' प्रचंड छळ….पतीला मारहाण, तरीही ती लढली आणि एक दिवस… – InMarathi

प्रचंड छळ….पतीला मारहाण, तरीही ती लढली आणि एक दिवस…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सन १९९२. राजस्थान मधील भटेरी गावात गावाचा मुखिया, रामकरण गुज्जर या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची तयारी जोरात सुरु होती. परंतु या लग्नाला त्या गावातील भंवरीदेवी ही बाई विरोध करत होती. घरातील लोकांनी तिला घराबाहेर हुसकावलं, पण ती बाई ऐकत नव्हती, कारण त्या बाईकडे लग्न थांबवायचे सबळ कारण होते.

त्या बाईच्या सुदैवाने त्याच दिवशी पोलीसही गावात आले होते. त्यांच्या मदतीने भंवरीदेवीने लग्न थांबवलं. परंतु त्या प्रतिष्ठित व्यक्तींचे राजकारणी लोकांशी लागेबांधे होते. त्यादिवशी पोलीस आणि रामकरण गुज्जर यांच्यात काहीतरी साटलोट झालं. पोलिस निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीचं लग्न लावून दिलं गेलं.

भंवरीदेवीने विरोध करूनही त्या मुलीचं लग्न लागलं, पण भंवरीदेवीने त्या लग्नाला विरोध का केला? कारण लग्न होणारी मुलगी ही अल्पवयीन होती. अल्पवयीन, अल्पवयीन म्हणजे किती अल्पवयीन? तर त्या मुलीचे वय होते केवळ दहा महिने. याचाच अर्थ ती मुलगी अजून पाळण्यातच होती.

या लग्नाला काही अर्थही नव्हता. अशा मुलीचं लग्न करणं हा कायद्याने गुन्हा होता. म्हणूनच राजस्थान सरकारच्या महिला विकास परियोजनांची कार्यकर्ता असलेल्या भंवरीदेवीने याला कडाडून विरोध केला होता.

त्या मुलीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून भंवरीदेवीचा वनवास सुरू झाला. संपूर्ण गाव भंवरीदेवीच्या विरोधात गेलं. एक तर भंवरीदेवीने गावातील प्रतिष्ठित आणि उच्चवर्णीय व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती आणि भंवरीदेवी हे जातीच्या उतरंडीतील खालच्या जातीची.

 

 

 

खालच्या जातीतील एका बाईने आपल्या घरात लक्ष देणे म्हणजे त्यांच्यासाठी अपमानच होता. आपली प्रतिष्ठा त्या एका क्षुद्र बाईने धुळीस मिळवली, तिला समज देणे आवश्यक आहे. तिला जन्माची अद्दल घडवायचीच असं त्या प्रतिष्ठित लोकांनी ठरवलं.

भंवरीदेवीला आणि तिच्या नवऱ्याला धमक्या देण्यात येऊ लागल्या. संपूर्ण गावाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. गावातल्या काही लोकांनी भंवरीदेवीच्या वरच्या अधिकाऱ्यालाही मारहाण केली. शेवटी नाईलाजास्तव भंवरीदेवीला आपली नोकरी सोडावी लागली.

परंतु यापेक्षाही भयंकर पुढे काही घडणार होतं. २२ सप्टेंबर १९९२ या दिवशीच्या संध्याकाळी भंवरीदेवी आपल्या पतीबरोबर शेतात काम करत होत्या. त्यावेळी अचानक पाच जण तिथे आले. त्यात होते रामकरण गुज्जर आणि त्याचे नातेवाईक. भंवरीदेवीच्या पतीला त्यांनी दांडुक्यानी मारले आणि भंवरीदेवीवर पाळी पाळीने बलात्कार केला. याची वाच्यता करू नकोस अशी धमकीही दिली.

परंतु आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार तर केलीच पाहिजे यावर भंवरीदेवी ठाम होत्या. याची तक्रार करण्यासाठी भंवरीदेवी आपल्या पतीबरोबर दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात गेल्या, परंतु तिथल्या पोलीसने एफ आय आर दाखल करायला देखील विलंब लावला.

भंवरीदेवीलाच त्यांनी “तुला बलात्कार म्हणजे काय असतो हे तरी माहित आहे का?” असं विचारलं. अशा कितीतरी त्रासदायक प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागली आणि शेवटी संध्याकाळी एफ आय आर दाखल झाला.

