'IPL- खेळाडूच्या कामगिरीनंतर, आजही महत्त्वाची भूमिका सांभाळणारे १० दिग्गज, वाचा!

IPL- खेळाडूच्या कामगिरीनंतर, आजही महत्त्वाची भूमिका सांभाळणारे १० दिग्गज, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आयपीएल म्हणजे क्रिकेटविश्वातील एक जत्राच जणू. गेली १२ वर्षं नियमितपणे मार्च-एप्रिल महिन्यात रंगणारा हा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचा महोत्सव जगभरातल्या क्रिकेटपटूंना आणि क्रिकेटप्रेमींना आकर्षित करतो.

ट्वेंटी ट्वेंटी प्रकारचा उदय झाल्यावर ३-४ वर्षांतच आयपीएलची सुरुवात झाली आणि प्रस्थापित तसेच उदयोन्मुख खेळाडूंसाठी आपले कौशल्य दाखवण्याची नवीन संधी उपलब्ध झाली.

आयपीएल सुरू झाल्यावर काही वर्षांतच याची लोकप्रियता एवढी वाढली, की आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (ICC) आपल्या वार्षिक वेळापत्रकात आयपीएल साठी वेगळी “विन्डो” ठेवली. जेणेकरून कोणतेही इतर देश या दरम्यान मालिका खेळवणार नाहीत आणि त्यांचे खेळाडू आयपीएल मध्ये सहभागी होऊ शकतील.

गेल्या १२ मोसमांमध्ये आयपीएलने अनेक गुणवान खेळाडूंना पुढे आणले. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू ही आयपीएलचीच देणगी होय.

 

hardik pandya inmarathi

 

२००८ साली जेव्हा आयपीएल सुरू झाले, तेव्हा त्या वेळचे अनेक महान खेळाडू आठ संघांमधून खेळत होते.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग यांसारख्या भारतीय, तर सनथ जयसूर्या, रिकी पॉन्टिंग, ऍडम गिलख्रिस्ट, केविन पीटरसन यांसारख्या परदेशी खेळाडूंनी सुरुवातीच्या काही मोसमांमध्ये वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले.

यांपैकी बरेचसे खेळाडू आता निवृत्त झालेले असून ते आपल्याला समालोचकांच्या भूमिकेत दिसतात. पण काही खेळाडूंनी निवृत्तीनंतरही आपण प्रतिनिधित्व केलेल्या संघांची साथ सोडलेली नाही बरं!

उदाहरणच घ्यायचे झाले, तर अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर हे आपल्याला अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये सल्लागाराच्या भूमिकेत पाहायला मिळतात. याशिवाय काही खेळाडू निवृत्तीनंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरलेले आहेत.

 

१. स्टीफन फ्लेमिंग –

 

stephen flaming inmarathi

 

न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग २००८ साली चेन्नई सुपर किंग्स संघाशी करारबद्ध झाला. आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून फ्लेमिंग केवळ १० सामने खेळला असून यात त्याने १९६ धावा केल्या.

२००९ साली कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने आपला शेवटचा सामना खेळून निवृत्ती पत्करली. मात्र त्या मोसमापासूनच फ्लेमिंगने चेन्नईच्या प्रशिक्षकपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली जी आजपावेतो त्याच्याकडेच आहे.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग या जोडगोळीने आयपीएलमध्ये आपल्या संघाचा दबदबा कायम ठेवला आहे.

तब्बल ३ वेळा चेन्नईच्या संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. फ्लेमिंगने अनेक वर्षे न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद सांभाळले असल्याने त्यांच्या अनुभवाचा चेन्नईला चांगलाच फायदा होत असल्याचे दिसून येते.

मध्यंतरी २ वर्ष चेन्नईच्या संघाला बंदीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर २०१८ पासून पुन्हा फ्लेमिंगकडेच चेन्नईचे प्रशिक्षक पद कायम राहिले आहे.

