' 'रॉकस्टार'च्या या सुपरहिट गाण्याची जन्मकथा...वाचा ए आर रहमानचा अविस्मरणीय अनुभव!

‘रॉकस्टार’च्या या सुपरहिट गाण्याची जन्मकथा…वाचा ए आर रहमानचा अविस्मरणीय अनुभव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ए आर रहमानच्या संगीताने प्रभावित केलं नाहीये असा संगीत प्रेमी जगभरात सापडणं कठीण आहे.

रहमानचं संगीत श्रवणीय आणि मधुर तर असतंच पण ते कालातीत सुद्धा असतं.

म्हणूनच बॉम्बे मधलं तू ही रे असो, वा रंग दे बसंती मधलं लूज कंट्रोल…ही गाणी त्या त्या काळातल्या तरुणाईला जशी भावतात तशीच नंतरच्या पिढीला सुद्धा…!

 

a r rehman recording marathipizza

 

रहमानच्या ह्या संगीत निर्मितीमागे काय जादू आहे? अशी कुठली गोष्ट आहे ज्यामुळे रहमानचं संगीत स्वर्गीय वाटतं?

ह्यावर हलकासा प्रकाश टाकला ध्वनिसंयोजक साईश्रवणम ह्यांनी…thequint.com ला दिलेल्या मुलाखतीतून…!

श्री विक्रम एडके ह्यांनी ह्या मुलाखतीचा सार त्यांच्या स्वतःच्या शब्दात सुरेख व्यक्त केला आहे.

===

जसजसा तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला, तसतसं मुद्रित संगीताच्या क्षेत्रात ध्वनिसंयोजनाचं स्थान अधिकाधिक भक्कम होत चाललंय. लोकांची आवडनिवडही कमालीची बदललीये.

हल्ली कोणत्याही गाण्याने पहिल्याच ऐकण्यात काही लक्षवेधी नाही दिलं, तर लोक दुसऱ्यांदा ऐकण्याचे कष्टही घेत नाहीत, इतके संयमशून्य वातावरण होत चाललेयत.

अश्यावेळी ध्वनिसंयोजकाची जबाबदारी फारच महत्त्वाची असते. गाण्यात आत्मा असो वा नसो, तज्ञ संयोजकाने गाण्यातले विविध ध्वनी जर बरोब्बर पकडले, तर गाणे कुठल्या कुठे जाऊन पोहोचते.

मुद्रण, मिश्रण, क्षेपण, वर्धन या आणि अश्या कितीतरी तांत्रिक बाबींकडे लक्ष द्यावे लागते. परंतु कोणत्याच तांत्रिक शिक्षणाने जी गोष्ट येऊ शकत नाही, जी कमवावीच लागते, ती गोष्ट म्हणजे तयार कान!

तोच ध्वनिसंयोजकाला योग्य निवड करण्याची दृष्टी देत असतो. असेच एक तयार कानाचे ध्वनिसंयोजक आहेत, साईश्रवणम! ध्वनीच्या सौंदर्यशास्त्रावर विशेष काम आहे त्यांचे.

मुळात साईश्रवणमसारखे ध्वनिसंयोजक म्हणजे पडद्यामागचे कलाकार. त्यामुळे फारच थोड्या लोकांना ते ठाऊक असतील. पण त्याहूनही कमी लोकांना ठाऊक असेल, ते त्यांचं तबलावादनाचं कौशल्य!

होय, साईश्रवणम अतिशय उत्कृष्ट तबला वाजवतात. कुणीही न शिकवता स्वतःच शिकलेयत ते.

रहमानचं गेल्या काही वर्षांतलं कोणतंही गाणं काढून पाहा, जर त्यात तबला असेल, तर तो बहुतेकवेळा साईश्रवणमचाच असतो!

 

रहमान सोबत, साईश्रवणम । स्रोत: thequint / साईवश्रणम

 

२०११ सालची गोष्ट आहे. रहमानने साईश्रवणम यांना एका मुद्रणासाठी बोलावले होते. रहमानकडचे त्यांचे पहिलेच काम. इतक्या मोठ्या माणसासोबत काम करायचे म्हटल्यावर साईश्रवणम साहजिकच बावरले होते. रहमान स्टुडियोत आला आणि थेट मुद्यावर येत त्याने साईश्रवणमना विचारले,

“तबला लावलाय”?

