' प्रेमाच्या गुरफटलेल्या बंधांवर भाष्य करणारा गुलझारचा ‘इजाजत’ – InMarathi

प्रेमाच्या गुरफटलेल्या बंधांवर भाष्य करणारा गुलझारचा ‘इजाजत’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्याला गुलजारचे चित्रपट आवडतात बुवा. आता त्याचे सगळेच चित्रपट आवडतात, अशातला भाग नाही पण साधारण १९९५ च्या आधीचे म्हणजे माचिसच्या आधीचे चित्रपट मला आवडतात. इतर दिग्दर्शक आणि गुलझार यांच्या बाबत असं जाणवत कि इतर दिग्दर्शकांचे चित्रपट आवडले तरी त्या चित्रपटातले सगळे आवडतेच असे नाही. म्हणजे कदाचित गाणी आवडणार नाहीत किंवा climax आवडणार नाही पण गुलझारचा चित्रपट मला तरी एकतर सगळाच्या सगळा आवडतो किंवा अजिबात आवडत नाही उदा. हुतुतू हा मला अजिबात आवडला नाही अगदी गाण्यांसकट. आता मला आवडला नाही म्हणजे इतर कुणाला तो आवडू नये असं अजिबात नाही.

hu-tu-tu-gulzaar-marathipizza
alchetron.com

माणसाच्या स्वभावातील भिडस्तपणा हा प्रेमासारख्या संवेदनशील विषयामध्ये कसा अडचणीचा ठरतो आणि त्यामुळे त्याची कशी फरफट होते याचं उत्तम काव्यमय चित्रण म्हणजे गुलझारचा इजाजत हा चित्रपट. यात हा भिडस्तपणा आणि त्याबरोबर ज्या गोष्टी किंवा नाती/ व्यक्ती आपल्या पासून लांब गेल्या आहेत त्यांना विसरून स्वतःच आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करण्यात येणारं अपयश अन त्यामुळे होणारी जीवाची फरफट / परवड अत्यंत ठळकपणे जाणवते.

एका अर्थी भिडस्तपणा माणसाच्या मनातील लपून असलेल्या तीव्र स्वरूपाच्या अहंकाराचे एक रूप आहे. त्याच बरोबर परिस्थितीवश जी गोष्ट, जी माणसं किंवा नाती आपल्यापासून दुरावली आहेत, मग त्यामागची कारणं कोणती ही असो, त्यांना विसरु न शकणं, आपलं आयुष्य त्यांच्या वाचून सुरु ठेवू न शकणं हे ही अहंकाराचंच रूप आहे. बऱ्याचदा मनाने खरोखर चांगल्या असलेल्या, सज्जन माणसांची त्यांच्या या दोषामुळे जेव्हा वाताहत होते, ते स्वतःच्या छुप्या अहंकाराच्या बरोबर फरफटत जातात तेव्हा आपण फक्त हळहळत त्यांच्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची परवड बघत राहतो. हीच भावना इजाजत बघून झाल्यावर होते.

ijaazat-marathipizza01
learningandcreativity.com

या चित्रपटाची पूर्ण गोष्ट मी सांगत नाही, तुम्ही मुळातून तो चित्रपट आवर्जून पहा, पण थोडक्यात गोष्ट अशी . महेंद्र (नसीरुद्दीन शहा) हा लहानपणीच अनाथ झालेला आणि दद्दूने (शम्मि कपुर) वाढवलेला मुलगा. लहानपणीच त्याचे सुधा (रेखा) या दद्दूच्या दूरच्या एका विधवा बहिणीच्या पार्वतीच्या (सुलभा देशपांडे) मुलीशी साखरपुडा झालेला आहे. अजून लग्न झालेले नाही पण शिक्षण आणि करिअर साठी लांब असताना महेंद्र मायाच्या (अनुराधा गांगुली) प्रेमात पडतो. ही माया एक मुक्त विचारांची आणि आचारांची मुलगी आहे. तिचही महेंद्रावर प्रेम आहे पण अजून तरी ती लग्नाला तयार नाही. साखरपुड्यानंतर फार काळ मुलगी तशीच लग्न न करता राहणं बर नाही, म्हणून सुधाच्या आईचा आणि दद्दूचा तगादा चालूच आहे. शेवटी ते त्याला अगदी ULTIMATUM देतात तेव्हा हा माया ला शोधायला जातो, पण नेमकी त्याच वेळी ती कुणाला काही न सांगता कुठेतरी गायब होते आणि याला नाईलाजाने सुधाशी लग्न करावे लागते.

