' या गावात अवतरलय ‘स्वदेस’ चित्रपटातील हे कॅरॅक्टर, सुरू आहे लोककल्याणाचं काम! – InMarathi

या गावात अवतरलय ‘स्वदेस’ चित्रपटातील हे कॅरॅक्टर, सुरू आहे लोककल्याणाचं काम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्यापैकी काही भारतीय जेव्हा जॉब किंवा बिजनेस साठी परदेशात जातात, तेव्हा त्यातील बहुतांश लोकांना तिथल्या सिस्टीम आणि भारतातील कार्यप्रणाली यांच्यात तुलना करायची सवय लागते.

मग त्यात ट्रॅफिक चे नियम असतील, शासकीय कागदपत्र मिळवण्याची पद्धत असेल किंवा एखादी खाजगी सेवा मिळण्याची पद्धत असेल.

पहिल्या दोन वर्षात त्या व्यक्तीला भारताबाहेर मिळणाऱ्या त्या intangible benifits बद्दल एक वेगळंच अप्रुप असतं.

ती व्यक्ती हे विसरून जाते की, भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे प्रशासनाला लोकशाही मार्गाने इतक्या गोष्टींचं नियोजन आणि त्यांना अंमलात आणावं लागतं.

इतकी मोठी लोकसंख्या, वेगवेगळया प्रकारचे लोक यांना घेऊन भारताचा रथ कसा चालतो हे कळण्यासाठी अभ्यासाची गरज आहे.

 

population inmarathi

 

परदेशातील भारतीयांना भारताची आठवण ही सणाच्या दिवशी प्रकर्षाने येत असते. गणपती च्या मिरवणुकीत नाचताना दिसणारा तो सळसळता उत्साह, होळीच्या दिवशी मित्राला घरात जाऊन रंग लावण्याची चढाओढ या गोष्टी फक्त भारतातच घडतात.

गोविंदाच्या “It happens only in India” या गाण्यातील ओळी ती व्यक्ती तेव्हा प्रत्यक्ष जगत असते.

त्यासोबतच, जेव्हा एखादी व्यक्ती ‘स्वदेस’ चे गाणे ऐकते किंवा बघते तेव्हा त्याला काही क्षणासाठी तरी ‘आपण खरंच काय मिळवतोय इथे राहून?’ हा विचार येतोच.

‘स्वदेस’ म्हंटलं की आठवतात ते शाहरुख खान चे फॉर्मल शर्ट्स, नासातील नोकरी करणारा व्यक्ती कित्येक वर्षांनी जेव्हा भारतात येतो तेव्हा त्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा त्याचा संघर्ष.

गावकऱ्यांकडून त्याला सतत होणारा विरोध, इंजिनियर असल्याने आपण या गावात वीज निर्मिती करण्यासाठी काहीतरी करावं ही त्याच्या मनातील भावना, ते साध्य करून गाव सोडून निघताना त्याची होणारी तगमग या गोष्टी प्रेक्षकांना प्रचंड भावल्या होत्या.

 

swades inmarathi

 

गावात वीज आल्यानंतर ‘बिजली’ म्हणून एका म्हाताऱ्या आजींच्या डोळ्यात चमकणारा बल्ब हा लोकांच्या कायम लक्षात राहणारा आहे.

आपणही आपल्या देशासाठी, मातीसाठी काहीतरी करावं हे हा सिनेमा बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं आणि मग तो पर्याय शोधू लागतो. त्यापैकी काहींना ते सापडतात. त्या यादीतील एक नाव म्हणजे अशोक सोनवणे सर.

अशोक सोनवणे सर हे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गावात राहणारे एक निवृत्त प्राध्यापक आहेत. तब्बल ३५ वर्ष त्यांनी राज्यशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवला.

लहानपणापासूनच त्यांनी पाण्याचा प्रचंड दुष्काळ अनुभवला होता. ‘पिण्याचं पाणी’ जी हक्काची गोष्ट आहे ती रोज मिळणे ही अशोक सरांसाठी एक नशिबाची गोष्ट होती.

‘आपल्या राज्यात पाऊस पडत असतानाही आपल्याला पिण्याचे पाणी मिळत नाही’ या भावनेतूनच त्यांनी २० वर्ष जलसंवर्धन या विषयाचा अभ्यास केला.

निवृत्ती नंतर नाशिक मध्ये स्थायिक झालेल्या अशोक सोनवणे सरांनी देशवंडी या गावाला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

२ वर्षातच त्यांनी त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने देशवंडी गावाला दुष्काळ मुक्त तर केलंच, त्यासोबतच दर पावसाळ्यात दहा करोड लिटर्स पाणी कसं वाचवायचं? हे सुद्धा त्यांनी खऱ्या अर्थाने ‘करून दाखवलं.’

 

ashok sonawne inmarathi

 

हे साध्य करण्यासाठी त्यांनी पोपटराव पवार, अण्णा हजारे, वसंतराव साळुंके या समाजसेवकांची सुद्धा वेळोवेळी त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली.

आपल्या दोन मुलं आणि परिवरासोबत २०१७ मध्ये नाशिकला स्थायिक झालेले सोनवणे सर हे खरं तर एका टिपिकल निवृत्त कर्मचाऱ्याप्रमाणे आयुष्य जगू शकले असते.

पण, कधी कमी वृष्टीने तर कधी अतिवृष्टीने परेशान असलेल्या शेतकऱ्याचं दुःख त्यांना बघवत नव्हतं.

