' पुरुषांच्या हातातील कडं म्हणजे फक्त फॅशन नाहीये, त्यामागे आहे महत्त्वाचं विज्ञान!

पुरुषांच्या हातातील कडं म्हणजे फक्त फॅशन नाहीये, त्यामागे आहे महत्त्वाचं विज्ञान!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आभूषणे हा खासकरून स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. पुरुषांच्या बाबतीत आभूषणाची यादी सोनसाखळी (चेन), अंगठी, भिगबाळी आणि कडे अथवा ब्रेसलेट यावरच संपते!

यामध्ये सगळ्यात जास्त दिसून येणारे आभूषण म्हणजे हातातलं कडं, पण मनगटावर शोभून दिसणारं कडं म्हणजे केवळ फॅशनपायी वापरले जाणारे आभूषण मुळीच नाही बरं का! पुरुषाचे रूप खुलवण्याबरोबरच हातात कडं असणं हे वैज्ञानिकदृष्ट्या तितकंच फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे कड्याला धार्मिक महत्त्वही आहेच.

या लेखातून आपण हातातल्या कड्याचे महत्त्व अधिक विस्तृतपणे पाहूया.

 

 

पुरुषांच्या हातात वापरले जाणारे कडे हे शक्यतो सोने, चांदी, तांबे अथवा लोखंडाचे असते. असे असण्यामागे शास्त्रीय कारण आहे. आपल्या शरीरात एक प्रकारचे चुंबकीय क्षेत्र असते. सोने, चांदी, तांबे यांसारखे धातू धारण केल्याने हे चुंबकीय क्षेत्र कार्यरत राहून शरीरातील रक्ताभिसरणासारख्या क्रिया सुरळीत चालू राहतात.

शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्याचे काम हे धातू करतात.याचा थेट संबंध हा आपल्या मेंदूशी आहे. मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यास आपल्याला उत्साह जाणवतो, सकारात्मकता वाढीस लागते. कड्याच्या रूपात हे धातू आपल्या शरीराच्या अगदी निकट राहू शकतात.

भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे कडे लोक वापरतात. प्रदेशांनुसार या कड्यांची घडण, कलाकुसर आणि त्यांचे वजन या गोष्टी बदलतात.

गुजराती लोकांमध्ये सोन्याची कडी प्रसिद्ध आहेत, तर राजस्थानात पंचधातूंची भरीव कडी बघायला मिळतात. पंजाबात शिख लोक लोखंडाची कडी वापरतात. तसेच तांब्याची कडीही सर्वत्र वापरली जातात.

 

 

कड्याचे वजन हे काही ग्रॅमपासून अगदी काही किलो पर्यंतही असू शकते. जास्त वजनाची कडी वापरल्याने मनगटे मजबूत होतात. तबला वाजवणारे कलाकार अनेकदा रियाझ करताना मनगटात वजनदार कडे घालतात. अशाप्रकारे रियाझ केल्याने मनगटे मजबूत होऊन तबला वाजवताना हात उत्तमरित्या तयार होतो.

शीख लोकांमध्ये कड्याचे महत्त्व फार मोठे आहे. शीख लोक लोखंडाचे, कोणतीही कलाकुसर नसलेले कडे वापरतात. शिखांमध्ये ५ “क”कार धारण करण्यास सांगितले आहेत. ज्यात केश, कंगा, कचहरा, कृपाण आणि कडा म्हणजेच कडे यांचा समावेश होतो. गुरूंनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपले आचरण असावे याची आठवण कडे करून देते.

शीख तत्त्वज्ञानानुसार, आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट लोकसेवेतून ईश्वराची सेवा करणे हे आहे. हातातले लोखंडी कडे हे याचे प्रतीक समजले जाते. लोखंड जसे मजबूत असते, त्याप्रमाणे आपले आपली ईश्वराप्रति असणारी निष्ठा अबाधित असावी.

कड्याचा आकार गोल असतो. वर्तुळाला ज्याप्रमाणे सुरुवात व शेवट दाखवणारे शिरोबिंदू नसतात, त्याप्रमाणे ईश्वरालाही आदि व अंत नाही.

 

 

हातात परिधान केलेले कडे माणसाच्या मर्यादेचेही प्रतीक आहे. हातात घातलेले कडे ज्याप्रमाणे आपणहून हातातून बाहेर पडत नाही, त्याप्रमाणे माणसानेही आपल्या मर्यादेच्या बाहेर पडू नये. हातात घातलेले कडे हे कायम माणसाला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देणारे असते.

आपल्याकडून कोणतेही गैरकृत्य घडू नये, तसेच गरीब किंवा दुर्बल व्यक्तींवर आपण हात उचलू नये याचे भान राहण्यासाठी हातातील कडे हे एक रूपक आहे.

शीख लोक वापरत असलेले कडे लोखंडी व वजनदार असल्याने प्रसंगी त्याचा उपयोग स्वसंरक्षणासाठी एखाद्या शस्त्राप्रमाणेही करता येऊ शकतो. शस्त्राप्रमाणे वापर करावयाचा असल्यास पूर्वीच्या काळी टोकेरी दाते असलेली कडीसुद्धा बनवली जात.

ब्रिटिशांच्या काळात सैन्यातील शीख सैनिक आपापसात वाद झाल्यास तो “लोह-मुठी” नावाने ओळखले जाणारे मुष्टियुद्ध खेळून सोडवत असत. या मुष्टियुध्दात दोन्ही बाजूच्या सैनिकांनी कडे परिधान केलेले असे.

पूर्वीच्या काळी राजे-रजवाडे एखादी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस बक्षीस म्हणून सोन्याचे किंवा चांदीचे कडे देत असत. अशा प्रकारे कडं देऊन गौरव होणं हे त्या काळी फार प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाई. याचबरोबर एखाद्याच्या हातात कडे घालणे म्हणजे एखादी जबाबदारी त्या माणसाकडे सोपवणे असाही त्याचा एक अर्थ होतो.

 

 

सध्याच्या काळात हातातील कडं हा फॅशनचा नवा ट्रेंड असल्यासारखे झाले आहे. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तसेच बनावटीमध्ये कडं बनवून मिळतं.

आपल्या संस्कृतीत अनेक लहानसहान गोष्टीचाही चांगल्या रुपकाप्रमाणे वापर केलेला आढळून येतो. हातातील कडे हे याचेच एक उदाहरण आहे. कड्याचा वापर करताना केवळ फॅशन म्हणून न वापरता यामागच्या रंजक गोष्टी जरूर लक्षात घेतल्या पाहिजेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?