' या १६ हॉटेल्सचं स्वातंत्र्यपूर्व भारताशी आहे एक अपूर्व, अनोखं नातं… – InMarathi

या १६ हॉटेल्सचं स्वातंत्र्यपूर्व भारताशी आहे एक अपूर्व, अनोखं नातं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

विविधता हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख अंग आहे. चालीरिती, भाषा, वेष, धर्म, पंथ यांच्यातील विविधतेबरोबरच अजून एका बाबतीत भारतात मोठे वैविध्य दिसून येते, ते म्हणजे भारतातील खाद्यसंस्कृती!!!

भारतात प्रत्येक प्रांतानुसार तसेच त्या प्रांतातील लोकसंस्कृती, चालीरिती यांनुसार खाद्यपरंपरेत बदल दिसून येतो. आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म मानले गेले आहे.

त्यामुळे खाद्यपदार्थ हे केवळ भूक भागवणे या एकाच उद्देशाने बनवले आणि खाल्ले जात नाहीत. स्वादातून मिळणारा आनंद अनुभवणे हाही एक महत्त्वाचा भाग असतो.

खाद्यपदार्थांमध्ये एवढे वैविध्य असल्यामुळेच की काय, भारतात खवैय्यांची कमी नाही.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात शहरे विकसित होण्यास सुरुवात झाली. नवे व्यापारउदीम सुरू झाले, लोक कामाच्या शोधात एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात स्थलांतरित होऊ लागले.

घराबाहेर असताना पोटापाण्याची सोय करण्याची गरज भासू लागली आणि यातूनच भारतात “हॉटेलिंग” ची सुरुवात झाली असे म्हणता येईल.

 

indian restaurant inmarathi

 

या काळात भारतात मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा महानगरांमधून उपाहारगृहे अर्थात् रेस्टॉरंटस् उभी राहण्यास सुरवात झाली आणि हळूहळू त्यांचे लोण इतरत्रही पसरले. यापैकी काही उपाहारगृहे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांमुळे लोकप्रिय झाली.

एवढेच नव्हे, तर ३-४ पिढ्या उलटल्यानंतरही ती आजही आपली ओळख टिकवून आहेत.

यापैकी काही रेस्टॉरंटस् तेथे मिळणाऱ्या पारंपरिक भारतीय पदार्थांमुळे प्रसिद्ध आहेत तर काही पाश्चात्त्य शैलीतील पदार्थांसाठी ओळखली जातात. अशाच काही जबरदस्त ठिकाणांची माहिती आपण घेऊया.

केसर दा ढाबा, अमृतसर

अमृतसर हे पंजाबातील एक राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर. अमृतसर जेवढे सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग यांसाठी प्रसिद्ध आहे तेवढेच इथल्या खाद्यसंस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे.

मुळात पंजाबी पद्धतीचे जेवण भारतात सर्वत्र लोकप्रिय आहे. पनीर, तूप, मलई यांचा सढळ हस्ते वापर करून विशिष्ठ मसाल्यांमध्ये बनवलेले शाकाहारी व मांसाहारी पंजाबी पदार्थ तोंडाला पाणी आणतातच.

 

paneer-tikka-masala-inmarathi

 

अमृतसरमध्ये पंजाबी पदार्थ चाखायचे असतील तर “केसर दा ढाबा” हा उत्तम पर्याय आहे. १९१६ मध्ये केसरलाल माल आणि त्यांच्या पत्नीने सध्या पाकिस्तानात असलेल्या शेखपुरा येथे हा ढाबा सुरू केला. फाळणीनंतर ते अमृतसरमध्ये आले आणि इथे ढाबा नव्याने सुरू केला.

 

dal-makhani-inmarathi

 

इथली सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे दाल माखनी… जी रात्रभर मंद आचेवर शिजवून तयार केली जाते. तसेच इथले पालक पनीर, निरनिराळे पराठे तसेच शाही फिरनी हे पदार्थ मुद्दाम खाण्याजोगे आहेत.

