' नर माश्यांशी समागम ते रोज हजारो अंडी; वाचा, कसं असतं आयुष्य ‘राणी माशी’चं! – InMarathi

नर माश्यांशी समागम ते रोज हजारो अंडी; वाचा, कसं असतं आयुष्य ‘राणी माशी’चं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मधमाशी हा निसर्गातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दिसायला लहान असला तरी हा जीव कितीतरी कामे करतो.

नावात असल्याप्रमाणे मधमाशी आपल्याला मध आणि मेण मिळवून देण्यात मदत करतेच, पण अजूनही एक असे काम करते ज्यामुळे निसर्गात मोठा समतोल राखला जातो. ते म्हणजे परागीभवन.

एक फुलावरून दुसऱ्या फुलावर उडत असताना मधमाश्या परागकणाचे वहन करण्याचे काम करतात, ज्यामुळे कितीतरी वनस्पतींच्या फलधारणेचा मार्ग सुकर होतो.

अशाप्रकारे निरनिराळ्या पद्धतीने माणसाच्या आणि निसर्गाच्या उपयोगी येणाऱ्या मधमाश्यांची जीवनकथाही फार रंजक असते.

 

honey bee inmarathi

 

मधमाश्या समूहाने राहतात. एका पोळ्यात साधारणपणे १० हजारांपासून ते ८० हजारापर्यंत मधमाश्या असू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सगळी वंशवृद्धी एका माशीपासून, म्हणजेच राणी माशीपासून होते बरं!

इतर माश्यांपेक्षा थोडी वेगळी असणारी राणीमाशी म्हणजे मधमाश्यांच्या पोळ्याची “कर्ती माशी” असते असे म्हणायला हरकत नाही!

मधमाश्यामध्ये तीन प्रकार पडतात, राणी माशी, नर माश्या आणि कामगार माश्या. कामगार माश्या या मादी माश्या असून त्यांचे काम मध गोळा करणे, इतर माश्यांना खाऊ घालणे आणि पोळ्याचे रक्षण करणे हे असते.

 

 

नर माश्यांचे काम फक्त आणि फक्त राणीमाशीशी समागम करून प्रजोत्पादनास मदत करणे हे असते.

राणी माशी नावाप्रमाणेच पोळ्यातील सर्वात बलाढ्य माशी असते. राणीमाशी दररोज हजारो अंडी घालू शकते.

कामगार माश्या काही महिने जिवंत राहतात. नर माश्या राणीशी समागम केल्यावर मरून जातात, पण राणी माशी तब्बल पाच वर्षांपर्यंत किंवा तिची अंडी घालण्याची क्षमता कमी होईपर्यंत जिवंत राहू शकते.

राणी माशी दोन प्रकारची अंडी घालते, एक म्हणजे फलित झालेली आणि दुसरी फलित न झालेली. फलित झालेल्या अंड्यांमधून कामगार माश्यांचा जन्म होतो, तर फलन न झालेल्या अंड्यामधून नर माश्या तयार होतात.

मधमाश्यांचे जीवनचक्र प्रथम अंडी, मग अळी, नंतर कोष आणि अखेर प्रौढ माशी अशा प्रकारचे असते.

राणी माशीने घातलेल्या अंड्यांमधील फलन न झालेल्या अंड्यातून नर माश्या तयार होतात आणि त्यांना कोशातून बाहेर पडेपर्यंत साधारणपणे २४ दिवसांचा काळ लागतो.

 

 

तसे म्हटले, तर नर माश्या पोळ्यासाठी खास कामाच्या नसतात. त्या मध गोळा करू शकत नाहीत किंवा अळ्यांना खायला घालू शकत नाहीत. त्या केवळ प्रजननासाठी उपयोगी येतात. नर माश्या साधारणपणे आठ आठवडे जगतात.

याउलट कामगार माश्या थोड्या लवकर म्हणजे २१ दिवसात कोशातून बाहेर पडतात. कामगार माश्या मध गोळा करणे, एक फुलावरून परागकण दुसऱ्या फुलापर्यंत पोचविणे आणि पोळ्यातील इतर माश्यांना अन्न पुरविणे ही कामे करतात.

