' पुणेकर उद्योजिकेची कहाणी – ३५०० रुपयातून लाखोंची कमाई, नक्की वाचा! – InMarathi

पुणेकर उद्योजिकेची कहाणी – ३५०० रुपयातून लाखोंची कमाई, नक्की वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी पाणी भरी” असं म्हणतात. कुणाला नोकरी करण्याची हौस असते…कुणाला लोकाच्या हाताखाली राबणं ही शिक्षा वाटत असते. मग काही लोक आपल्या आवडीची नोकरी करतात..तर कुणी आवडता व्यवसाय.‌

खूपदा नोकरीत आलेल्या अनुभवांवरून व्यवसाय सुरु करता येतो. काहीजण थेट व्यवसायातच उडी घेऊन अनुभवांनी तो वाढवत नेतात.

आजकाल ‘वेटलाॅस’ आणि ‘वेटगेन’ यांनी बरेच हातपाय पसरले आहेत. वजनवाढीसाठी लोक नाना उपाय अवलंबतात, तर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारेही कमी नाहीत.

वजन आटोक्यात रहावं.. मधुमेह, रक्तदाब अशी दुखणी मागं लागू नयेत यासाठी अनेक गोष्टी करतात. खाण्यापिण्याची पथ्यं सांभाळतात. पौष्टिक पदार्थ खाताना त्यात मेद असू नये, पोट भरलं पाहिजे, फायबर्स म्हणजे तंतूमय पदार्थ हवेत असं बरंच काही!

 

veg diet inmarathi

 

थोडक्यात, शरीराला पचनक्रिया त्रासाची न होता पोट भरावं आणि वजन आटोक्यात रहावं यासाठी भरपूर श्रम घेतात. जिममध्ये जाऊन वर्क आऊट करतात. खाण्यापिण्याची बंधनं सांभाळतात.

एकंदरीत लोक अतिशय ‘हेल्थ काँन्शस’ झाले आहेत आणि याच गोष्टीचा विचार करुन एका स्त्रीनं आपला छोटासा उद्योग चालू केला. नुसताच चालू केला नाही, तर वाढवला आहे. हाताखाली बायका कामाला ठेवून त्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

हाॅटेलमध्ये जेवायला गेल्यावर सलाड सजवलेलं पाहून आपण ते खायला लगेच सुरू करतो. मेन कोर्स येईपर्यंत तोंड हलवायला पौष्टिक, वजन न वाढवणारे सलाड फिगरचा विचार करणारे लोक आवडीने खातात.

हिरव्या भाज्या, भिजवलेली मोड आलेली कडधान्ये यांचा मुक्त वापर सलाडमध्ये असतो. वेगवेगळ्या तऱ्हेचे सलाड आजकाल सर्वत्र हौसेने आवडीने खाल्ले जाते.

वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवून केलेले सलाड डेकोरेशन डोळ्यांबरोबरच जीभेलाही भुरळ पाडते. याचाच विचार करुन एका महिलेनं सलाडचाच उद्योग बनवला.

 

balanced diet inmarathi

 

पुण्यात राहणाऱ्या मेघा बाफना यांची ही सलाड गाथा! मेघा बाफना या पुण्यात रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतात. १५ वर्षं त्या या क्षेत्रात काम करत आहेत.

ते करत असतानाच आवड म्हणून सलाड बनवायच्या. छंद म्हणून त्यांना कच्च्या भाज्यांची विविध प्रकारची सलाड बनवायला त्यांना खूप आवडत होतं.

आवड असली की सवड मिळतेच. नोकरी करत करत त्या आपल्या आपल्या ग्रूपमध्ये सलाड डेकोरेशन करुन देत असत.

आॅनलाईन ग्रूपवर टाकलेले सलाडचे डेकोरेट केलेले फोटो पाहून त्यांच्या ग्रूपमधून त्यांना सलाडची आॅर्डर मिळाली आणि पहिल्याच दिवशी मिळालेल्या आॅर्डर होत्या पाच!!!

