' कथा शबरीची: फारशी माहित नसलेली, पण तिच्या बोरांइतकीच गोड आणि ह्रदयस्पर्शी!

कथा शबरीची: फारशी माहित नसलेली, पण तिच्या बोरांइतकीच गोड आणि ह्रदयस्पर्शी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रामायण… प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. मग ते महाकाव्य असो, गदीमांच्या शब्दांतून रंगणारा गीतरामायणाचा सुरेल सांगितीक अनुभव असो की अगदी लॉकडाऊनचा असह्य काळ सुखकर करणारे रामानंद सागर यांचे रामायण.

मात्र या महाकाव्याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये आपल्याला भेटणारी पात्र. प्रत्येक स्वभावाची, प्रत्येक प्रवृत्तीची. कदाचित यामुळेच या पात्रांचं नेहमीच आपल्या मनात अढळ स्थान राहिलं आहे.

 

ramayan inmarathi

 

म्हणूच केवळ श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण या मुख्यपात्रांसह सुग्रीव, हनुमंत, जटायु यांसारखी इतर अनेक पात्र आपल्याला तितकीच भावतात.

रामायणातील तुमचं आवडतं पात्र कोणतं असा प्रश्न विचारला, तर या भल्या मोठ्या यादीत शबरी हा उल्लेख आल्यावाचून राहणार नाही.

प्रभु श्रीरामांची वर्षानुवर्ष वाट पाहणारी, थकलेल्या डोळ्यांनीही रामाच्या वाटेकडे आस लावलेली आणि प्रभुश्रीरामांच्या दर्शनानंतर आपण चाखलेली बोरं खाऊन देवाला तृप्त करणारी ती शबरी…

 

shabari inmarathi

 

पण यापलिकडे तिची ओळख काय? प्रभु श्रीरामांवर तिची एवढी भक्ती कशी जडली? या प्रश्नांची उत्तरं फारच कमी जणांना ठाऊक असतात.

चला तर.. जिची उष्टी बोरं खाऊनही प्रभुंनी तृप्तीचा ढेकर दिला अशा शबरीची कहाणी तिच्या बोरांइतकीच गोड, ह्रदयस्पर्शी आहे.

गोष्ट काही वर्षापुर्वीची… दंडकारण्यातील भिल्लवस्तीच्या प्रमुखाची लेक, अवघ्या दहा वर्षांची शबरी आपलं निरागस बालपण जपत होती. आईवडिलांनी ठरविलेलं लग्न, त्यासाठी सुरु असलेली लगबग यासा-यांचं भान तिला मुळी नव्हतंच, कारण अंगणातल्या बोकडाच्या पिल्लांशी तिची गट्टी जमली होती. दिवसरात्र या तिच्या नव्या सवंगड्यांसोबत तिचे खेळ सुरु रहायचे.

 

goat inmarathi

 

आपल्या लग्नाच्या दिवशी या आपल्या सवंगड्याशी कायमची ताटातुट होणार ही आईकडून कळलेली वार्ता ऐकून लहानगी शबरी हिरमुसली. असं होवू नये यासाठी तिने आईची समजुत घातली.  विनवण्या झाल्या, अश्रु गाळले पण सगळेच प्रयत्न व्यर्थ. अखेर आईनं दटावलं आणि वैतागून वडिलांसमोर शबरीला उभं केलं.

“पिल्लांना मारू नका? अगं मोठ्या कष्टानं त्यांना आणलंय तुझ्या लग्नासाठी. पाहुण्यांना याची चमचमीत मेजवानी दिली नाही तर कायमची बोलणी खावी लागतील, त्यामुळे यापुढे हा हट्ट सोड आणि गपगुमान लग्नाला उभी रहा.” जरबेच्या आवाजात वडिलांनी दिलेल्या या ताकिदीमुळे विषय तिथेच थांबला पण शबरीची तगमग थांबेना.

