विमानाने पहिल्यांदाच प्रवास करताय? तुमचा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

प्रवास…हा खरं तर आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येकजण काही ना काही कारणाने जगाच्या, देशाच्या पाठीवर प्रवास करतच असतो. शिक्षण, व्यवसाय, नोकरी, मौजमस्ती…या ना त्या कारणाने आपल्यातील प्रत्येकाने कुठे ना कुठे तरी प्रवास केलेलाच असतो.

काळ बदलला तसा या प्रवासाच्या वाहनांतही आपण बदल अनुभवले. अगदी चालत प्रवास करण्यापासून ते बैलगाडी, घोडागाडी, आगगाडी आणि आता विमाने!

त्यातल्या त्यात विमान प्रवास हा आजही जरा सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आणि खिशाला चाट लावणारा असला तरी त्याबद्दल आजही अनेकांच्या मनात संभ्रम आहेत.

बऱ्याच लोकांना विमान प्रवास म्हंटलं की आधी भीतीनेच पोटात गोळा येतो. अनेक सुशिक्षित आणि सधन लोकंही विमान प्रवासाबद्दल मनात किंचित अढी बाळगून असतात.

 

airoplane secretes-inmarathi01
panacea.mk

काहींना जमीन सोडून हवेत उडण्याची भीती वाटते तर काहींना विमान प्रवासाभोवती वर्षानुवर्षे असणाऱ्या श्रीमंतीच्या वलयाची! काहींना विमान प्रवास करायची इच्छा असते पण त्या प्रवासाबद्दलची एकूणच किचकट वाटणारी तयारी त्यांना त्यापासून रोखत असते.

पण, भीतीवर थोडा ताबा मिळवला आणि विमान, विमान प्रवास, त्याबाबतचे समज / गैरसमज, त्यासाठी आवश्यक तयारी याबद्दल जर आपल्याला एखादा भरवशाचा मार्गदर्शक अथवा वाटाड्या मिळाला तर भविष्यात विमान प्रवास करताना आपल्यातील प्रत्येक जण त्याचा मनमुराद आनंद लुटू शकेल.

मित्रहो, याच भावनेतून आजच्या या लेखात विमान प्रवासाबद्दल आपण काही गोष्टी किंवा “Do’s अँड Don’ts जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम एक खोल श्वास घ्या, मनातले सगळे समज / गैरसमज बाजूला सारा. एखाद्या गोष्टीचा अतिविचार देखील त्यातील मजा घालवतो.

तुम्ही प्रवासाला निघणार आहात, तेंव्हा निश्चित मनाने प्रवास होणे महत्वाचे. त्यासाठी या खालील सूचनावजा मुद्दे काळजीपूर्वक वाचा.

१. कागदपत्रं

विमान प्रवासात सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्रं. देशाबाहेर असो वा देशांतर्गत, प्रत्येक प्रवाशाला काही अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे हे विमानतळाच्या प्रवेशद्वारापासूनच बंधनकारक असते.

विमानाच्या तिकिटाबरोबरच, आपले ओळखपत्र जसे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, कामाच्या ठिकाणचे ओळखपत्र, पॅन कार्ड असा कुठचाही वैयक्तिक दाखला गरज पडल्यास कामी येऊ शकतो.

देशांतर्गत प्रवासात जरी पारपत्र (पासपोर्ट) लागत नसले तरी देशाबाहेरच्या प्रवासात वैध पारपत्र असणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी पारपत्राची वैधता (एक्स्पायरी) तपासून बघा.

 

important-documents-inmarathi
india.com

पारपत्र हे तुमच्या स्वतःच्या देशातील नागरिकत्वाचा पुरावा आहे, त्यामुळे तो मुलांच्या हातात खेळायला देऊ नका. वापर झाल्यानंतर तो योग्य तऱ्हेने सांभाळून ठेवा.

त्याची पाने संपली नाहीत ना याची खात्री करून घ्या. चुकीच्या पारपत्रामुळे अनोळखी देशात तुम्हाला संकटाला सामोरे जायची वेळ येऊ नये.

