घेतलं जातं, पण आजही जी हातावर विणलेल्या शालींना जी सफाई असते, ती काही या मशिनमेड शालींना मिळवता आली नाही.

हातमागावर तयार करण्यात येणाऱ्या साड्या, शाली, चादरी आणि इतर वस्त्रे हे अतिशय प्रसिद्ध आहेत, पण या कामाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही.

हे काम करणारे एक कारागीर आहेत अहमद सईद कुरेशी. हिमरु मशरु कारागिरी करताना त्यात अभिनव प्रयोग करत, केवळ फुलपानांच्या नक्षीनं सजलेल्या हिमरु शालींवर अजिंठ्याची लेणी, त्यात असणारी कमळाची फुले वगैरे आणि इतरही सृजनात्मक गोष्टींनी त्यांनी काम फुलवलं आहे.

 

 

हिमरु मशरु कारागिरी ही हातमागावरच केली, तर त्या कलेची सृजनशीलता आणि सफाईदारपणा, वेगळेपणा नजाकत टिकून राहील असं त्यांना वाटतं. आणि खरंच आहे ते!

विणकाम, भरतकाम ही हातांवर केली तर ती कामं मजबूत राहतात. त्याला एक सफाईदार ढंग येतो. खूपदा कापड खराब होतं, पण विणकाम जात नाही.

मशिनवर काम भरभर आवरतं, पण हाताचा सफाईदारपणा त्यात नसतो. धागे मध्येच वर खाली झालेले असतात. एखादी जरी वीण उसवली तर अखंड डिझाईन उसवलं जाऊन खराब होतं. ज्या माणसांना विणकामाची आवड आहे, त्यातील बारकावे कळतात ते लोक कधीही मशीनच्या कामाला प्राधान्य देत नाहीत.

तसंच सईद कुरेशी यांनाही हे काम हातावर, हातमागावर केलं जावं असं वाटतं. कितीतरी लोकांना यावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यांनी. गरजू लोकांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करुन बराच हातभार लावला आहे.

कोणतीही कला जिवंत कधी राहते? तिचा योग्य सन्मान केला तर आणि योग्य वेळी केला तर. हिमरु मशरु कारागिरीबाबत पण लक्षात घेऊन ही काहीशी बाजूला पडलेली कारागिरी प्रकाशात आणली, तर या कलेला अजूनही चांगल्या रितीने जगासमोर आणता येईल.

 

himroo art inmarathi3

 

मेड इन इंडिया…मेक इन इंडिया ही संकल्पना अजूनही मोठी करुन या छोट्या छोट्या कारागीरांना मोठं करता येईल. आपली कला जगभर पोचवता येईल.

शेवटी कलेचं योग्य मूल्यमापन होऊन, तिला योग्य मोबदला मिळाला, तर हे कलाकार अजूनही उत्तमातलं उत्तम काम करतीलच, पण ही इतकी सुंदर कला पुनरुज्जीवन मिळून बहरुन जाईल हे किती छान वाटेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?