करीम, दिल्ली

दिल्लीतील चांदणी चौक म्हणजे खाद्यप्रेमींसाठी पर्वणीच. अनेक लहान मोठे विक्रेते इथे वेगवेगळी चाट, छोले भटोरे, मोमोज, पास्ता, ऑम्लेट, कबाब अशा शेकडो पदार्थांमधून खवैय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत असतात.

 

karim-thali-inmarathi

 

१९१३ मध्ये हाजी करीमउद्दीन यांनी सुरू केलेले करीम हे रेस्टॉरंट म्हणजे मुघलाई खाद्यपदार्थांचे आगर आहे. मटण निहारी, चिकन जहाँगिरी, वेगवेगळे कबाब यांसाठी करीमला भेट द्यायलाच हवी.

युनायटेड कॉफी हाऊस

कॅनॉट प्लेस हा भाग इथल्या विदेशी लोक, सरकारी अधिकारी यांच्या वर्दळीमुळे दिल्लीत तसा उच्चभ्रू समजला जातो. युनायटेड कॉफी हाऊस हे रेस्टॉरंट कॅनॉट प्लेसला १९४२ साली सुरू झाले. आजही या रेस्टॉरंटने आपली स्वातंत्र्यपूर्व काळातील ओळख जपली आहे.

 

united-coffee-house-inmarathi

 

इथे कायम सनदी अधिकारी, उद्योजक आणि पर्यटक यांची वर्दळ दिसून येते. खाण्याच्या बाबतीत म्हणायचे झाले तर इथे भारतीय तसेच पाश्चात्य पद्धतीचे पदार्थ उत्तम मिळतात.

हरी राम अँड सन्स –

अलाहाबाद म्हणजेच सध्याचे प्रयागराज हे उत्तर प्रदेशातील सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर होय. तीर्थक्षेत्र असण्याबरोबरच प्रयागराज इथल्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.

हरिराम अँड सन्स हे येथील काही जुन्या दुकानांपैकी एक आहे. याची स्थापना १८९० मध्ये झाली आहे! उत्तर प्रदेशात प्रसिद्ध असणारे चाट चे वेगवेगळे प्रकार, पालक शेव, सामोसे आणि कचोरी यांसाठी हरिराम प्रसिद्ध आहे.

टुंडे कबाबी, लखनौ

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ म्हणजे नबाबी थाटाचे शहर. लखनौ इथल्या कबाब आणि बिर्यानीसाठी जास्त प्रसिद्ध आहे. टुंडे कबाबची सुरुवात लखनौच्या नबाबाचे आचारी हाजी मुराद अली यांनी १९०५ साली केली.

 

tunday-kababi-inmarathi

 

इथले अप्रतिम मसाले आणि शुद्ध तुप वापरून केलेले लुसलुशीत कबाब खाणे म्हणजे सुखच! कबाब प्रेमींसाठी लखनौला गेल्यावर टुंडे कबाबला भेट देणे क्रमप्राप्तच आहे.

फ्लरीज, कोलकाता

१९२७ साली कोलकातामधील पार्क स्ट्रीट या भागात सुरू झालेले ‘फ्लरीज’ पाश्चिमात्य खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. फ्लरी आडनावाच्या दाम्पत्याने हे उपहारगृह सुरू केले होते.

 

flurys-inmarathi

 

रम बॉल्स, ब्रिटिश पद्धतीचा ब्रेकफास्ट ही येथील खास वैशिष्ट्ये आहेत. याबरोबरच इथली सजावटी युरोपियन पद्धतीची असल्याने त्याचाही वेगळा प्रभाव जाणवतो. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे इथे दर रविवारी नाश्त्याला येत असत.

निजामस् रेस्टॉरंट

काठी रोल हा पश्चिम बंगालमधून प्रसिद्ध झालेला एक लज्जतदार पदार्थ आहे. ‘निजामस् रेस्टॉरंट’ हे १९३२ साली सुरू झालेले उपहारगृह म्हणजे या काठी रोल्स चे जन्मस्थान होय.

एकदा एका परदेशी ग्राहकाने तो फार घाईत असल्याने कोणता तरी कोरडा, लवकर मिळेल असा आणि सोबत नेता येईल असा पदार्थ मिळेल का अशी विचारणा केली, यातूनच काठी रोलचा जन्म झाला.

