'दुसरं महायुद्ध आणि पॉपाय कार्टूनचं आहे एक वेगळंच कनेक्शन; वाचा काय ते!

दुसरं महायुद्ध आणि पॉपाय कार्टूनचं आहे एक वेगळंच कनेक्शन; वाचा काय ते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

टीव्हीवर लागणारी कार्टून्स म्हणजे बच्चे कंपनीचा जीव की प्राण! हल्लीच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमान्यातही कार्टून्स पाहणे हा छोट्या दोस्तांचा अगदी आवडता छंद आहे.

कार्टून नेटवर्क, पोगो, डिस्नी, निक्लोडियन यांसारख्या वाहिन्या संपूर्णपणे कार्टून्स साठी वाहिलेल्या आहेत. गेल्या शतकात जगभर अनेक वेगवेगळी कार्टून कॅरेक्टर रंगवली गेली आणि लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले.

हॅना-बार्बेरा यांचे टॉम अँड जेरी, डिस्ने चा मिकी माउस यांच्यापासून डोनाल्ड डक, स्कुबी डू, रोड रनर तसेच पॉकेमॉन, डोरेमॉन, शिन चॅन यांसारख्या अनेक कार्टून कॅरेक्टर्सनी केवळ लहानांनाच नव्हे मोठ्यांनाही वेड लावले.

या सगळ्या कार्टून्स प्रमाणेच एक कार्टून कॅरॅक्टर एका वैशिष्ट्यपूर्ण कारणामुळे प्रसिद्ध झाले. एवढेच नव्हे, तर या कार्टूनने चक्क मुलांना पालेभाजी खाण्याची सवय लावली! हेच ते ‘पॉपाय द सेलर मॅन’ या नावाने प्रसिद्ध असणारे कार्टून!

 

popeye cartoon inmarathi

 

पॉपाय च्या जन्माची कहाणी खूपच मजेशीर आहे. पॉपाय हे पात्र मुळात कार्टून फिल्मसाठी बनवले गेलेले नव्हतेच.

एलझि क्रिसलर सेगर हा अमेरिकन व्यंगचित्रकार न्यूयॉर्क जर्नल या दैनिकात ‘थिंबल थिएटर’ या नावाने एक व्यंगचित्रांची मालिका चालवत असे.

१९१९ पासून नियमितपणे प्रकाशित होत असलेल्या या मालिकेत १९२९ साली कथानकाची गरज म्हणून एका खलाशाचे पात्र सेगरने आणले. हे पात्र म्हणजेच ‘पॉपाय’.

कॅलिफोर्नियात जन्मलेला, ३४ वर्षांचा, एका डोळ्याचा, काहीसा राकट दिसणारा हा खलाशी अल्पावधीतच एवढा लोकप्रिय झाला, की थिंबल थिएटर या मालिकेच्या नावात पॉपायचे नाव जोडले गेले आणि नंतर केवळ ‘पॉपाय’ या नावाने ही व्यंगचित्र मालिका ओळखली जाऊ लागली.

१९३३ साली पॉपाय प्रथम पडद्यावर दिसला. अमेरिकेतील पॅरामाउंट पिक्चर्स या कंपनीने ‘पॉपाय – द सेलर’ या नावाची कार्टून फिल्म बनवली.

 

popeye cartoon inmarathi1

 

१९५७ पर्यंत पॅरामाउंटच्या मालकीच्या फेमस स्टुडिओज ने पॉपाय च्या अनेक चित्रमालिका बनवल्या. यांचे हक्क सध्या वॉर्नर ब्रदर्स कडे आहेत. १९६० नंतर पॉपाय वेगवेगळ्या प्रोडक्शन कंपन्यांनी टीव्हीवर प्रसारित केला.

सेगरच्या कॉमिक्समध्ये पॉपाय बरोबरच अनेक पात्रे होती. यात पॉपाय ची मैत्रीण ऑलिव्ह, त्याचा मित्र विम्पी, पॉपायचा कायमचा शत्रू ब्रूटो आणि त्याचा दत्तक मुलगा स्वीपी ही त्यातील काही प्रमुख पात्रे होत.

पॉपाय आणि त्याची मैत्रीण ऑलिव्ह ही पात्रे सेगरला फ्रँक फिगल आणि डोरा पास्कल या आपल्या शेजाऱ्यांवरून सुचली होती. यांपैकी सेगरच्या कॉमिक्स मध्ये पॉपाय चा मुलगा म्हणून दाखवलेला स्वीपी पडद्यावर मात्र त्याचा भाऊ म्हणून दाखवला गेला.

याशिवायही अनेक पात्रे वेळोवेळी कथानकानुसार आपली हजेरी लावून जात. ‘थिंबल थिएटर’ मध्ये पॉपायचा समावेश एका भागात ऑलिव्हला समुद्र सफरीवर घेऊन जाणारा खलाशी म्हणून झाला, पण पुढे जाऊन पॉपाय हाच सगळ्या कॉमिक चा केंद्रबिंदू बनला.

 

popeye cartoon inmarathi2

 

पॉपाय हा तसा कमी शिकलेला, काहीसा बेशिस्त भासत असला तरी संकटाच्या वेळी बुद्धीचा वापर करून त्यातून मार्ग काढणे, दांडगाई करणाऱ्या शत्रूची पिटाई करणे यामुळे पॉपायची ओळख एक कार्टून हिरो म्हणून झाली.

टीव्हीवरच्या ऍनिमेशनपटात पॉपाय तोंडात एक पाईप धरून दाखवला आहे. या पाईपचा वापर शिटी, पेरिस्कोप, जेट, प्रोपेलर अशा प्रकारे करताना पाहणे फारच मजेशीर असते. पण पॉपायची खरी ओळख आहे ती पालकामुळे!