त्यांचे आयुष्य नर माश्यांपेक्षा जास्त म्हणजे साधारणपणे ५ महिने एवढे असते.

उन्हाळ्याच्या दिवसात कामकरी माश्या कमी जगतात, कारण तेव्हा फुलांना बहर आलेला असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात अन्न आणि मध गोळा करणे, पोळ्यातील अळ्यांना खाऊ घालणे ही कामे करावी लागतात.

त्या तुलनेत हिवाळ्यात त्याचे आयुष्यमान वाढते, कारण तेव्हा तुलनेने त्यांचे काम कमी झालेले असते.

राणी माशीचे जीवनचक्र फारच वैशिष्ट्यपूर्ण असते. साधारणतः राणीमाशी दर दिवशी हजारापेक्षा जास्त अंडी घालते. ही अंडी फलित झाली, तर त्यातून कामगार माश्या किंवा राणी माशी तयार होते.

जेव्हा एखाद्या राणी माशीची प्रजनन क्षमता कमी होते किंवा ती अशक्त होते, तेव्हा नवीन राणी माशीसाठी तयारी सुरू होते.

 

honey bee inmarathi

 

कामगार माश्या साधारणपणे २० फलित अंडी शोधतात. या अंड्यामधून जेव्हा अळ्या बाहेर येतात तेव्हा त्यांना कामगार माश्या “रॉयल जेली” या नावाने ओळखले जाणारे अन्न देतात.

या अन्नामुळे या अळ्यांचे नर माश्या आणि कामगार माश्यांपेक्षा चांगले पोषण होते. या अळ्या पोळ्यामध्ये विशिष्ट ठिकाणी ठेवल्या जातात. कोशातून सगळ्यात आधी बाहेर पडणारी माशी राणीमाशी म्हणून ओळखली जाते.

रॉयल जेलीसारखे अन्न मिळाल्यामुळे ती नर आणि कामगार माश्यांपेक्षा मोठी असते. आपल्या इतर स्पर्धक माश्यांना ती अळ्या असतानाच संपवून टाकते.

काही वेळेस दोन कोषांमधून एकाच वेळी दोन माश्या बाहेर येतात. अशा वेळेस त्या दोन माश्यांमधील बलाढ्य माशी राणीमाशी बनते.

नवीन राणीमाशी कोशातून बाहेर आल्यावर आठवड्याभरातच पोळ्यातून बाहेर जाऊ लागते आणि जवळपास वीसेक नर माश्या शोधून त्यांच्याशी समागम करते.

या दरम्यान आपल्या “स्पर्म बॅग” मध्ये ती पुरेसे शुक्राणू गोळा करून ठेवते, ज्यामुळे ती आयुष्यभर प्रजननक्षम राहते.

पुन्हा पोळ्यात येऊन राणीमाशी एका वेळेस जवळपास एक हजारापेक्षा जास्त अंडी घालण्यास सुरुवात करते. यानंतर मात्र ती क्वचितच पोळ्यातून बाहेर पडते.

 

 

हिवाळ्यात राणीमाशीचे जगणे काहीसे कठीण बनते. जर पोळे व्यवस्थित मोठे असेल, तर राणीमाशीला काही अडचण येत नाही. राणीमाशी आपले प्रजोत्पादनाचे काम नीट करत आहे, की नाही यावर कामगार माश्यांचे बारीक लक्ष असते.

जर राणी माशीची अंडी देण्याची क्षमता कमी झाली, तर कामगार माश्या नवीन राणी माशीसाठी तयारी सुरू करतात. वृद्ध राणी माशी एकतर पोळ्यातून हाकलली जाते किंवा काही वेळेस पोळ्यातही राहते.

काही वेळेस नवीन राणीमाशी दुसरे पोळे तयार करून दुसरी वसाहत तयार करते.

पोळ्यामधल्या मधमाशांचे जीवन म्हणजे सामूहिक सहजीवन या प्रकारचे असते. इतर किटकांमध्ये सहसा न बघायला मिळणारा हा प्रकार मधमाश्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवितो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?