 

kathi-roll-inmarathi

 

आजही निजामस् कबाब आणि रोल्समुळे कोलकात्यात खवय्यांची पहिली पसंती आहे.

लिओपोल्ड कॅफे

फोर्ट हा मुंबईतील प्रतिष्ठित आणि जुना भाग. पूर्वीच्या काळात तसेच आत्ताही या भागात प्रशासकीय कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस असल्याने सतत माणसांची वर्दळ असते.

लिओपोल्ड कॅफे या भागातील सगळ्यात जुन्या ठिकाणांपैकी एक आहे. १८७१ मध्ये लिओपोल्ड कॅफे सुरू झाला. वेगवेगळ्या पाश्चात्य खाद्यपदार्थांसोबतच इथे मद्याचा आस्वादही घेता येतो.

 

leopold-cafe-inmarathi

 

२००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लिओपोल्ड कॅफेचे बरेच नुकसान झाले होते. पण अल्पावधीतच लिओपोल्ड पुन्हा पूर्वीच्या दिमाखात सुरू झाला होता. मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये लिओपोल्ड कॅफे हे एक प्रमुख आकर्षण आहे.

जोशी बुढाकाका माहीम हलवा वाला

सुप्रसिद्ध माहीम हलव्याचे हे जन्मस्थान आहे. जोशी बुढाकाका हे दुकान तब्बल २०० वर्षं जुने आहे! गिरीधर मावजी यांनी पातळ चौकोनी लाद्यांच्या रुपात एक गोड पदार्थ विकण्यास त्या काळात सुरुवात केली.

 

joshi-budhakaka-inmarathi

 

अल्पावधीतच तो पदार्थ दुकानाच्या पत्त्यावरून ‘माहीम हलवा’ म्हणून प्रसिद्ध झाला. आजही इथला माहीम हलवा विकत घेण्यास देशभरातून लोक येतात.

ब्रिटानिया

मुंबईत इराणी हॉटेल्स एकेकाळी फार प्रसिद्ध होती. काळाच्या ओघात त्यातली बरीच हॉटेल्स बंद झाली. तरी ब्रिटानिया, मेरवान, कुलार कॅफे अशी काही इराणी हॉटेल्स आजही आपली ओळख टिकवून आहेत.

 

britannia-inmarathi

 

फोर्टमधील ब्रिटानिया रेस्टॉरंट हे १९२३ साली सुरू झाले. त्या काळी फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच प्रवेश असलेले ब्रिटानिया तेथील जुन्या पद्धतीचे वातावरण आणि शोभिवंत फर्निचर यांमुळे आजही लोकांना आकर्षित करते.

येथील मटण आणि चिकन बेरी पुलाव विशेष प्रसिद्ध आहे.

बडेमिया

मुंबईत कबाब आणि बिर्यानी हे पदार्थ खायचे आहेत आणि बडेमियाचे नाव घेतले नाही, असे होणे शक्यच नाही. १९४२ साली एका स्टॉल च्या रुपात सुरू झालेले बडेमिया अनेक ठिकाणे बदलल्यानंतर कुलाब्याला स्थिर झाले.

मोहम्मद यासिन यांनी याची सुरुवात केली आणि आपल्या भरदार मिशांमुळे त्यांना बडेमिया या नावाने ओळखले जाई. हीच ओळख या दुकानालाही चिकटली.

 

bademiya-inmarathi

 

बडेमिया इथल्या लज्जतदार कबाब आणि बिर्यानी साठी प्रसिद्ध आहे. रोज संध्याकाळी इथे लोटणारी खवैय्यांची गर्दी याच्या प्रसिद्धीची साक्ष देते.

दोराबजी अँड सन्स

पुण्यातील कॅम्प भागात असणारे दोराबजी अँड सन्स हे हॉटेल पारशी पद्धतीच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.

१८७८ मध्ये दोराबजी सोराबजी यांनी हे हॉटेल सुरू केले. सुरुवातीला चहापासून सुरू झालेले हे हॉटेल नंतर तेथील पारशी पदार्थांसाठी प्रसिद्ध झाले. धानसाक, पात्रानी मच्छी, सल्ली बोटी अशा स्पेशल पारसी पाककृती ही दोराबजी ची खासियत आहे.