 

२. सचिन तेंडुलकर – 

मुंबई हीच सचिनची जन्मभूमी… मुंबईमधील मैदानांवर त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. साहजिकपणे आयपीएलच्या पहिल्या मोसमात जेव्हा ‘आयकॉन खेळाडू’ निवडण्यात आले, तेव्हा ‘मुंबई इंडियन्स’ संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून सचिनची निवड झाली.

२००८ पासूनच तो मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा भाग होता.

 

sachin-mumbai-mentor

 

मात्र २०१३ साली मुंबईने पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद मिळवल्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती घोषित केली. असं असूनही, संघव्यवस्थापन हे जाणून होतं की सचिन हा मुंबईच्या संघाचा अविभाज्य भाग आहे.

त्यामुळे त्याच्यावर एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली. संघाचा सल्लागार म्हणून त्याची नेमणूक केली गेली. संघातील खेळाडू आणि कोचिंग स्टाफचा मार्गदर्शक म्हणून आजही सचिन काम पाहत आहे. मध्यंतरीच्या काळात प्रशिक्षकांमध्ये बदल करण्यात आला.

मात्र सचिन मुंबई इंडियन्सच्या संघासोबत कायम आहे…

 

३. जेम्स होप्स –

 

james hopes inmarathi

 

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू जेम्स होप्स २०११ साली तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचा काही सामन्यात कर्णधार होता.

त्याची आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून कारकीर्द काही फार विशेष नसली, तरी २०१८ मध्ये दिल्ली संघाने त्याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. सध्याही होप्स दिल्ली संघात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

 

४. राहुल द्रविड – 

२००८ साली पहिल्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून द्रविडची निवड करण्यात आली. तीन वर्ष या संघाकडून खेळल्यानंतर त्याला राजस्थान रॉयल्स या संघात घेतले गेले.

कप्तान आणि खेळाडू म्हणून उत्तम कामगिरी पार पाडल्यावर, २०१३ सालातील चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर द्रविडने आयपीएल मधून निवृत्ती घेतली.

 

rahul-dravid-rr-mentor-inmarathi

 

अखेरची आयपीएल ज्या राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळली, त्याच संघाचा सल्लागार म्हणून सुद्धा त्याने नंतर काम पाहिलं. नवा कर्णधार शेन वॉटसन याच्या संघाला त्याने उत्तम मार्गदर्शन केलं.

 

५. रिकी पॉन्टिंग –

 

ricky ponting inmarathi

 

२००८ पर्यंतचा ऑस्ट्रेलियन संघ क्रिकेटविश्वात दादा समजला जाई. वॉर्न, मॅकग्रा, हेडन, गिल्डख्रिस्ट अशा महान खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचा कर्णधार होता रिकी पॉन्टिंग.

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा पॉन्टिंग आयपीएलमध्ये कोलकाता आणि मुंबई या दोन संघांकडून खेळला.

आपल्या फलंदाजीमुळे विख्यात असलेला पॉन्टिंग आयपीएलमध्ये आपली विशेष छाप पडू शकला नाही. दोन्ही संघांकडून खेळताना १० सामन्यात त्याने केवळ ९१ धावा केल्या.

मुंबईच्या व्यवस्थापनाने त्याला २०१५ नंतर प्रशिक्षकपदासाठी आमंत्रित केले. त्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने दुसऱ्या वेळेस आयपीएलचे विजेतेपद मिळवले.

सध्या पॉन्टिंगकडे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे.

 

६. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण –

 

laxman-ipl-mentor-inmarathi

 

हैदराबाद या नावाने खेळणारा संघ ज्यावेळी ‘डेक्कन चार्जर्स’ या फ्रॅन्चायजीकडे होता, त्यावेळी लक्ष्मण त्या संघाचा कर्णधार होता. पुढे २०११ साली नव्याने घेण्यात आलेल्या लिलावात तो कोची टस्कर्स संघात सामील झाला.

हा संघ आयपीएलमधून रद्द करण्यात आल्यानंतर लक्ष्मणची स्पर्धेतील खेळाडू म्हणून असलेली कारकीर्द संपली. हैदराबाद जेव्हा ‘सनरायझर्स’ या नव्या फ्रॅन्चायजीने घेतले, त्यावेळी लक्ष्मणला संघाचा सल्लागार म्हणून नेमण्यात आले.