त्यांनी हो म्हणताच रहमानने त्यांना एक गाणे ऐकवले आणि म्हणाला,

“यात तबला वाजवायचाय. फक्त वादन कमीत कमी ठेवा”.

साईश्रवणम हो म्हणाल्यावर रहमान म्हणाला, “चला, ताबडतोब मुद्रण करुयात”!

आता दचकायची पाळी साईश्रवणमची होती….!

आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलेलं गाणं आणि हा माणूस फक्त एकदाच ऐकवून सरळ त्यावर वाजवा म्हणतोय? रहमानचं गाणं एकदाच ऐकून असंही कुणाला आजवर कधी समजलंय!

पण साईश्रवणमना ही संधी हातची जाऊ द्यायची नव्हती. ते मुद्रणकक्षात गेले. गाणे लावले तसे आपल्या आठवणींवर विसंबून ते वाजवू लागले. मध्येच थांबले. परत जरावेळाने वाजवू लागले.

कोणत्याही मुद्रणात साधारणतः अनेकवेळा रिटेक्स होतात. तसेच याहीवेळी होणार, याची साईश्रवणमना खात्री होती. त्यांना जिथे योग्य वाटले, तिथे त्यांनी वाजवले. जिथे अयोग्य वाटले, तिथे नाही.

बाहेर आल्यावर रहमानला विचारुन परत त्या त्या जागांवर काय करायचं ते विचारु, असा त्यांचा सोपा हिशोब होता.

 

rehman-inmarathi

 

मुद्रण संपलं. साईश्रवणम बाहेर आले. रहमानने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तो स्टुडियोच्या बाहेर निघून गेला. साईश्रवणमचे अवसान गळाले. आपण फार मोठ्ठी चूक केल्याची भावना त्यांना घेरू लागली.

जरावेळाने रहमान परत आल्यावर साईश्रवणम त्याला विनवू लागले,

मी परत वाजवतो. यावेळी नीट करेन. गाण्याची चाल लक्षात नव्हती आली माझ्या.

रहमान शांतपणे म्हणाला,

नको. राहू द्या.

आयुष्यात एकदाच येणारी संधी आपल्याकडून हुकलीये, याची साईश्रवणमना जाणीव झाली. खट्टू होऊन, ते तिथून निघाले. काही दिवसांनी “रॉकस्टार”ची गाणी प्रकाशित झाली आणि त्यातले कविता कृष्णमूर्तींच्या स्वरातले “तुम को” ऐकल्यावर साईश्रवणमना धक्काच बसला.

त्यादिवशी त्यांनी वाजवलेले हे गाणे, जिथे त्यांनी वाजवले होते आणि जिथे त्यांनी थांबवले होते, सगळेच रहमानने जसेच्या तसे वापरले होते. तेही उचित श्रेय देऊन!

असे कसे काय झाले? आपण तर चुकलो होतो. वाट्टेल तसे वाजवले होते आपण. चालही नीट कळाली नव्हती आपल्याला. रहमान यापेक्षा अनेक पटींनी चांगलं वादन करवून घेऊ शकला असता, आपल्याकडून नाही तर अजून कुणाकडून. तरी त्याने हे का वापरले?

पहिली संधी मिळताच त्यांनी रहमानला आपल्या मनातले प्रश्न विचारुन टाकले. अस्वस्थपणे! रहमान मात्र केवळ हसला.

नेहमीच्या त्याच्या मितभाषी स्वभावाला अनुसरुन त्याने एकाच वाक्यात उत्तर दिले. एकच वाक्य, पण जन्मभरासाठीची शिकवण देऊन गेले साईश्रवणमना. रहमान म्हणाला होता —

 

http://qmedia.qyuki.com

 

“जे पहिल्यांदा येतं, ते परमेश्वराचं असतं. नंतरच्या सगळ्या गोष्टी निव्वळ मानवी मेंदूचे आविष्कार असतात”!

===

रहमानच्या सांगीतिक बैठकीचा पाया हा असा आहे…!

त्यांच्या संगीतातून स्वर्गीय अनुभूती उगीच येत नाही…!

विक्रमजींची मूळ पोस्ट इथे वाचू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?