'तुकोबांनी विचारलं: "तुम्हाला माझे म्हणणे पटले नाही का?" : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १२

तुकोबांनी विचारलं: “तुम्हाला माझे म्हणणे पटले नाही का?” : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १२

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ११

तुकोबांचा शब्द न् शब्द आबा आपल्या मनात साठवीत होता. आपण तुकोबांना विचारलेला प्रश्न अगदी साधा नाही याची त्याला कल्पना होती. तुकोबा बोलत असताना त्याची मान खाली होती. सांगता सांगता तुकोबांनी थोडी उसंत घेतली तरी ती वर झाली नाही. ते पाहून तुकोबांनी विचारले,

आबा, ऐकता आहात ना?

आबाने खालमानेनेच होकार भरला. तुकोबांनी पुढे विचारले.

मग आवडत नाही आहे का माझे बोलणे? की पटत नाही आहे?

त्यावर थोडी मान वर करून आबा म्हणतो,

म्यां आता वनात जाऊ म्हन्ता?

हे ऐकून तुकोबांना किंचित हसू आले व ते म्हणाले,

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

“तसे नाही हो आबा. मी तुम्हाला एक मार्ग सांगितला. यापूर्वी ह्या पद्धतीने अनेकांनी आपल्या प्रश्नांची तड लावली म्हणून सांगितला. लोकांतात मनबुद्धी स्थिर होत नाही असे लक्षात आले की कुठल्यातरी क्षणी एकांताची ओढ लागते. माझ्याही आयुष्यात ते वळण येऊन गेले. मग मी येथील भांबगिरीवर गेलो, एक जागा शोधली आणि आसन मांडले. ठरवले की काम होईपर्यंत आता इथून हलायचे नाही. आणि ऐका –

पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार झाला । विठोबा भेटला निराकार ।।
भांबगिरिपाठारीं वस्ति जाण केली । वृत्ति स्थिरावली परब्रह्मी ।।
निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिले देवाजीचे ।।
सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबले । पीडूं जे लागलें सकळिक ।।
दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह झाला तुका ह्मणे ।।

आसन मांडताना निर्वाणीचाच विचार केला. तड लागेपर्यंत हलायचे नाही असे ठरवून टाकले आणि परमेश्वराचे ध्यान आरंभिले. वाघसर्पविंचू सारे येऊन अंगाला झोंबत राहिले. तरी निश्चय ढळू दिला नाही.

असे पंधरा दिवस गेले आणि एका क्षणी साक्षात्कार झाला! जाणीव झाली की आपल्याला विठोबा भेटला! तो निराकार आहे! त्या स्वरूपातच तो आता आपल्याला भेटला आहे! आपली वृत्ती आता त्या परब्रह्मात स्थिरावली आहे!
या पूर्वी आपली अशी भावना नव्हती. आता आधीची देहभावनाच गेली आहे. दिव्यात कापूर विरून जावा तसे आता आपण ह्या जगात सामावून गेलो आहो. सामान्यपणे असे होण्यासाठी माणसाला मरावे लागते. आपण वेगळ्या अर्थाने मरण पावलो आहेत. देह आहे असाच आहे आणि मरणच मरून गेले आहे!

मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ।।
ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥
आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥
तुका म्हणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥

लक्षात आले की ह्या नाशिवंत देहापायी ज्या नाशिवंत भावनांचा पूर मनात वाहत होता तो आता अगदी नष्ट झाला आहे. देहभाव ओस पडला आहे. किंबहुना म्हणा की आधी होती ती ओळखच पुसली गेली आहे. आपण कोण कुठले हा विषयच संपला आहे आणि आता यापुढे जे जगायचे त्यासाठी विलक्षण धीर आला आहे. आपली मूळ ओळख काय ती कळली आहे आणि आपल्या आयुष्यात सत्याचा जणू उदय झाला आहे.

मग मला माझ्यातच भेटलेल्या त्या निराकार विठोबाला मी म्हटले,

अज्ञान हा देह स्वरूपीं मीनला । सर्व वोसावला देहपात ॥
ज्ञानस्वरूपाची सांगड मिळाली । अंतरीं पाहिली ज्ञानज्योती ॥
तुका ह्मणे चित्त स्वरूपीं राहिलें । देह विसावलें तुझ्या पायीं ॥

तर मंडळी, आपला देह, आपले चित्त आपल्याच मूळ स्वरूपात मिसळणे म्हणजे काय याचा अनुभव त्या एकांतवासामुळे मला आला. अज्ञानाचा नाश झाला आणि अंतरात ज्ञानाचा उदय झाला.

