' व्हॅनिला आईस्क्रीम विकत घेतलं तर हमखास बंद पडणारी कार… वाचा विलक्षण लॉजिक! – InMarathi

व्हॅनिला आईस्क्रीम विकत घेतलं तर हमखास बंद पडणारी कार… वाचा विलक्षण लॉजिक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“टारझन द वंडर कार” हा सिनेमा आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पहिला असेल. त्यात कार मालकाच्या वडिलांचा आत्मा, त्या गाडीला कंट्रोल करत असतो. ज्यामुळे गाडी आपोआप काही कामे करते, घटना घडवून आणत असते.

अशाच एका वंडर कारबद्दल कोणी आपल्याला सांगितले व ती अगदी खरी खुरी आहे हे म्हटले, तर आपल्या कोणाचाच या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. या विषयाची गणना आपण अंधश्रद्धा किंवा मस्करीच्या कॅटेगरीमध्ये करू.

अमेरिकेत एक अशी कार आहे जिला चक्क व्हॅनिला आइस्क्रीमची ॲलर्जी आहे. व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन कोणी गाडीत बसले, तर ही कार सुरूच होत नाही. ऐकून आश्चर्य वाटत असेल ना?

अमेरिकेतील ओकलँडच्या मिशिगन येथील जनरल मोटर्सच्या कंपनीच्या, पाँटीॲक कारच्या डिविजनला “माझ्या कारला व्हॅनिला फ्लेवरचे आईस्क्रीम आवडत नाही, तिला त्याची ॲलर्जी आहे…” हा विषय असलेलं एक पत्र मिळालं.

 

car inmarathi

 

कोणाही वाचणाऱ्याला हे पत्र नक्कीच उपहासात्मक किंवा मास्करीच्या हेतूने लिहिलेला आहे हेच वाटेल. त्याचप्रमाणे कंपनी सुद्धा वाटलं व त्यांनी या पत्राकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. उघडून बघण्याची तसदीही घेतली नाही.

कोणत्याही अधिकाऱ्याने हेच केलं असतं यात काहीच दुमत नाही. कारण प्रत्येकालाच आपला वेळ अत्यंत मौल्यवान असतो.

पण काही दिवसांनी पुन्हा याच विषयाचं एक पत्र आलं. या वेळी, ग्राहकाचं म्हणणं तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी जनरल मोटर्सच्या त्या अधिकाऱ्याने ते पत्र पूर्ण वाचलं.

त्यात लिहिलं होतं की “माझे पत्र वाचून तुम्हाला नक्कीच मी वेडा वाटेन. कोणालाही तसंच वाटलं असतं. मला स्वतःला सुद्धा हे पत्र लिहितांना विचित्रच वाटतंय, पण माझ्या कारला खरंच व्हॅनिला आईस्क्रीमची ॲलर्जी आहे, आणि माझ्या दृष्टीने ही एक समस्या आहे.

आमच्या घरी रात्रीच्या जेवणानंतर गोड काही तरी खाण्याची पद्धत आहे. ज्यात आम्ही नेहमी आईस्क्रीम खातो. आम्ही सगळ्यांची मते घेऊन आज कुठला फ्लेवर आणायचा हे ठरवतो.

आईस्क्रीम आणायला नेहमी मी, नवीन विकत घेतलेली पाँटीॲक कारच घेऊन जातो. पण ज्या खेपेला मी व्हॅनिला फ्लेवरचे आइस्क्रीम विकत घेतो त्या खेपेला कार लवकर सुरूच होत नाही.

 

 

इतर फ्लेवर्सच्या वेळी मात्र बरोबर सुरू होते व कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे आमच्या कारमध्ये काय गोंधळ झालाय ते तपासण्याची तसदी घ्यावी मी आपणास ही विनंती करीत आहे.”

कार मालकाचे हे सविस्तर लिहिलेले पत्र व त्यांना येणारी अजब समस्या जाणून घेण्यास जनरल मोटर्सने एक इंजिनिअरला त्या ग्राहकाच्या समाधानासाठी त्याच्या घरी पाठवलं.

ठरलेल्या वेळी जेव्हा इंजिनिअर त्या मालकाला भेटायला आला तेव्हा तिथे एक सुशिक्षित, सुजाण माणूस होता. हे बघून त्या इंजिनीयर गोंधळातच पडला, की एक सुशिक्षित माणूस अशी तक्रार कशी काय करू शकतो?

ते दोघे ठरल्याप्रमाणे कारमध्ये बसून आईस्क्रीम आणायला गेले. त्या मालकाने ठरल्याप्रमाणे व्हॅनिला फ्लेवरच आईस्क्रीम विकत घेतले व कार सुरू करायची वेळ आली, तेव्हा ती नेहमीप्रमाणे सुरूच होईना.

