' नोकरी सांभाळून गरजू लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या “ह्या” तरुणीची कहाणी वाचा – InMarathi

नोकरी सांभाळून गरजू लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या “ह्या” तरुणीची कहाणी वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लोक आटापिटा करतात. याचं कारण म्हणजे नोकरीची हमी आणि घरी येणारा महिन्याचा पगार.

शिवाय सकाळी ९ ते ५ काम आणि इतर वेळी घरी. शिवाय इतरही अनेक फायदे आहेत पण त्याची चर्चा इथे नको. थोडक्यात सांगायचं तर, थोडं आरामातलं काम सगळ्यांना हवं असतं.

परंतु काही काही शासकीय कर्मचारी देखील या सगळ्याला अपवाद असतात. तेलंगणामधल्या मुलुगु जिल्ह्यातील तस्लिमा मोहम्मद या सब रजिस्ट्रार म्हणून काम करतात.

प्रापर्टी रेकॉर्ड ठेवणे आणि काही टॅक्सेस जमा करणे हे त्यांचं ऑफिसातील काम. पण त्याबरोबरच आपले सामाजिक कर्तव्य देखील त्या तितक्याच तत्परतेने पार पडतात.

गरिबांसाठी आवश्यक सामान मिळावे आणि त्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्या एक एनजीओ देखील चालवतात.

तस्लिमा या स्वतः गुट्टिकोया या आदिवासी समाजामधून आलेल्या आहेत. पण आधीपासूनच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या तस्लिमा आता विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत असतात.

दुर्गम, अतिदुर्गम भागातील जे आदिवासी आहेत त्यांच्यापर्यंत सरकारी मदत पोहोचली पाहिजे, त्याशिवाय त्यांना त्यांच्या हक्काची, शिक्षणाची जाणीव झाली पाहिजे यासाठी त्यांची धडपड सुरू असते.

हे सगळं करत असताना आपल्या शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी त्या शेतामध्ये काम करतात. त्याचे जे पैसे मिळतात ते पैसे त्या गरजू व्यक्तींना देत असतात.

 

taslima inmarathi

 

शेतमजूर म्हणून काम करण्याचा त्यांचा उद्देशही वेगळा आहे. त्यांना त्याबरोबर त्यांच्या सोबत असणारे जे शेतमजुर असतील त्यांच्याशी बोलायचे असते. त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतात.

त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल याचा विचार त्या करतात. त्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती सांगतात. सरकारच्या योजनांचा लाभ कशाप्रकारे घेतला पाहिजे हे देखील समजावून सांगतात.

आपला विकेंड त्या अशाप्रकारे सत्कारणी लावतात. गेली कित्येक वर्ष त्यांचा हा पायंडा हे सुरूच आहे.

आताही लॉकडाउनच्या काळात जे मजूर इतर राज्यातून आपल्या राज्यात जात होते मैलोन मैल चालून प्रवास करत होते, त्यांना त्यांच्याच घरात जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती.

अशा मजुरांजवळ खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यांचे हाल तस्लिमा यांनाही बघवले नाहीत. त्या मजुरांच्यासाठी देखील त्यांनी जेवणाची व्यवस्था केली.

त्या लोकांना किराणा सामान देऊन त्यांच्या घरी पाठवलं.

 

taslima 2 inmarathi

 

तस्लिमा यांच्या या सगळ्या कृतीमागे त्यांचा भूतकाळ आहे. त्या केवळ दोन वर्षाच्या होत्या त्याचवेळेस नक्षलवाद्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली.

घरात एकूण पाच भावंडे, तस्लिमा त्यातीलच एक. घराची सगळी जबाबदारी आईवर आली. परंतु आईने अत्यंत कष्टाने या पाचही मुलांना सांभाळले. घरची थोडीफार शेती होती, ती शेती करतच आईने या मुलांचा सांभाळ केला.

आईने केलेल्या कष्टाची जाणीव तस्लिमा यांना आहे. त्यांची १३००० रुपये फी भरण्यासाठी आईला किती कष्ट करावं लागलं होतं हेदेखील त्यांना माहित आहे.

तस्लिमा यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री मधून एम.एस.सी केलं. आणि आपल्याच गावात त्यांना रजिस्ट्रार म्हणून नोकरीही मिळाली.

तस्लिमा म्हणतात, की मी माझ्या आईचे कष्ट कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच जेव्हा इतर लोक दुःखात असतात, संकटात असतात. त्यावेळेस त्यांचं दुःख हलकं करण्याचा मी प्रयत्न करते.

तस्लिमा यांचं लग्न झालं असून त्यांना आता दोन मुलं आहेत. परंतु त्यांच्या या सामाजिक कामाला त्यांच्या पतीची देखील साथ आहे.

कुटुंबाकडून साथ मिळते म्हणून कामही करायला आनंद मिळतो असे त्या म्हणतात.