आजही तो ही जबाबदारी पार पाडत आहे.

 

७. डॅनियल व्हेट्टोरी –

 

ipl coach inmarathi2

 

डॅनियल व्हेट्टोरीने आयपीएलमध्ये दिल्ली आणि बंगलोर या दोन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३ साली विराट कोहली बंगलोर संघाचा कर्णधार होण्याच्या अगोदर डॅनियल व्हेट्टोरी ही जबाबदारी सांभाळत होता.

त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ३४ सामन्यांमध्ये २८ बळी मिळवले आहेत. २०१४ पासून २०१८ पर्यंत व्हेट्टोरी बंगलोर संघाचा प्रशिक्षक होता.

कोहली, एबी डिव्हीलीयर्स सारखे खेळाडू असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला आयपीएलमध्ये म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

व्हेट्टोरी प्रशिक्षक असताना २०१६ मध्ये एकदाच बंगलोरने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र पुढच्या दोन वर्षांत संघाची कामगिरी खालावल्यामुळे व्हेट्टोरी च्या जागी गॅरी कर्स्टन यांना प्रशिक्षक म्हणून पाचारण करण्यात आले होते.

 

८. जॅक कॅलिस –

 

ipl coach inmarathi1

 

जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये कॅलिसचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार पेक्षा जास्त धावा आणि ५०० पेक्षा जास्त बळी मिळवणारा कॅलिस आयपीएलमध्ये कसा मागे राहील?

बंगलोर आणि कोलकाता या दोन संघांचे प्रतिनिधित्व करताना कॅलिसने ९८ सामन्यांमध्ये २४२७ धावांसह ६५ बळी मिळवत आपले अष्टपैलू प्रदर्शन कायम ठेवले होते.

२०१४ मध्ये कॅलिस कोलकाता संघाकडून खेळून निवृत्त झाला. त्याच वर्षी कोलकाता संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

२०१५ पासून कॅलिस कोलकाता संघाचा प्रशिक्षक झाला. २०१६ मध्ये कोलकाता संघाने प्लेऑफस् पार करून टॉप फोर मध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर संघाची कामगिरी काही फारशी चांगली झाली नाही.

२०१९ मध्ये पुन्हा टॉप फॉर मध्ये जाण्यात कोलकाता संघाला अपयश आल्यावर कॅलिसने स्वतःहून प्रशिक्षकपद सोडले.

 

९. अनिल कुंबळे – 

 

anil-kumble-inmarathi

 

अनिल कुंबळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा महत्त्वाचा खेळाडू होता. २०१२ साली खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका सुद्धा निभावली.

त्यानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून सुद्धा अनिल कुंबळे याने काम पाहिले आहे. 

सध्या अनिल कुंबळे किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचा प्रशिक्षक म्हणून आयपीएलमध्ये पाहायला मिळतो.

 

१०. ब्रॅण्डन मॅक्युलम –

 

ipl coach inmarathi

 

न्यूझीलंडचा माजी विकेटकीपर असणारा ब्रॅण्डन मॅक्युलम आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी विशेष ओळखला जातो.

२००८ साली आयपीएलचा पहिला सामना आपल्याला आठवत असेलच. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मध्ये झालेला हा सामना प्रत्यक्षात मॅक्युलम विरुद्ध बंगलोर असाच होता! केवळ ७८ चेंडूत त्याने तडाखेबंद १५८ धावा केल्या.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मॅक्युलमने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात लायन्स आणि कोची टस्कर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले.

आयपीएल कारकिर्दीत त्याने १०९ सामने खेळत २८८० धावा केल्या, त्याही १३२ च्या स्ट्राईक रेटने. यात १३ अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी कोलकाता संघाच्या खराब कामगिरीनंतर जॅक कॅलिसने प्रशिक्षकपद सोडले. त्यामुळे यावर्षी मॅक्युलमकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रशिक्षक म्हणून काम करण्याची मॅक्युलमची ही पहिलीच वेळ असल्याने त्याच्या मार्गदर्शनाखाली यंदा कोलकाता संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?