' ६७ पदार्थांचे पंचपक्वान्न. – जावयाला तृप्त करणारी सासू, वाचा यामागची खरी गोष्ट! – InMarathi

६७ पदार्थांचे पंचपक्वान्न. – जावयाला तृप्त करणारी सासू, वाचा यामागची खरी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘जामातः दशम ग्रह’ असा एक प्रवाद भारतात आहे. भारतात जावयाला दहावा ग्रह समजलं जातं. याचं कारण म्हणजे जावई म्हणजे,’अवघड जागचं दुखणं’, असं लोकांना वाटतं. आपली लाडाची मुलगी त्याची बायको असते.

ती सासरी त्याच्याच भरवश्यावर गेलेली असते, आणि तिला सासरी कोणताही त्रास होऊ नये हीच भावना आई वडिलांची असते. त्यासाठी मग जावयाला खूष करण्यासाठी निरनिराळे उपाय केले जातात.

त्याच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा असं म्हणू यात की लाडक्या मुलीबरोबर जावयाचे ही लाड केले जातात.

 

hum aapke hai kaun inmarathi

 

जावयाला विशेष मान सन्मान त्याच्या सासरवाडीतील मंडळींकडून मिळत असतो. पूर्वीच्या काळी तर खेड्यापाड्यात कोणाचा जावई येणार असेल तर अख्ख गाव त्याचं स्वागत करत असे. त्याला गावातील अनेक घरातून चहापाण्याला बोलावलं जात असे.

सासुबाई वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालत असत. त्याची सारी बडदास्त ठेवली जात असे, जेणेकरून जावई नाराज होऊ नये. आणि आपल्या मुलीला कोणताही त्रास होऊ नये हाच हेतू असायचा.

अर्थात हे सगळं पूर्वीच्या काळी खूप चालायचं. परंतु आता मात्र अगदीच तशी परिस्थिती नाही. म्हणजे जावयाला मान मिळतो, पण त्याच फारसं विशेष कौतुक होत नाही, त्याचा गवगवाही होत नाही.

परंतु मध्यंतरी अशाच एका लाडक्या जावयाचं त्याच्या सासूने केलेलं कौतुक सोशल मीडियावर व्हायरल झालं.

त्याचं झालं असं, की आंध्र प्रदेशातील एका सासूने आपल्या जावयाच्या स्वागतासाठी ६७ प्रकारचे पदार्थ बनवले. तेही लॉकडाउनच्या काळात, घरात उपलब्ध असलेलं सामान घेऊन.

तसंही आंध्र प्रदेशात मुळातच पाहुणचार हा भरभक्कम केला जातो. त्यात पाहुणा जर जावई असेल तर मग तर विचारायलाच नको! म्हणूनच या सासूबाईंनी आपल्या जावयासाठी ६७ पदार्थ बनवले.

 

andhra women inmarathi

 

बरं नुसतेच पदार्थ बनवले नाहीत तर ते केळीच्या पानावर सुंदर रित्या मांडून ठेवले. अगदी आपल्या बनवलेल्या पदार्थांचं मेनूकार्ड ही त्यांनी तयार केलं.

त्या सगळ्या पदार्थांबरोबर एक व्हिडीओ देखील त्यांनी बनवला ज्यामध्ये त्या पदार्थांची नावे आणि त्याची माहिती त्या सासूबाईंनी सांगितली आहे.

ते ताट काही साधंसुधं नव्हतं, त्यावर वेलकम ड्रिंक पासून स्टार्टर, चाटचे पदार्थ, मेन कोर्स (मुख्य जेवण) आणि भरपूर मिठाईचे पदार्थ असं सगळं काही होतं. हे सगळे पदार्थ केळीच्या पानावर सुंदर रित्या मांडलेले होते. ते ताट अगदी भरगच्च दिसत होतं.

त्या पानाभोवती फुलांची सजावट सुद्धा केलेली होती.

आपल्याला माहित आहे की ,ब्रिटिश लोक ३ कोर्स मिल खातात. ज्यामध्ये स्टार्टर, मेन कोर्स आणि स्‍वीट्स हा मेनू असतो. परंतु या सासूबाईंनी चक्क ५ कोर्स मिल आपल्या जावयासाठी बनवलं.

ज्यामध्ये सात प्रकारचे स्टार्टर्स होते. त्यात बेबी कॉर्न फ्राय, व्हेजिटेबल सूप, कॉलिफ्लॉवर फ्राय कुकुंबर रोल, याशिवाय पपई, मोड आलेली कडधान्य आणि सिमला मिरची पासून काही पदार्थ बनवले होते.

