'आजीच्या पाठिंब्यावर नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, आज कमावतोय १.५ कोटी

आजीच्या पाठिंब्यावर नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, आज कमावतोय १.५ कोटी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्या काही वर्षांत केटरिंग आणि हॉटेलिंग व्यवसायाला सुगीचे दिवस आलेले आहेत. खासकरून महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये नोकरीधंद्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले आणि यातूनच हॉटेलिंगचे प्रमाणही वाढले.

आपल्याकडे पुण्यासारख्या शहराचा विचार केला, तर तेथे बाहेरून येणारे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गामुळे खानावळी, उपाहारगृहे तसेच अगदी घरगुती डबा करून देणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. यातूनच स्वीगी, झोमॅटो यांसारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांचाही विस्तार झाला.

घरापासून दूर राहणाऱ्यांसाठी रोजचे जेवण हा एक मोठा प्रश्न असतो. व्यस्त दिनक्रमातून स्वतः स्वयंपाक करणे बरेचदा शक्य नसतेच, त्यामुळे खानावळींचा पर्याय निवडावा लागतो.

 

indian-food-inmarathi

 

चांगल्या चवीचे पण त्याचबरोबर खिशाला परवडणारे जेवण मिळणे तसे कठीणच. त्यामुळे या क्षेत्रात जेवढी स्पर्धा आहे, तेवढाच वावही आहे. याचाच विचार करून सुमारे ५ वर्षांपूर्वी म्हैसूर (मैसुरू) मधील एका उच्चशिक्षित युवकाच्या मनात तयार जेवण पुरवण्याची कल्पना आली.

नुसत्या कल्पनेवर तो थांबला नाही, तर त्यानुसार आपल्या आजी आणि काकूच्या पाठिंब्यावर याची सुरुवात करून त्याने आजच्या घडीला दरवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल असणारा व्यवसाय उभारला.

ही यशोगाथा आहे मैसुरू मधील मुरली गुंडाण्णा याची. “फुडबॉक्स” या नावाने मुरली मैसुरू आणि आसपासच्या भागात तयार जेवणाचे पदार्थ पुरवतो.

२०१५ साली दोन मित्र आणि भावाच्या साथीने सुरू केलेल्या या व्यवसायाचा आज विस्तार होऊन सुमारे २६ जणांची टीम मुरलीसोबत आहे.

मुरली हा शिक्षणाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये काम करत असताना त्याच्या मनात आपला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होतीच.

एक दिवस आपल्या वरिष्ठांशी बोलत असताना त्याने आपली ‘फूड बिझनेस’ची कल्पना त्यांच्या समोर मांडली. ते मुरलीच्या कल्पनेमुळे प्रभावित झाले, एवढेच नव्हे तर त्याला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ३ महिन्यांची रजाही मंजूर केली! आणि जर तो यात यशस्वी झाला नाही, तर पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आश्वासनही दिले.

मुरलीसाठी ही सुवर्णसंधीच होती. २०१५ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून त्याने तयार अन्नपदार्थ घरपोच देण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.

 

foodbox inmarathi3

 

मुरलीच्या बरोबर त्याची आजी इंदिराम्मा आणि दोन काकू संध्या आणि उषा या उभ्या राहिल्या. या तिघींनी अन्नपदार्थ तयार करण्याची जबाबदारी घेतली.

मुरलीच्या घरचे एक बंद गॅरेज होते. त्यालाच त्यांनी स्वयंपाकघर बनवले. मुरलीसोबत त्याचे कॉलेजमधील दोन मित्र आणि त्याचा भाऊ हेही सामील झाले. मैसुरू मधील वेगवेगळ्या भागात फिरून त्यांनी आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या, तसेच कॉलेजमधील व इतर परिचित मित्रांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती दिली.

पुलाव, दहीभात, खीर आणि फळे यापासून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसात रोजच्या १५-२० डब्यांपासून सुरुवात करून मुरली आणि त्याचे सहकारी काही काळातच आठवड्याचे २००० डबे देऊ लागले.

आजच्या घडीला मुरलीच्या ‘फुडबॉक्स’ मध्ये २७ जण काम करतात आणि मैसुरू मध्ये जवळपास ३०००० लोक फुडबॉक्सची सेवा घेतात.

