' सलाम!! निर्वाहासाठी दगड फोडणाऱ्या माउलीनं प्रतिकूल परिस्थितीला फोडून PSI पद मिळवलं आहे! – InMarathi

सलाम!! निर्वाहासाठी दगड फोडणाऱ्या माउलीनं प्रतिकूल परिस्थितीला फोडून PSI पद मिळवलं आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्वप्नांना आकाशाची ओढ असते. गरुड भरारी घेण्याची इच्छा असते. स्वप्नं बघणं जितकं सोपं असतं तितकी पूर्ण करणं कठीण असतं. कधी पैसा कधी परिस्थिती आपल्या वाटेत अडचणींचे डोंगर बनून उभे राहतात.

पण ज्याला ते डोंगर पार करायची जिद्द असते तो दगडधोंडे काटेकुटे यांची पर्वा करत नाही. ती पूर्ण करायचीच इच्छा ठेवून स्वप्नांना आकार देतो.

काही लोक इतके मोठे असतात की आपली स्वप्नं आपल्या जोडीदाराच्या डोळ्यांनी पाहतात. ती पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करतात. त्यांची जिद्द इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद यांच्या मदतीने स्वप्नं पूर्ण करतात.

लग्नाच्या वेदीवर सप्तपदी चालताना नवरा नवरीला नातिचरामी म्हणजे कुठल्याही गोष्टी अति करणार नाही असं सांगतो. सातवं पाऊल चालताना सखा सप्तपदी भव असं म्हणतात. आणि खूपदा ही सात वचनं‌ एकटी पत्नीच आचरते.

 

saptapadi inmarathi

 

पण काही वेळा ही वचनं निभावणारा एखादा जगावेगळा नवरा पण असतो. जो खरोखर आपल्या पत्नीला साथ देतो. तिची स्वप्नं आपली समजून पूर्ण करायला डोंगरासारखा तिच्या पाठीशी उभा राहतो.

एका यशस्वी पुरुषाच्या मागे कायम एक स्त्री खंबीरपणे उभी असते असं म्हणतात पण कधीकधी एका स्त्रीला यशस्वी करण्यासाठी तिला खंबीरपणे साथ देणारा एखादा पुरुष असतो.

असाच एक जिद्दी पती, ज्यानं आपल्या पत्नीला आॅफीसर करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मोलमजुरी करून तिचं शिक्षण पूर्ण केलं इतकंच नव्हे तर तिनं शासकीय अधिकारी म्हणून काम करावं हे स्वप्न पूर्ण केलं.

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पद्मशीला तिरपुडे हिची ही कथा. माहेरची गरीब असलेली पद्मशीला. तिला शिकायची इच्छा होती. वडीलांनाही वाटायचं तिनं शिकावं.

तुकाराम खोब्रागडे यांचा मुलगा पवन खोब्रागडे यांच्याशी तिचं लग्न झालं. दहा वर्षं झाली. दोन मुलंही झाली तिला. पण सासरची परिस्थिती पण जेमतेमच होती. मग ते रोजगाराच्या शोधात नाशिकला रहायला आले.

रमेश वीटभट्टीवर काम करायचा. या दहा वर्षांत हे जोडपं गरिबीतही अतिशय आनंदाने संसार करत होतं. मोलमजुरी करुन मिळणारी मीठ भाकर पण सुखाचा घास होती.

 

charusheela tirpude inmarathi

 

प्रेम असतं तेंव्हा हेच तर असतं ना? एक दिवस तिच्या नवऱ्याचा पगार झाला. किती होता पगार? दिवसाला पन्नास रुपये! आणि घरी येत असताना ते पैसे कुठेतरी पडले.

ती रात्र दोघेही उपाशी पोटी झोपले. कारण पैसे नव्हते. आणि एकदम त्यांच्या मनात विचार आला, आज एक दिवस पैसे नाहीत म्हणून आपल्याला उपाशीपोटी झोपावं लागलं. अजून अवघं आयुष्य बाकी आहे.

अजून किती दिवस आपण अशी मेहनत करणार आहोत? हीच विचारांची ठिणगी त्यांच्या आयुष्यात दिशा बदलणारी ठरली. पायाखालची फांदी तोडल्याशिवाय गरुडाला उडायची बुद्धी होत नाही.

ही रात्र अशीच त्यांच्या पायाखाली असलेली फांदी तोडणारी ठरली.

प्रश्न तर होताच. मग काय करायचं? कसं घालवायचं आयुष्य? मग त्यांनी ठरवलं, पद्मशीलाला पुढे शिकवायचं आणि सरकारी नोकरी करायची. मग सुरु झाली ढोर मेहनत.

तो दिवसभर वीटभट्टीवर काम करायचाच पण उरलेल्या वेळात त्यांनी पाटा वरवंटा बनवायला सुरुवात केली. सोपं असतं का दगड फोडून त्यावर टाकीचे घाव घालून पाटा वरवंटा बनवणं?

पद्मशीला आणि तिचा पती तुकाराम दोघं पाटा वरवंटा बनवायचे. एका मुलाला ती घरी ठेवायची आणि दुसरं तिचं दूधपितं बाळ सोबत घ्यायची.

नाशिकच्या रस्त्यांवर रणरणत्या उन्हात पद्मशीला बाळ काखोटीला आणि डोक्यावर पाटा वरवंट्यांची बुट्टी असा जामानिमा करून पाटा वरवंटा विकायला बाहेर पडायची. घरोघरी ते विकायचा प्रयत्न करायची. मध्येच बाळ रडायचं.

मग बाजूला थांबून पदराआड घेऊन त्याला दूध पाजायचं. असा दिनक्रम चालू झाला. आणि त्याच बरोबरीनं त्यांनी फळं विकायला सुरुवात केली.

जे पैसे मिळत त्यातील पैसे वापरुन पद्मशीलानं आपली पदवी मिळवली. आणि मग ठरवलं स्पर्धा परीक्षा द्यायची.

 

padmashila 2 inmarathi

 

ते देखील सोपं नव्हतं, पण जिद्द होती.. मनात उमेद होती. आणि मुख्य म्हणजे घरचा पाठिंबा होता. तेही आव्हान तिनं स्वीकारलं. जिद्दीनं ती परीक्षेच्या तयारीला लागली, आणि यशस्वी झाली.

मग महाराष्ट्र पोलीस दलात ती भरती झाली. आता ती अमरावती रेंजमध्ये पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पद्मशीला म्हणतात. त्यावेळी जे काही शक्य होतं ते मी केलं.

सुदैवाने हातात शिक्षण होतं, मनात जिद्द होती आणि मुख्य म्हणजे पतीचा पाठिंबा होता. मग मला काय कठीण होतं? आता आनंद आहे तो याच गोष्टीचा की, माझ्या मुलांचं भविष्य आता सुरक्षित आहे.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी ताण तणावाचे ताणेबाणे विणणारी नाती पाहीली की या पिढीची काळजी वाटते.

लोक विवाहसंस्था कुटुंबसंस्था यावर मोठा प्रश्नांकित चेहरा करतात. पण अशी उदाहरणं पाहून वाटतं. जगात आजही प्रेम आहे, आनंद आहे, सुख आहे आणि चांगुलपणा पण!

जीवन म्हणजे काय, केवळ काटेरी डंख आहेत? डोळे उघडून पहा तरी, प्रत्येकाला फुलपाखरांचे पंख आहेत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?