' अविवाहित असलेल्या ‘या’ ऋषींनी जगाला दिलाय चक्क कामसूत्राचा मंत्र! – InMarathi

अविवाहित असलेल्या ‘या’ ऋषींनी जगाला दिलाय चक्क कामसूत्राचा मंत्र!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कामसुत्र हा शब्द आजही तसं पाहिलं तर फारसा मोकळेपणाने चर्चेला येणारा विषय नाही. कुटूंबांमध्ये तर आजही नाहीच.

भलेही शाळा, महाविद्यालयांतून यावर बोलले जात असेल, याविषयीचे कार्यक्रम, चर्चासत्रे, सेमिनार्स हे सर्व काही टीव्ही, रेडिओ सारख्या समाजमाध्यमांवर हाताळले जाते.

पण घराघरांतून, कुटूंबात सर्वजण एकत्र असताना किंवा पालक आणि पाल्य यांच्यात मात्र अजुनही मोकळेपणाने लैंगिकता या विषयावर चर्चा होताना फारसे कुठे दिसत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा विषय आजही तितकाच गंभीर आहे जितका पूर्वी होता किंवा पुरातन काळातही तो गंभीरच होता मात्र इथे एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे, पुर्वी हा विषय जितका पवित्र होता तितका मात्र तो आज राहिलेला नाही.

 

kamasutra inmarathi

 

‘पवित्र’ हा शब्द का वापरलाय? ते समजून घेण्यासाठी आधी या ग्रंथाविषयी जाणून घेऊ!

वात्स्यायन ऋषिंच्या मूळ प्रेरणेतून निर्माण झालेला कामसूत्र ग्रंथ :

महर्षी वात्स्यायन ज्यांनी संपूर्ण जगालाच एक योग्य दिशा देणारा कामसूत्र ग्रंथ निर्माण केला ते स्वत: मात्र अविवाहीत होते हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटते. पण याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. ऋषी वात्स्यायन हे एका हिंदू ब्राम्हण पुजारी कुटूंबातील होते.

वेद आणि अध्यात्माचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलेलेच होते मात्र तरीही यामध्ये त्यांची थेट रुची अशी नव्हती, परंतू इच्छा, सुख मिळणे किंवा मिळवणे आणि परमेच्छा यामध्ये त्यांना खुपच रस होता.

याविषयीचा सखोल अभ्यास करताना ऋषींच्या असे लक्षात आले की, इच्छा, इच्छापूर्ती होताना मिळणारा आनंद आणि परमोच्च बिंदू अर्थातच परमानंद ही देवानेच मानवाला दिलेली एक नोबेल अशी देणगी आहे.

अध्यात्माच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास स्वर्गप्राप्तीकडे जाण्याचा एक मार्ग अर्थातच स्वर्गसूख.

 

kama sutra inmarathi

 

मग यासाठी देवाने मानवी शरीराची जडणघडण करतानाच स्त्री आणि पुरुष देहांना हे स्वर्गसूख मिळेल अशी व्यवस्था केली आहे याकडे ऋषी वात्स्यायनांचे लक्ष वेधले. ह्याविषयीचे आणखी सखोल ज्ञान प्राप्त करण्यास त्यांनी सुरुवात केली.

वात्स्यायन ऋषींविषयीच्या काही प्रकाशझोतात न आलेल्या गोष्टी :

इतिहासकारांच्या मते, गुप्त साम्राज्य ज्यावेळी आर्यभूमीवर (आजचा भारत देश) राज्य करत होते त्या सुमारास पहिल्या ते चौथ्या शतकादरम्यान वात्स्यायन ऋषींचा काळ समजला जातो.

कामसूत्र या ग्रंथाची निर्मीतीदेखील साधारण त्याच काळात झाल्याचे पुरातत्व खात्याच्या संशोधनातून समोर आले आहे.

कामसूत्र अर्थातच सेक्स, विवाह, कामजीवन यासंबंधी सखोल विवेचन करणारे महर्षी स्वत: मात्र या सगळ्यापासून अगदी अलिप्त होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य परमसमाधीत गेले.

प्लेजर म्हणजेच तीव्र इच्छा तृप्तीसाठी त्यांनी परमेश्वराशी एकरुप होण्याचा मार्ग स्विकारला होता. ना त्यांनी कधी विवाह केला ना कधी सेक्स केला, तरीही याबद्दलचे अतिशय सखोल ज्ञान त्यांनी अखंड समाधीतून प्राप्त केले.

हे ही वाचा परिपूर्ण जोडीदार बनायचंय: कामसुत्रातील या १० टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील

वात्स्यायन ऋषींच्या आधीदेखील भीत्तीचित्रे, पेंटिंग्ज, नृत्यकला, नाट्य- शारीरिक अभिनय या माध्यमांतून स्त्री-पुरुषांमधील प्रेम, इच्छा, शरीरसंबंध यांविषयी माहिती उपलब्ध होती.

