' तनिष्कच्या जाहिरातीवर उठलेलं वादळ आणि राज्यपालांचा "सेक्युलर" टोमणा अनेक महत्वाचे प्रश्न उभे करतात

तनिष्कच्या जाहिरातीवर उठलेलं वादळ आणि राज्यपालांचा “सेक्युलर” टोमणा अनेक महत्वाचे प्रश्न उभे करतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : ओंकार दाभाडकर

===

कोणत्याही समाजासमोर असतात तसे भारतीय समाजासमोर देखील अनेक प्रश्न आहेत. काही बदलत्या काळानुसार निर्माण झालेले नूतन नवे तर काही पूर्वापार चालत असलेले प्राचीन.

अल्पसंख्याक तुष्टीकरण आणि स्युडो सेक्युलरिझम हे कित्येक दशकांपासून रुजलेले असेच दोन प्रश्न.

जगभरात इस्लाम प्रेरित नि विविध इस्लामी संथा पुरस्कृत दहशतवाद ही आणखी एक टोकदार समस्या. भारतात रहात असलेले कोट्यवधी मुस्लिम, त्यांच्यावर वाढता इस्लामी मूलतत्वांचा प्रभाव या सर्वातून वरील तिन्ही प्रश्न अधिकाधिक भडक होत गेले आहेत हे वास्तव आहे.

२०१४ साली नरेंद्र मोदींचं पंतप्रधान होणं आणि २०१९ साली अभूतपूर्व रित्या “पुन्हा येईन” हे सिद्ध करून दाखवणं अनेक कारणांचा परिणाम म्हणून होतं. त्या सर्वांमधील महत्वपूर्ण कारणं म्हणजे स्युडो सेक्युलॅरिझम, अल्पसंख्याक तुष्टीकरण आणि इस्लामी कट्टरवाद हे होत.

 

narendra-modi-inmarahi
indianexpress.com

सध्या हिंदुत्व चहूकडे जोमाने रुजण्यामागे याच कारणांची भारतीय हिंदू समाजमनाला होणारी वाढती जाणीव आहे.

कुणी काहीही म्हणो – या समस्या खऱ्या आहेतच. स्वतःला लिबरल, पुरोगामी वगैरे म्हणवणाऱ्या लबाड विचारवंतांनी कितीही नाकारलं तरी या तिन्ही समस्यांचं दाहक वास्तव कोणताही वस्तुनिष्ठ माणूस मान्य करेलच. “पण हिंदूंमध्ये अमुक अमुक समस्या नाहीत का” अश्या कातडीबचाव प्रश्नांना अर्थच नसतो. हिंदूंमधील अनिष्ट प्रकार, त्यांची कारणमीमांसा स्वतंत्रपणे करता येते, करायलाही हवी. त्यावर काम देखील करायला हवं.

पण ‘ते’ प्रश्न आहेत म्हणून ‘हे’ प्रश्न “नाहीतच” असं होत नाही. आणि या प्रश्नांची दाहकता देखील कमी होत नाही.

सबब, भारतात “भारतीय” म्हणून प्रत्येक नागरिक व प्रत्येक नागरी समूहाला एकसारखं वागवलं जाणं आणि “या देशातील साधनसंपत्तीवर सर्वात पहिला हक्क मुस्लिमांचा आहे” छाप कम्युनल लाड तात्काळ बंद होणं अत्यंत आवश्यक आहे.

पण…!

या समस्या आहेत – हे जितकं खरं आहे – तितकंच – या समस्यांवर समाधान शोधत असताना नव्या समस्या जन्माला घालायच्या नाहीयेत – हे ही खरं आहे.

नव्या समस्या जन्माला घालणं म्हणजे काय?

तर –

अल्पसंख्याक तुष्टीकरण आहे म्हणून त्यावर बहुसंख्याक तुष्टीकरण नको! इस्लामी कट्टरवाद आहे म्हणून हिंदू कट्टरवाद नको…! स्युडो सेक्युलरीझम आहे म्हणून सेक्युलरीझमचाच विरोध नको…!

 

hindu violence marathipizza

 

देशाच्या विविध भागात मुस्लिमांविरुद्ध हिंसा होण्याच्या घटना जरी घडत असल्या तरी सुदैवाने “सर्वसाधारण हिंदू कट्टर होताहेत” असं अजूनतरी दिसत नाही. भारतीय हिंदू जात्याच सर्वसमावेशक आहे, सहिष्णू आहे, सेक्युलरच आहे. आजही बहुसंख्य हिंदू मनापासून हिंदू-मुस्लिम सौहार्द जोपासण्याच्याच मानसिकतेचे आहेत. म्हणूनच घडत असलेल्या घटना दुर्लक्षिण्याजोग्या अर्थातच नसल्या तरी “देशात यादवी माजेल” सदृश परिस्थिती नाही.

