' मयंक, संजू अँड दी ‘राहुल’ शो….!!!! वाचा आयपीएलमधील सर्वोत्तम रन चेजबद्दल… – InMarathi

मयंक, संजू अँड दी ‘राहुल’ शो….!!!! वाचा आयपीएलमधील सर्वोत्तम रन चेजबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे 

===

कर्नाटकच्या रणजी संघाप्रमाणेच, राहुल आणि मयंक ही सलामीची जोडी आता आयपीएलमध्येही मस्तच जमली आहे. (न जाणो भारतीय संघात सुद्धा लवकरच पाहायला मिळाली तरी आश्चर्य वाटणार नाही)

 

mayank-and-rahul-inmarathi

 

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सुद्धा जबरदस्त आणि धडाकेबाज सलामीचा नमुना या दोघांनी पेश केला. मागच्या सामन्यात राहुलने दमदार शतक झळकावलं होतं, यावेळी ती जबाबदारी मयंकने त्याच्या खांद्यावर घेतली. कर्णधार के. एल. राहुलने पुन्हा ऑरेंज कॅपवर दावा ठोकला.

या दोघांनी अप्रतिम फलंदाजी म्हणजे काय ते दाखवून द्यायचं मनाशी पक्कं ठरवलेलं दिसतंय.

एवढंच नाही, तर मयंकने आता गेलची बॅग भरली आहे असं म्हणायलाही हरकत नाही. या आयपीएलमध्ये आता गेल नावाच्या वादळाला फारशी संधी मिळेल असं वाटत नाही. संपूर्ण सामन्यात षटकारांचा नुसता पाऊस पडत असताना, ‘षटकारांचा बादशाह’ बेंच गरम करत होता.

 

gayle-inmarathi

 

आयपीएलमध्ये कधी आणि काय पाहायला मिळेल हे सांगता येणं खरंच अशक्य आहे. काही कामानिमित्त बाहेर होतो, म्हणून सामन्याचा पहिला डाव बघता आला नाही. अर्थातच वाईट वाटतंय… पण, एक ‘अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय’ रन चेज पाहता आली आणि ती मिस झाली नाही, याचा आनंद सुद्धा आहे.

‘एक डाव धोबीपछाड’ असं ज्या डावाचं वर्णन करता येईल, अशी ठरली दुसरी इंनिंग…

२२४ धावांचं आव्हान पेलणं राजस्थानची कागदावरील ताकद बघता अशक्य वाटत नव्हतं. पण, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अत्यंत अफलातून परफॉर्मन्सची आवश्यकता होती. तो परफॉर्मन्स त्यांनी दिला, हे तर आपल्याला माहित आहेच. पण, जे पाहायला मिळालं, ते क्षणोक्षणी रोमांच निर्माण करणारं होतं. तोच सामना.. तोच रोमांच.. माझ्या नजरेतून…

अ’यशस्वी’ सलामी…

राजस्थानच्या मागच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. इथवर पोचण्याचा त्याचा प्रवास मोठा खडतर ठरलाय. मैदानावर तंबूत राहून, पाणीपुरी विकून त्यानं दिवस काढलेत. युवा विश्वचषकात आपली छाप पाडण्यापर्यंत त्याने मजल मारली आणि मग त्याला आयपीएलमध्ये लॉटरी लागली.

 

yashasvi-inmarathi

 

यंदाच्या आयपीएल लिलावात तो रातोरात करोडपती झाला. त्याचं पदार्पण मात्र अयशस्वी ठरलं. अवघ्या ६ धावा त्याला करता आल्या. आज त्याचाच परिणाम म्हणून पुढच्याच सामन्यातून त्याला वगळण्यात आलं.

इंग्लंडचा धुवांधार फलंदाज बटलर आणि स्वतः कर्णधार स्मिथ सलामीला आले. पण हा प्रयोग सुद्धा अयशस्वीच ठरला. बटलर चमक दाखवू शकला नाही. सलामी पुन्हा एकदा फ्लॉप झाली…

एस फॅक्टर…

पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संजूने कप्तान स्मिथची साथ करायला सुरुवात केली. त्या दोघांची जणू जुगलबंदी सुरु झाली. अप्रतिम फटके, गोलंदाजांवर चाललेला प्रहार या सगळ्यात २२३ धावांचा डोंगर सुद्धा खुजा वाटू लागला.

