' “…म्हणून मी अर्णब गोस्वामीचं रिपब्लिक चॅनल सोडलं” : धक्कादायक वास्तव उघडकीस आणणारा लेख – InMarathi

“…म्हणून मी अर्णब गोस्वामीचं रिपब्लिक चॅनल सोडलं” : धक्कादायक वास्तव उघडकीस आणणारा लेख

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अर्णब गोस्वामी… लाईव्ह टीव्ही शोमध्ये होणारा जोरदार आवाज, अनेक वादंग, पक्षपाती असण्याचा आरोप, त्यामुळे तयार केले जाणारे मिम्स अशा सगळ्या गोष्टींमुळे सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व! एक जुने आणि अभ्यासू पत्रकार म्हणूनही त्यांची चर्चा होतेच..

मात्र त्यांचं वागणं अनेकांना खटकतं हे पाहायला मिळालं आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्ही सोडून जाणारी मंडळी पाहायला मिळतात. याचं ताजं उदाहरण म्हणून तेजिंदर सिंग हे नाव पुढे आलं आहे.

 

arnab goswami inmarathi
guwahati plus

 

रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या जम्मू विभागाचे प्रमुख तेजिंदर सिंग सोढी यांनी काही खळबळजनक खुलासे केले आहेत.

हनी कौर यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी त्यांच्या नाराजीचं कारण स्पष्ट करताना, अनेक मुद्दे समोर आणले आहेत. त्यांचे हे पत्र म्हणजे एक धक्कादायक वास्तव आहे असंच म्हणायला हवं.

ऑगस्ट महिन्यात तेजिंदर सिंग यांना बढती मिळणार होती. त्यांनी ती नाकारली. उलट, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. या राजीनाम्याची कारणं मी नक्कीच स्पष्ट करेन असंही त्यांनी हनी कौर यांना म्हटलं होतं. तो ई-मेल आणि मिडीयम या संकेतस्थळावर मांडलेला हा लेख, त्यातील काही महत्त्वाचे संदर्भ पुढे देत आहोत.

तेजिंदर सिंग सोढी यांचं नेमकं काय म्हणणं आहे, ते जाणून घेऊया…

मेलच्या सुरुवातीलाच, व्हाईस प्रेसिडेंट पदी बढती मिळाल्याबद्दल हनी यांचं अभिनंदन केलेलं पाहायला मिळतं. मात्र ही अशी बढती रिपब्लिक नेटवर्कमध्ये मिळण्यापेक्षा इतर ठिकाणी मिळणं अधिक फायद्याचं असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी ते म्हणतात;

“सर्वेसर्वा आणि त्यांच्या पत्नी यांच्या व्यतिरिक्त इतर सर्वांनाच इथे गौण वागणूक मिळते. तुम्ही कुठल्या पदावर कार्यरत आहात याचा संबंध नसतो.”

 

tejinder singh sodhi inmarathi

 

आपल्या या पत्राच्या सुरुवातीलाच एक खळबळजनक आरोप सोढी यांनी केलेला दिसून येतोय. हा आरोप करताना त्यांनी म्हटलेलं आणखी एक वाक्य फारच महत्त्वाचं आहे. “इथं सारं काही अर्णबपासून सुरु होतं आणि गोस्वामीवर जाऊन संपतं.”

या कंपनीची निर्मिती होण्याआधी ज्या केवळ एक सामान्य पत्रकार होत्या, त्या अर्णबजी यांच्या पत्नीने मला बढती मिळाली हे कळवण्यासाठी फोन केला होता. त्या खूप आनंदी असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात, एखाद्याला त्याची गुणवत्ता पाहून बढती देण्यात येते. मग, यात त्यांना आनंद झाला असण्याचा प्रश्नच कुठे उद्भवत होता, असा सवाल सोढी करतात.

या सगळ्यात गमतीचा भाग तर हा होता, की बढती मिळाल्यानंतर त्याविषयी मोठ्या कौतुकाने सगळ्यांना सांगण्यात यावं अशी अर्णब यांची अपेक्षा होती. तेजिंदर सिंग यांनी तर थेट असा आरोप केला आहे, की अर्णब गोस्वामी किती मोठ्या मनाचे आहेत, त्यांनी कशाप्रकारे सर्वांना बढती दिली याचा उदो उदो सोशल मीडियावर केला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.

