पावसाळ्याची रंगत वाढवायची असेल तर या १० खास खमंग डिशेस एकदा होऊन जाऊद्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

संपला बुवा उन्हाळा. उन्हाळ्यात जिवाची घालमेल होते, जेवण जात नाही, नुसतं पाणी-पाणी होतं आणि घामाच्या धारांनी त्रस्त झालेले आपण अगदी आतुरतेने वाट बघत असतो एका गोष्टीची. कधी आकाशात काळे मेघ जमतात आणि कधी पावसाच्या धारा बरसतात.

पावसाळ्यात पसरलेल्या मातीचा सुगंध, हवेतील गारवा आपल्याला आनंद देतो आणि मग सुरुवात होते ती खमंग पदार्थांची.

पावसाळा आला की, घराघरातून कांद्याची भजी, बटाटेवडे, पकोडे यांचा वास येऊ लागतो. सगळीकडे भजीच्या आणि वड्यांच्या प्लेटस् याचे फोटो दिसू लागतात.

पावसात भिजायला पण सगळ्यांनाच आवडतं, पण या भिजण्याबरोबरच गरम गरम चहा आणि काही पदार्थ खावेसे वाटतात.

 

rain-inmarathi
roadcompass.org

पावसामुळे धरणी माता तर शांत झालेली असते, पण आपल्या पोटातली भूक मात्र जागी होते आणि नवीन नवीन पदार्थ सुचू लागतात. पाहुया असे कोणते पदार्थ आहेत की जे आपल्याला पावसात खावेसे वाटतात.

पाऊस म्हटलं की, सगळ्यात पहिला आठवतो तो चहा.

१. चहा

चहा आणि पाऊस यांचं नातं अतूट आहे. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि आपण घरात किंवा ऑफिसमध्ये गरम गरम चहा पितोय हा आनंद काही वेगळाच.

 

 

पावसाळ्यातला चहा आणखीन स्पेशल असतो कारण त्यात आपण आलं किंवा मसाला टाकून चहा करतो. असा गरम गरम चहा आपल्याला प्रफुल्लित करतो आणि मनातील मरगळ निघून जाते आणि एकदम मस्त वाटून जातं.

पावसामुळे आलेल्या गारठ्याने शरीराला ऊब मिळते. अर्थात हे चहाप्रेमींसाठी. ज्यांनी कधीही चहा घेतलेला नाही किंवा ज्यांना चहा आवडत नाही त्यांना याची मजा काय कळणार?

२. भजी

इकडे पावसाळी हवामान आहे थोड्याच वेळात मेघ बरसू लागणार आहेत किंवा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय आणि रस्त्यावर किंवा घरात मस्त कांदाभजी, बटाटा भजी, मिरची भजीचा वास पसरलाय वा! काय कल्पना आहे ना? पाणी सुटलं ना तोंडाला?

 

 

त्या भजीबरोबर तिखट मिरची आणि काय हवं? हा असा मेनू म्हटलं कीच कळतं की पाऊस जोरदार सुरू झालाय.

आणि या सगळ्याबरोबर चहा तर हवाच. अगदी पौष्टिकच म्हणायची असेल तर पालकभजी सुद्धा खाऊ शकता. डाएट वाल्यांना दिलासा दुसरं काही नाही.

३. सामोसा

गरम गरम सामोसे. विचार करा बाहेर पाऊस पडतोय आणि तुमच्या हातात सामोसा आहे! वा ! वा! काय स्वर्गसुख आहे ना?

 

 

तसं तर सामोसा आपण सगळ्याच ऋतूत खाऊ शकतो, पण पावसाळ्यात असा गरम आणि कुरकुरीत सामोसा खाल्ल्यानंतर आपला मूडच बदलतो. तोंडाला पाणी सुटलं ना?

त्याच्या सोबत आंबटगोड चटणी घ्या किंवा टॉमेटोचा सॉस घ्या आणि कसलाही विचार न करता गरमागरम सामोसा खाऊन टाका.

४. भाजलेलं कणीस

कणीस ! पाऊस पडतोय आपण पावसाळी ट्रीपसाठी धबधबा किंवा एखाद्या गडावर गेलोय. पावसाचे तुषार अंगावर पडतायत आणि तिथेच गाडीवर, कोळशावर कणीस भाजतायत! दिसलं ना चित्र डोळ्यासमोर. का नाही मोह होणार हे खायचा?

 

 

गॅसवर भाजलेल्या कणसापेक्षा हे कोळशावर भाजलेले कणीस खूपच सुंदर लागते. त्याला भाजून झाल्यावर काळी मिरपूड, मीठ, लाल मिरची पावडर असं मिश्रण लावलं जातं.

त्यामुळे त्याची जी काही टेस्ट लागते विचारूच नका. पावसात गरम गरम कणीस खाण्याचा अनुभव जर घेतला नसेल तर नक्की घ्या.

