' पोलिस चांगले की वाईट या चर्चेआधी ह्या अधिकाऱ्याची कामगिरी वाचा, आणि मग बोला! – InMarathi

पोलिस चांगले की वाईट या चर्चेआधी ह्या अधिकाऱ्याची कामगिरी वाचा, आणि मग बोला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अन्नदान व विद्यादान हे समस्त दानांपैकी श्रेष्ठ मानलेले आहेत. अन्नदान माणसाची भूक तात्पुरती भागवत असतं, पण विद्यादान हे जीवनाविषयी अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची भूक वाढवतं.

असे म्हणतात दान करायचेच असेल, तर त्या व्यक्तीला कोणती वस्तू, पैसे जे क्षणिक आहे आणि लगेच संपून जाईल असे दान करण्यापेक्षा, एखादे पुस्तक दान करा किंवा आपला थोडासा वेळ देऊन त्याच्या मनात ज्ञानार्जनाची इच्छा जागवा. जेणेकरून पुढे त्याला कधीही कोणासमोर हात पसरायची पाळी येणार नाही, व ती व्यक्ती स्वतःच्या पायांवर खंबीर पणे उभी राहून प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची हिंमत बाळगेल.

या कोरोना काळात आपण अशी कित्येक माणसांची उदाहरणे पहिली ज्यांनी अनेक समाजसेवेची कार्ये केली. गरजू लोकांच्या अडी नडीला देवाप्रमाणे धावून जाणाऱ्या ह्याच माणसांनी, “माणुसकी अजूनही जिवंत आहे” हे सिद्ध केले.

गरीब लोकांना अन्न, वस्त्र पुरवणारे कोणते कार्यकर्ते असो, दिवस रात्र दवाखान्यात झटणारे डॉक्टर्स असो वा आपला जीव धोक्यात घालून, नियमित स्वरूपाने नागरिक शिस्तीचे पालन करतायत की नाही, हे पाहणारे पोलीस असो. सगळ्यांनी आपले काम अगदी चोख बजावले व आपल्याला सुखरूप ठेवले.

 

police lockdown inmarathi

 

आज आपण अशाच एका कर्तबगार पोलीस अधिकाऱ्या विषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी या महामारीत गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण आपल्या प्रयत्नांनी अखंड सुरू ठेवले. जो खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी देव ठरला.

कर्नाटक राज्याची राजधानी बँगलोरच्या अन्नपूर्णेश्र्वरी नगर पोलीस ठाण्यातील सब इन्स्पेक्टर शांतप्पा जाडेम्मनवार ह्यांनी लॉकडाऊनच्या काळात नगरभावी येथील गरीब कामगारांच्या मुलांचे शिक्षण अबाधित ठेवलेले आहे.

रोज सकाळी ८:३० च्या ड्युटीला रिपोर्ट करण्याआधी ते ७-८ एक तास मुलांचा क्लास घेतात. सध्या जवळपास २५-३० विद्यार्थी नियमित त्यांच्याकडे अभ्यासाचे धडे गिरवत आहेत.

 

banglore cop teaches migrant inmarathi

 

पोलीस म्हटलं, की सामान्य माणूस सगळ्यात आधी घबरतोच, त्यामुळे शिकवण्याचे कार्य सुरू करण्यापूर्वी शांतप्पांना मुलांच्या पालकांना आपण प्रामाणिक असल्याचे पटवून द्यावे लागले, त्यानंतरच त्यांची संमती मिळाली.

जसे कोरोनाचे सावट जगावर पडले तसे नोकरी धंद्यासमवेत मुलांच्या शाळाही बंद पडल्या. यातून मार्ग काढण्यासाठी मोबाईल व लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ऑनलाईन शाळा घेण्याचा विचार मांडण्यात आला व ऑनलाईन शाळा सुरू ही झाल्या.

 

Online school InMarathi

 

ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे, त्या सगळ्यांकडे ही ऑनलाईन शिक्षण संपादन करण्याची साधने व सोयी उपलब्ध होत्या.

काही पालकांनी फक्त मुलांच्या क्लास साठी नवीन स्मार्टफोनही विकत घेतले, पण हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गाची मात्र मोठी पंचाईत झाली.

रोज सकाळी काम शोधून, दिवस भर तिथे राबून संध्याकाळी मजुरी मिळाल्यावरच ज्यांच्या घरी जेवणाची सोय होते, असे हे गरीब मजूर, कामगार महागडे मोबाईल फोन कसे विकत घेऊ शकणार होते?