“रिपब्लिकचा उल्लेख आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर करण्याची परवानगी सुद्धा आम्हाला एकेकाळी देण्यात आली नव्हती. आज त्याच रिपब्लिकचे सर्वेसर्वा, मी सोशल मीडियावर अशी पोस्ट करावी असा आग्रह धरत होते.”

 

arnab goswami inmarathi 4

हे तेजिंदर सिंग यांचे वाक्य खूप काही बोलून जाणारे आहे.

त्यांनी सोशल मीडियावर याविषयी केलेल्या पोस्ट नंतर डिलीट करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यातूनच त्या पोस्ट त्यांनी त्यांच्या अनिच्छेने केल्या असाव्यात हे लक्षात येतं. पण, खरी मेख इतर गोष्टींमध्ये सुद्धा आहे, हे त्या ई-मेलमधील इतर मजकुरावर नजर मारल्यावर सुद्धा लक्षात येतं.

“स्वतः अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या मर्जीतील इतर मंडळी रिपब्लिकमधून भरपूर कामे करत आहेत. मात्र खरोखर मेहनतीने काम करणारी मंडळी पगारवाढीच्या अपेक्षेतच आहेत.

त्यांना नुसतीच गाजरं दाखवून काम करून घेणं, आणि पगारवाढीचा नुसताच दिखावा करणं, हे प्रकार सुरु आहेत. मागील दोन वर्षांपासून आम्ही मंडळी पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहोत.” असंही यात तेजिंदर सिंग सोढी यांनी म्हटलं आहे.

रिपब्लिक सुरु झाल्यापासून आठवड्यभरातच, टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर पोचलं. मात्र अर्णब यांनी टीमच्या मेहनतीचं श्रेय कधीही त्यांना दिलं नाही. त्यांनी सतत स्वतःलाच महत्त्व मिळेल याची काळजी घेतली. कुठल्याही होर्डिंगवर तुम्हाला त्यांचाच उदो उदो होत असल्याचं पाहायला मिळेल.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यीप्रकरणी घडलेल्या घटनेबद्दल एक फार मोठा खुलासा तेजिंदर सिंग यांनी केलाय.

शशी थरूर यांच्यावर आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी तिच्या वडिलांनी आरोप करावेत; तसं त्यांच्या तोंडून वदवून घ्यावं असं मला सांगणात आलं होतं असं सोढी यांनी म्हटलं आहे.

मानसिक धक्क्यातून सावरू न शकलेल्या त्या वयस्कर व्यक्तीकडून असं काहीही वदवून घेण्याची तयारी सोढी यांनी दाखवली नाही. त्यांनी असं केलं नाही.

मात्र सुनंदा पुष्कर यांच्या वडिलांच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी तेथील एका नोकराशी बातचीत केली होती. शशी थरूर आणि सुनंदा यांचे संबंध किती उत्तम होते याविषयी त्यात माहिती मिळाली होती.

 

shashi tharoor inmarathi

 

मात्र ही मुलाखत कधीही टीव्हीवर दाखवण्यात आली नाही असं सोढी यांचं म्हणणं आहे.

याउलट, शशी थरूर यांच्यावर आरोप करणारं स्टेटमेंट सुनंदा यांच्या वडिलांकडून न मिळवल्याबद्दल त्यांना चुकीचं ठरवण्यात आलं होतं.

या भल्याथोरल्या पत्रामध्ये त्यांनी अर्णब यांची अरेरावी, पक्षपात याविषयी बऱ्याचदा भाष्य केलेलं दिसतंय. रिपब्लिकला मोठं करण्यात हातभार असलेली मंडळी आज अर्णब सोबत नाहीत, तुमचा तुम्हीच समजून घ्या असं सोढी यांनी म्हटलंय. यात त्यांनी नावासह काही उदाहरणांचा उल्लेख सुद्धा केलाय.

आदित्य राज कौल हे रिपब्लिकचे अत्यंत हुशार आणि महत्त्वाचे घटक होते. खरंतर ते रिपब्लिकचा महत्त्वाचा कणा होते.

नव्या कल्पना, ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या बातम्यांमधील खाचाखोचा आणि त्याच्याशी निगडित माहिती मिळवणं अशा अनेक गोष्टी ते पाहत असत. परंतु त्यांचं वाढतं महत्त्व अर्णब यांना पाहावलं नाही. त्याचाच परिणाम म्हणून एक उत्तम व्यक्ती रिपब्लिकने गमावली.