चाफेकर दुग्ध मंदिर, नागपूर

१९३१ मध्ये वासुदेव गोविंद चाफेकर आणि नारायण सखाराम पालकर या दोन मित्रांनी चाफेकर दुग्ध मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपासून सुरुवात झाल्यावर त्याचे रूपांतर उपाहारगृहात झाले.

 

chafekar-dugdha-mandir-inmarathi

 

स्वातंत्र्यपूर्व काळात हे ठिकाण म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटीचे ठिकाण असे. साधी सजावट आणि बैठक व्यवस्था असणारे चाफेकर दुग्ध मंदिर इथल्या साबुदाणा वडा, खिचडी, श्रीखंड, मसाला दूध आणि पियुष या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.

मावाल्ली टिफिन रूम, बंगलोर

दाक्षिणात्य/उडपी पदार्थ भारतभर लोकप्रिय आहेत. खासकरून सकाळच्या नाश्त्यासाठी इडली, मेदूवडा, डोसा हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कर्नाटकात बंगलोरमधील मावाल्ली टिफिन रूम हे रेस्टॉरंट १९२४ पासून खवैय्यांची भूक भागवत आहे.

यांनी तयार केलेली दाक्षिणात्य पदार्थांची रेडी टू कूक उत्पादने एमटीआर या नावाने भारतभर उपलब्ध असतात. उत्तम दर्जा आणि कमालीची स्वच्छता यामुळे एमटीआर विशेष प्रसिद्ध आहे. रवा इडलीची सुरुवातही एमटीआरनेच केली.

 

mtr-inmarathi

 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा तांदळाचा तुटवडा होता तेव्हा एमटीआर ने पारंपरिक इडलीला पर्याय म्हणून रवा इडली बनवण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता ती दक्षिण भारतात सर्वत्र लोकप्रिय झाली.

मित्र समाज, उडुपी

कर्नाटकातील उडुपी मधील हे रेस्टॉरंट जवळपास १०० वर्षं जुने आहे! इथले वेगवेगळ्या प्रकारचे डोसे, बुलेट इडली आणि मंगलोर भजी विशेष प्रसिद्ध आहेत.

इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उडुपी पदार्थांच्या नियमानुसार येथील खाद्यपदार्थांमध्ये कांदा, लसूण आणि मुळा अजिबात वापरले जात नाही.

 

mitra-samaj-udipi

 

इथे मिळणारे मंगलोरीयन बन, मसाला डोसा, खास दक्षिण कानडी पद्धतीची कचोरी आणि बदाम दूध हे पदार्थ आवर्जून चाखून बघण्यासारखे आहेत.

रायर्स मेस, चेन्नई

चेन्नईतील मायलापूर येथे १९४० साली श्रीनिवास राव यांनी रायर्स मेसची सुरुवात केली.

 

rayars-mess-idli-inmarathi

 

इथे मिळणाऱ्या लुसलुशीत इडल्या, कुरकुरीत वडे आणि त्यासोबत मिळणारी चटणी आणि दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी गरमागरम कॉफी हे पदार्थ निव्वळ अप्रतिम असतात! इथे नियमित येणाऱ्या लोकांची संख्याही पुष्कळ आहे.

अप्रतिम चवीबरोबरच इथली स्वच्छता देखील वाखाणण्याजोगी आहे.

याखेरीज भारताच्या बऱ्याच शहरांमध्ये अनेक जुनी उपाहारगृहे बघायला मिळतात. अलीकडच्या काळात नव्याने उदयास आलेल्या ‘फूड ब्लॉगिंग’ या संकल्पनेमुळे अशी ठिकाणे ब्लॉगर्स आपल्या लेखांमधून, व्हिडीओज मधून खवैयांपुढे आणत असतात.

वर्षानुवर्षे ही उपाहारगृहे आपल्या चवीमुळे आणि आदरातिथ्यामुळे लोकांच्या मनात जागा करून राहिली आहेत. आता अनलॉक नंतर यातील बरीचशी उपाहारगृहे सुरू होतीलच, त्यामुळे लवकरच आपल्याला इथल्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल यात शंकाच नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?