मेन कोर्समध्ये लोणची, पापड, तीन प्रकारचे भात, खीर, पोळी, रस्सम, सांबर ,बिर्याणी, पचडी यासारखे अनेक पदार्थ होते तर गोड पदार्थांमध्ये मोतीचूर लाडू, पायसम, हलवा, आईस्क्रीम असे पदार्थ होते.

आणि विशेष म्हणजे गोड पदार्थांमध्ये पाच ग्रॅम सोन्याचं नाणं जावयाला सरप्राइज देण्यासाठी लपवलेलं होतं.

त्यांनी बनवलेले ते पदार्थ, त्याची माहिती याचा एक छोटासा व्हिडिओ त्यांनी बनवला. इतके पदार्थ करूनही त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा जाणवत नाही. त्यांचा चेहरा अगदी प्रसन्न दिसत होता.

जावई येणार याचं कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं होतंच. या मेनुला त्या लॉक डाऊन मेनू म्हणतात… म्हणजे लॉक डाऊन नसता तर आणखी काय काय बनवलं असतं!

 

andhra women featured inmarathi

 

त्यांचा हा व्हिडिओ ट्विटरवर आला आणि एकदम व्हायरल झाला. बऱ्याच जणांना ही आयडिया आणि त्यांनी केलेली मेहनत, प्रेझेंटेशन आवडलेलं आहे. काहीजणांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो असं म्हटलं आहे.

तर काही नेटिझन्सनी यावर अनेक प्रकारच्या मजेशीर कमेंट केलेल्या आहेत. लोकांना हे जेवणाचा ताट खूपच आवडले आहे.

एका परदेशातील व्यक्तीने तर हा व्हिडिओ शेअर करून,’ पुढच्या जन्मात मला नक्कीच भारतातील जावई व्हायला आवडेल’, असे सांगितले आहे.

एकाने म्हटले आहे की,’ यांच्या मुलीला नक्की किती पदार्थ करता येत असतील! आता मी तिच्या व्हिडिओ ची वाट पाहतोय’.

एका युजरने म्हटले की मी माझ्या सासरी हा व्हिडिओ शेअर केला आहे. जेणेकरून तिकडे माझंही असंच स्वागत व्हावं.

काहीकाही युजर्सना त्यांचे लग्न झाल्यानंतरचे दिवस आठवले आहेत. जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला भेट दिली होती, त्यावेळेस त्यांना काय खायला मिळालं होतं ते सांगितलं आहे.

एकाने म्हटले की,’ भारतीय जावयाला इतकं चांगलं जेवण करायला काहीच हरकत नाही, फक्त त्यामुळे त्याच्या कमरेचा घेर मात्र नक्कीच वाढेल.’

तर काही जणांनी सासुबाईने जावयासाठी इतके पदार्थ बनवले याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘निदान आताच्या काळात तरी अशा गोष्टींना महत्त्व देऊ नये’, असं म्हटलं आहे.

 

tweet inmarathi2

 

‘त्यांनी इतक्या प्रेमाने ही गोष्ट केलेली आहे हे जरी मान्य केले तरी अशा प्रथा अजून चालता कामा नयेत’, असेही काही जणांचे म्हणणे आहे.

पण खरी गंमत तर पुढेच आहे. या व्हिडिओवर ट्विटर वर उलट-सुलट प्रतिक्रिया, काही मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यानंतर हा व्हिडीओ ज्या युजरने पहिल्यांदा शेअर केला त्याने अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण केलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार ही एक कुकिंग कॉम्पिटिशन होती. ज्यामध्ये या व्हिडीओ मधील महिलेने सहभाग नोंदवला होता.

आणि कुकिंग कॉम्पिटिशनची थीम होती की,” जावई पहिल्यांदा घरी आल्यावर तुम्ही त्याचे स्वागत कशा प्रकारे कराल? त्याला कोणत्या प्रकारचे जेवण बनवाल?” त्यात या महिलेने ६७ प्रकारचे पदार्थ बनवले.

खरंतर या महिलेला एकच मुलगा असून अजून तो शाळेत शिकतोय. अर्थातच या महिलेने सदुसष्ट प्रकार केले त्याला नक्कीच बक्षीस मिळालं असेल.

लॉकडाऊनच्या काळात लोकांनी वेळ घालवण्यासाठी, सकारात्मक राहण्यासाठी ज्या अनेक गोष्टी केल्या त्यातलीच ही एक गोष्ट. पण त्यामुळे बरेच दिवस लोकांचे मनोरंजन झालं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?