आदित्य राज कौल यांच्यासह, स्नेहेश अॅलेक्स फिलिप, हरीहरन, परीक्षित लुथरा, सकल भट, पूजा प्रसन्न, प्रेमा श्रीदेवी अशी नावांची भलमोठी यादी करता येईल असं सोढी यांचं मत आहे. या सर्वांमुळे आज रिपब्लिक उभी आहे. असंही ते म्हणतात.

सध्या प्रचंड गाजत असलेल्या सुशांत सिंग प्रकरणामुळे गेल्या आठवड्याभरात अनेक पत्रकारांनी राजीनामा दिला असल्याचा खळबळजनक दावा सुद्धा यात केलेला दिसतोय.

रियाची मुलाखत घेण्यासाठी रिपब्लिक उत्सुक आहे. मात्र इतरांना मुलाखत देणाऱ्या रियाची मुलाखत घेण्यासाठी तिला तयार करणे शक्य झाले नाही, या कारणामुळे अनेक पत्रकारांना अर्णब यांनी बोल लावले आहेत.

 

rhea interview inmarathi

 

पत्रकारांना अत्यंत वाईट पद्धतीने अपमानित करण्यात आले असल्याचे मला समजले आहे, अशी माहिती तेजिंदर सिंग सोढी यांनी दिली आहे.

भारतातील सर्वोत्तम चॅनेल असण्याविषयी आणि पक्षपातीपणाविषयी बोलण्याचा अर्णब यांना कुठलाही अधिकार नाही, असं स्पष्ट मत यात मांडलेलं आहे. त्यांची पत्नी दोन्ही चॅनेल्सची ऑपरेशन्स बघते.

त्यांच्या मर्जीतील मंडळींना बढती मिळाल्याचं सातत्याने पाहायला मिळतं. यातून त्यांचा पक्षपात स्पष्टपणे दिसतो.

भारतातील सगळ्यात उत्तम चॅनेल असण्याचं म्हणणाऱ्या या नेटवर्ककडे अनेक ठिकाणी पत्रकारच नाहीत. नामवंत पत्रकारांची रिपब्लिक सोबत काम करण्याची इच्छा नाही.

नेव्ही आणि एअर फोर्सच्या गणवेशातील फरकही न कळणारा पत्रकार दिल्लीत डिफेन्स बीटवर काम करतो, असं सोढी यांचं मत आहे.

कन्टनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या पत्रकारांना सुद्धा काम करण्यासाठी आणि फिल्ड वर जाण्यासाठी आहे. एकूणच अरेरावी आणि हुकूमशाहीचा प्रत्यय येथे पदोपदी येतो आहे. एका विशिष्ट पक्षाला अपेक्षित असलेलं संपादन केलं जात आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चॅनल चालत असल्याचा आरोप सुद्धा सोढी करतात.

यावर प्रतिप्रश्न केला जाऊ नये म्हणून अननुभवी आणि नवोदित पत्रकारांना कामाची संधी दिली जाते. हे असं ढोंग सुद्धा रिपब्लिकमध्ये केलं जात आहे.

 

republic media inmarathi

 

अशा सगळ्या पार्श्वभूमीवर, अखेरचा वाद झाला तो माझ्याकडून एक मुलाखत काढून घेण्यात आल्यामुळे… असं सोढी यांनी म्हटलं आहे.

“मी अनेक दिवस ज्या मुलाखतीसाठी मेहनत घेत होतं, ती माझ्याकडून काढून घेऊन, अर्णब यांच्या पत्नीच्या मर्जीतील व्यक्तीला देण्यात आली. एवढंच नाही, तर याविषयी नाराजी व्यक्त केल्यावर अर्णब यांनी शिवीगाळ केला. माझाही संयम सुटला आणि मी त्यांच्याच प्रत्युत्तर केले.

त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलेलं असल्याने त्यांना हे आयुष्यभर समरणात राहील..”

सगळ्याच स्टाफच्या बाबतीत अशा शिवराळ भाषेचा वापर होतो. ते स्टाफला महत्त्व देत नाहीत, असंही सोढी यांनी पुढे म्हटलं आहे.

एकूणच, त्यांनी केलेलं खळबळजनक आरोप आणि हा ई-मेल एक मोठा धक्का आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?