आपलं लग्न म्हणजे निष्पाप पिल्लांचा बळी ही भावनाच छोट्या शबरीला सहन होणं शक्य नव्हतं. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसा तिचा निश्चय पक्का झाला. माझ्या लग्नामुळे पिल्लाचं मरण ओढवणार असेल तर मला लग्नच नको या विचाराने छोटी शबरी घरातून बाहेर पडली. रात्रभर धावत राहिली.

मनात भिती होतीच, पण भिल्लाच्या त्या पोरीला जंगलाची वाट काही नवी नव्हती.

 

forest inmarathi

 

रात्रभर धावायचं आणि उजाडताच इतरांच्या नजरा चुकवण्यासाठी झाडावर लपून बसायचं. दिवस सरत होते, वाट फुटेल तिथे लहानग्या शबरीची पावलं धावत होती. मात्र मनातील सद्भावनांना परमेश्वराचा आशिर्वाद मिळाला आणि म्हणूनच एका पहाटे तांबडे फुटताच झाडावर दडून बसलेल्या शबरीला एका मुनींचा आश्रम नजरेस पडला.

आश्रम कुणाचा? ऋषी कोण? अशी कोणतीही माहिती नसताना शबरीनं पहाटे उठावं, झाडलोट करून आश्रमाची स्वच्छता करावी आणि पुन्हा झाडावर चढून बसावं हा दिनक्रम आखला. आपला आश्रम इतका वेळेत स्वच्छ कसा होतो, हे पाहून सुरवातीला मतंग ऋषींना आश्चर्य वाटलं, मात्र हे आपल्या शिष्यांचे काम नव्हे हे त्यांनी ताडले.

याचा छडा लावण्यासाठी रात्रभऱ जागत राहिलेल्या ऋषींनी सकाळी छोट्या शबरीला पकडले. प्रेमाने तिची विचारपुस केली मात्र घाबरलेल्या शबरीच्या तोंडातून शब्दही फुटेना. मग ऋषींनीच तिची अवस्था जाणून तिला याच आश्रमात राहण्यास सांगितलं आणि त्या दिवसापासून शबरी त्या आश्रमाची लेक झाली.

 

hut inmarathi

 

आश्रमात अनेकांनी सेवा करत तिने एक सुंदर उद्यान फुलविले, दिवस आनंदात जात असतानाच मतंग ऋषींना भगवंताकडून समाधीचा संदेश मिळाला. पुढील दोनच दिवसात ऋषीमुनी आपल्याला कायमचे सोडून जाणार हे समजातच आश्रमातील सर्वजण अस्वस्थ झाले. मुनींची भेट घेत, त्यांचा उपदेश घेण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी करू लागले.

छोटी शबरी प्रत्येकांशी मुनींचा होणारा संवाद ऐकत होती, काहींचा बोध होत होता तर काही बाबी मात्र तिच्या कोवळ्या मनाला समजत नव्हत्या. अखेरिस न राहून तिने मुनींना प्रश्न केला, की उद्धार म्हणजे काय? माझा उद्धार व्हावा यासाठी मी काय करु?

गुरुजींनी तिच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि मोठ्या प्रेमाने म्हणाले,

“काळजी करू नकोस, तुझा उद्धार आपोआपच होणार आहे.” तरीही तिच्या चेह-यावरचे भाव ओळखून मुनी म्हणाले, की तुझ्या उद्धारासाठी प्रभु श्रीराम स्वतः येथे येतील. यानंतर सर्वांचा निरोप घेऊन मुनी निघून गेले.

मुनींच्या जाण्याने शबरीला मात्र खूप दुःख झालं, एकाकी वाटु लागलं, रात्री उशीरा ती झोप लागणार इतक्यातच तिच्या मनात विचार चमकला, रात्री उशीराने प्रभु राम आले तर आमची भेट कशी होणार? त्यांच्या येण्याची नेमकी वेळ ठाऊक नसल्याने ती अस्वस्थ झाली, त्यांची वाच पहात रात्रभर जागीच राहिली.

 

shree ram inmarathi

हे ही वाचा – रामायणातील या ‘७’ गोष्टी शिकल्याशिवाय आजच्या कॉर्पोरेट जगात यश मिळणं अशक्यच!

