' सावधान: सुशांत सिंग प्रकरणाच्या रिपोर्टिंग-चर्चांमधून एक भयावह संकट उभं करतोय आपण – InMarathi

सावधान: सुशांत सिंग प्रकरणाच्या रिपोर्टिंग-चर्चांमधून एक भयावह संकट उभं करतोय आपण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एरवी इन्स्टाग्रामवर येणारे मेसेजेस मी फारसे पाहत नाही. मला लक्षातच नसतो तो इनबॉक्स. अनोळखी अकाऊंट आणि त्यातही फॅन पेज वगैरे असतील तर मग आणखी आनंद! आम्हाला फॉलो करा किंवा तत्सम डिल्स घेऊन ते तिथे येत असतात. त्यामुळे अकाउंट नक्की कसं आहे हे ही पाहण्याची तसदी मी बऱ्याच वेळा वेळेअभावी घेत नाही.

काल मात्र कधी नव्हे ते एक फॅन पेज मेसेज वाचून कुतूहलामुळे ओपन करून पाहिलं आणि त्यानंतर झालेल्या संवादामुळे जेव्हा जेव्हा बातम्यांवर नजर जात होती, तेव्हा तेव्हा आज दिवसभर माझ्या डोक्यात तो संवाद भुणभुणत होता.

 

kangana sushant inmarathi

 

मागच्या काही महिन्यात SSR फॅन पेजची संख्या खूप वाढली आहे. हे पण असंच एक फॅन पेज होतं. साधारण ३ दिवस मुळीच इनबॉक्स मध्ये न डोकावता ते मला फॉलो करत होतं आणि अचानक काल एक मेसेज आला. मला वाटलं असेल काहीतरी सपोर्ट मागणारा मेसेज. पण नाही. हा फार वेगळा विषय होता.

त्या पेजच्या ऍडमीनने माझ्या बऱ्याच पोस्ट वाचून त्याला स्पेस सायन्समध्ये असणारे काही डाऊट्स मला पाठवलेले. वर मी लहान आहे आता, पण मला या क्षेत्रात करियर करायचं आहे असं सांगत काही फार इंटरेस्टिंग मुद्दे पाठवले होते.

मला आता कुतूहल आणि कौतुक वाटू लागलेलं. क्षेत्रातील अस्ट्रॉबायोलॉजी, अस्ट्रॉफिजिक्स सारख्या विषयाची बेसिक माहिती होती. सध्या इन असणाऱ्या, महत्वाच्या गोष्टी त्याला माहित होत्या आणि हे प्रश्न विचारण्यापुरतं वरवर गुगल करून आलेलं नव्हतं हे मला या क्षेत्रातील माझ्या अनुभवावरून नक्की सांगता येईल.

या सगळ्यात मी ते फॅन पेज आहे हे बाजूला सारून थोडं आणखी हुडकायचं ठरवलं. लहान म्हणजे किती लहान हे माहीत करून घ्यायचं होतं मला आता.

थोडी चौकशी केल्यावर समजलं, की तो मुंबईच्या एका शाळेत शिकणारा सातवीतील मुलगा होता. त्याने त्याच्या शाळेचं नाव पण सांगितलं. तो खरंच सातवीचा मुलगा असेल, तर त्याचं ज्ञान कौतुक करायला भाग पाडणारं आहे हे नक्की असलं तरी इथे मला वेगळीच भीती वाटली ती त्याचं ते फॅन पेज पाहून.

दर मिनिटाला तिथे पोस्ट होणाऱ्या पोस्ट्स आणि त्यांचे प्रकार पाहून. साधारण १२-१३ वर्षाचा तो मुलगा खेळण्याबागडण्याच्या वयात या कोणत्या गोष्टीत गुंतला आहे! मागचे कित्येक महिने तो फक्त हेच करतोय हे भयावह आहे.

SSR ची केस… त्याला न्याय… त्याच्या मैत्रिणी… मग त्यातून डोकं काढलेल्या ड्रग्ज च्या केसेस… त्यात अडकलेली अनेक नावं… वेगवेगळ्या प्रूव्ह न झालेल्या थिअरीज… एक ७ वीतील छोटा मुलगा इतर काहीच न सुचता दिवस रात्र अनेक महिने याच गोष्टीचा सातत्याने विचार करतो. त्यासाठी फॅन पेज चालवणं त्याला त्याचं कर्तव्य वाटतं, तेव्हा मला तरी हे फार अलार्मिंग वाटतं.

