' अमिताभ बच्चन यांचं वेगळेपण नेमकं रेखाटणारा अप्रतिम लेख! – InMarathi

अमिताभ बच्चन यांचं वेगळेपण नेमकं रेखाटणारा अप्रतिम लेख!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : राजेश कुळकर्णी

===

द बच्चन
.
.
बच्चन यांचा आज वाढदिवस.

आठवणीत असलेला त्यांचा पाहिलेला पहिला सिनेमा शोले. करमाळ्याच्या तंबूमध्ये पडदा मध्ये व पडद्याच्या दोन्ही बाजूंना बसलेले लोक. त्यातही विरूध्द बाजूला बसून पाहिलेला. टायटल्स उलटी दिसली, नंतर काही फार वावगे वाटल्याचे आठवत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नंतर मोठे झाल्यावर शाळेत असताना नांदेडच्या गणेश टॉकिजमध्ये ‘मुकद्दर का सिकंदर’ हा सिनेमा पाहिल्याचे आठवते. नंतर शाळेत आल्यावर मित्रांमध्ये सिनेमाला ते नाव का दिले असेल यावर चर्चा.

 

amitabh bachchan inmarathi

 

सिकंदर हा मुकद्दर या गावचा असेल, म्हणून तसे नाव यावर एकमत झाल्याचे आठवते. तो सिनेमा खरे तर आवडला, तरी सलामे इश्क व रोते हुए आते हैं सब या गाण्यांऐवजी पियानोवरील दिल तो है दिल हे गाणे जास्त आवडले, यावरून मित्रांकडून शिव्या खाव्या लागल्या होत्या.

मोठे होत असताना काही लेखांमधून बच्चन अशा सिनेमांमधून काम करून कसे स्वत:चे नुकसान करून घेत आहेत असेही वाचले होते. तेव्हा एवढ्या गाजणार्‍या सिनेमाने त्यांचे नुकसान कसे होणार, हे कळत नसे.

नंतर पाहण्यात आला नूतनबरोबरचा सौदागर. बच्चन काय चीज आहे याची झलक त्यातून दिसली. हा खरे तर त्याच्या सुरूवातीच्या सिनेमांपैकी. अखेरच्या काही प्रसंगातला रडवेलेपणा अजूनही लक्षात आहे.

माझ्या दृष्टीने नंतरच्या काळातील मंझीलसारखा सिनेमा वगळता पोट नसते तर त्यातले कितीतरी सिनेमा त्यांनी केलेच नसते. आनंद, अभिमान, मिली वगैरे मध्येही चित्रपट चांगले असले, तरी अभिनयाचा कस वगैरे लागल्याचे फार कधी दिसले नाही.

आता बच्चनसारख्यांशी खासगीत भेट होण्याची दूरदूरतक शक्यता नसली, तरी आपल्यालाही त्यांचा राग येऊ शकतोच की! तसेच मला त्यांचा राग आला तो त्यांनी एका मुलाखतीत त्यांचे सर्वात आवडते दिग्दर्शक मनमोहन देसाई हे असल्याचे सांगितले तेव्हा. अगदी त्यांच्या स्वत:च्या कारकिर्दीचाच नाही, तर भारतीय सिनेसृष्टीचा त्यांनी अपमान केल्यासारखे वाटले.

खरोखर त्यांचे तसे म्हणणे होते का, नसले तर मग काय कारण होते, हे कधी कळणार नाही. शिवाय तोंडाचा चंबू करून व डोळे मोठे करून काही बोलण्याची जी त्यांची लकब आहे, तीच त्यांच्या अभिनयक्षमतेची परिसीमा आहे असा काही दिग्दर्शकांचा समज आहे, परंतु त्यांचे ते रूप संतापजनक वाटे. अगदी आताच्या पिकूमध्येही ती लकब वापरण्याचा मोह दिग्दर्शकाने थोडक्यात टाळला.

 

piku InMarathi

 

ते राजकारणात पडले, चित्रपटनिर्मितीसाठी कंपनी स्थापन केली. दोन्ही प्रकार अंगलट आले. नंतर त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यावर लक्ष केंद्रित केले.

यादरम्यान त्यांना समाजवादी पक्षाशी संबंध जोडून अमरसिंह, मुलायमसिंह यांच्यासारख्या हलकट व देशावर भार असलेल्या माणसांशी संबंध जोडावे लागले. सारे ठीक चालले असते, तर त्यांना कदाचित याची गरज न पडती.

त्यांची विशेष गोष्ट जाणवे, की ते हिंदी बोलताना अस्खलित हिंदी बोलतात. इंग्रजी बोलताना ही तसेच. हे सहज जमण्यासारखे नसते. बोलताना ‘याठिकाणी’सारखे तेच तेच शब्द येत नाहीत. असे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे लोक दिसतात.

सोशल मेडिया फार जोरात नसतानाच्या काळात त्यांनी बीबीसीने आयोजित केलेल्या सर्व्हेमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय अभिनेता हे बिरूदही मिळवले.