पहाट होताच प्रभुंच्या स्वागतासाछी तिने आवराआवर सुरु केली, तिच्या कुटीबाहेर परिसर झाडून स्वच्छ केला. त्यानंतर प्रभुंच्या आगमनापुर्वी स्नान उरकण्यासाठी ती झ-याकडे गेली, मात्र नेहमीप्रमाणे तिथे खेळत न बसता तात्काळ ती कुटीकडे परतली. त्यानंतर श्रीरामांच्या स्वागतासाठी तिची लगबग सुरु झाली.

प्रभुंना बसण्यासाठी आसन, सुगंधीत फुले, पांढ-याशुभ्र फुलांचे हार, ताजी रसाळ फळे सारं काही सज्ज झालं पण प्रभु राम येईनात. तो दिवस सरला आणि त्यानंतर प्रत्येक दिवस हाच नेम सुरु झाला. दिवसरात्री भान उरले नाही कारण झोपी गेले तर रामभेट होणार नाही या विचारांनी तिची झोप दूर पळाली.

आजपर्यंत तिने श्रीरामांना पाहिले नव्हते, त्यामुळे मनातल्या मनात ती त्यांचे चित्र रेखाटायची आणि मनातच त्यांची पुजा करायची. यामध्ये अनेकदा भगवंतांनी तिला प्रत्यक्ष दर्शन दिले, मात्र तिला तो भासच वाटायचा. प्रभुंची आस लावून नेमके किती दिवस सरले हे तिलाही कळलं नाही, मात्र तिची ही भक्ती पाहून आश्रमात मात्र आश्चर्य व्यक्त केले जायचे.

आश्रमात आलेली चिमुरडी शबरी वयात आली, मात्र वयाच्या तुलनेत तिची भक्ती शंभरपटीने वाढली.

तारुण्यातील तिच्या भक्तीचे अनेक दाखलं दिले जातात. आश्रमातील सख्यांसोबत दिवस सरत असले, तरी परिसरातील अनेक ऋषींकडून भिल्लाची लेक म्हणून तिची हेटाळणी होत होती. अनेकदा तिला तळ्यातलं पाणी नेण्यास मनाई केली, तर कधी तिच्यावर आरोपांची लाखोली वाहिली. पण तिच्या भक्तीत तसुभरही फरक पडला नाही.

हा आश्रम तिचं घर बनल्याने तेथिल प्रत्येकजण तिच्यासाठी आईवडिलांच्या स्थानी होते, त्यामुळे आईवडिलांनी कधी खडे बोल सुनावले तर नाराज होण्याचं कारण काय? असं ठामपणे सांगणारी शबरी अनेक उदाहरणांतून कायमच भेटते.

त्यातच रोजचा दिवस उगवायचा तो केवळ श्रीरांमांच्या ओढीने. ध्येय निश्चित असलं की मग मार्गातले काटेही टोचत नाहीत ही शबरीने दिलेली सर्वात मोठी शिकवण म्हणावी लागेल.

 

shabari old inmarathi

 

तारुण्यही सरलं आणि पाठोपाठ वार्धक्य येऊ ठेपलं. शरीर थकलं, दृष्टी कमी झाली, हात थरथरू लागले, पण मन मात्र अजूनही रामाच्या प्रतिक्षेत चीरतरुण होतं.

वार्धक्यातही स्वच्छतेचा नेम ती चुकवत नव्हती, आश्रमातील प्रत्येकजण तिला विश्रांती घेण्याची विनंती करायचा, प्रत्येकजण तिला कामांत हातभार लावण्यासाठी धडपड करायचा, मात्र प्रभुरामांच्या स्वागतासाठी आपल्याच हातून सारी तयारी व्हावी हा अट्टहास तिने कधीच सोडला नाही.

त्याकाळी ना आजच्यासारखं घड्याळ होतं, ना कॅलेंडर, त्यामुळे किती वर्ष सरली, किती सुर्य मावळले याची गणनाच नाही, पण शबरीला त्याची पर्वा नव्हती.