तुकोबांचा हा सारा स्वानुभव ऐकताना सारेच तल्लीन झाले होते. त्या एकतानतेचा भंग केला आबानेच. तो म्हणाला,

देवा, हे सारं येगळं हाय. त्याचा अर्थ लागंल तवा लागंल. पन तवां तुमाला कसं वाटत हुतं, त्ये येळी तुमची स्थिती कशी जाली हुती ते अाजून सांगा की.

त्या वेळी माझी स्थिती कशी झाली होती? अहो, आजही ती स्थिती तशीच आहे!

आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ॥
काय सांगो जालें कांहींचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥
तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥

आबा, अधिक काय सांगू? तुम्ही देव आहे की नाही याचा शोध घेत आहात आणि त्या विषयीचा माझा शोध संपलेला आहे. भांबगिरिवर पंधरा दिवसांनी माझी अवस्था कशी झाली ते मी तुम्हाला सांगितले. ज्या मानसिक अवस्थेत मी तिकडे निघालो तशी तुमची अवस्था आधी होवो.

हे ऐकून आबाने विचारले,

तुमी लय धीराचे म्हनूनच ह्ये सारं करू शकला. तरी बी इचारतो, आसं येकलं, सारं मागं ठीऊन तिकडं ग्येल्याव भ्यां न्हाई वाटलं?

“भय? अहो, काय सांगू? फार कठीण वेळ होती ती.

ओस जाल्या दिशा मज भिंगुळवाणे ।
जीवलग नेणे मज कोणी ।।
भय वाटे देखें श्वापदांचे भार ।
नव्हे मज धीर पांडुरंगा ।।
अंधकारापुढे न चलवे वाट ।
लागतील खुंट काटे अंगा ।।
एकला निःसंग फांकती मारग ।
भितो नव्हे लाग चालावया ।।
तुका ह्मणे वाट दावूनि सद्गुरु ।
राहिला हा दुरु पांडुरंग ।।

झाले असे की ज्या पांडुरंगाने ह्या एकांताची ओढ मला लावली, वाट दाखवली तो माझा सद्गुरुच मला त्या वेळी दूर सोडून निघून गेला आहे अशी भावना झाली. एकटा मी, बरोबर कोणी नाही अशी ती अवस्था. कुठे कुणी दिसेना. सार्‍या दिशा ओस पडल्यासारखे वाटून भ्रमल्यासारखे झाले. कुणी जिवलग तर नाहीतच, श्वापदे मात्र आहेत! त्यात अंधार! पाऊल पुढे टाकायची भीती वाटू लागली. पायाला काटे टोचताहेत, अंगाला खुंट. समोर म्हणू तितक्या वाटा. जायचे कोठे? थांबायचे कोठे?

एकांतवासांची कल्पना रम्य होती आणि सुरुवात अशी जीवघेणी. आसनमांडी घालून बसल्यानंतर मात्र हळूहळू फरक पडत चालला आणि शेवटी सांगितला तसा आनंदाचा क्षण आला. तसा क्षण तुमच्याही आयुष्यात येवो. अर्थात, त्यासाठी तुम्ही धीर मात्र धरला पाहिजे.

धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावें ॥
चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची ॥
धेनु येऊं नेदी जवळी आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥
तुका म्हणे नेम प्राणांसवेंसाटी । तरी च या गोष्टी विठोबाची ॥

आबा, तुम्ही देव आहे की नाही याचा शोध घेत आहात तर तो विषय अगदी लावून धरा. दुसरे काही म्हणून मनात येऊ देऊ नका. देवाच्या विचाराने मन एकाग्र होऊ द्या. पतिव्रतेच्या मनात आपल्या पतिशिवाय दुसरा विचार नसावा त्याप्रमाणे.

चातक पक्षी कशी मेघांची वाट पाहतात, सूर्याला पाहिल्याशिवाय काही कमळे जशी उमलत नाहीत किंवा गायीला आपल्या वासराशिवाय दुसरे कोणी जवळ आलेले जसे चालत नाही तशी एका देवाची ओढ तुम्हाला लागो. विषयाची तड लागेपर्यंत प्राण कंठाशी आले तरी धीर सुटू नये अशी अवस्था तुम्हाला प्राप्त होवो.

आबा, इतकी अवस्था झाल्याशिवाय सुटणारा हा विषय नव्हे!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “तुकोबांनी विचारलं: “तुम्हाला माझे म्हणणे पटले नाही का?” : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १२

  • March 24, 2017 at 4:05 pm
    Permalink

    Khup Khup abhar tumache ya lekh malikebadal.. 🙂

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?