त्याचाच आधार घेत, परमेश्वराच्या माध्यमातून एका शास्त्रीय पद्धतीने गृहस्थ जिवनात कामधर्म कसा गरजेचा आणि महत्त्वाचा आहे याचे विवेचन वात्स्यायनांनी केले म्हणूनच महर्षी होण्याचा सन्मान त्यांना मिळाला.

हल्ली असे आपण ऐकतो की ज्या जोडप्यांचे लैंगिक आयुष्य खुप सुखी असते त्यांना व्याधीविरहीत दिर्घायुष्य प्राप्त होते.

हेच ऋषी वात्स्यायनांनी अभ्यासातून सिद्ध केले की दोन शरीरांचे मिलन झाले की जे सुख दोघांनाही प्राप्त होते ती केवळ इच्छापूर्ती नसून, ब्रम्हानंद म्हणजेच ते देह परमेश्वराशी एकरुप होतात.

 

vatsayana rishi inmarathi

 

आणि त्या देहांमधील दोषांचा नाश होवून एक सुखी जीवन जगता येते आणि जास्त काळ जीवन जगणे शक्य होते.

वात्स्यायन ऋषींच्या अभ्यासातून एक गोष्ट नक्की जाणवते ती परमानंद हा नृत्य, संगीत, वादन, अभिनय, चित्रकला अशा सर्व अभिव्यक्तींमधूनही मिळतो. ना केवळ देहांच्या कामतृप्तीतून.

ऋषी म्हणतात, ज्या माध्यमातून व्यक्ती परमेश्वराशी एकरुप होऊ शकते तो परमोच्च आनंद. संभोग करणे हा केवळ एक भाग आहे. ते काही सर्वस्व किंवा अंतिम नाही.

कोणतीही कला जेव्हा परमोच्च बिंदू गाठते तेव्हा तो कलाकार ब्रम्हमय झाला असे आपण मानतो कारण कामसूत्र हा ग्रंथही हेच सांगतो.

ग्रंथ प्रयोजन थोडक्यात असे आहे :

धर्म व अर्थ या शास्त्रांची पुरुषार्थांसाठी जशी नितांत आवश्यकता आहे, तशीच काम शास्त्राचीही याचसाठी आवश्यकता आहे.

दांपत्यजीवन सुखमय व आनंदमय व्हावे म्हणून, तसेच शारीरिक आरोग्य उत्तम आणि संतुलित रहावे म्हणून अन्न व निद्रेप्रमाणेच काम सेवन हे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या अतिरिक्त सेवनाने दोष उत्पन्न होतील, तर ते दोष टाळून संयमाने कामसेवन करावे.

चारही वर्णांतील गृहस्थाश्रमी स्त्री-पुरुषांची जीवनयात्रा सुखमय व्हावी यासाठी या ग्रंथांचा अवतार आहे, कामवासना अधिक भडकावी म्हणून नव्हे.

कामसूत्र हा शास्त्रग्रंथ :

कामसुत्राकडे शास्त्रीय पद्धतीनेच पहावे ही महर्षिंची अपेक्षा आहे. त्यामुळेच काम विषयक सर्व विचारांचे सर्व बाजुंनी लक्षात घेऊन अतिशय सखोल विवेचन यामध्ये आले आहे.

 

maharshi inmarathi

 

त्यामुळे काही काही प्रसंगी ग्रंथांतील लैंगिक संभोगासंबंधीची विविध अंगे आणि संभोगाच्या विविध क्रिया अशा प्रकारचा अश्लील मजकूर त्यात आहे.

असा आक्षेप या ग्रंथावर येण्याचा संभव आहे परंतु विषयच तत्संबंधी आहे ही गोष्ट, तसेच शास्त्रीय मांडणी आणि ग्रंथकाराचा निर्मळ उद्देश लक्षात घेता अश्लीलतेचा दोष यावर येऊ शकत नाही. हा ग्रंथ कौटिल्यांच्या अर्थशास्त्राच्या धर्तीवर लिहिलेला आहे.

अतिशय प्राचिन ग्रंथ :

कामसूत्र हा ग्रंथ बराच प्राचीन असून आजपासून सुमारे १८०० वर्षे जुना म्हणजेच इसवी सनाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात लिहिलेला असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. कामशास्त्रावरील उपलब्ध हा मूळ संस्कृत ग्रंथ कालदृष्ट्या सर्वांत प्राचीन व गुणदृष्ट्या सर्वांत उत्तम आहे.