कुली या तद्दन फालतु चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यावेळी झालेल्या जीवघेण्या अपघाताच्या काळात आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता, तरी त्यांच्यासाठी आलेले शुभेच्छांचा महापूर क्वचितच कोणाच्या वाट्याला येतो.

त्यांच्या मुलाखतींमधून, टीव्हीवरील कार्यक्रमांमधून त्यांच्या सुसंस्कृतपणाचा परिचय होतो. त्यांच्या बोलण्यात आले, की मध्यंतरीच्या कठीण काळातून मार्गक्रमण करताना या सुसंस्कृतपणामुळेच त्यांना तारले.

“ती वेळ अशी होती की कोणी मला फरशी पुसायचे काम दिले असते तरी मी ते केले असते व मला त्यात कमीपणा वाटला नसता” असे ते म्हणतात.

त्याकाळात घसरलेली पत सावरण्यासाठी जवळच्या मित्रांना त्यांच्या गाड्या त्यांच्या घरासमोर दिसू द्यात अशी विनंती ते करायचे, हेही ते मोकळेपणाने सांगतात. त्यांच्यासाठी या सर्वांमधून अभिमानाची गोष्ट ही की त्यांनी त्यातले पै-पैचे कर्ज फेडले.

त्यादरम्यान त्यांनी करामध्ये काही सवलती मिळवण्यासाठी अनिवासी भारतीयत्व पत्करले वगैरे आरोप त्यांच्यावर झाले, पण त्यांनी काही बेकायदेशीर केले नसणार याची मला खात्री आहे. अन्यथा आपल्याकडे कर्जबाजारी होऊनही मस्तवालपणा करणार्‍यांची काही कमी उदाहरणे नाहीत.

त्यांच्या उमेदवारीच्या काळातल्या मेहमुदसारख्या त्यांच्या मित्रांशी त्यांनी अखेरपर्यंत चांगले संबंध ठेवले अशा गोष्टीही आपण ऐकतो.
त्यांच्या कारकिर्दीतल्या विविध कालखंडातल्या भूमिका पाहिल्या, तर सुपरस्टार होण्याच्या आधीच्या व आताच्या अलीकडच्या त्यांच्या भूमिका अधिक वास्तववादी वाटतात.

देव, चिनी कम, पिकू ही अलीकडची काही उदाहरणे. पा सारख्या सिनेमात पूर्ण चेहराच बदलण्याचा प्रकार पाहिला, तर त्यातून अभिनयक्षमतेला फारसा वाव रहात नाही.

 

amitabh bachchan inmarathi1

 

पूर्वी सुपरस्टार असताना बच्चन शेट्टीसारख्याला मारत व तो ही गुमाने मार खाऊन घेई. असे हास्यास्पद प्रसंग करताना स्वत: बच्चन यांनाही मनातल्या मनात कोठे तरी वाईट वाटत असणार. कारण तेही जागतिक सिनेमाकडे लक्ष ठेवून असणारच.

तंत्र व आशय यांच्या निकषांवर पाहिले व त्यातही आशयाघनतेच्या दृष्टीने मानाने पाहिले तर आपण किती दलदलीत आहोत याची त्यांना कल्पना नसेल असे म्हणवत नाही, परंतु अभिनेत्याच्या दृष्टीने पाहिले तर याबाबतीत काय करणे खरोखर त्याच्या स्वत:च्या हातात असते? तो काही हवेत अभिनय करू शकत नाही. इथले निर्माते, दिग्दर्शक यांच्या जोडीलाच प्रेक्षकही कोणत्या दर्जाचे आहेत यावरही त्या अभिनेत्याचे भजे होणार की काय ते अवलंबून असते. मग भलेही तो सुपरस्टार का असेना.

आजच्या फरहान अख्तर, नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यासारख्या अभिनेत्यांना ज्या पद्धतीच्या भूमिका मिळतात, तशा भूमिका आपल्याला आपल्या उमेदीच्या काळात मिळाल्या असत्या तर काय बहार आली असती असा विचार त्यांच्या मनात नक्कीच येत असणार.

या जर तरच्या विधानांना खरे तर काही अर्थ नसतो. मात्र ओमार शरीफ यांच्या निधनानंतर आलेल्या बातम्यांमध्ये लॉरेन्स ऑफ अरेबिया या सिनेमातील भूमिका दिलीपकुमार यांनी नाकारल्यामुळे त्यांच्याकडे गेल्याचे कळले होते.

आताच्या द ग्रेट बॅट्सबी या चित्रपटात बच्चन यांची एक-दीड मिनिटाची भूमिका होती. त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला त्या भूमिकेसाठी तो बच्चन यांच्याखेरीज अन्य कोणाचाही विचार करू शकत नव्हता असे उगाचच हरभर्‍याच्या झाडावर चढवणारे म्हणताना मी ऐकले होते.