 

sanju-smith-ipl-inmarathi

 

हा S फॅक्टर जोरदार धमाका करत असताना, किंग्स इलेव्हनच्या संघासाठी कदाचित एकमेव उत्तम गोष्ट घडली. विंडीजचा निकोलस पुराण याने वाचवलेला षटकार!!! त्याने जे काही करून दाखवलं ते बघून सगळीच मंडळी निव्वळ अवाक झाली.

त्याने एक जबरदस्त डाइव्ह मारून वाचवलेले तो षटकार पाहून जॉन्टी ऱ्होड्सने सुद्धा स्टँडिंग ओव्हेशन दिलं, यात सारं काही आलं.

 

jonty-nicolas-ipl-inmarathi

 

एकेकाळी क्षेत्ररक्षण हा जेव्हा फारसा महत्वाचा पैलू सुद्धा मानला जात नव्हता, त्यावेळी क्रिकेटमधील या महत्त्वपूर्ण बाबीचा एकमेव राजा होता जॉन्टी…!!!

तर स्मिथ आणि संजू चौफेर फटकेबाजी करत होते. खरंतर हे दोघे असेच खेळात राहिले, तर २२४ धावांचं आव्हान म्हणजे निव्वळ औपचारिकता वाटेल असं वाटू लागलं. यहीं पर कहानी में थोडा ट्विस्ट था.. ९व्या षटकात स्मिथ बाद झाला.

बटलर सुद्धा गेलाय आणि स्मिथ सुद्धा गेला म्हटल्यावर राजस्थानच्या फॅन्समध्ये आणि अर्थात डगआऊटमध्ये सुद्धा थोडीशी धाकधूक नक्कीच निर्माण झाली. त्यात (कदाचित लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनचा विचार करून) राहुल तेवाटियाला बढती देण्यात आली. आता काय होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात सुरु होताच.

संजू सावरत होता पण…

असं असलं तरी संजूने मात्र स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. पाचव्या गियरमध्ये सुसाट सुटलेल्या गाडीचा वेग कमी होणार नाही याची काळजी संजू घेत होता. याच्या बरोबर उलट, म्हणजे अगदी कसोटी सामना खेळावा अशा संथ गतीने राहुल त्याची फलंदाजी करत होता.

त्याचा खेळ बघून ‘बॉलर्स सुद्धा बॅट चांगली कनेक्ट करतात’ असं मनात येऊन गेलं. अगदी हर्षा भोगले यांनी सुद्धा Feel for Tewatia. But he is losing his team the game असं ट्विट केलं. स्मिथची ही चाल फसणार असं त्यावेळी कुणीही म्हटलं असतं तरी ते चुकीचं ठरलंच नसतं.

 

harsha-bhogle-tweet-inmarathi

 

संजू मात्र अजूनही लढत होता. ४ षटकांत ६३ धावा हव्या होत्या. संजू हे साध्य करू शकतो असा विश्वास वाटत होता. भीती होती ती फक्त आणि फक्त राहुलची… त्याने संजूला साथ द्यावी (साथ नाही तर नाही किमान स्ट्राईक तरी) एवढीच अपेक्षा होती.But RAHUL had different plans…

खलनायक नहीं.. नायक हूं मैं…

१७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संजू बाद झाला. इथं सगळं संपलं असं वाटलं. आता या सामन्यात रंजकता, रोमांच उरला नाही असं वाटलं. क्षणभरासाठी टीव्ही बंद करण्याचा विचार सुद्धा मनात येऊन गेला. तसं केलं असतं तर, या भावनेने सुद्धा आता विचित्र वाटतंय.

राहुलने त्यानंतर सगळीच कसर भरून काढली.