खेड्यातील टँकर च्या लाईन मध्ये एक हंडा भरण्यासाठी उभ्या असलेल्या स्त्रिया, आभाळाकडे डोळे लावून बसलेले गावकरी हे त्यांना रोज सकाळी ब्रश करताना पाणी वापरताना सुद्धा मनात परेशान करायचे.

२०१८ मध्ये देशवंडी गावात त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करताना त्यांना सिन्नर जवळ असलेल्या या गावाच्या दुष्काळ सदृश परिस्थितीची खूप काळजी वाटली.

सह्याद्री पर्वत आणि पश्चिम घाट यामुळे अडलेला पाऊस हा देशवंडी या गावापर्यंत घेऊन येणं हे त्यांना साध्य करायचं होतं. ग्रामपंचायत समोर त्यांनी जलसंवर्धन कामाचा प्रस्ताव ठेवला.

ग्रामस्थ, विद्यार्थी कामाला लागले आणि त्यांनी डोंगरातून वाट काढत, मोजमाप करत त्यांनी डोंगरा सोबत एक कालवा खोदण्यास सुरुवात केली. या कामाला Continuous Contour Trenches (CCT) हे नाव आहे.

उताराच्या दिशेने सलग खोदकाम केलं गेलं. कालवा आणि जागोजागी पाणी थांबवण्यासाठी केलेल्या छोट्या तळ्यांमुळे पाणी जमिनीत साठवण्यास मदत झाली आणि जमिनीची पाण्याची पातळी सुधारली.

 

ashok ji inmarathi

 

डोंगर कड्या कपाऱ्यातून पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी एका ठिकाणी जमा होऊ लागलं. कालव्या लगत च्या जमिनीत झाडं लावण्यात आली.

झाडांच्या मुळांमुळे वाहून जाणारं अतिरिक्त पाणी हे झाडांच्या वाढीसाठी वापरलं जाऊ लागलं. हे सगळं करण्यासाठी उपकरणांसाठी पैसा लागत असतो.

ते साध्य करण्यासाठी ग्रामस्थ पुढे आले आणि त्यांनी अशोक सोनवणे सरांच्या vision वर विश्वास ठेवत त्यांनी JCB आणि इतर उपरकण आणण्याची जवाबदारी घेतली.

अशोक सोनवणे सर हे काम करण्यासाठी कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट बघत बसले नाहीत.

सुनील पोटे यांनी दिलेल्या ५००० रुपयांच्या मदतीने त्यांनी हे काम सुरू केलं आणि त्यासोबतच त्यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून प्लॅन राबवून घेतला.

मे २०१८ मध्ये सोनवणे सर आणि टीम ने मिळून ३८ हेक्टर जागेत खोदकाम करण्याचं काम पूर्ण केलं. त्यावर्षी चांगला पाऊस झाला आणि शेतकऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक पीक घेतलं जाऊ शकतं हा विश्वास निर्माण झाला.

२०१९ मध्ये या टीम ने अजून कमाल करत ६८ हेक्टर जमीन खणून काढली ज्यामुळे त्या गावातील कित्येक शेतकऱ्यांची दुष्काळा पासून सुटका झाली.

 

drought 2 inmarathi

 

आज देशवंडी गाव हे पूर्णपणे दुष्काळ मुक्त झालं आहे. अशोक सोनवणे सर आणि त्यांची १५ उत्साही कार्यकर्त्यांची टीम ही महाराष्ट्रातील अजूनही गावांना याच प्रकारे दुष्काळ मुक्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हे काम सोपं नाहीये, पण त्यासाठी कोणत्याही इंजिनियर ची गरज नाहीये ही गोष्ट स्वतः अशोक सोनवणे सर सांगतात.

लोकांची मानसिकता ही एक अडचण या टीम ला सहन करावी लागते. कारण, काही डोंगर, टेकड्या या काही जमीनदारांच्या मालकीच्या असतात.

ते या लोकांना कोणतंही काम करण्यासाठी परवानगी देत नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की, ‘पाणी हे मला माझ्या राहत्या जागी सरकारने उपलब्ध करून द्यावं’.

सरकार कमी पडत असेल तर मी काही करणार नाही हा विचार अशोक सोनवणे सरांना जास्त त्रास देतो. डोंगरावर सतत केलेल्या वृक्षारोपण कार्याने त्यांना पाऊस वाढण्यासाठी मदत होत आहे.

चांगल्या हेतूने काम केल्यास निसर्गाची सुद्धा साथ मिळते तसं या मिशन च्या बाबतीत सुद्धा झालं आणि यावर्षी दुष्काळ कुठल्या कुठे पळून गेला असं म्हणायला हरकत नाही.

कोरोना चं संकट दूर झाल्यावर हे काम सतत करण्यासाठी अशोक सोनवणे सरांनी ठरवलं आहे.

“निवृत्ती म्हणजे फक्त तुमच्या रुटीन कामातून सुटका असते आणि त्यानंतर आपली दुसरी इनिंग सुरू होते जिथे आपल्याला आपण आयुष्यभर शिकत आलेल्या ज्ञानाचा वापर करून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करायच्या असतात.”

या शब्दात त्यांनी लोकांना त्यांच्या एनर्जी चा प्रत्यय आणून दिला आहे.

अशोक सोनवणे सरांसारखे अजून लोक समोर आले तर भारत खऱ्या अर्थाने ‘महान’ होईल आणि ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी रहो’ हे कित्येक लोकांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?