' बाहेर पाणीपुरी खायचीये, पण स्वच्छतेची भीतीये? तर मग हा “जुगाड” तुमच्यासाठीच आहे – InMarathi

बाहेर पाणीपुरी खायचीये, पण स्वच्छतेची भीतीये? तर मग हा “जुगाड” तुमच्यासाठीच आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पाणीपुरी, भेळ, चाट यासारखे पदार्थ कोणाला आवडत नाहीत!! भारतातलं हे प्रचंड लोकप्रिय असलेलं स्ट्रीट फूड. भारतातल्या कुठल्याही राज्यांमध्ये आपल्याला भेळ आणि पाणीपुरी तरी मिळतेच. तिकडे त्यांची नावे वेगळी असतील, पण तो प्रकार मिळतोच.

पाणीपुरी ही लोकांची इतकी आवडीची असते की, लोक पैजा लावून पाणीपुरी खातात. आज-काल लग्नामध्ये देखील पाणीपुरीचा स्टॉल लावलेला असतो आणि सगळ्यात जास्त गर्दी त्याच स्टॉलला असते.

एक तर खिशावर जास्त भार न देता हे चाटचे पदार्थ आपल्या पोटाच्या आणि जिभेचे चोचले पुरवतात.

संध्याकाळच्या वेळेला एखाद्या भेळीच्या दुकानात, स्टॉलवर, बागेत पाणीपुरी खाण्याची मजा औरच. दुपारचे जेवण होऊन तीन-चार तास झालेले असतात. रात्रीच्या जेवणाला तीन तास उशीर असतो. त्यावेळेस भूक थोडीशी चाळवलेली असते. त्यावेळेस अशी चटकदार पाणीपुरी आपल्या पोटोबाला शांत करते.

 

panipuri-inmarathi03

 

आपल्या मराठीतले प्रसिद्ध साहित्यकार पु.ल. देशपांडे यांनीही त्यांच्या, माझे खाद्यजीवन या लेखात भेळ आणि पाणीपुरीचे गुणगान केले आहे.

ते म्हणतात की, भेळ आणि पाणीपुरी ही कधीही घरात बनवून खाऊ नये, त्याला बाहेरच्या पाणीपुरीची आणि भेळीची चव येत नाही.

आपण पाहतोच की प्रत्येक शहरांमध्ये, गावांमध्ये एखादी तरी पाणीपुरी, भेळ प्रसिद्ध असतेच. त्यांच्या स्टॉल्सवर संध्याकाळी गर्दी असतेच.

पाणीपुरी खाताना तो पाणीपुरीवाला जरी मराठी असला तरी हिंदी बोलणे मस्ट असल्याप्रमाणे पाणीपुरी मागणारे हिंदीतच बोलतात. जे पट्टीचे तिखट खाणारे असतात ते म्हणतात,”जरा तीखा बनाना भैया”.

एखादी आई आपल्या लहान मुलाला घेऊन आलेली असते ती म्हणते,” मुझको मीडियम दो और इसको मिठा दो”. तर कोणाला खट्टा पाणीपुरी हवी असते.

बरं आपली पाणीपुरी खाऊन झाली की लगेच त्या पाणीपुरीवाल्या भैय्याला, “एक मसाला पुरी देना” म्हणत ती शेवटची मसाला पुरी हक्काने मागून खाल्ली जाते. मगच प्रत्येक जण आपल्या आवडीची चव जिभेवर रेंगाळत घेऊन घरी जातो.

 

panipuri-inmarathi06

 

तर अशी ही पाणीपुरी आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक भाग बनून गेलेली. परंतु अचानक २०२० मध्ये कोरोना नावाचं संकट संपूर्ण जगावर आलं.

भारतातही सगळीकडेच लॉक डाऊन सुरू झालं आणि सगळीच हॉटेल्स, स्ट्रीट फूड स्टॉल्स बंद पडले.  त्यामुळे खवय्ये लोकांची खरोखरच पंचाईत झाली.

अर्थात बऱ्याच जणांनी घरांमध्ये अनेक पदार्थ केले. नवीन नवीन पदार्थ शिकून घेतले. अगदी पाणीपुरीच्या पुऱ्या करण्यापासून पाणीपुरी करून खाल्ली, तरीही त्या स्टॉलवरची पाणीपुरी प्रत्येकालाच आठवत होती.

शेवटी आता लॉकडाऊन संपलं , पण तरीही कोरोनाचं संकट संपलेलं नाही. दररोज कोरोना बाधित लोकांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे.