त्यांना विश्वास होता, की हेच काम आपण व्यवस्थित करु शकतो. चांगला दर्जा, उत्तम चव, घरगुती पदार्थ, ते बनवताना पाळलेली स्वच्छता हे लोकांना कधीही आवडतं. लोक चवीचे पदार्थ घेतातच. हे लक्षात घेऊन मेघा यांनी आपला व्यवसाय सुरु करायचा निर्णय घेतला.

 

salad business inmarathi1

 

प्रवाहासोबत पोहणं सोपं असतं. गर्दीच्या रस्त्यावर चालणं त्याहून सोपं. गर्दीच आपल्याला ढकलत ढकलत पुढं रेटत नेत असते. आपण फार प्रयत्न न करता पुढं सरकत असतो, पण वेगळी वाट निवडून त्यावर चालत जाताना, प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना जास्त त्रास होतो.

मेघा यांनी हा वेगळा रस्ता निवडला. १५ वर्षं चालू असलेली नोकरी न सोडता सलाड बनवून घरपोच देण्याच्या एका वेगळ्या व्यवसायाची सुरुवात केली.

बघता बघता तो व्याप इतका वाढला, की हाताखाली त्यांना कामासाठी बायका आणि डिलीव्हरी बाॅय नेमावे लागले. एकूण १९ बायका आणि पुरुष भाज्या कापायला आणि डिलीव्हरी द्यायला त्यांच्याकडे आहेत.

 

salad business inmarathi

 

साडेतीन हजार रुपये भांडवलावर सुरु केलेला हा अनोखा व्यवसाय आज त्यांना लाखो रुपये मिळवून देण्यासाठी कारण ठरला.

मेघाचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरू होतो. भाज्या त्या स्वतः खरेदी करतात. पहाटे उठून त्या भाज्या निवडणं, भाज्या चिरणं, आवश्यक ते मसाले तयार करणं ही सारी कामं सुरुवातीला त्यांनी स्वतः केली.

कधी कधी गणितं चुकली, कुठेतरी तोटा सहन करावा लागला, पण त्यातूनच त्या शिकत गेल्या. काय करावं काय करु नये हे या अनुभवांनीच त्यांना शिकवलं.

नंतर नंतर आॅर्डर वाढू लागल्या. मग मात्र हाताखाली कामासाठी माणसं घेणं आवश्यक होऊ लागलं. चना चाट, बीटरुट चाट, मिक्स काॅर्न, पास्ता सलाड असे विविध चटपटीत सलाडचे प्रकार त्या बनवतात. त्यातही विविध प्रयोग त्या सातत्यानं करत राहील्या.

 

salad business inmarathi2

 

तीन हजार रुपये भांडवलावर त्यांनी ही झेप घेतली. चार वर्षांत जवळपास बावीस लाख रुपयांची उलाढाल करत फायदा मिळवला त्यांनी या व्यवसायात!

आपल्यापुरते कुणीही कमाई करत असतोच, पण आपल्या बरोबरीने अजून काही लोकांना कमाई करण्यासाठी सहभागी करुन त्यांना काम देणं ही गोष्ट किती मोठी आहे.

प्रत्येक माणूस काही मोठा उद्योगपती होऊ शकतो असं नाही, पण छोट्या छोट्या उद्योगातून आत्मनिर्भर होऊन इतरांना मदत होईल असं काही करणं हे पण किती उत्तम उदाहरण होऊ शकतं.

खरंतर, नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय करत घराकडेही लक्ष देणं ही खूप मोठी गोष्ट आहे, मेघा अतिशय कुशलरीत्या ही जबाबदारी पार पाडत आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं!

२०१७ मध्ये हा व्यवसाय त्यांनी सुरु केला. चांगला चालला असतानाच कोरोनानं जगभर थैमान घालत जगातील मोठमोठ्या उद्योगांना पण टाळं लावलं.

या कोरोनाचा परिणाम मेघा बाफनांच्या व्यवसायावरही झालाच, पण त्या डगमगल्या नाहीत. कोरोना काही जन्मभर राहणार नाही. आज ना उद्या हे संकट टळणार आहे हा आशावाद ठेवून पुढं फ्रँचायझी द्यायचा त्यांचा विचार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?