' सुसंस्कृत, प्रतिष्ठित घरातील तरुण ड्रग्जच्या विळख्यात अडकण्याची कारणे, जाणून घ्या – InMarathi

सुसंस्कृत, प्रतिष्ठित घरातील तरुण ड्रग्जच्या विळख्यात अडकण्याची कारणे, जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर अवघ्या काही दिवसात ड्रग्स वापराचा अँगल उघडकीस आला आणि रुपेरी पडद्याची काळी बाजू सर्वांच्या समोर आली.

तसं बघायला गेलं, तर हे काही पहिलेच सेलिब्रिटी प्रकरण नाही, ज्यात अमली पदार्थांच्या सेवनाचा गुन्हा घडला.

फरदीन खान पासून ते संजय दत्त आणि “बॅटमॅन” बेन ऍफ्लेक ते “आयर्नमॅन” रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर अशी अनेक प्रकरणे यापूर्वी उजेडात आली आहेत.

 

sanjay dutt inmarathi

 

असे झाल्यानंतर ह्या सेलिब्रिटींच्या फॅन्सना धक्का बसतो. आपण ज्यांना हिरो किंवा सुपरहिरो मानत होतो, ती तर “कॉमन मॅन” पेक्षाही कमकुवत मनाची, दोषयुक्त माणसे आहेत अशा विविध प्रतिक्रिया बघायला मिळतात.

काही दिवस यासंबंधात गरमा-गरम चर्चा झडतात आणि पुन्हा एकदा आपण आपापल्या विश्वात मश्गुल होऊन जातो.

“द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट” असेल किंवा आपला देशी “उडता पंजाब” अशा मोजक्या काही चित्रपटांनी अमली पदार्थ सेवनाच्या ह्या विषयाला गंभीरपणाने दाखवले आहे.

 

shahid kapoor inmarathi

 

मुळातच एखादी व्यक्ती इतक्या घातक व्यसनाच्या आहारी जातेच कशी? असे कोणते अमली पदार्थ आहेत जे मनुष्याला आत्मनाशाच्या वाटेवरून सुसाट वेगाने घेऊन जातात? अशा व्यसनांपासून वाचण्याचा काहीच मार्ग नाहीये का? ह्यासंबंधातील काही मुद्दे आपण बघूया… 

कोणत्याही व्यसनाची सुरुवात ही निश्चितच “एकच प्याला” किंवा “एकच कश” अशा शब्दांपासूनच पासून होते.

उत्सुकतेपासून सुरु झालेला हा प्रवास प्रथम सवय, त्यानंतर व्यसन आणि सर्वात शेवटी अवलंबित्व (ड्रग डिपेंडन्सी) अश्या निसरड्या रस्त्यावरचा असतो.

डॉक्टर्स, मानसशास्त्रज्ञ, आणि समाजशास्त्रज्ञांनी ह्या विषयावर संशोधन करून व्यसनाधीनतेची खालीलप्रमाणे कारणमीमांसा केलेली आहे :

जनुकीय आणि कौटुंबिक कारणे –

 

drugs inmarathi

 

वैद्यक शास्त्रातील आधुनिक संशोधन असे दाखवते, की एखादी व्यक्ती तिच्या जनुकीय घटकांमुळेच व्यसनाधीन होण्याची शक्यता असू शकते. त्यांच्या मेंदूतील “डोपामिन” ह्या चेतापारेषकाशी (न्यूरोट्रान्समीटर) निगडित प्रणाली ही अमली पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहित करते.

जर व्यसनाधीनतेची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा बाल्यावस्थेपासूनच अमली पदार्थ सेवन कुटुंबात बघितले असेल तरीदेखील अशी व्यक्ती भविष्यात “ड्रग ऍडिक्ट” बनू शकते.

किशोरावस्था आणि संगतीचा प्रभाव –

“टिनएज” ही अशी वयाची अवस्था असते, ज्यात नाविन्याची अफाट उत्सुकता सारासार विवेकबुद्धीवर सहज मात करते. त्यातच जर “पीअर प्रेशर” (संगतीचा प्रभाव) असेल तर “तथाकथित” मित्रांना (?) एका पेग किंवा कश साठी नाही म्हणायला जड जाते.

व्यसनांना “नाही” म्हणण्याचे धैर्य मग पुढील आयुष्यात फार क्वचितच त्या व्यक्तीकडे येते.

 

हे ही वाचा –

===

 

नैराश्य, आजार किंवा मानसिक ताणतणाव –

 

DEPRESSION-inmarathi

 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात करिअर, रिलेशनशिप, शारीरिक व्याधी, प्रिय व्यक्तीचा मृत्यू ह्यासंबंधातील चढ-उतार झेलतांना अनेकदा एकटेपणा जाणवतो. ह्याचाच परिणाम पुढे नैराश्याच्या अवस्थेत होऊन व्यक्ती व्यसनाधीनतेच्या आहारी जाण्यात होते.

त्या वेळेस अमली पदार्थांच्या वापराने मिळणारी “किक” काही क्षणांपुरते का होईना पण एखाद्याला जग जिंकल्याची भावना देऊन जाते.

हवीहवीशी वाटणारी ही अनुभूती त्या व्यक्तीला एका समांतर विश्वात घेऊन जाते आणि काही दिवसांनी ते काल्पनिक विश्वच तिचे वास्तव होऊन जाते.

सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही इतक्या विविध प्रकारची रसायने अमली पदार्थ म्हणून व्यसन करण्यासाठी वापरली जातात.

त्यामध्ये अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या “व्हाईटनर”पासून ते अगदी रासायनिक प्रयोगशाळेत बनविलेल्या “एल एस डी” सारख्या कृत्रिम पदार्थांचा समावेश आहे.

 

drugs inmarathi1

 

Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985 हा कायदा अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करीसंबंधात शिक्षेची तरतूद करतो. कोकेन, चरस, गांजा, अफू, एल एस डी इत्यादी सर्व घटकांचे नियमन करणारा हा खूपच कडक कायदा आहे.

गुन्हा सिद्ध झाल्यास अश्या व्यक्तीला कमीत कमी १० वर्ष सक्तमजुरीची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. ही शिक्षा २० वर्ष सक्त मजुरी तसेच दोन लाख रुपये दंड अशी वाढवलीही जाऊ शकते.

कितीही वाईट परिस्थिती असली तरीही अमली पदार्थांचे व्यसन सोडणे अजिबात अशक्य नाहीये.

 

drugs inmarathi2

 

आपण या लेखाच्या सुरुवातीला वाचलेली “संजुबाबा” आणि “बॅटमॅन” बेन ऍफ्लेक ह्यांची उदाहरणे हेच दाखवतात, की त्यांनी गुडघे न टेकता सतत लढा देऊन आज स्वतःला पूर्णपणे निर्व्यसनी बनवले आहे.

निर्व्यसनी बनण्याच्या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणजे अश्या व्यक्तीला व्यसनाधीनता मान्य करून आपली इच्छाशक्ती कुठे कमी पडते हे शोधावे लागेल.

कुटुंबातील सदस्य, मित्र यांच्यासमोर मन मोकळे करून मानसिक ताणतणाव कमीत-कमी ठेवावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजकाल विविध गैर-सरकारी संघटना आणि व्यसन सोडू इच्छिणाऱ्यांचे गट कार्यरत आहेत ज्यांची मदत खूप फायदेशीर ठरू शकते.

शारीरिक कवायत, कला-संगीत, पाळीव प्राणी इत्यादींमध्ये मन रमवून व्यसनाची तल्लफ कमी करता येऊ शकते.

 

हे ही वाचा – 

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?