पण हा प्रामाणिक आहे अन तो लग्नाआधी सुधाला सर्व कल्पना देतो. हे सर्व असे असून ही दोघ लग्न का करतात? तर हा चित्रपट आहे आणि तशी गोष्टीची गरज आहे पण हे अगदी घडूच शकत नाही असं थोडच आहे?….असो लग्नानंतर ही माया त्यांच्या दोघांच्या आयुष्यातून जात नाही, तिला महेंद्र स्वतःच्या आयुष्यातून बेदखल करू शकत नाही आणि हे सुधाला पसंत पडत नाही शेवटी व्हायचे तेच होते आणि सुधा त्याला सोडून जाते. ह्याचा अहंकार आणि सुधावरच प्रेम इतका दुखावतं की त्याला संतापाने HEART ATTACK येतो. सुधा जवळ नसते आणि काळजी घ्यायला (?) माया आलेली असताना सुधाचा फोन येतो जो माया उचलते. सुधा काय समजायचं ते समजते आणि घटस्फोटाची नोटीस पाठवते आणि एकतर्फी घटस्फोट घेते. तिला समजवायला जाताना माया अपघात होऊन मरते. हा सगळा भाग FLASH BACK मध्ये आपण पाहतो. चित्रपटाच्या सुरुवातीला एका आडगावच्या / निर्मनुष्य रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूम मध्ये हे दोघं जण भेटतात आणि चित्रपट असा आठवणीतून उलगडत जातो.

http://anuradhawarrier.blogspot.in

यामध्ये खास गुलझार टच असलेली दृश्य, गाणी आणि संवाद तर आहेतच पण एकूण कथा अशी काही गुंफली आहे की शेवट अनपेक्षित आणि धक्का देणारा ठरतो, पण जरा विचार केला कि तो पटतो सुद्धा. हा एका अर्थी वास्तववादी चित्रपटच आहे. प्रत्यक्ष आयुष्यात आपण असे तुटलेले नातेसंबंध अनेक वर्षानंतर पुन्हा जुळून येताना क्वचितच पाहतो. कदाचित आपल्याला दुखावणाऱ्या माणसाबद्दल वाटणारा संताप, त्वेष, तिरस्कार याची धार बोथट होते किंवा आपण त्या सगळ्या गोष्टी मागे सोडून बरेच पुढे आलेलो असतो. माणसांचं वागणं त्यांच्या स्वभावाला धरूनच होत असतं, हे ही पटतं.

आपण प्रामाणिक आहोत आणि सुधावर प्रेम करतो ही गोष्ट तिला माहित आहे, ती आपल्याला समजून घेईल असा दृढ विश्वास आणि ती गैरसमज होऊन आपल्याला सोडून कधी जाणारच नाही असं वाटणं हा अहंकारच तर आहे. आता समजून उमजून सुधाशी लग्न केलय आणि तिला माया आवडत नाही म्हटल्यावर, महेंद्रने निकराने तिला आयुष्यातून दूर केले पाहिजे होते. कारण काहीही असो तिला स्वतः पासून/ संसारापासून दूर ठेवले पाहिजे होते. पण भिडस्तपणापायी/अहंकारापायी त्याला तसं करता येत नाही आणि त्याची पुढे परवडच होते. असे निर्णय तुम्ही वेळेवर घेऊ शकला नाहीत तर मग परिस्थिती ते निर्णय अधिक कठोरपणे अंमलात आणते.

माया जरी मेली नसती तरी घटस्फोटानंतर महेंद्र आणि माया एकत्र येऊ शकले असते काय? मला तरी तसे वाटत नाही, कारण त्याचा स्वतःला त्रास करून घेण्याचा पराकोटीचा अहंकारी स्वभाव आणि भिडस्तपणा. माझ्यामुळे सुधाचं आयुष्य बरबाद झालं, माया मेली असं तो स्वतःला नंतर कोसतच राहतो. त्याच श्रेय सुद्धा तो नियतीशी/ योगायोगाशी वाटून घ्यायला तयार नाही. झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात करत नाही. इतका टोकाचा अहंकार!