गौतमाच्या न्यायसूत्रावर भाष्य लिहिणारा वात्स्यायन हाही याच सुमारास झाला असल्यामुळे हे दोन्ही वात्स्यायन एकच असण्याचाही संभव आहे. वात्स्यायन हे अर्थशास्त्रकार कौटिल्याचेच दुसरे नाव होय अशी एक परंपरागत समजूत आहे परंतु ती आ‌धुनिक पंडितांना मान्य नाही.

ग्रंथाची सद्यस्थिती :

मूळ संस्कत कामसूत्र ग्रंथ आता अभ्यासक्रमातून बाजूला पडला असल्याने तो बराच दुर्लक्षित झाला आहे. परंतु पुढे तेराव्या शतकातील यशोधराने लिहिलेल्या ‘जयमंगला’ नामक टीकाग्रंथाने ती दुर्लक्षितता पुष्कळ कमी केली आहे.

कामसूत्रात अत्यंत प्राचीन अशा ऋषी-मुनींसह सातवाहन काळातील अनेक राजांची नावे विविध प्रसंगांच्या अनुषंगाने नमूद केल्याचे आढळते.

त्याकाळच्या विविध देशांतील व्यवहार, चालीरीती यात ‌वर्णन केलेल्या आहेत. प्राचीन इतिहासाला उपयोगी पडणारी काही माहिती यात ‌आली आहे. महाकाव्ये तसेच नाटके लिहिताना कालिदास-भवभूतीसारख्या महाकवींनी याचा भरपूर उपयोग केलेला दिसतो.

 

kalidas bhavbhuti inmarathi

 

पुढे झालेले अनेक कामशास्त्रविषयक ग्रंथ यावरच मुख्यत्वे आधारलेले आहेत.

सदाचाराचा उपदेश, लोकव्यवहारातील कौशल्य तसेच चौसष्ट कलांची माहिती आणि गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कसे वर्तन करावे याचे सखोल शिक्षण या ग्रंथाच्या अभ्यासाने मिळते, असे म्हणता येईल.

कामसूत्राविषयी आज जाणून घेताना अनेक आश्चर्याचे धक्के बसतात, कारण या ग्रंथातील अनेक गोष्टी आज बदलत्या काळानुसार पुसट वाटतात, तर काही अगदी खऱ्या खुऱ्या.

सुमारे १८०० वर्षे जुन्या कामसूत्र ग्रंथाचे सर रिचर्ड एफ बर्टन यांनी १८७६ मध्ये इंग्रजीत भाषांतर केले, “आम्हा ब्रिटिशांना असं प्रेम करणं माहित नव्हतं” असं बर्टन म्हणतात!

मात्र याच कामसूत्र ग्रंथाच्या भाषांतरावर किंवा त्याप्रमाणे वागणुकीस १९६३ पर्यंत ब्रिटनमध्ये बंदी होती.

सर बर्टन यांना शोध आणि भाषांतरासाठी जी मोलाची मदत केली ते भारतीय पुरातत्त्व खात्याचे प्रमूख संशोधक भगवानलाल इंद्राजी होय.

हे प्राचीन संस्कृत भाषेत लिहिण्यात आलं होतं, संस्कृतमध्ये काम म्हणजे इच्छा आणि सूत्र म्हणजे नियम. पुस्तकातील संदर्भानुसार इच्छा म्हणजे, गाणं, वाचणं, कविता, नाचणं आणि सेक्स करणे सुद्धा.

कामसुत्रात एकूण ६४ प्रकारे शरीर संबंध ठेवता येतात असे नमूद केले आहे. पैकी काही हे व्यायाम प्रकारासारखे आहेत, वात्सायान यांनी लिहल्यानुसार आपण आठ प्रकारे शरीरसंबंध ठेऊ शकतो.

कामसूत्रानुसार महिलांचं मन जिंकण्यासाठी, नेहमी अथक आणि तत्पर राहण्यासाठी, पुरूषांनी त्यांच्या उजव्या हाताला, मोराचं, तरसाचं हाडं किंवा सोनं बांधलं पाहिजे.

कामसूत्रानुसार हलकासा चावा घेणे, ओरखडणे यामुळे अधिक प्रेम व्यक्त होत असतं, मात्र हे लिहित असतांना असंही सांगितलंय, तुमची नखं ही स्वच्छ, मृदू आणि चमकदार असावीत, थोडक्यात संबंधांमध्ये जंगली पणा नसावा.

 

sex-inmarathi

 

आपलं घर, झोपण्याची खोली, शैय्या म्हणजेच बिछाना कसा असावा, याविषयी देखील कामसूत्रात लिहिण्यात आलं आहे. एक थुंकीपात्र, सतार टांगण्याठी हत्तीचा दात, मऊसूत बिछाना आणि फुलं असावीत.