बऱ्याच मोठ्या शहरातील मजूर आपल्या सबंध कुटुंबासमवेत आपल्या गावाला निघून गेले, त्यांच्या मुलांच्या शाळा त्या शहरात व ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू सुद्धा झाल्या होत्या, पण त्यांना महागडे मोबाईल घेणं अजिबात शक्य नसल्यामुळे त्यांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत होते.

या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून आपल्या परीने जितके जमेल तितके कोणाचे भले व्हावे, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, कोणाचीच शिक्षणाची आवड या महामारी मुळे खुंटू नये असे शांतप्पांना वाटले व त्यांनी आजूबाजूच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू केले.

 

banglore cop teaches migrant inmarathi1

 

“आमचे कुटुंब मजुरांचेच आहे. मी स्वतः एका मजुराचा मुलगा आहे व शिक्षण घेत असताना पैशांच्या अभावामुळे मजुरी करून शिकलो आहे.

बंगलोर मधील बरेच मजूर हे उत्तर कर्नाटातील बल्लारी, कोप्पाल, रायचूरमधले आहेत. मी ही त्याच प्रदेशाचा मूळनिवासी आहे, त्यामुळे ही परिस्थिती किती भयंकर असते याची मला पुरेपूर कल्पना आहे.

बऱ्याच भागात असेही पाहायला मिळते, की मुलं १०-१२ वर्षांची झाली की त्यांच्या पोटापाण्याची सोय त्यांना स्वतः ला करण्यास सांगितली जाते. ज्यामुळे मुलांचे शिक्षण सुटते, ते अशिक्षित राहतात व गरीबीचे हे चक्र कायम स्वरुपी फिरत राहते.

त्यामुळे शिक्षण किती महत्त्वाचे आहे याची मला जाणीव आहे व या जाणीवे पोटीच मी या मुलांना शिकवण्याचे ठरविले. यात मला अत्यंत सुख मिळते” असे शांतप्पांचे म्हणणे आहे.

ते आपल्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, वैदिक गणित, व्यक्तिमत्व विकास शिकवतात. लैंगिक अत्याचारासंबंधी माहिती देऊन त्यांना या गलिच्छ प्रकारापासून सुरक्षित राहण्यासाठी धडे देत असतात.

 

banglore cop teaches migrant inmarathi2

 

मुलांची आवड वाढावी, आकर्षण वाटावे म्हणून बक्षीस म्हणून चॉकलेट व जॉमेट्री बॉक्स देतात.

शांतप्पा म्हणतात,

“या मुलांकडे फोन नाही, टॅबलेट नाही, कोणा कडे असेलही, तरी घरी चार्ज करण्याची सोय नाही कारण ही मुलं ज्या भागातून येतात, तिथे विजेची सुद्धा सोय नाही. त्यामुळे यांचे जीवन सुखकर होण्यासाठी अभ्यासाची गोडी कायम असणं आवश्यक आहे, जी मी प्रामाणिकपणे कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.”

संपूर्ण सोशल मीडिया वर शांतप्पाच्या या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात येतोय. लोकं त्यांना “हिरो” म्हणून संबोधित करतायेत व त्यांच्या कामासाठी त्यांना अनेकानेक आशीर्वाद व शुभेच्छा सुद्धा देतायत.

 

banglore cop teaches migrant inmarathi3

 

खुद्द कर्नाटकचे शिक्षण मंत्री एस. सुरेश यांनी या ३० वर्षीय शांतप्पाच्या कामाची दखल घेत त्यांची प्रशंसा केली.

“एकीकडे पोलिसांबद्दल नकारात्मक व वाईट बातम्या समाजात पसरत असताना एका पोलीस अधिकाऱ्यामुळे पोलिसांचं नाव पुन्हा उजळून निघतय याचा मला भरपूर आनंद व अभिमान आहे” असे त्यांनी शांतप्पाबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हटले.

शांतप्पासारख्या सोन्याचे मन असलेल्या माणसांची आज समाजाला नितांत गरज आहे. लोकांचा माणुसकीवरचा जो विश्वास ढळत चाललाय तो आणखीन बळकट होण्याकरता शांतप्पांकडून आपण सगळेच प्रेरणा घेऊ अशी आशा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?