हे सगळे पाहून इंजिनीयर अजूनच गोंधळाला, पण इंजिनीयर एक अत्यंत लॉजिकल माणूस असल्या कारणाने त्याने, समस्येचा छडा लागेपर्यंत कार मालकाला व कारला भेट देण्याचे ठरवले.

आता दोघांनी आईस्क्रीम घ्यायला जाणे सुरू केले. त्यांनी पहिल्या दिवशी चॉकलेट फ्लेवरचे आइस्क्रीम घेतले, तेव्हा कार व्यवस्थित सुरू झाली.

दुसऱ्या दिवशी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आईस्क्रीम विकत घेतले, तेव्हाही कार व्यवस्थित सुरू झाली. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा व्हॅनिला फ्लेवरचे आईस्क्रीम घेतले तेव्हा कार सुरूच झाली नाही.

इतर वेळी व्यवस्थित पणे सुरू होणारी कार, व्हॅनिला फ्लेवरच्या वेळी का सुरू होत नाही? हे त्या इंजिनीयरसाठी एक कधीही न बघितलेलं कोडंच  होतं.

त्या इंजिनीयरने आता आईस्क्रीम विकत घ्यायच्या प्रत्येक वेळचे अनुभव टिपणे सुरू केले. पद्धतशीर नोट्स काढणे सुरू केले, ज्यात कारला लागणारा गॅस कुठून भरला गेला, तापमान, येण्या जाण्यासाठी लागणारा वेळ या सगळ्याच्या समावेश होता.

 

writing inmarathi

 

सगळ्या पॉइंट्सचा अभ्यास करताना त्याला दुकानातून आईस्क्रीम विकत घेऊन कारमध्ये परतण्याच्या वेळेत फरक दिसला. त्यानंतर त्या इंजिनीयरने आईस्क्रीमच्या दुकानाची पाहणी केली आणि क्षणातच नेमकी गडबड कुठे आहे हे त्याच्या लक्षात आले.

ती गडबड म्हणजे “वेपर लॉक”.

आईस्क्रीमच्या दुकानाची रचना अशी होती, की व्हॅनिला फ्लेवर सगळ्यांचाच आवडता असल्यामुळे व त्याला मागणी जास्त असल्यामुळे समोरच्या बाजूला व्हॅनिला फ्लेवर ठेवण्यात आला होता व इतर फ्लेवर्स आतल्या बाजूस ठेवलेले होते.

ज्यामुळे व्हॅनिला फ्लेवरचे आईस्क्रीम विकत घेऊन कारपर्यंत जाण्यात व दुकानात आत जाऊन, इतर ठराविक फ्लेवरचे आईस्क्रीम घेऊन कारपर्यंत जाण्याच्या कालावधीत फरक होता.

 

ice cream inmarathi

 

व्हॅनिला आइस्क्रीम घेऊन परतण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने कारचे इंजिन गरमच राहायचे. त्याला पुन्हा गार होऊन मुळ स्थितीपर्यंत येण्यास लागणारा वेळच मिळायचा नाही. ज्यामुळे आतल्या गॅसचे परिवर्तन हे वेपर्समध्ये व्हायचे, ज्याने कारच्या टँकमधून इंजिनपर्यंत गॅस पोहोचायला अडचण व्हायची व कार सुरू होण्यास भरपूर वेळ लागायचा.

इतर फ्लेवरचे आईस्क्रीम घेऊन कारपर्यंत यायला उशीर होत असल्याने इंजिन थंड व्हायचे व कोणताही प्रॉब्लेम उद्भावयचा नाही.

इंजिनीअरच्या धीराने काम करण्याने, समस्येचे समाधान शोधण्याच्या जिद्दीमुळे, कार सुरू न होण्यामागे कुठलाही अनैसर्गिक घटक नसून टेक्निकल फॉल्ट होता हे सगळ्यांनाच समजले.

या गोष्टीवरून शिकण्यासारखे असे, की आपल्या ग्राहकांच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये व प्रथम दृष्ट्या समस्या कितीही क्षुल्लक वाटत असली, तरी त्याकडे लक्ष देऊन वेळीच त्यावर उपाय शोधून काढायला हवा.

प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं. वरील घटनेच्या बाबतीत इंजिनिअर सुज्ञ असल्यामुळे इंजिनची ही गडबड त्याच्या लगेच लक्षात आली, पण त्याच्याऐवजी दुसरी एखादी व्यक्ती असती, तर सरसकट या घटनेचं रूपांतर अंधश्रद्धेत झालं असतं.

विषयाच्या खोलात न शिरता, केवळ वरकरणी विचार केल्याने समाजात अंधश्रद्धा रुजू लागतात, पण एखादा प्रॉब्लेम असेल, तर त्याचा लॉजिकली विचार करणं आणि तो सोडवण्यावर भर देणं जास्त गरजेचं आहे, हे वरील उदाहरणावरून पटतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?