' व्हरायटी पाहूनच भूक खवळणार,अशा ८ ग्रँड थाळींचं वैशिष्ट्य जाणून घ्या! – InMarathi

व्हरायटी पाहूनच भूक खवळणार,अशा ८ ग्रँड थाळींचं वैशिष्ट्य जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस जे जे कष्ट उपसतो ते सगळं काही फक्त पोटासाठी. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी. भयंकर भूक लागली तर चटणीबरोबर भाकरीसुद्धा गोड लागते.

पण भूक लागली नसेल तर अमृतालाही चव नसते. हे सगळं कोडकौतुक रसनेचं म्हणजे जिभेचं.

काही लोक असेही असतात जे जेवण केवळ जेवायचं म्हणून जेवतात. ना चवीशी देणंघेणं ना कौतुकाशी मतलब. केवळ उदरभरण हेच कर्म.

तर काही लोक असे असतात ज्यांना प्रत्येक पदार्थ हा चवदारच असावा असं वाटतं. हे लोक खाण्याचे शौकीन असतात.

या शौकीन लोकांना गावातील आसपासच्या परिसरातील उत्तम हाॅटेल्स माहिती असतात. कुठं काय मिळतं…काय चांगलं असतं.. खासियत काय हे अगदी तोंडपाठ असतं.

अशा लोकांसोबत जेवण करणं ही पर्वणीच समजावी. आपल्या देशात तर इतकी खानपानाच्या पद्धतीत विविधता आहे की जितके प्रदेश तितक्या डिशेस.

 

foodie people inmarathhi

 

गोड, तिखट, शाकाहारी, मांसाहारी, भाज्यांचे प्रकार, चटण्या, कोशिंबिरी, लोणची, मुरांबे, आमटीचे वेगवेगळे प्रकार, तळणीचे पदार्थ, साठवणीचे पदार्थ, वाळवणं.

हे कमी म्हणून सकाळच्या नाश्त्यामधील पदार्थ, संध्याकाळी खायचा खाऊ, चाटचे नाना प्रकार, आईस्क्रीम, डेझर्ट, ज्यूस..किती खाऊ नी काय खाऊ!

पूर्वी तर हाॅटेल म्हणजे केवळ क्षुधाशांतीभुवन एवढीच ओळख असलेलं दुकान. पण आता बदलत्या काळानुसार हाॅटेल्सनी पण आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज आपण अशा काही हाॅटेलमधील ८ ग्रँड थाळी बघणार आहोत. भरगच्च पदार्थांनी घसघशीत वाढलेली जेवणाची थाळी पाहूनच मन तृप्त झालं पाहिजे.

आणि ती व्हरायटी पाहून भूक खवळली पाहिजे अशा काही ठिकाणी असलेल्या या स्पेशल थाळींची ही माहिती!

१. खली बली थाली –

khali bali thali inmarathi

 

दिल्ली येथील कॅनाॅट प्लेसमध्ये ही थाळी मिळते. अगदी राजेशाही थाटात ही थाळी ग्राहकांना दिली जाते. या थाळीतील एकूण पदार्थांचा थाट पाहूनच भूक चाळवते पण एकटा माणूस ही थाळी संपवू शकत नाही.

चार जणांच्यामध्ये ही थाळी संपवावी लागेल इतकी पदार्थांची रेलचेल असते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारात ही थाळी मिळते. ही थाळी ५६ इंची थाळी आहे.

Ardor 0.2 मध्ये ही थाळी मिळते. एकंदर ४० वेगवेगळे पदार्थ या थाळीत असतात. अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक किचनमध्ये हे पदार्थ बनवले जातात.

१९०० रुपयांत येणारी ही थाळी चौघेजण शेअर करु शकतात. पाचवा माणूस आला तर ५०० रुपये जादा आकारणी केली जाते.

यात पनीर टिक्का, बुंदी रायता,सलाड, नान, व्हेज कबाब, विविध पारंपरिक भाज्या, आमटी, डेझर्ट यांचा समावेश असतो. तर मांसाहारी थाळीत चिकन, मटण, माशांचे विविध प्रकार, भाज्या, यांचा समावेश असतो.

एका वेळी दोन‌ लोक ही थाळी उचलून आणतात. चार किलो अन्न या थाळीत असते. आणि अनलिमिटेड आॅर्डर रिपीट करु शकतो. पण आॅर्डर रिपीट करायला यातील पदार्थ संपायला तर हवेत ना!

 

२. बाहुबली थाळी –

 

bahubali thali inmarathi

 

पुण्यातील आओजी खाओजी या हाॅटेलमध्ये‌ ही बाहुबली थाळी मिळते. या थाळीत ११ प्रकारचे मेन कोर्स डिशेस आहेत.

त्याशिवाय दोन प्रकारच्या आमट्या, दोन प्रकारचे दही, एक बाऊल भरुन लोणी, सहा प्रकारचे डेझर्ट, तीन प्रकारचा भात, दोन प्रकारच्या रोट्या, सहा पापड, लोणचं, सलाड, आणि दोन मोठे ग्लास पतियाळा लस्सी यांचा समावेश आहे.

