' मालाची मागणी वाढवण्यासाठी वापरलेली अफलातून शक्कल! – InMarathi

मालाची मागणी वाढवण्यासाठी वापरलेली अफलातून शक्कल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण भारतीय लोक ‘भावनिक’ आहोत हे पूर्ण जगाला माहीत आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना जर का आपल्या आवडत्या कलाकाराने त्या वस्तूची जाहिरात केली असेल तर ती आपण लगेच विकत घेतो.

लहान मुलांचा फोटो असलेल्या वस्तू सुद्धा भारतात जास्त विकल्या जातात असं एक रिसर्च सांगतो. ह्याची काही उदाहरणं सांगायची, तर अमूल बटरच्या पॅकेट वरील ‘अमूल गर्ल’ असेल किंवा parle biscuit वरील लहान मुलीचं mascot असेल. मनाला आवडलं की भारतीय व्यक्तीचे हात ती वस्तु घेण्यासाठी वळतातच.

 

the amul girl inmarathi

 

अर्थात, गुणवत्तेच्या कसोटी वर खरं उतरण्यासाठी त्या वस्तूला सुद्धा तितकं चांगलं असावं लागतं. प्रॉडक्ट तयार करणाऱ्या कंपनीने जर का गुणवत्तेची काळजी घेतली आणि जाहिरातीतून लोकांना आकर्षित केलं तर यश मिळवणं तितकं अवघड नाहीये.

‘निरमा डिटर्जंट पावडर’ ही एक अशीच भारतीय वस्तू जी की अल्पावधीतच कित्येक लोकांच्या घरात पोहोचली होती. आपल्या टॅगलाईन मध्ये ‘सब की पसंद’ लिहिणाऱ्या निरमाने खरंच लोकांची पसंती मिळवली आणि लोकांचा विश्वास सुद्धा.

कर्सनभाई पटेल यांनी आपल्या घरामागे एक प्रयोग म्हणून तयार केलेली डिटर्जंट पावडर आज जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी पोहोचली आहे.

आज तुमच्या घरात ‘निरमा’ येत असेल किंवा नसेलही, पण पांढरा फ्रॉक घातलेली आणि स्वतःभोवती गिरकी मारणारी ती मुलगी कायमच आपल्या लक्षात राहील.

 

nirma inmarathi

 

‘निरमा’ हे नाव अहमदाबादच्या कर्सनभाई पटेल यांनी त्यांच्या मुलीच्या ‘निरुपमा’ या नावावरून ठेवले होते. निरुपमा ही एका कार अपघातात हे जग सोडून गेली होती.  कर्सनभाई पटेल हे त्यावेळी गुजरातच्या भूगर्भ शास्त्र खात्यात केमिस्ट म्हणून काम करत होते. ‘आपला पण स्वतःचा बिजनेस असावा’ अशी कर्सनभाई यांची इच्छा होती.

१९६९ या वर्षी ‘Surf’, युनिलिव्हर या इंग्लंडच्या कंपनीने मार्केट काबीज केलं होतं. तुमच्या साबणापेक्षा सर्फ पावडर ही कपड्यांवरील मळ लवकर धुऊन काढते आणि तुमच्या हातांची काळजी सुद्धा घेते हा विश्वास युनिलिव्हरने लोकांना दिला होता.

=====

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

====

त्या काळात १० ते १५ रुपये किलो या दराने विकलं जाणारं हे प्रॉडक्ट हे उच्चवर्णीय लोकांसाठी आहे असं मानलं जायचं. कर्सनभाई पटेल यांना वॉशिंग पावडर ही सामान्य माणसापर्यंत पोहोचवायची होती. त्यांनी ठरवलं की, आपण फक्त प्रॉडक्शन कॉस्ट निघेल इतक्याच किमतीत म्हणजे ३ रुपये प्रति किलो ‘निरमा’ ची विक्री सुरू करायची. 

सुरुवातीला कर्सनभाई पटेल हे स्वतःच्या नातेवाईक आणि शेजारच्या लोकांना ‘मनी बॅक’ गॅरंटी देऊन दारोदारी जाऊन स्वतः पावडर विकायचे.