पारपत्राबरोबरच ज्या देशात तुम्ही जाणार त्या देशाच्या दूतावासाकडून मिळालेला व्हिसा तुम्हाला जपून ठेवावा लागेल. आजकाल बऱ्याच देशांत विमानतळावर उतरल्यानंतर देखील तुम्हाला ‘टुरिस्ट व्हिसा’ मिळतो.

पण दहा-दहा वर्षांचे व्हिसा मिळाले असल्यास, प्रवासाला निघण्यापूर्वीच त्याच्या वैधतेची खात्री करून घ्या.

२. सामान

 

Polycarbonate inmarathi
Polycarbonate.com

गेल्या काही वर्षांत अतिरेकी आणि दहशती कारवायांमुळे विमान प्रवासाची सुरक्षा हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. आपण आपल्यासमवेत जे सामान नेतो त्या सामानात ज्वलनशील पदार्थ, हत्यारे, अवैध देशी अथवा विदेशी चलन, अंमली पदार्थ यांचा समावेश नाही ना याची खात्री करून घ्या.

त्यासाठी विमान सेवेच्या, विमानतळ प्राधिकरणाच्या अथवा कस्टम्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन परवानगीकृत सामानाची यादी तपासून बघा.

दुसरे अत्यंत महत्वाचे, विमान प्रवासात सामानाच्या ठराविक वजनापेक्षा जास्ती सामान नेण्याची परवानगी नसते.

जरी प्रत्येक विमान कंपनीनुसार या वजनाच्या आकड्यांत थोडीफार तफावत असली तरी, सामानाच्या नियमबाह्य वजनासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागतात.

३. विमानाची वेळ

 

time inmarathi
telegraph.com

रेल्वे किंवा बस सेवेपेक्षा विमानसेवेची यंत्रणा किंचित वेगळ्या पद्धतीने हाताळली जाते. देशाबाहेर वा देशांतर्गत प्रवासाकरता निघताना तुम्हाला विमानाच्या निर्धारित वेळेआधी कमीत कमी २ तास ते जास्तीत जास्त ३ तास आधी विमानतळावर पोहोचणे बंधनकारक आहे.

त्यामुळे, प्रवासाकरता निघताना हातात पुरेसा वेळ ठेवून निघा, जेणेकरून विमानतळावरील सुरक्षा तपासणी आणि इतर बाबींची पूर्तता करताना तुमची दमछाक होणार नाही आणि विमानही चुकणार नाही.

४. संयम बाळगा

 

airport inmarathi
Genetec.com

विमानतळ हे गर्दीचे आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण आहे. इथे प्रत्येकाला वैयक्तिक तसेच सामानाच्या सुरक्षा चाचणीतून पार पडावेच लागते.

तुमच्याबरोबर असणारे सहप्रवासी, विमानतळावरील कर्मचारी, विमान कंपन्यांचे कर्मचारी तुमच्याइतकेच दमलेले, कंटाळलेले असू शकतात.

अनेकदा त्यांच्यावरही कामाचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे, तुमचे सहकार्य त्यांना अपेक्षित असते, जेणेकरून तुम्हाला विमानप्रवासाचा सुखकर अनुभव यावा.

५. ‘चेक इन’

 

check in inmarathi
thehindu.com

विमानतळावर पोहोचल्यावर सर्वप्रथम तुमच्या विमान सेवेच्या ‘चेक इन’ काऊंटरवर तुमच्या कागदपत्रांची आणि सामानाची छाननी करून घ्या. ते अत्यावश्यक आहे.

अनेकदा, सुरक्षा तपासणीत वेळ जातो. मोठ्या बॅगा विमानाच्या ‘कार्गो’ मध्ये जमा होतील तर ‘केबिन लगेज’ तुम्हाला तुमच्या समवेत विमानात  घेऊन जाता येईल.

६. सुरक्षा तपासणी

चेक इन करण्यापूर्वी आपल्या सामानवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा. कुणी तुमच्या सामानासह त्यांचे सामान देण्याची विनंती केली तर त्याला फशी पडू नका.