तस्लिमा केवळ आपल्या आजूबाजूच्या लोकांनाच मदत करत नाहीत, तर त्याच्याही पलीकडे लोकांना मदत करण्याचा त्यांचा हेतू असतो.

हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्याचा त्या प्रयत्न करतात. यासाठी सोशल मीडिया आणि पोलिसांची मदत घेतात.

एका पंधरा वर्षाच्या मुलीचे आई वडील एका एक्सीडेंट मध्ये गेले आणि ही मुलगी अनाथ झाली. तिला कोणीही इतर नातेवाईक नव्हते. त्या मुलीला देखील आता तस्लिमा यांनी दत्तक घेतले आहे.

त्यासाठी लागणार्‍या सगळ्या कायदेशीर बाबीही पूर्ण केल्या आहेत.

दुसऱ्या एका घटनेत आठ महिन्याच्या गरोदर महिलेला त्यांनी त्यांच्या घरात सहारा दिला. तिची सगळी काळजी घेतली. तिचं खाणंपिणं तिची औषध याची सगळी व्यवस्था केली.

 

taslima 3 inmarathi

 

या लॉकडाउनच्या काळात एका गरीब घरातील मुलीचा पोटदुखी ने अंत झाला. त्यावेळेस तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठीही तिच्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते. तेव्हादेखील तस्लिमा यांनी त्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे देऊ केले.

एका गरीब घरातील कर्ता पुरुष हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू पावला. त्याच्यामागे त्याची बायको आणि दोन मुले आहेत. त्यांना सर्व प्रकारची मदत करायचे तस्लिमा यांनी आता ठरवले आहे.

लॉकडाऊन, कोरोना मुळे रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांची, भिकाऱ्यांची अवस्था फारच वाईट झाली. त्या लोकांसाठी देखील निवारा आणि जेवण्याची व्यवस्था त्यांनी केली.

लॉकडाउनच्या काळात गुट्टीकोया या दुर्गम भागातील ३६ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू तिथल्या खासदार दानसरी अनुसया यांच्या मदतीने पोहोचवल्या.

अगदी अलीकडे एका अनाथाश्रमातील मुलीने दहावी मध्ये खुप चांगले मार्क्स मिळवले, आता तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी तस्लिमा यांच्या एनजीओ ने घेतली आहे.

तस्लिमा या स्वतःच्या वागणुकीतूनच लोकांना शिकवण देत असतात. आजकालची मुलं घरची शेती करायला नको म्हणतात. त्यांना शेतात काम करायला लाज वाटते.

त्यांनादेखील तस्लिमा शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतात. तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांना मदत करत आहात हे त्या मुलांना सांगतात.

आत्तापर्यंत अशी ३०० मुलं त्यांनी यासाठी तयार केली आहेत.

अनेक संस्थांमधल्या शिक्षकांना देखील त्यांनी लॉकडाऊनच्या काळात शेतीसाठी प्रोत्साहित केले. आता त्यांच्याप्रमाणेच आपणही काम करावं अशी प्रेरणा आता तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये निर्माण होत आहे.

तस्लिमा आता तिथे प्रसिद्ध झाल्या आहेत. तिथले लोक आता त्यांना ‘गुट्टीकोयला पेडक्का’ म्हणतात. अक्का म्हणजे बहीण. गुट्टिकोयलातली बहीण.

तिथल्या एका विद्यार्थ्याने तर त्यांचा टॅटूच आपल्या हातावर काढून घेतला आहे, आणि खाली आक्का असे लिहिले आहे.

 

taslima tattoo inmarathi

 

तस्लिमा यांचे आता फेसबुक वर १५०० फॉलोअर्स आहेत. त्याद्वारे त्या आदिवासी समाजातील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.

त्यांच्या या मदतीचा लाभ घेतलेला विनोद म्हणतो की तस्लिमा यांनी अगदी आईप्रमाणे आमच्या शिक्षणाची आणि जेवणाची जबाबदारी घेतली. हीच भावना अनवेश देखील व्यक्त करतो.

सरकारी नोकरी मिळाल्यावर आरामाचे जीवन तस्लिमा जगू शकत होत्या. बाकीचे इतर काही करण्याची त्यांना काही तशी गरजही नव्हती. परंतु इतका स्वार्थी विचार त्यांनी केला नाही. आपले मागचे दिवस त्या कधीच विसरल्या नाहीत.

गरीब लोकांच्या मदतीसाठी लोक फारसे पुढे येत नाहीत. परंतु त्यांना देखील मदतीची गरज असतेच. हे जाणून त्यांना मदत करणारे तसे कमीच.

परंतु तस्लिमा सारखे लोक मनापासून हे काम करतात. म्हणूनच म्हणावसं वाटतं की,

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले| तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.||

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?