हे भारतीय – खासकरून हिंदू – सर्वसमावेशकतेचं यश आहे.

हे सगळं टिकायला हवं, वाढायला हवं. हिंदूंमधील सद्गुण मुस्लिमांमध्ये रुजायला हवेत. इस्लाम मधील दुर्गुण हिंदूंना चिकटू नयेत!

हे राज्यकर्ते, शासनकर्ते या सर्वांनी समजून घ्यायला हवं आहे. आणि हिंदू समाजानेसुद्धा.

तनिष्कच्या जाहिरातीतून उभा राहिलेला वाद नेमका याच प्रक्रियेच्या विरुद्ध जाणारा आहे.

भारतीय माध्यमांमधून इस्लाम-मुस्लिमांचं सॉफ्ट प्रमोशन होत असतं हे वास्तव आहेच. चित्रपटांमधील मुल्सिम नेहेमी गरीब असहायच असणं आणि गुंड मात्र नेहेमी भगवे, टिळकधारी असणं हे नित्याचं आहे. दिवार चित्रपटात मंदिरात नं जाणारा अमिताभ बच्चन खिश्यात ७८६ चा बिल्ला खिश्यात ठेवतो काय नि त्यामुळे त्याचा जीव वाचतो काय…इथपासून सुरुवात आहे. त्याचबरोबर समाजात लव्ह जिहाद खरोखर घडतो नि हा फक्त हिंदुत्ववाद्यांनी रुजवलेल्या खोटा प्रॉपगॅन्डा नाहीये हे ही खरंय.

म्हणूनच सर्वसामान्य हिंदूंना हिंदू मुस्लिम सौहार्द दाखवायचं म्हणून होळीमध्ये हिंदू मुलीला मुस्लिम मुलाने रंग लावताना बघितलं तर ते एकदम आक्षेपार्ह वाटणं एकवेळ समजू शकतोच आपण.

पण त्याचवेळी याच भारतात असे अनेक मोहल्ले नक्कीच आहेत जिथे असं सौहार्द खरोखरच आहे – हे ही नाकारू नये आपण.

“भारतीय मुस्लिम” खरंच जगभरातील मूलतत्ववादी मुस्लिमांपेक्षा खूप वेगळा आहे – हे खरंच आहे. तनिष्कची जाहिरात अनेक मुस्लिम घरांमधील वास्तव दर्शवणारीच आहे. या जाहिरातीवर झालेला टीकेचा भडीमार त्याचमुळे एकांगी आणि अनाठायी वाटतो.

या जाहिरातीवर अनेकांनी “तुम्ही हिंदू घरात मुस्लिम मुलगी दाखवू शकला नाही!” असा आक्षेप नोंदवला आहे.

जर तसं दाखवलं असतं तर तुम्हाला आवडलं असतं का? त्यावेळी तुम्ही “बघा, एका मुस्लिम मुलीसाठी अख्खं हिंदू घर बदललं, तिच्या मजहबच्या रसम पुऱ्या करायला लागलं…” हा कोन दर्शवत, “तुम्हाला हेच हिंदू मुलींसाठी मुस्लिम घर बदललेलं दाखवण्याची हिम्मत दाखवा आली नाही!” असा आक्षेप घेतला असताच.

आक्षेप घेणाऱ्यांनी जाहिरातीचा फोटो आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या सोनभद्रमधील क्रौर्याचा फोटो जोडून “जाहिरात विरुद्ध वास्तव” किंवा “जाहिराती आधी आणि जाहिराती नंतर” अशी तुलना करून विरोधाभास दाखवला.

 

 

आधी म्हटल्याप्रमाणे – हा विरोधाभास खोटा आहे का? तर अर्थातच नाही. इस्लामी कट्टरवाद, बळजबरी-दमदाटीने धर्मपरिवर्तन घडवून आणणं हे वास्तव आहेच. स्युडो सेक्युलर्स जसं या प्रश्नाचं अस्तित्वच नाकारतात – तसं आपण करण्यात काहीच हशील नाही.

मुद्दा हा आहे की या प्रश्ना बरोबरच खरोखर हिंदू-मुस्लिम सौहार्दाची, मुस्लिम खरात सुखेनैव नांदणाऱ्या हिंदू कुटुंबांची संख्या देखील लक्षणीय आहेच. खासकरून तनिष्कच्या जाहिरातीत ज्या आर्थिक पार्श्वभूमीचं कुटुंब दाखवलं आहे, त्या प्रकारच्या कुटुंबांमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेतच.

आणि – आपल्याला हीच उदाहरणं रुजायला हवी आहेत – हो ना?