 

security inmarathi
MiniTime.com

बरेचदा, तुमच्या नकळत, काही समाज विघातक तुमच्या सामानामध्ये अंमली पदार्थ, हत्यारे आणि अवैध चलन लपवू शकतात; अश्या घटना घडतात, घडल्या आहेत. त्यामुळे, तुम्ही त्याचे बळी ठरू नये हीच इच्छा!

७. बोर्डिंग गेट

 

boarding gate inmarathi
access.com

विमानात चढण्यापूर्वी तुम्हाला योग्य बोर्डिंग गेटवर जावं लागेल. तुमच्या तिकिटावर तुम्हाला बोर्डिंग गेट क्रमांक छापलेला मिळेल. पण तरीही, विमानतळावर असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक संदेश फलकांवर तुमच्या विमानाचे बोर्डिंग गेट तपासा.

बोर्डिंग गेट क्रमांक विमान सेवेकडून आयत्यावेळी बदलण्यात येऊ शकतो. तसे झाल्यास उगाच पळापळ होण्याची शक्यता अधिक.

८. विमानात चढण्यापूर्वी…

तुम्हाला मिळालेला बोर्डिंग पास आणि इतर कागदपत्रे बोर्डिंग गेटवर तयार ठेवा. विमानसेवेच्या बोर्डिंग गेटवरील कर्मचाऱ्याने विमानात प्रवेश देण्यास सुरुवात केली की तुमच्या केबिन लगेजवरनं पुन्हा एकवार नजर फिरवा.

 

flight inmarathi
flight.com

विमानात प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिलेल्या आसन क्रमांकानुसार बसून घ्या. तत्पूर्वी, आपले केबिन लगेज आसनाच्या वर असलेल्या कप्प्यांमध्ये ठेवा.

तुमच्या आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तुमचे सामान पायाजवळ अथवा आसनांच्या मधील रांगेत ठेवता येणार नाही. हवाई सुंदरी किंवा फ्लाईट अटेंडंट तुमच्या मदतीला तत्पर असतात. सामान ठेवण्यासाठी तुम्हाला त्यांची मदत घेता येईल.

९. खानपान व अन्य सुविधा

 

food in flight inmarathi
mark.in

तुमच्या प्रवासाच्या अंतरावर आणि विमानाच्या वेळेनुसार खानपान आणि अन्य सुविधा दिल्या जातात. कमी अंतरासाठी कदाचित तुम्हाला फक्त रिफ्रेशमेंट्स मिळतील, तसेच लांब पल्ल्यासाठी आणि विमानाच्या वेळेनुसार जेवण, नाश्ता दिलं जातं.

काही विमानसेवा मद्यही पुरवतात. कदाचित, त्याकरता तुम्हाला विमानातच वेगळे पैसे भरावे लागतील.

बहुतांशी वेळेला त्यासाठी चलन स्विकारले जात नाही. त्यामुळे, तुमचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड जवळ बाळगा.

१०. शेवट पण महत्वाचे…

बऱ्याच लोकांना विमान प्रवासात उलटीचा किंवा उंचीचा त्रास होतो. विमानप्रवासास निघण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरशी बोलून योग्य आणि विमानप्रवासात अधिकृत मानली जाणारी औषधे जवळ ठेवा अथवा प्रवासापूर्वीच त्यांचे सेवन करा.

 

medicines-inmarathi06
lareine.com.kh

तुम्ही एकटेच प्रवास करत असाल आणि तुम्हाला काही वैद्यकीय त्रास असेल तर त्याबाबत फ्लाईट अटेंडंटला आधीच कल्पना देऊन ठेवा.

विमान टेक ऑफ करण्यापूर्वी सुरक्षित प्रवासाकरता अटेंडंटने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. जितका झेपेल तितकाच आहार / मद्य घ्या.

वर दिलेल्या दहा सूचनावजा मुद्दे लक्षात ठेवल्यास विमान प्रवास सुखकर तर होईलच पण त्याचबरोबर स्मरणीयदेखील बनेल याची खात्री बाळगा!

तेंव्हा ‘शुभास्ते पंथान:’ अर्थात ‘हॅप्पी जर्नी’!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “विमानाने पहिल्यांदाच प्रवास करताय? तुमचा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स

  • May 25, 2019 at 12:48 pm
    Permalink

    छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?