यात एक धडा हा पूर्णपणे पुरूषाने पत्नीसोबत संभोग कधी करावा यासाठीच लिहिला आहे. कामसूत्र ही महिलांच्या कलेविषयी अभ्यास करण्याची एक कला असल्याचं यात सांगितलंय.

मानवी लैंगिक जीवन आणि कालानुरुप होत आलेले बदल :

मानवी लैंगिक जीवन हे शारीरिक सानिध्य आणि लैंगिक आकर्षणाने अभिव्यक्त होते. मानवी लैंगिक जीवन विविध मानसिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक, आचार विचारांनी प्रभावित होत आले आहे.

मानवी ज्ञानात भर घालणाऱ्या तर्क शास्त्र, तत्त्वज्ञान, आरोग्य, जाणिवा, नीती, मूल्य, योग्य-अयोग्य, पाप-पुण्य यांचाही प्रभाव लैंगिक अभिव्यक्तीवर पडत असतो.

संपूर्ण मानवी इतिहासात विविध वेळी विविध कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात तत्कालीन समाजाच्या लैंगिकतेसंदर्भातील आचार विचारांची नोंद प्रामुख्याने घेतलेली आढळते.

विविध काळात विविध समाजात तत्कालीन कायदे व सामाजिक नियम व्यक्तींतील नाते आणि लैंगिक संबंधांवर प्रभाव ठेवून असतात.

लैंगिकतेकडे बघण्याची दृष्टी विविध काळात विविध संस्कृतीत सतत बदलत आली आहे. तसेच गेल्या दोन दशकांमध्ये तर ती प्रचंड झपाट्याने बदलल्याचे दिसतेय.

सुरुवातीला कामसुत्राचा जो पवित्र असा उल्लेख केला तो मात्र गत २ दशकांमध्ये जवळपास नाहिसा झालाय की काय असेच वाटते. याची कारणेही अनेक आहेत.

अगदी साधा विचार केला तर पुर्वीचे चित्रपट आठवा, त्यात शरीरसंबंध कशाप्रकारे दाखवावे किंवा ते कसे चित्रीत करावे, कसे एडिटिंग करावे याचे ठोस नियम होते. त्याचे उल्लंघन झाल्यास सेन्सॉरशिप बोर्ड त्यावर नियंत्रण ठेऊ शकत होते.

 

flowers inmarathi

 

अगदीच जर अडल्ट ग्रेड चा चित्रपट असेल तर १८ वर्षांखालील मुला-मुलींना तेथे प्रवेश नसे.

मात्र आता हे कुठेच दिसत नाही. सर्व समाजमाध्यमे लहान मुलांच्या हातात असताना त्यावर कोणाचाच काही कंट्रोल नाही. काय दाखवावे आणि काय पहावे किंवा पाहू द्यावे यावर कोणाचेच आणि कुठलेच बंधन नाही.

त्यामुळे अडनेड्या वयात मिळालेली अपुरी आणि चुकीची माहिती तसेच नको त्या वयात नको त्या गोष्टी पाहिल्याने आणि ऐकल्याने मनावर होणारे विपरीत परिणाम यातूनच विकृती मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसतेय.

त्याच विकृत मानसिकतेतून आज १४ ते २१ वयोगटातील मुले बिनधास्त मुलींवर अत्याचार प्रसंगी रेपही करण्यास धजावत आहेत.

टिन एज मध्ये रेप केस मध्ये सापडलेली मुलांची संख्या पाहता हे किती धोकादायक आहे याचा खरोखर विचार करावा लागेल.

धर्म आणि अर्थ यानंतरच गृहस्थाश्रमी प्रवेश केल्यानंतर कामजीवनाची सुरुवात करावी असे हा ग्रंथ सांगतो, मात्र आज एकविसाव्या शतकात अगदी उलट होताना दिसत आहे.

हे ही वाचा पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा बंगालमध्ये आजही पाळली जाते!

महाविद्यालयीन शिक्षणही पुर्ण न झालेले विद्यार्थी जर अशाप्रकारे चुकीचे कंटेंट पाहून जर विकृत मानसिकतेत अडकत असतील तर आजच्या पालकांनी याचा खुप गंभीर विचार करणे गरजेचे आहे.

 

indian guy inmarathu

 

म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे कामसूत्र ही केवळ मजा-मस्ती नसून ते एक शास्त्र आहे आणि त्याचा वापर करण्याची एक विशिष्ठ वेळ आहे.

तसे होताना दिसत नाही म्हणूनच त्याचे पावित्र्य भंगलेले आहे असे म्हणता येईल. मात्र याचा खुप सखोल आणि गंभीरतेने विचार करावा लागेल दोस्तांनो..

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?