'तब्बल साडेपाच फुटी चालान...५७ हजारांचा दंड, वाचा बुलेट राजाचा अनोखा विक्रम!

तब्बल साडेपाच फुटी चालान…५७ हजारांचा दंड, वाचा बुलेट राजाचा अनोखा विक्रम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अक्षय कुमारची ती ट्राफिक पोलिसाची जाहिरात आठवते का? अक्षय कुमार ट्रॅफिक पोलिस बनून ट्रॅफिक नियम तोडणाऱ्या प्रत्येकाला थांबवून एका वेगळ्याच स्टाइल मध्ये त्यांना धडा शिकवत असतो.

नो एंट्री, ट्रिपल सीट, बिना हेल्मेट प्रवास अशा कित्येक नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी ती जाहिरात काढली होती जी बरीच लोकप्रिय सुद्धा झाली आणि टीव्ही वर बरीच चालली सुद्धा!

 

akshay kumar trafic ad inmarathi

 

जनतेच्या सुरक्षेसाठी आणि रस्त्यावरून प्रवास सुकर व्हावा म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने काही नियम कायदे बनवले आहेत. ते तोडले की दंड हा बसतोच.

काही जण एक दोनदा दंड भरून शिस्तीत वाहतुकीचे नियम पाळायला लागतात तर काही आपल्या स्वभाव बदलण्याच्या मूड मध्ये नसतात.

दिल्ली सरकारचा ऑड-इव्हन पॅटर्न आठवतो? दिल्ली मध्ये वाढते ट्रॅफिक आणि प्रदूषण कमी करण्याचा उपाय?

त्याला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार राजदीप सरदेसाईने आपली ऑड नंबर असलेल्या गाडीतून प्रवास केला आणि ही माहिती त्याने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली.

लोकांनी त्याच्या या गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबर वरून त्याचा कच्चाचिठ्ठा काढला आणि त्याच्या नावावर वाहतुकीचे नियम तोडले म्हणून असलेले दोन चलान सार्वजनिक करून टाकले.

सांगायचं तात्पर्य हे की वाहतुकीचे नियम तोडले की आरटीओ आता ऑनलाइन आपल्या गाडीच्या रजिस्ट्रेशन वरून आपल्याला दंड ठोकते.

ऑनलाइन दंड भरला तर ठीक नाही तर पुढच्या वेळेस नियम तोडला आणि वाहतूक पोलिसांनी पकडले तर आधी तोडलेल्या नियमांची भरपाई सुद्धा तात्काळ करावी लागते.

एवढं पुराण का सांगत आहोत तर, बंगळूर स्थित एका युवकाने तब्बल १०१ वेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत. हे चलान आणि दंड पाहण्यासाठी ऑनलाइन काही व्यवस्था आहे हे त्याला माहित नसावं.

अन त्याचा दिवस खराब म्हणावा की नशीब, ट्रॅफिक पोलिसांनी सिग्नल तोडल्याच्या आरोपाखाली दंड लावताना त्याची बॅक हिस्ट्री बघितली आणि त्याचे मागचे सगळे दंड एकत्र वसूल करताना साडे पाच फूट चलान प्रिंट केले आणि तब्बल ५७ हजारांचा दंड ठोठावला.

 

indian challan inmarathi

 

आणि त्याने हे नियम मोडले आहेत यापासून तो स्वतः अनभिज्ञ होता.

तर, झालं असं की बंगळूर स्थित एका खाजगी कंपनीत काम करणारा राजेश कुमार नेहमी प्रमाणे आपली बुलेट घेऊन इलेक्ट्रॉनिक सिटी ते व्हाइट फिल्ड पर्यंत कामावर जाण्यासाठी निघाला.

त्यादिवशी घाई गडबडीत एका ठिकाणी तो सिग्नल तोडून निघाला. पुढे तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला अडवलं.

जेव्हा पोलीस चलान बनवत होते तेव्हा त्यांना त्याच दिवशी त्याच रजिस्ट्रेशन नंबर वर अजून ६ चलान तयार झालेले दिसले आणि हा नवीन सातवा.

घडत असलेल्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याने जातीने लक्ष घातले आणि त्याच रेकॉर्ड चेक केलं तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले.

राजेश कुमारच्या नावे एकूण ९४ चलान पेंडिंग होते आणि नवीन सात असे एकूण १०१ चलान त्याच्या नावावर आले.

आणि यापैकी एकाही चलानच्या दंडाची रक्कम त्याने भरलेली नाही. राजेश कुमारच्या या प्रकरणी बोलताना बंगळूर वाहतूक पोलीस सांगतात,

सर्व १०१ चलान त्याला एकत्र देण्यात आले आहे. प्रिंट मारल्यावर जे साडेपाच फूट एवढे लांब होते. दंडाची एकूण रक्कम ही ५७,२०० एवढी आहे.

राजेश कुमारने अजून पर्यंत या दंडाची रक्कम भरलेली नाही, त्यामुळे त्याची बुलेट ही जप्त केली गेली आहे.

नियम अज्ञानाने तोडले गेल्याचे सांगून राजेश कुमारने दंडाची रक्कम भरण्यासाठी तीन दिवसांचा वेळ मागितला आहे.

५७,२०० रुपये भरून राजेश कुमार आपली बाईक सोडवून नेऊ शकतो. अन्यथा रीतसर मार्गाने तक्रार दाखल होऊन प्रकरण कोर्टात जाऊ शकतं. मग तिथूनच कायदेशीर रित्या राजेश कुमार आणि त्याची बाईक सुटू शकेल.

१०१ पैकी ६० नियम राजेश कुमारने हे एप्रिल पासून तोडलेले आहेत. कोरोनामुळे असलेल्या लॉक डाऊनच्या काळात रस्त्यावर कमी पोलीस तैनात आहेत. त्याचाच गैर फायदा राजेशने घेतल्याचा दिसून येतो.

बिना हेल्मेट बाईक चालवणे, सिग्नल तोडणे, रहदारीच्या रस्त्यात वेगाने गाडी चालवणे सारखे नियम त्याने मोडल्याचे कळते.

 

challan inmaratho

 

४१ वेळा चलान हे केवळ हेल्मेट न घातल्यामुळे फाडले गेले आहे.

बंगळुरात एवढी मोठी दंडाची रक्कम भरणारा राजेश कुमार हा एकमेव असल्याचे बंगळूर वाहतूक पोलीस सांगतात. एक प्रकारे विक्रम त्याच्या नावे प्रस्थापित झाला आहे.

याआधी हा विक्रम एका भाजी विक्रेत्याच्या नावे होता. १५ डिसेंबर २०१९ ला या भाजी विक्रेत्याने १५,४०० रुपये एवढा दंड भरला होता.

दोन वर्षात त्याने ५५ वेळा वाहतुकीचे नियम मोडले होते.त्याचे प्रिंट झालेले चलान हे ५.१ फूट एवढे लांब होते.

तर, नियम कायदे हे आपल्या भल्यासाठीच असतात. त्याचे पालन केले की आपल्या सोबत इतरांचे सुद्धा चांगलेच होते. नियम तोडून रिबेल बनायचा प्रयत्न केला की असा दंडाचा फटका बसू शकतो.

 

traffic rules inmarathi

 

ज्यात आपलेच नुकसान जास्त असते. म्हणून सतर्क रहा, सावधान रहा आणि वाहतुकी सोबत इतर ही जे नियम आहेत त्याचे कटाक्षाने पालन करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?