अहमदाबाद शहरात सुरू झालेल्या “निरमा”ला त्या शहरात चांगला प्रतिसाद मिळत होता, पण आपल्या शहरापर्यंतच सीमित राहील इतकं कर्सनभाई यांचं स्वप्न छोटं नव्हतं. काही दिवसांत त्यांनी केमिस्ट पदाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ निरमासाठी देऊ लागले.

‘दुकानदारांना उधारीत माल देणे’ हे त्यावेळच्या मल्टिनॅशनल कंपनीचं एक बिजनेस धोरण होतं. कर्सनभाई ही जोखीम स्वीकारू शकत नव्हते. त्यांनी दुकानदारांच्या मागे लागण्यापेक्षा दुकानदारांनी त्यांच्या मागे लागून निरमा स्टॉक मध्ये ठेवावं, असा प्लॅन त्यांना हवा होता.

 

 

ती कल्पना त्यांना सुचली. त्यांनी एका जाहिरात कंपनीशी संपर्क साधून एक जाहिरात तयार केली. संगीता बीजलानीला त्यांनी त्या जाहिरातीसाठी साईन केलं आणि “कसा निरमा हा पूर्ण भारताचा आवडता ब्रँड आहे” हे ३० सेकंदात सांगितले.  त्या वेळी फक्त दूरदर्शन हेच मनोरंजनाचं माध्यम असल्याने बघता बघता ही जाहिरात खूप लोकप्रिय झाली.

एक महिना भर त्यांनी फक्त टीव्हीवर जाहिरात चालवली आणि मार्केट मध्ये ‘मागणी’ तयार केली, स्टॉक कमी केला. लोक दुकानात निरमाबद्दल विचारायचे आणि नाराज होऊन घरी परतायचे. दुकानदार कर्सनभाई पटेल यांच्या मागे लागले आणि त्यांनी ‘निरमा’ त्यांच्या display शेल्फ वर ठेवायला सुरुवात केली.

त्या वर्षी निरमाची विक्री इतकी वाढली, की त्याने Surf ला मोठ्या फरकाने मागे टाकले. ‘सर्वात जास्त विकली जाणारी वॉशिंग पावडर’ म्हणून “निरमा” घोषित झाली. आजही ३५% मार्केट शेअरने ‘निरमा डिटर्जंट पावडर’ आपलं स्थान टिकवून आहे.

मार्केटच्या चढउताराने खचून न जाणारे कर्सनभाई पटेल यांनी लवकरच टॉयलेट सोप, सौन्दर्य साबण आणि शॅम्पूचं उत्पादन सुरू करून मार्केट वरची आपली पकड घट्ट केली.

 

 

१९९५ मध्ये कर्सनभाई पटेल यांनी निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची अहमदाबाद इथे स्थापना केली. २००३ मध्ये त्यांनी निरमा इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि निरमा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ची स्थापना केली.

‘काम हेच जीवन’ हे मान्य केलेले कर्सनभाई हे सतत या इन्स्टिट्यूटच्या नवीन शाखा उघडून आपल्या मुलीच्या नावाला अजून मोठं करत असतात.

बिजनेस आणि सामाजिक योगदानासाठी त्यांना २०१० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २००९ आणि २०१७ च्या फॉर्ब्स मासिकाच्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सुद्धा त्यांचा समावेश होता.

 

 

स्वतःकडे कोणतीही मॅनेजमेंट डिग्री नसतांना केवळ आपल्या बिजनेस स्किल्स च्या जोरावर कर्सनभाई पटेल हे आजही एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी हे सिद्ध केलं आहे, की केवळ निरमा नाही ते स्वतः सुद्धा “सब की पसंद” व्यक्ती आहेत.

निरमाच्या प्रवासातून आपण कोणत्याही कामाला लाजू नका, आपला टार्गेट कस्टमर ठरवा आणि त्यांना समोर ठेवून बिजनेस मध्ये योग्य ती पावलं उचला हे नक्की शिकण्यासारखं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?