सुरुवातीला सेगरच्या कॉमिक्स मध्ये पॉपाय आणि पालकाचा काहीही संबंध नव्हता. त्या ऐवजी व्हीफल हेन नावाचा काल्पनिक पक्षी आपल्या डोक्यावर घासून पॉपाय आपले नशीब आजमावत असे, पण त्यानंतर पडद्यावर आल्यावर यात बदल झाला.

पालक खाताच पॉपायला शक्ती मिळते, डोके वेगाने काम करू लागते आणि तो आपल्या समोरच्या अडचणी चुटकीसरशी सोडवतो. या बदलामुळे पॉपायला त्याची ओळख मिळाली जी आजतागायत टिकून आहे.

 

popeye cartoon inmarathi3

 

लहान मुलांना आपल्या आवडत्या हिरोचे अनुकरण करायला सांगायला लागत नाही. बघता बघता पॉपायच्या पालक खाण्याची लोकप्रियता एवढी वाढली, की अमेरिकेत पालकाची विक्री तब्बल ३३ टक्क्यांनी वाढली.

एरवी पालेभाज्या खायला कंटाळा करणारी मुले पालक खाऊ लागली, एवढेच नव्हे तर आईस्क्रीम आणि टर्की नंतर मुलांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा आवडता पदार्थ म्हणून पालक प्रसिद्ध झाला!

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पॉपाय लोकप्रियतेच्या शिखरावर होता. अमेरिकन सैन्यातही त्याकाळी पॉपायची जबरदस्त क्रेझ होती. अनेकदा सैन्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पॉपायच्या मालिका सैनिकांना दाखविल्या जात.

एका भागात तर पॉपाय आणि त्याचा शत्रू ब्रूटो एकत्र येऊन जपानी सैनिकांना धूळ चारतात (अर्थातच पालक खाऊन!) असेही दाखवले गेले होते.

महायुद्धाच्या काळातील घटनांचे पडसाद पॉपाय मालिकेतही दिसले. त्या काळात पॉपाय आपली नेहमीची हॅट, काळा शर्ट या पोषाखाऐवजी अमेरिकन नौदलाच्या पांढऱ्या पोशाखात दाखवला गेला.

पॉपायचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेने इंग्रजी भाषेला काही नवे शब्द बहाल केले. या मालिकेत पॉपायचा विम्पी नावाचा एक मित्र दाखवला आहे, ज्याच्या नावावरून wimp हा शब्द तयार झाला आहे असे मानले जाते.

जगभर प्रसिद्ध असणाऱ्या ‘जीप’ ला जीप हे नाव मिळण्याचे कारणही पॉपाय आहे! पॉपाय मालिकेत पॉपायने एक कुत्र्यासारखा प्राणी पाळलेला असतो, ज्याचे नाव ‘युजिन – द जीप’ असे होते.

 

popeye cartoon inmarathi4

 

या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हा भिंतीतून आरपार जाऊ शकत असे आणि ‘जीप’ हा एकच शब्द बोलत असे!

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकन सैन्यासाठी एका ‘जनरल पर्पज’ (ज्याला GP असेही म्हटले जाई) वाहनाची निर्मिती झाली, जे पुढे जगभर ‘जीप’ या नावाने प्रसिद्ध झाले. असे मानले जाते, की ‘जीप’ हे नाव ‘युजिन – द जीप’ वरून प्रचलित झाले आहे!

१९३२ साली पडद्यावर आल्यावर पॉपाय ला एवढी प्रसिद्धी मिळाली, की १९३७ मध्ये टेक्सास मधील क्रिस्टल सिटी मध्ये पॉपायचा पुतळा उभारला गेला! एखाद्या कार्टून कॅरेक्टरचा पुतळा उभारण्याचे हे जगातील पाहिले उदाहरण!

 

popeye cartoon inmarathi5

 

हा पुतळा उभारण्याचे कारणही तसेच विशेष होते. टेक्सास प्रांतात पालकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले होते. याप्रीत्यर्थ टेक्सासमधील एक कॅसिनो व्यावसायिक स्टीव्ह विन याने तब्बल २८ दशलक्ष डॉलर्स या पुतळ्यासाठी दिले होते. पॉपाय जणू काही पालकाचा ब्रँड अँबेसेडरच बनला होता!

१९८० मध्ये पॉपाय वर चित्रपटही आला ज्यात रॉबिन विल्यम्स या कलाकारांने पॉपायची भूमिका केली होती. याचे चित्रीकरण माल्टा या देशात झाले होते. चित्रीकरण संपल्यावर तेथील सेट तसाच ठेवून त्याजागी एका थीम पार्क ची निर्मिती करण्यात आली.

मिकी माउस, टॉम अँड जेरी प्रमाणेच पॉपाय आजही आपली ओळख टिकवून आहे. हल्लीच्या काळात झालेल्या तंत्रज्ञानातील बदलांमुळे रोज नवनवीन कार्टून्स येतात आणि जातात.

गेल्या शतकात आलेल्या मोजक्या कार्टून्सनी आबालवृद्धांचे तेव्हाही मनोरंजन केले आणि नव्या पिढीतही ती तेवढीच लोकप्रिय आहेत.

मनोरंजनाबरोबरच चांगल्या सवयीचा संदेशही ही कार्टून्स देतात. “जुनं ते सोनं” ही म्हण या कार्टून्स च्या बाबतीत शतप्रतिशत खरी आहे यात शंकाच नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?