१८ वं षटक.. शेल्डन कॉट्रेलच्या हातात बॉल.. समोर राहुल तेवाटिया… १८ चेंडूत जिंकायला हव्या होत्या ५१ धावा… सगळ्यांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा सारं, सारं काही, फक्त आणि फक्त रॉबिन उथप्पाकडे लागून राहिलं होतं. पण आत्तापर्यंत खलनायक ठरलेल्या राहुलने इथून पुढे हिरोचा रोल करायचा ठरवलं होतं.

पहिल्या ४ चेंडूत ४ धमाकेदार षटकार…!!! तो एकामागून एक चेंडू सीमापार धाडत होता आणि रोमांच वाढत होता. पाचवा चेंडू हुकला. वाईट वाटलं.. फारच वाईट वाटलं. पण अखेरच्या चेंडूवर पुन्हा षटकार हाणला त्याने… शेल्डन कॉट्रेलला एका षटकात ३० धावा ठोकल्या.

 

rahul-tewatia-inmarathi

 

मागच्या सामन्यात पहिल्याच स्पेलमध्ये २ महत्त्वाचे गडी गारद करून जो हिरो बनला होता, त्याला राहुल नावाच्या आजच्या नायकाने सपशेल नामोहरम केलं.

धमाल अजूनही बाकीच होती

पण, सामन्यातील रोमांच मात्र अजूनही बाकी होता. १२ चेंडूत २१ असं शक्य असलेलं समीकरण दिसू लागलं. पण, रॉबिन भरोश्याच्या म्हशीला टोणगा ठरला. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो तंबूत परतला. सामन्याचं पारडं पालटणार का? अशी शंका यायला वाव होता. त्यानंतर आलेल्या आर्चरने दोन सणसणीत षटकार हाणत सामना पुन्हा राजस्थानच्या बाजूने झुकवला.

 

archer-inmarathi

 

इथेही सगळं सरळमार्गाने होणं नियतीला मान्य नव्हतं. आणखी एक षटकार ठोकून आणि आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर राहुल सुद्धा बाद झाला. पहिल्या १९ चेंडूत अवघ्या ८ धावा करणाऱ्या राहुलने ३० चेंडूंमध्ये अर्धशतक गाठलं. तो बाद झाला पण तोवर ६ चेंडूत २ धावा असं ‘सहजशक्य’ समीकरण समोर आलं होतं.

मुरुगन अश्विनला हेसुद्धा इतक्या सहजपणे होणं मान्य नव्हतं. अखेरच्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव आणि मग दुसऱ्या बॉलवर परागची विकेट.. तेही गुगलीवर क्लीन बोल्ड… ४ चेंडूत २ धावा हव्यात…

 

ashwin-murugan-inmarathi

 

स्पर्धेतील दुसरा सामना आठवला. आणखी एक सुपर ओव्हर बघायला मिळणार का, अशी शंकेची पाल सुद्धा चुकचुकली.

टॉम करनने मात्र हा रोमांच फार काळ टिकू दिला नाही. आल्या आल्या पहिलाच चेंडू सीमापार धाडून त्यानं सगळ्या क्रिकेट चाहत्यांचं ब्लडप्रेशर, हार्टबिट्स वगैरे ठिकाणावर आणल्या.

त्याच्याच संघासाठी जो खलनायक ठरणार असं वाटत होतं तो राहुल नायक झाला. विकेट काढल्यावर नेहमी कानात बोटं घालून सेलिब्रेट करणाऱ्या राहुलने यावेळी त्याच्या दमदार फलंदाजीने लोकांची तोंडं बंद केली.

 

rahul-tewatia-wicket-celebration-inmarathi

 

२२४ धावांचा यशस्वी पाठलाग करून राजस्थानने एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

या सामन्याचं माझ्या एका मित्रानं केलेलं वर्णन अगदीच पाहण्यासारखं आहे..”RRरारारारारारा” खतरनाक…

 

vinay-raul-fb-post-inmarathi

 

थोडक्यात काय, तर हा सामना सुद्धा अद्भुत ठरला.. अविश्वसनीय झाला.. त्यामुळे IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग याचं नामकरण INCREDIBLE PREMIER LEAGUE असं केलं तरी वावगं ठरू नये…

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?