‘शरीर जर्जर झालं तरी प्रभुंच्या दर्शनाशिवाय श्वास थांबणार नाही’ या विश्वासाच्या बळावरच शबरी तग धरून होती. मनात प्रभुंचे रुप आणि डोळ्यात त्यांच्याच पावलांची आस धरून बसलेल्या शबरीच्या आयुष्यात अखेरिस तो दिवस आला.

थरथरणा-या हातात झावळ्याचा झाडू घेऊन शबरीने पहाटे झाडलोट सुरु केली, मुखातून प्रभुरामाचे नामस्मरण सुरु असल्याने बाकी कशाचे भान नव्हते आणि अशातच दोन पावलांवर तिची नजर पडली, त्यापाठोपाठ आणखी दोन पावले दिसली. परमोच्च शिखरावर पोहोचलेल्या भक्तीने पावलांवरूनच दैवत्वाची खुण पटवली आणि साश्रु नयनांनी शबरीने मान उंचावली.

यापुर्वी कधीही न पाहिलेल्या तरिही प्रत्येक क्षणोक्षणी मनात साठविलेल्या त्या प्रतिमा अखेरिस एक झाल्या, अवघ्या काही क्षणात तो अभुतपुर्व सोहळा शबरीने अनुभला. कोटी सुर्यांचं तेज, अनेक चंद्रांची शीतलता एक झाल्या आणि शबरीची भक्ती फळाला आली.

 

shabari ram inmarathi

 

“अखेर तुम्ही आलात प्रभु” हे शब्द आसमंतात घुमले आणि शबरीने प्रभुश्रीरामांच्या चरणांवर लोळण घेतली. एरव्ही कधीही मातेसमान असलेल्या महिलेला आपल्या पायांना स्पर्श करु न देणारे राम त्या दिवशी मात्र अढळ नजरेने ही भक्ती स्विकारत होते.

त्यानंतर प्रभुंच्या पाद्यपुजनाचा शबरीने धरलेला हट्ट प्रभुरामांना मोडवला नाही. लक्ष्मणाने हरत-हेने समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र शबरीप्रमाणाचे श्रीरामही भक्तीच्या या सोहळ्यात मग्न झाले होते.

शबरी आणि प्रभुरामांच्या या भेटीचा ह्रद्य सोहळा वाल्मिकी रामायणात शब्दबद्ध करण्यात आला आहे. जणु काही काळाचे चक्र मागे फिरले होते, कारण लहानग्या शबरीने पुजेजा जो थाट ठरविला होता, त्याचप्रमाणे पुजा घडत होती. आधी पाद्यपुजा, मग गंध, पुष्प, फुलांचा वर्षाव आणि सोबत अश्रुंचा अभिषेकही…

मग शबरीने काही फळं वेचून आणली, यामध्ये नक्की कोणत्या फळांचा समावेश होता, बोरं होती की अन्य फळं याबाबत अनेक विवाद आहेत, मात्र त्या वादात न पडता बोरांसारख्याच काही फळांचा सर्वत्र उल्लेख असल्याने शबरीची बोरं ही म्हण प्रचलित झाली.

शबरीने चाखलेली बोरं पाहून लक्ष्मणाच्या चेह-यावर आठ्या पडल्या मात्र तरिही रामाने प्रेमभराने त्याचा केलेला स्विकार म्हणजे शबरीच्या वर्षानुवर्षाच्या भक्तीची पोचपावती होती.

 

shabari bor inmarathi

 

त्या लहानश्या कुटीत असा सोहळा संपन्न झाला, ज्याचे दाखले आजच्या कलियुगातही दिले जातात.

शबरीने आपल्या कृतीतून शिकवलेली भक्तीची नवी परिभाषा आपणही जपली तर भगवंताच्या भेटीपासून आपल्याला कधीही वंचित रहावे लागणार नाही.

ना कोणती दांभिक वृत्ती, ना अतिरिक्त खर्चिक पुजापाठ… केवळ मनातील निर्माण भक्तीची आस इतकी सोपी कृती शिकवणारी शबरीमाई पुढील अनेक पिढ्यांची गुरु ठरते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?