 

corona inmarathi 2

 

त्यामुळे लॉकडाउन कमी झालं, तरीही पाणीपुरीचे स्टॉल्स मात्र अजूनही सुरू झाले नाहीत. कारण आता बाहेरचं काही खाताना त्याला किती लोकांचे हात लागले असतील? ते स्वच्छ असेल का? असे अनेक प्रश्न मनात येत राहतात.

पण या सगळ्यांमध्ये जास्त कुणाची अडचण झाली असेल तर ती पाणीपुरी विकणाऱ्या लोकांची. कारण गेले पाच सहा महिने त्यांचा व्यवसाय बंद आहे. कोणतंही उत्पन्नाचे साधन त्यांच्याकडे नसल्यामुळे आता पुढे काय करायचं, हा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे.

‘गरज ही शोधाची जननी असते’ असं म्हणतात, ते काही खोटं नाही. आपला व्यवसाय चालवायचा असेल तर त्यात काहीतरी नाविन्य आणलं पाहिजे. लोकांना विश्वास वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे आणि परत आपलं गिऱ्हाईक आपण आपल्याकडे आणलं पाहिजे.

यातूनच मग रायपूरच्या एका पाणीपुरी स्टॉलवाल्याने एक नवीन कल्पना राबवली. ज्यामध्ये त्याचा फायदा तर आहेच, परंतु त्याच्याकडे येणाऱ्या गिर्‍हाईकालाही निःशंकपणे पूर्वीसारखाच पाणीपुरीचा आस्वाद घेता येईल.

 

panipuri inmarathi1

 

त्याचं असं झालं की, अवनीश शरण नावाच्या एका आयएएस ऑफिसरने ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर केला. त्याला नाव दिलं,’गजब का जुगाड’.

हा व्हिडिओ होता, तेलीबांधा, रायपूर येथील एका पाणीपुरी वाल्याचा. त्याने आपली पाणीपुरी ऑटोमॅटिक सेंसर लावून विकायला सुरुवात केली आहे. त्याला तो ‘टच मी नॉट पाणीपुरी’ असं म्हणतो.

सध्याच्या या कोरोनाकाळात सोशल डिस्टंसिंग पाळणे खूप महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारची काळजी घेऊनच आता आपलं “न्यू नॉर्मल लाइफ” चालू करायचं आहे, हे बरोबर कळलेला तो पाणीपुरीवाला आता त्याच्यात आणि लोकांमध्ये कमी कॉन्टॅक्ट येईल याची काळजी घेतोय.

त्याच्या वेंडिंग मशीन मध्ये खट्टा मीठा, जीरा लसुन, पुदिना धनिया असे तीन प्रकारचे फ्लेवर्स मिळतात. ज्याला ज्या फ्लेवरची पाणीपुरी खायची आहे ती त्याला मिळते.

 

panipuri inmarathi2

 

त्या वेंडिंग मशीन वर त्या त्या फ्लेवरची नावे लिहिलेली आहेत. त्याच्याखाली आपली पुरी धरली, की ती पुरी भरेल इतके पाणी पडते आणि लोकांना स्ट्रीटफूडची पाणीपुरी खाण्याचा आनंदही मिळतो.

खरंच सोशल डिस्टंसिंग, स्वच्छता पाळून आपण आपलं न्यू नॉर्मल लाईफ चालू करू शकतोय. म्हणजे बदल होतोय, पण तो चांगला होतोय, असं म्हणायला हरकत नाही.

त्याच्या याचं कल्पनेचे कौतुक अवनीश शरण यांनी केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर थोड्याच काळात लोकप्रिय झाला. अनेक लोकांनी त्यावर रिट्विट देखील केलं.

 

 

कोण त्याला ‘सुपर आयडिया’ असं म्हणतंय, तर कोण त्या पाणीपुरी वाल्याला भेटू आणि पाणीपुरी खाऊ, असं सांगतंय. तर काहीजण अशाप्रकारे पाणीपुरी खायला मिळत असेल तर काय हरकत आहे असं म्हणत आहेत.

अर्थातच अवनीश शरण यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमुळे अशा अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांना आणखीन काही नवीन आयडिया सुचतील आणि त्यांचा त्यांचा व्यवसाय पुन्हा चालू करता येईल.

आता पुढे काय करायचं? असं म्हणून हातपाय गाळण्यापेक्षा अशा कल्पना राबवून नवीन उपक्रम चालू करता येतील. यातूनच रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल.

भारतात अशा प्रकारचे जुगाड करणारे कमी नाहीत. फक्त त्यांनी त्याचा वापर अशा कामांसाठी केला तर नक्कीच सगळ्यांनाच फायदा होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?