मुस्लिम कुटुंबातील हिंदू सून आपला धर्म पाळू शकते, तिच्या धर्मातील रीती रिवाज पाळले जातात – हेच तर आपल्याला रुजायला हवं आहे ना? मग जर मुस्लिमांवर “तुम्ही हे असं वागायला हवं”, “तुम्ही हे असं ही वागू शकता” असे कळत-नकळत संस्कार रुजायला हवे असतील (जे हिंदूंवर नेहेमीच रुजत असतात, रुजत आले आहेत) तर अश्या जाहिराती फक्त योग्यच नव्हे, तर आवश्यक ही नाहीत का?

मुळात इस्लामच्या प्रश्नावर आपल्याकडे “हा” सोडून दुसऱ्या कुठला लॉजिकल मार्ग आहे?

हिंदूंनी कट्टर होणं, सतत उच्चारवात “हिंदू खतरे में है” च्या आरोळ्या ओरडत रहाणं – हे आपलं सोल्युशन आहे का? एकतर हे उत्तर आत्मघातकी आहे. हिंदू तरुणांनी आपले व्यावहारिक उत्कर्ष सोडून देऊन सतत लढाईच्या पावित्र्यात रहाणं हिंदूंच्याच नव्हे तर देशाच्या, समाजाच्याही हिताचं नाही. दुसरं म्हणजे मुळात हिंदू स्वभाव असा नाही. त्यामुळे “ते” कधी घडणे देखील नाही.

हा – हिंदूंनी जागरूक रहावं, लव्ह जिहादला आपल्या मुली बळी पडू नयेत या सर्व खबरदारी जरूर घ्याव्यात. परंतु “प्रत्येक मुस्लिम वाईटच आहे” हाच आवाज बुलंद करत नेणं आत्मघातकी आहे. यामुळे सहज पीर बाबा साई बाबा अश्यांना मानत नकळत इस्लामी मूलतत्त्वांपासून दूर जाणारा मुस्लिम कट्टर होत जाणार आहे. गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्या गावातील बायका बुरख्यात ढकलल्या जाणार आहेत.

ते हवं आहे का आपल्याला?

भारतीय समाजातील अंगभूत सेक्युलर थ्रेड उखडून टाकायचं आहे का आपल्याला?

इथेच राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रातील “तुम्ही सेक्युलर झालात काय?” या खवचट टोन मधील प्रश्नाची आठवण येते.

भारतीय संविधानाची शपथ घेऊन राज्यपाल सारख्या पदावर विराजमान असलेली व्यक्ती हा प्रश्न विचारूच कसा शकते? मूळ पात्रात असलेला हिंदुत्वचा उल्लेख देखील अस्थानी होता. तरी वैचारिक बैठक म्हणून तो एकवेळ दुर्लक्षित करू. परंतु “तुम्ही सेक्युलर झालात काय?” या प्रश्नात सेक्युलर तत्वाला टाकाऊ, हीन छटा दिली गेली आहे ती अक्षम्य आहे.

स्युडो सेक्युलॅरिझमचा विरोध सर्वांनी स्पष्ट आणि उघडपणे करत राहायला हवा. पण तो कशासाठी? तर खरं सेक्युलॅरिझम प्रस्थापित व्हावं म्हणून. स्वतःला सत्यवादी म्हणवणाऱ्या माणसाने सर्रास खोटं बोलणं सुरु केलं तर त्या माणसाच्या स्युडो सत्यवादाला उघडं पाडू आपण – “तुम्ही सत्यवादी कधीपासून झालात?” असे वाक्यप्रयोग रुजवून मूळ सत्यवादच बदनाम करणार काय?

हे प्रश्न महत्वाचे आहेत. अर्थात हे प्रश्न विचारले म्हणून “इस्लामवर टीका करून कट्टर हिंदुत्वचं छुपं समर्थन करताय काय?” आणि सेक्युलर किडा चावल्यामुळे तनिष्कचं समर्थन करताय काय?” असे एकाचवेळी परस्परविरोधी प्रश्न विचारले जातील. “उगाच बॅलन्स साधण्याचा प्रयत्न” म्हणून उडवून लावण्यात येईल. परंतु सामान्य भारतीय मन याच बॅलन्समध्ये अडकलं आहे – हे कुणीच मान्य करणार नाही.

एक बाजू इस्लाम प्रश्नच नाकारते. दुसरी बाजू इस्लाम प्रश्नाचं भांडवल करत फक्त आकांडतांडव करत रहाते.

एक बाजू लबाड स्युडो सेक्युलर आहे. दुसरी बाजू थेट कम्युनल होऊ पहात आहे.

एक बाजू तुष्टीकरण करते…दुसरी बाजू दमन करण्याकडे झुकते.

यामुळे मध्यममार्गी, सर्वसमावेशक, सहिष्णू भारतीय – जो खरंतर बहुसंख्य आहे – तोच कोंडीत सापडत आहे. त्याला समस्यांवर समाधानही सापडत नाहीये, नि समाधान शोधू शकणारे पर्याय ही.

फक्त प्रश्न तेवढे कायम रहात आहेत. कधी नवे तर कधी प्राचीन.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?