 

bhanvari devi inmarathi

 

तिथून शारीरिक चाचणीसाठी तिला जयपुर मधल्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तिथल्या डॉक्टरांनी तिची शारीरिक चाचणी करण्यास नकार दिला. कारण मॅजिस्ट्रेटचे लेटर आमच्याकडे नाहीये असं डॉक्टरांचं म्हणणं होतं.

खरंतर असा कोणताही नियम यासाठी नाही. उलट बलात्कार झाल्याची तक्रार स्त्रीने केली तर त्या स्त्रीची शारीरिक चाचणी ही २४ तासाच्या आत व्हायला हवी, परंतु भंवरीदेवीची शारीरिक चाचणी बावन्न तास उलटून गेल्यानंतर झाली.

त्यानंतर पुढील तपासासाठी पोलीस भंवरीदेवीच्या गावी आले. त्या ठिकाणची तपासणी करताना पोलिसांनी तिला त्यादिवशी कोणते कपडे घातले होते हे विचारलं. त्या दिवशीचा लेहंगा तिला मागितला, जो तिच्या अंगावरच होता. सगळ्यांसमोर तिला लेहंगा काढायला लावला. आपल्या पतीच्या डोक्यावरचा फेटा वापरून तिने आपले शरीर झाकले आणि ती घरी गेली.

कोर्टात भंवरीदेवीच्या केसची सुनावणी सुरू झाली. कोर्टातही भंवरीदेवीला त्या घटनेचे वर्णन करायला लागायचे. तिथेही अनेक लज्जास्पद प्रश्नांना उत्तर द्यावी लागायची. तिच्या उत्तराने कोर्टाचे समाधान झाले नाही.

मुळातच भंवरीदेवीची शारीरिक चाचणी व्हायला वेळ लागला होता. त्यामुळे तिच्या शरीरावर झालेल्या बलात्काराचा ठोस पुरावा मिळत नाही असं कोर्टाचं म्हणणं ठरलं.

 

rape-law-inmarathi

 

शेवटी १५ नोव्हेंबर १९९५ या दिवशी भंवरीदेवीच्या केसचा निकाल जाहीर झाला, तया आरोपींना बलात्काराच्या आरोपातून मुक्त करण्यात आले, इतर गुन्ह्यासाठी केवळ ९ महिन्याची शिक्षा देण्यात आली. कोर्टाने जे विधान केले, तर आश्चर्यकारकच होते. कोर्टाच्या म्हणण्यानुसार,

भंवरीदेवीने मुद्दाम त्या पाच जणांवर खोटे आरोप केले.

गावाचा मुखिया बलात्कार करणार नाही.

६०-७० वयाची माणसे बलात्कार करू शकत नाहीत.

कुठल्याही उच्च जातीतला माणूस खालच्या जातीतल्या स्त्रीवर बलात्कार करणार नाही. असं करून तो स्वतः अशुद्ध होणार नाही.

कुठलाही काका आपल्या पुतण्यासमोर बलात्कार करणार नाही.

कोणताही नवरा आपल्या बायकोवर बलात्कार होत असताना शांत बसणार नाही.

कहर म्हणजे या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेनंतर त्यांची शोभायात्रा काढण्यात आली आणि विशेष म्हणजे राजकीय पक्षातल्या महिला देखील त्यात सामील झाल्या.

भंवरीदेवी म्हणतात, “तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी लढाई सुरूच राहील. मी एका तान्ह्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अजूनही देशात बालविवाह होतात. केवळ कायद्याने काहीच सुधारणा होणार नाही. प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची मदत केली पाहिजे. हा लढा एकत्रितपणे लढण्याचा आहे.”

 

 

भंवरीदेवीच्या या घटनेने त्यावेळेस देशभरातील वातावरण ढवळून निघालं होतं. राजस्थान सारख्या परंपरावादी राज्यामध्ये पहिल्यांदाच एका स्त्रीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा जाहीर उच्चार केला होता.

भंवरीदेवीच्या घटनेने पहिल्यांदाच कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता कोणाकडे असते? हा प्रश्न उपस्थित झाला. कारण या घटनेत राज्य सरकारने आणि गावच्या पंचायतनेही नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर नाही असे सांगितले. मग एखाद्या ठिकाणी महिला काम करत असेल तर तिला सुरक्षिततेची हमी कशी मिळणार? हा प्रश्न उपस्थित झाला.

महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची हमी मिळायलाच हवी यासाठी देशभरातले अनेक महिला कार्यकर्ते, महिला संघटना, एनजीओ यांनी आवाज उठवायला सुरुवात केली.

 

 

विशाखा” या प्लॅटफॉर्म अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. ज्यानुसार महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही नोकरी देणाऱ्याने स्वीकारली पाहिजे, या मागणीने जोर धरला.

या चळवळीचा हाच फायदा झाला की, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळाची व्याख्या ठरवली गेली. २०१३ मध्ये हे बदल मान्य झाले. ज्याला “विशाखा मार्गदर्शक तत्वे” म्हणून ओळखले जाते.

 

 

परंतु भंवरीदेवीला कधीच न्याय मिळाला नाही. केवळ बालविवाह करणं चुकीचं आहे हे सांगणे देखील तिला खूप महागात पडले.

भंवरीदेवी स्वतः राज्य सरकारच्या महिला विकास परियोजनांची कार्यकर्ता होती. महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि मानवाधिकार यासाठी ती काम करायची. बालविवाह रोखण्यासाठी ती जनजागृती करायची. तिच्या बालविवाह रोखण्याच्या कृतीला राजस्थान मध्ये खूप विरोध करण्यात आला, परंतु भंवरीदेवी आपल्या कामावर ठाम होती.

आजही भंवरीदेवी गरिबीत एकट्या राहतात. त्यांच्यावर बलात्कार झाला आहे म्हणून गावातल्या लोकांनी आधीच त्यांच्याशी बोलणं सोडलेले आहे. आता त्यांचे पतीही हयात नाहीत. अगदी तिच्या माहेरच्या लोकांनीही तिला आपले दरवाजे बंद केले आहेत.

भंवरीदेवीची आई गेल्यानंतरही तिला तिच्या भावांनी अंत्यसंस्कारासाठी येऊ दिले नाही. भंवरीदेवीच्या चार मुलांपैकी दोघे जयपुर मध्ये काम करतात. तर एक मुलगी शिकली नाही, पण दुसरी मुलगी गावातल्या शाळेत इंग्लिश शिकवते.

भंवरीदेवीच्या घटनेचे पडसाद जगभर उमटले. त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं गेलं. त्यांना ‘नीरजा भनोट पुरस्कार’ देण्यात आला आहे. राजस्थान सरकारनेही शेवटी त्यांना आर्थिक मदत केली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या चौथ्या कॉन्फरन्सला त्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या होत्या. भंवरीदेवी वरती एक सिनेमाही बनवण्यात आला आहे. सगळं होऊनही तिला जो न्याय मिळायला हवा होता तो मात्र मिळाला नाही.

 

 

१९९२ ची घटना लक्षात घेतली, तर स्वातंत्र्य मिळूनही चाळीस वर्षे उलटून गेली होती. भारतातील बालविवाहाची प्रथा थांबलेली नव्हती. अजूनही काही प्रमाणात ती सुरूच आहे. बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये तर या प्रथा सर्रास सुरू आहेत.

भंवरीदेवीला जेव्हा सांगितलं जातं, की “तुम्ही एक प्रेरणास्थान आहात”. त्यावेळेस त्या म्हणतात, की “माझी कहाणी प्रेरणादायक आहे म्हणून थांबू नका. महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करा. महिलांचे सशक्तीकरण करणे म्हणजे केवळ ऐकणे आणि अन्याय जाणून घेणे हेच नाही तर त्यावर कृती करणे आहे.

मी असा समाज तयार व्हावा यासाठी लढा देत आहे, जिथे लैंगिक समानता असेल. घरातल्या बहीणभावांमध्ये कुठलाही भेद केला जाणार नाही. दोघांनाही जेवण आणि शिक्षण सारखंच मिळेल.”

भंवरीदेवीची कहाणी खरोखरच प्रेरणादायक आहे. अन्याय सहन करायचा नाही तसेच परिणामांचा विचार न करता अन्यायाला वाचा फोडायची याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भंवरीदेवी. भंवरीदेवींमुळेच भारतातल्या स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता वाढवली गेली. त्यासाठी तरी भंवरीदेवी कायमच लक्षात राहतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?