' “चाय – बिस्कुट” : या जोडीचा इतिहास कल्पनेपेक्षा जास्त रंजक आहे…! – InMarathi

“चाय – बिस्कुट” : या जोडीचा इतिहास कल्पनेपेक्षा जास्त रंजक आहे…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या फेसबुकवर #couplechallenge खूपच गाजतंय. आपल्या जोडीदारासोबत काढलेला एखादा फोटो फेसबुकवर अपलोड करणं, इतकं साधं स्वरूप आहे या चॅलेंजचं… पण ‘एकटा जीव सदाशिव’ असणाऱ्या सिंगल मंडळींनी तर या चॅलेंजचा पार चेहरा-मोहराच बदलून टाकला.

सजीव असो किंवा निर्जीव, जगात जे काही जोडी म्हणून दिसेल त्यांचे फोटो टाकून #couplechallenge वापरायला या मंडळींनी सुरुवात केली. कुठे त्याला मिमचं स्वरूप आलं, तर कुठे लोक भावनिक झालेले सुद्धा दिसले.

‘जोडीचे’ फोटो टाकायचे तर एक रोजच्या जीवनातली एक जोडी अगदी हमखास समोर येते. ही जोडी म्हणजे अर्थात, चहा-बिस्कीट…

 

biscuit-tea-inmarathi

 

सकाळच्या चहा सोबत टाईमपास म्हणून बिस्कीट, दुपारच्या चहासोबत पोटाला थोडा आधार म्हणून बिस्कीट… अगदीच काही नाही तर, नुसताच चहा प्यायला कंटाळा येतो म्हणून त्याच्यासोबत बिस्कीट… थोडक्यात काय, तर चहा आहे म्हणजे बिस्कीट आलंच.

हातावर पोट असणाऱ्या काही लोकांसाठी तर ही चहा बिस्किटांची जोडी, दुपारच्या जेवणाचं काम करत असते. तर कधी किटी पार्टीसाठी किंवा आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायला चहा बिस्कीट कामी येतं.

म्हणजेच अगदी सर्वसामान्य माणसापासून ते हाय प्रोफाइल लोकांपर्यंत, सगळीकडे ही जोडी तुफान हिट आहे.

सध्या तर ही जोडी जरा जास्तच गाजतेय. चहा-बिस्किटं खाणारे पत्रकार सध्या भन्नाट चर्चेत आहेत नाही का..!!

 

biscuit-tea-journalist-inmarathi

 

त्यांचं चहा-बिस्कीट गाजायचं ते गाजू देत, पण तुम्हाला हे माहित आहे का, की ही चहा बिस्किटांची जोडी हिट झाली कशी? संध्याकाळचा चहा घेण्याची प्रथा पडली कुठून?

आज आम्ही तुम्हाला या चहा-बिस्किटाबद्दल अशाच काही गमतीदार गोष्टी सांगणार आहोत..

बिस्कीट चहात बुडवण्याची प्रथा आली कुठून?

असं म्हटलं जातं, की जुन्या काळातील खलाशी त्यांच्या सोबत हार्डटॅक प्रकारची बिस्किटं जवळ बाळगत असत. ही बिस्किटं खूप कडक आणि दोनदा भाजून बनवली जात असत. जेणेकरून ती कुठल्याही वातावरणात व्यवस्थित टिकून राहावीत. त्या बिस्किटांचा कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी ती खूपच कडक बनवली जात असत.

 

hardtack-inmarathi

 

कधी कधी वर्षानुवर्षे हे खलाशी त्यांच्या मोहिमांवर असायचे. म्हणूनच ही अशी बिस्किटं बनवली जात असत. जी टिकाऊ असतील…

अशी बिस्किटं खाताना त्रास होणं साहजिक आहे. म्हणूनच ही कडक बिस्किटं काहीशी मऊ करून खाण्याची पद्धत खलाश्यांनी अमलात आणली. ती मऊ करण्यासाठी कॉफी किंवा इतर कुठल्या तरी द्रव पदार्थात बुडवून खाणं हा उत्तम पर्याय होता. म्हणून मग ही बिस्किटं ‘बुडवून खाण्याची’ पद्धत सुरु झाली असं म्हटलं जातं.

एवढंच नाही तर, “बिस्कीट” हा शब्द सुद्धा लॅटिन भाषेतील ‘बिस कॉटम’ या शब्दांवरून अस्तित्वात आला आहे, असं म्हटलं जातं. ज्याचा अर्थ ‘दोनदा भाजलेली’ असा होतो.

अशीच आणखी एक कथा  ऐकिवात आहे. फार पूर्वीच्या काळात रोमन्स एका विशिष्ट प्रकारचे वेफर्स वाईनमध्ये बुडवून खात असत. म्हणजेच ही खलाशी मंडळी हार्डटॅक कॉफीत बुडवून खात त्याच्या आधीपासूनच ही बुडवून खाण्याची प्रथा अस्तित्वात असावी.

 

wafers-and-wine-inmarathi

 

चहात बिस्कीट बुडवण्याची प्रथा ही इथूनच कुठून तरी आली असावी असं मानलं जातं.

संध्याकाळच्या चहाचा इतिहास…

रोज संध्याकाळी चहा घेण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना असेल.

 

tea inmarathi
pixelproduction.in

 

पण, या संध्याकाळच्या चहाचा उगम कुठून झालाय हे तुम्हाला माहित्ये का? तर, हा संध्याकाळचा चहा म्हणजे दोन जेवणांच्या मधल्या वेळात टाइमपास म्हणून अस्तित्वात आला आहे.

१८ व्या शतकाच्या अखेरीस ही प्रथा सुरु झाली. ब्रिटनमधील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ही पद्धत होती. या मधल्या वेळात, संध्याकाळच्या वेळात ‘टी-पार्टी’ आयोजित करण्यात येत असे. रात्रीचं जेवण म्हणजे एखादा जंगी सोहळा असे.

या सोहळ्याआधीच्या वेळात चहा आणि त्याच्या सोबतीला असलेले  केक्स, बिस्किटं असा थाट असायचा. पुढे पुढे चहाची उपलब्धी वाढली. त्यामुळे मग आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक घरांमध्ये संध्याकाळचा चहा आणि त्याच्या सोबत असा बिस्किट्स आणि केकचा नाश्ता सर्रासपणे होऊ लागला.

पुढे ब्रिटिशांसोबत ही पद्धत जगभर पसरली.

म्हणजे १६व्या शतकातील खलाशांनी बिस्कीट बुडवून खाण्याची पद्धत सुरु केली आणि पुढे १९व्या शतकात राणी व्हिक्टोरियाच्या काळात ‘संध्याकाळचा चहा’ ही प्रथा अस्तित्वात आली असं म्हणता येईल.

पुढे मग आपण भारतीयांनी चहा-चिवडा, चहा-चकली, चहा-खाकरा, चहा सोबत खारी, टोस्ट वगैरे नव्या जोड्या जमवल्या आहेतच…

 

tea-and-snacks-inmarathi

 

मग, काय मंडळी या चहा बिस्किटाच्या जोडीचा इतिहास आहे की नाही अगदीच गमतीशीर…

हा इतिहास तुम्हाला कळला, तसाच तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा कळायला हवा की नाही… चला मग तुमच्या ‘चाय-बिस्कुट’ बडींसोबत शेअर करा बरं पटापट…!!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?