 

sushant inmarathi

 

“तू तुझं अकाउंट न ठेवता ते Justice for SSR ला डेडिकेट का केलं? इतका आवडायचा का तुला तो?” या माझ्या प्रश्नावर, “हो आवडायचा तो मला, पण तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले नाही का! किती महत्वाचं आहे हे. दिवसभर सगळे लोक त्यासाठी आणि त्याविषयी बोलताहेत. महत्वाचं असल्याशिवाय का? म्हणून मी पण मला जमेल तसं करतोय” असं उत्तर देतो आणि मग इतके दिवस मी दुर्लक्ष करत असलेल्या बातम्यांकडे आज माझ्याकडून दुर्लक्षच होत नाही.

त्याचं ते उत्तर वाचून थोडावेळ थबकला नसाल, तर एक मिनिट थांबून पुन्हा एकदा सावकाश वाचा. गांभीर्य समजतंय का पहा! एका शाळेत जाणाऱ्या मुलाला या गोष्टी फार महत्वाच्या वाटू देतोय आपण समाज म्हणून. इतक्या की तो स्वतःची आयडेंटिटी पण हरवून बसलाय.

या वयात त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेणं त्याचं कर्तव्य वाटतंय. आणि तेही का? तर सतत मीडिया आणि मोठी माणसं त्याविषयी बोलताहेत म्हणून?

मीडिया हा लोकशाहीचा एक आधारस्तंभ असतो, पण आज तोच आधार ठिसूळ झालेला दिसतोय. SSR ची केस, सध्या सुरू असणाऱ्या ड्रग्जच्या केसेस या सगळ्यासोबत डील करण्याची सुज्ञ पद्धत असेल ना! थोडी सिव्हीलीयन पद्धत असेल ना! की स्पर्धा आणि पब्लिसिटी यात मुलांच्या निरागसत्वाचा बळी द्यायला आपण तयार असण्याइतके स्वार्थी झालोय.

एक समाज म्हणून आपल्या भविष्यासमोर चांगले आदर्श ठेवायला, त्यांना चांगलं वातावरण द्यायला काहीच करायचं नाही का आपण!

डॉक्टर कलामांनी त्यांच्या लेटर टू एव्हरी इंडियन या पत्रात एक छान गोष्ट लिहिली आहे. इस्राईलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतरही पहिल्या पानावर वाळवंटात बाग फुलवणाऱ्या शेतकऱ्याची कथा सांगून आतल्या पानावर बॉम्बस्फोटाची बातमी दिलेली याची.

इथे इस्राईल आणि भारतीय मीडिया यांच्यात तुलना करत नाहीय मी. मला फक्त ती गोष्ट आठवतेय. तिथल्या तरुणांना इंस्पायर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या छोट्या प्रयत्नांची.

ते अकाउंट फेक असू शकतं किंवा तो मुलगा ७वी चा नसून थोडा मोठा असू शकतो असे अनेक विचार आणि तर्क केले जातील. मीही केलेत. पण तरी तो खरंच सातवीचा असेल तर? हा विचार करून अवतीभवतीच्या गोष्टींमध्ये एकदा लक्ष घालूया.

मी मागचे काही दिवस काही निमित्ताने लहान मुलांसोबत बोलतेय. सभोवताली सुरू असणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याची, ते रिसिव्ह करण्याची पद्धत मी समजून घेतेय. सोप्पं नाहीय.

अनेक प्रश्न आहेत त्यांना. जे दिसतंय ते accept करून मतं बनवली जाताहेत. तेव्हा आपल्यासाठी नाही… आपल्या सोबतच्या लोकांसाठी नाही, तर किमान येणाऱ्या नव्या पिढीसाठी तरी थोडं शहाणं होऊया का? व्यक्त होताना थोडा विचार करूया! विश्वासाचं जग त्यांच्यासाठी तयार करूया का?

नाहीतर आपल्या स्पर्धेच्या आणि व्यक्त होण्याच्या घाईत आपल्यावर लक्ष ठेऊन असलेली पिढी या सगळ्यात आणखी गुंतत जाईल आणि आपल्याला जाग येईपर्यंत खूप उशीर होईल.

माझ्यावर विश्वास ठेवून नाही, पण अवतीभवतीच्या, तुमच्या घरातील मुलांशी एकदा बोलून पहा. या सगळ्या गडबडी, सध्याच्या परिस्थिती, तुमचं त्यावरचं रिऍक्ट होणं हे सगळं ती मुलं कसं परसिव्ह करताहेत ते समजून घ्या एकदा.

मला भेटलेला तो एक छोटा अनेकांना भेटू नये यासाठी. आपण प्रत्येकाने एकदा विचार करून पाहुयात का यावर. प्लिज.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?