चार माणसांना ही थाळी पोटभर जेवण देते. ४५ मिनीटात ही थाळी जो एकटा माणूस संपवेल त्याला अकरा हजार रुपये बक्षिस देण्याचं चॅलेंज हाॅटेलनं ठेवलं आहे.

 

३. चोकी धनिस राजस्थानी थाली –

 

choki dhani thali inmarathi

 

राजस्थानी खाद्य संस्कृतीचा वारसा सांगणारी ही थाळी. यात राजस्थानातील पारंपारिक खाद्य पदार्थ आहेतच खवैय्यांना चुरमा ते घेवर पर्यंत सारे राजस्थानी खाद्य पदार्थ एकाच थाळीत मिळतात.

 

४. केसरिया थाली –

 

kesariya thali inmarathi

 

बेंगळुरू येथे सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया मध्ये ही थाळी मिळते. अनोखे राजस्थानी खाद्य पदार्थ एकाच थाळीत मिळतात.

एकूण ३२ खाद्य पदार्थ या थाळीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

 

५. दारा सिंग थाली –

 

dara singh thali inmarathi

 

ठाण्यातील मिनी पंजाब या हाॅटेलमध्ये ही दारा सिंग थाली मिळते. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे जेवण या थाळीत मिळते.

एका वेळी पाच माणसे पोटभर जेऊ शकतील इतके पदार्थ या थाळीत समाविष्ट आहेत.

एका थाळीत तीन चाटचे प्रकार, चार प्रकारची पेयं, सूप, सात प्रकारचे डेझर्ट, चटण्या लोणची तर मांसाहारी थाळीत टिक्का, कबाब यांचे वेगळे प्रकार अशी रेलचेल असते.

एकंदरीत या थाळीत ३६ प्रकारचे खाद्य पदार्थ आहेत.

 

६. श्री ठाकर भोजनालय गुजराती थाळी –

 

thakar thali inmarathi

 

शाकाहारी भोजनाचे शौकीन असलेल्या लोकांसाठी ही थाळी म्हणजे खवैय्येगिरीची संधीच आहे.

मुंबईत काळबादेवीतील या भोजनालयात मिळणाऱ्या या थाळीत चार प्रकारच्या भाज्या, रोटी, बटाट्याची भाजी, कढी, दाल, खांडवी म्हणजे आपल्या सुरळीच्या वड्या, जिलेबी, फ्रूट कस्टर्ड, श्रीखंड, बासुंदी यांचा समावेश आहे.

एक असं वैशिष्ट्य म्हणजे या थाळीतील पदार्थ अस्सल देशी तुपात तयार केलेले आहेत.

 

७. छप्पन्न भोग महाराजा थाळी –

 

chappan bhog thali inmarathi

 

मुंबई मधील हलवाई की दुकान या ठिकाणी ही वैशिष्ट्यपूर्ण थाळी मिळते. या थाळीच्या नावातच वैशिष्ट्य दिसतं, एकूण छप्पन्न पदार्थ असलेली ही थाळी संपवण्यासाठी दोनपेक्षा अधिक लोक लागतात.

मारवाडी आणि गुजराती पदार्थ भरुन परिपूर्ण केलेली ही थाळी म्हणजे खवैय्येगिरीची अफलातून संधी आहे.

९०० वेगवेगळ्या पदार्थांच्या समावेशाने सजलेली ही थाळी म्हणजे बल्लवाचार्यांच्या करामतीचा भारी नमुना आहे.

या थाळीत पापड, दोन प्रकारच्या चटण्या, दोन प्रकारची लोणची, सलाड, उकडून काढलेला आणि तळलेला फरसाण,त्या दिवसाची स्पेशल डिश, चार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारची डाळ,

दोन‌ प्रकार कढीचे, भारतीय प्रकारचे ब्रेड, दोन प्रकारचे भात, अनलिमिटेड डेझर्ट, पान,ताक अशी राजेशाही थाट असलेली ही थाळी मुंबईत लोअर परेल येथे मिळते.

 

८. सुकांता शुद्ध शाकाहारी थाळी –

 

sukanta thali inmarathi

 

पुण्यात डेक्कन जिमखाना येथे असलेल्या सुकांता मध्ये ही शुद्ध शाकाहारी थाळी मिळते. सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात ही थाळी मिळते. या एका थाळीत २५ विविध प्रकार असलेले पदार्थ समाविष्ट आहेत.

एक वेलकम् ड्रिंक, दोन प्रकारचे चाट, एक प्रकार तळलेला फरसाण, एक उकडलेला फरसाण, चार प्रकारच्या भाज्या, भारतीय प्रकारचे ब्रेड, दोन प्रकारचे भात,कढी आणि डाळ असा साधा सोपा जामानिमा असलेली ही थाळी पुणेकरांची पसंत बनायला वेळ नाही लागला.

कितीही पट्टीचा खाणारा असला तरी एकटा माणूस ही थाळी संपवू शकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?