५. आलू पराठा

खूप तेलकट नको असेल, पण तरीही चटपटीत हवं असेल तर सगळ्या ऋतूत चालणारा एक पदार्थ आहे तो म्हणजे आलू पराठा.

 

 

हानमुलांपासून सगळ्यांना प्रिय असतो हा पराठा आणि तसं पण तो कधीही खायला चालतो. गरम आलू पराठा आणि थंड दही यांचे मिश्रण आपल्याला एक समाधानकारक पण विरोधाभासी अशी चव देते.

पावसाळ्यात असा गरम गरम पराठा खायला मिळाला तर आनंद द्विगुणित होतोच. शिवाय आपण खूप काही कॅलरीज वाढवल्यात किंवा खूप तेल पोटात गेलंय असंही नसतं. त्यामुळे निशंक मनाने आपण ते खाऊ शकतो.

६. वडा पाव

हा एक असा पदार्थ आहे की, ज्यावर काही लोकांचं पोट अवलंबून असतं. काही मिळालं नाही तर लोकं वडापाव खाऊन राहतात. गरिबातल्या गरीब माणसाला पण वडापाव खाणं परवडतं आणि आवडतं सुद्धा.

 

 

गरिबापासून श्रीमंतापर्यंत हा वडापाव सर्वांनाच प्रिय आहे. विशेषत: मुंबईमधला वडापाव सर्वांत प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात गरम गरम वडा, हिरवी मिरची, पाव आणि कांदा लसूण चटणी बरोबर खाल्ला तर त्याचा झटका काही औरच लागतो.

७. मिसळपाव

गरमागरम मिसळ आणि पाव. मिसळ हाही एक अतिशय प्रसिद्ध असा पदार्थ आहे. कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ फारच प्रसिद्ध आहेत.

गरम गरम रस्सा, फरसाण आणि बे्रड याचं मिश्रण असलेली, स्वादिष्ट अशी मिसळ बाहेर पावसाची भुरभुर सुरू असताना खायला मिळाली तर होणारा आनंद अवर्णनीयच असतो.

 

 

मिसळ हा असा पदार्थ आहे की, त्याची एक विशिष्ट चव असेलच असे नाही. प्रत्येक ठिकाणी ती वेगळी मिळते. पण जर ती टेस्टी तरीसुद्धा झणझणीत असेल तर पावसासारखाच त्याचा आस्वाद घेताना मजा येते.

८. पावभाजी

मुंबईतील ही अजून एक लोकप्रिय डीश आहे. यात सगळ्या भाज्या पण असतात त्यामुळे तशी पौष्टिक म्हणायला हरकत नाही.

 

 

गरमागरम पावभाजी, बटरवर भाजलेले गरम गरम पाव, चिरलेला कांदा, लिंबू यांचे मिश्रण आणि खिडकीत बसून ते खात खात बाहेर पडणार्‍या पावसाचा आनंद घेताना फारच भारी वाटतं.

ही पावभाजी सुद्धा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच प्रिय असते.

९. चटपटे चाटस्

रस्त्याच्या कडेला किंवा कोपर्‍यात चाटवाला उभा असतो. वरून पाऊस पडत असतो. तरीपण आपल्याला चाट खायचा मोह होतो.

 

 

पाणीपुरी, भेळपुरी, दहीबटाटापुरी आणि सगळ्या प्रकारचे चाटस् पावसात खाऊन तर बघा. एक वेगळाच अनुभव येतो. पाणी सुटलं ना तोंडाला मग चला तर!

१०. सूप

पोटात भूक नाही, पण तरीही हलकं काहीतरी आणि गरम गरम खायची इच्छा होतेय, तर सूपशिवाय दुसरा ऑप्शन नाही. बाहेर थंड वारा, पाऊस आणि पोटात गरम गरम सूप हे पावसाळी वातावरण यातून आपल्याला एक उबदार असा अनुभव येतो. नक्की ट्राय करा.

 

 

आपल्या संस्कृतीत इतके पदार्थ आहेत की, कितीही लिहिले तरी कमीच. खाण्या-पिण्याचे सुख म्हणजे काय हे आपल्या देशातील लोकांना सांगायला नको.

प्रत्येक ऋतूचे, सणांचे विविध प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीत ठरलेले आहेत आणि त्याचा आस्वाद आपण पुरेपूर घेतो.

तर अशा या पावसाळी वातावरणाचा आनंद पुरेपूर घ्या. कोणतीही चटपटीत डीश घ्या त्याच्यासोबत गरमागरम चहा प्या, पहा कसं फ्रेश वाटून जाईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “पावसाळ्याची रंगत वाढवायची असेल तर या १० खास खमंग डिशेस एकदा होऊन जाऊद्या!

  • July 15, 2019 at 9:33 am
    Permalink

    खास माहिती

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?