बच्चन यांच्या उमेदीच्या काळातील आपल्याकडचे मुख्य प्रवाहातील सिनेमाचे किती दिग्दर्शक हे सत्यजित रे तर सोडून द्या, पण चांगल्या म्हणता येतील अशा दिग्दर्शकांच्या पासंगाला पुरणारे होते हे पाहिले, तर मी काय म्हणतो हे लक्षात यावे. त्यामुळे बच्चन यांना मी डबक्यातला बेडूक असे अजिबात म्हणत नाही. कारण चूक तर आपल्याकडच्या गल्लाभरू चित्रपटनिर्मात्यांची व तेवढ्याच दळभद्री अभिरूचीच्या प्रेक्षकांची आहे. अर्थात या अभिरूचीला आपली सामाजिक स्थिती जबाबदार आहे असे काहीजण म्हणतीलही. समोर तोलामोलाची फारशी उदाहरणे नसल्यामुळे त्यांचाच तो काय अभिनय आणि त्यांचीच ती काय ष्टाइल असे वाटणारेही असतील.

अशीच मर्यादित समज असलेले लोक मग आपल्या लिखाणातून दीवारमधील ‘मेरे पास अमुक है तमुक है, तेरे पास क्या है’,’ या संवादाच्या वेळी बच्चनसमोर शशी कपूर यांचे मांजर होते असे सांगताना किंवा जलवासारख्या चित्रपटात केवळ एका प्रसंगात बच्चन आख्खा चित्रपट खाऊन टाकतात असे म्हणताना अशा समजांना हातभार लावतात.

आताही अल पचिनो, जॅक निकल्सन व रॉबर्ट डि निरो यांच्यासारखे तरूणपणी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते आताही तेवढाच आनंद देत आहेत, हे पाहिले, तर बच्चन यांच्याबाबतीत आधीच्यापेक्षा बरे एवढीच समाधानाची परिस्थिती आहे हे पाहून खरोखर वाईट वाटते.

बच्चन यांची गल्ल्याच्या दृष्टीने सर्वथैव यशस्वी कारकीर्द पाहता ते जेव्हा केव्हा निवृत्त होतील त्यावेळी त्यांच्या प्रतिभेला पुरेसा न्याय मिळाला नाही असे म्हणण्याचे धाडस आपल्याकडे फार कोणी करणार नाही. कारण प्रतिभेला न्याय मिळण्याची आपल्याकडची व्याख्या ही गल्ल्याच्या किंवा लोकप्रियतेच्या किंवा दोन्ही दृष्टीने असते. परंतु बच्चन यांची प्रतिभा व त्यांना मिळालेले बहुतांशी टुकार सिनेमे पाहता त्यांना जेमतेम ३०-४०%च न्याय मिळाला असे मी म्हणेन.

 

amitabh bachchan inmarathi

 

भारतातील कितीतरी समीक्षक बच्चन यांना सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेत्यांच्या यादीत मोजत नाहीत, याचे अनेकांना आश्चर्य वाटत असेल, परंतु मला वाटते याचे कारण हेच असेल.

त्यांची तब्येत फारच नाजूक असल्याचे मधूनमधून वाचण्यात येते. तरीदेखील वयाची अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण होताना त्यांच्यासारखी बाह्यरूपाने ठणठणीत वाटणारी तब्येत आपलीही त्या वयात असावी असे अनेकांना वाटेल.

सध्या दारू हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे समजणारे अनेक जण दिसत असताना या क्षेत्रात राहूनही त्यापासून दूर राहणारे बच्चन हे आश्चर्याचा विषय ठरतील. त्यांना देवत्व देणारे स्वत: मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतील.

समाजहिताचे सार्वजनिक संदेश पसरवण्याच्या विविध उपक्रमांमध्ये ते आघाडीवर असतात. त्यांच्या लोकप्रियतेचा असा उपयोग करून घेतला जातो. मात्र चित्रपटसृष्टीच म्हणजे त्यांचे स्वत:चे क्षेत्रच ड्रग्जच्या व इतर अनेक अपप्रवृत्तींच्या विळख्यात सापडलेले असताना त्यांनी त्याबाबत मौन बाळगणे निश्चितपणे खटकणारे आहे.

संघात मॅचफिक्सिंगचे प्रकार होत असूनही कदाचित ‘आपण बरे व आपला खेळ बरा’ या भावनेने त्याला वाचा न फोडणारा तेंडूलकर आणि बच्चन यांच्यात मग फारसा फरक रहात नाही. समाजातील अपप्रवृत्तींबद्दल न बोलणारे, स्वत:ला लोकप्रिय म्हणवणारे राजकारणीही आपल्याला अपरिचित नाहीत.

त्यांच्या अभिनयाच्या उर्वरीत कारकिर्दीत त्यांना वैविध्यपूर्ण भूमिका मिळोत व त्यांचे आरोग्य चांगले राहो या स्वार्थी शुभेच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?