 

foodbox inmarathi

 

इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनीही फुडबॉक्स सुरू झाल्यानंतर महिन्याभरातच तेथून जेवण मागवले होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी फुडबॉक्सच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे.

मैसुरू हे बऱ्यापैकी मोठे शहर असल्याने फूडबॉक्सला तेथे उत्तम प्रतिसाद मिळाला. फुडबॉक्स मधून खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार आहेत. फूडबॉक्सच्या नोंदणीकृत ग्राहकांपैकी सुमारे ३५% ग्राहक हे डॉक्टर आहेत.

ग्राहक आपली मागणी फोनवर तसेच व्हॉट्सअपवर नोंदवू शकतात. मुरलीच्या मते, फुडबॉक्स च्या यशस्वीतेचे कारण म्हणजे घरगुती चवीचे ताजे अन्न, पूर्वनियोजित मेनू, घरपोच सेवा आणि रास्त दर होय.

साधारणपणे ८० रुपयांत फुडबॉक्स एका माणसाचे जेवण पुरवते. दर बुधवारी फुडबॉक्समध्ये पारंपरिक दाक्षिणात्य पदार्थ बनवले जातात, तर गुरुवारी फ्राईड राईस, मंच्युरियन यांसारखे पदार्थ बनवले जातात. बिसीबेळे भात, लेमन राईस, पुलियोगरे हे फूडबॉक्सचे काही लोकप्रिय पदार्थ आहेत.

 

foodbox inmarathi4

 

सुरुवातीला मुरलीच्या आजीच्या देखरेखीखाली सगळे पदार्थ बनत असल्याने फुडबॉक्समधून दिले जाणारे पदार्थ हे घरगुती चवीचे असत. मार्चमध्ये मुरलीच्या आजीचे निधन झाले, पण त्यांनी तिच्या पाककृती प्रमाणांसह लिहून ठेवलेल्या होत्या.

फूडबॉक्समधील पदार्थ त्या प्रमाणानुसारच बनवले जातात, ज्यामुळे त्याची घरगुती चव कायम राहते. तसेच माणसाने कोणतेही काम आपले समजून केले, की त्या कामाची गुणवत्ता वाढते.

फूडबॉक्समध्ये काम करणारे आचारी तेथील भागधारकही आहेत. यामुळे तेथील प्रत्येकजण काम आपलेपणाने करतो आणि त्यामुळेच पदार्थांची गुणवत्ता कायम राहते.

 

foodbox inmarathi1

 

काळानुसार पॅकेजिंगमध्येही मुरलीने बदल केला आहे. प्लास्टिकचा वापर टाळून त्यांनी आता ॲल्युमिनिअम फॉईलचा वापर सुरू केला आहे.

फूडबॉक्समध्ये रोज ताजी भाजी वापरली जाते. कोणत्याही गोष्टीचा अनावश्यक साठा न करता गरजेनुसार त्या त्या वस्तू आणल्या जातात.

मुरलीची काकू उषा फुडबॉक्सचे आर्थिक व्यवहार आणि रोजचे कामकाज पाहते. मुरलीच्या या स्टार्टअपमध्ये ती पहिल्यापासूनच त्याच्या बरोबर आहे.

नुकतेच लॉकडाऊनपूर्वी फूडबॉक्सने मैसुरू मध्ये नवीन आउटलेट सुरू केले. आता अनलॉकपासून पुन्हा हळूहळू नियमित ऑर्डर्स येण्यास सुरुवात झालेली आहे.

पुढील वर्षात फुडबॉक्स बंगलोरमध्ये सुरू करण्याचा मुरलीचा विचार आहे, तसेच याचे एक मोबाईल ॲप्लिकेशनही सुरू होणार आहे.

शिक्षणाने इंजिनिअर असूनही आवड आणि नवीन व्यवसाय उभा करण्याची जिद्द यांच्या जोरावर मुरलीने पाच वर्षांत फुडबॉक्स उत्तमरित्या नावारूपास आणले.

व्यवसायाच्या चांगल्या कल्पना प्रभावीपणे राबविल्यास त्या यशस्वी होतात याचे फुडबॉक्स हे एक उत्तम उदाहरण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?