ijaazat-marathipizza03
http://anuradhawarrier.blogspot.com

सुधा या उलट जितकी वाटते तितकी गरीब गाय नाही, ती VICTIM आहे पण VICTIMHOOD जपणारी रडकी बाय तर अजिबात नाही. ती महेंद्र सोबत असते तेव्हा त्याच्यावर प्रेम करते, नंतर जेव्हा शशी कपूरशी लग्न करते तेव्हा त्याच्यावर प्रेम करते कारण ती खरंतर स्वतःवर खूप प्रेम करते. तिला आयुष्यात सुखी व्हायचं आहे. तिच्या कल्पना, तिचे विचार, आवडी निवडी सगळ स्पष्ट आणि सरधोपट आहे. त्यांच्याशी एका मर्यादेपलीकडे ती तडजोड करीत नाही. कुठे थांबायचं याची तिला स्पष्ट कल्पना आहे. ती वरवर पाहता आडमुठी वाटते पण तसं ते नाहीये, महेंद्र जर भिडस्तपणापायी निर्णय घेऊ शकत नडेल तर तो तिचा प्रॉब्लेम नाही आणि त्यापायी ती स्वतःच आयुष्य बरबाद होऊ देत नाही. ती सरळ सांगत नाही एवढच. घटस्फोटाची नोटीस पाठवताना शम्मी कपूरला काय वाटेल? म्हाताऱ्या आईला काय वाटेल ? महेंद्र ला काय वाटेल ? हे ती फार मनावर घेत नाही. बॉस! हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

हेच जर महेंद्रने आधी सरळ सरळ कोणतीही भीड न ठेवता शम्मीकपूर ला सांगितलं असतं तर …? कोटाच्या खिशात जर चुकून पडलेल्या मायाच्या कानातल्या रिंग सापडल्या नसत्यातर सुधा महेंद्रला सोडून गेलीच नसती का ? नाही त्यांचे स्वभाव पाहता हे अस नाही तर दुसऱ्या कोणत्याही प्रसंगाचे निमित्त होऊन, पण असंच झालं असतं.

राहता राहिली गोष्ट मायाची, ती मरूनच गेल्यामुळे तिच्यापुरते प्रश्न संपले पण समजा ती मरते असं दाखवलं नसतं तरी महेंद्र सारख्या कमालीच्या छुप्या अहंकारी, भिडस्त आणि गुदमरून टाकणारं प्रेम करणाऱ्या माणसासोबत ती फार काळ एकत्र राहू शकली असती अस वाटत नाही .

लहान सहन प्रसंग आणि त्यांचा पुढे जोडलेला संबंध गुलझारइतके छान कोणी दाखवू शकत नाही. एकच लहान प्रसंग सांगतो. सुरुवातीला जेव्हा महेंद्र पावसात भिजत वेटिंग रूम मध्ये येतो (तेव्हा रेखा आधीच बसलेली असते) आणि थोड्यावेळाने सिगारेट पेटवायला जातो पण त्याच्याकडे काडेपेटी किंवा लायटर नसतो तेव्हा रेखा त्याला काडेपेटी देते, तो विचारतो,

अभी तक रखती हो?

त्यावर ती म्हणते,

तुम्हारी भूलने कि आदत नही गयी और मेरी रखने की.

खलास आपण फिदा, वाटतं दोघही अजून एकमेकात अडकलेले आहेत, अजून चान्स आहे. पण चित्रपटाच्या शेवटी शशी कपूर येतो तेव्हा रेखा काडेपेटीच नाहीतर सिगरेटच पाकीटच पर्स मधून काढून त्याला देते यावर महेंद्रच्या चेहेऱ्यावरचे भाव आणि त्याला सुधाने दिलेला सुधाने लुक यात जे नाट्य आहे ते इथे शब्दात सांगता येणारच नाही, त्यासाठी चित्रपटच पाहायलाच हवा .

ijaazat-marathipizza04
http://www.hindustantimes.com

असो, शेवटी सुधा त्याला जाताना परवानगी मागते म्हणते मागच्यावेळी परवानगी न मागता गेले होते आज परवानगी दे. पण खरी परवानगी (इजाजत ) त्याने स्वतःला द्यायची असते.

आयुष्य मुठीत धरलेल्या वाळूसारख असतं , जेवढ घट्ट धरून ठेवयाचा प्रयत्न करू तेवढ्या झटकन ते निसटतं. नाही घट्ट धरून ठेवलं तरी ते निसटतच तेव्हा निसटलेल्याची चिंता न करता जे आता हातात आहे ते जगणं महत्वाचं….नाही का?

मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे, चांगला चित्रपट कोणता ? तर तुम्ही चित्रपट संपवून थेटरातून बाहेर पडताना सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. इजाजत हा तसाच एक खूप चांगला चित्रपट आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?