' ख्रिसमसशी संबंधित असणारे हे १० इंग्रजी चित्रपट आवर्जून बघावेत असे आहेत… – InMarathi

ख्रिसमसशी संबंधित असणारे हे १० इंग्रजी चित्रपट आवर्जून बघावेत असे आहेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हिवाळ्यातला महत्त्वाचा सण म्हणजे ख्रिसमस. थंडीची चाहूल लागली की सगळी दुकानं ख्रिसमससाठी सजू लागतात. डिसेंबरपर्यंत सगळं वातावरण ख्रिसमसमय झालेलं असतं. गुलाबी थंडी, ख्रिसमससाठी सजलेले रस्ते, रोषणाई, लाल टोपी घालून लहान मुलांना गिफ्ट देणार सांता असं सगळं भारलेलं वातावरण असतं.

या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ख्रिसमसनिमित्त मिळणारी सुट्टी. आता या सुट्टीत नेमकं करायचं काय ? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो.

काहींचे फिरायला जाण्याचे प्लॅन्स असतात पण, ज्यांचे नसतील त्यांच्यासाठी घरी बसून सुट्टी एन्जॉय करण्याचा एक झक्कास प्लॅन आहे.

चित्रपट हा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय आहे. त्यामुळे सुट्टीत कुठेही बाहेर न जाता घरीच ख्रिसमसचा आनंद देणारे हे दहा हॉलिवूड चित्रपट आवर्जून बघितलेच पाहिजेत ..

१) It’s a Wonderful Life (1946)

 

या चित्रपटाचा नायक जॉर्ज बेली हा आयुष्यातील विविध कारणांमुळे खूप त्रस्त आहे. आयुष्य संपवायला निघालेल्या जॉर्जला मदत करण्यासाठी म्हणून स्वर्गातून एक परी येते. ख्रिसमसच्याच दिवशी त्या परीशी झालेल्या संवादातून जॉर्जचं पूर्वायुष्य प्रेक्षकांसमोर येतं.

या भेटीनंतर जगण्याच्या त्याच्या दृष्टिकोनात झालेला सकारात्मक बदल आपल्याला दिसतो. ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट नक्कीच बघावा.

२) Home Alone (1990)

 

या चित्रपटाच्या कथानकावर सहज विश्वास बसणं थोडंसं कठीण आहे पण, मनोरंजनाच्या दृष्टीने हा चित्रपट अव्वल क्रमांकावर आहे.

आठ वर्षीय मुलगा ‘केविन’ हा त्याच्या पालकांकडून चुकून ख्रिसमसच्या सुट्टीत एकटाच घरी राहतो. त्याचे आईवडील त्याला सोबत न घेताच पॅरिसला ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी जातात आणि नेमकं ख्रिसमसच्या दिवशी संध्याकाळी काहीतरी चांगलं चोरण्याच्या हेतूने दोन तरुण चोर केविनच्या घरात शिरतात. त्यानंतर काय घडतं याची रंजक कहाणी म्हणजे हा चित्रपट.

३) Miracle on 34th Street (1947)

 

 

ख्रिसमसचं वातावरण तयार करण्यासाठी या चित्रपटसारखा दुसरा चांगला पर्याय नाही.

आपण स्वतः सांता आहोत हे सांगणाऱ्या माणसाची ही कथा आहे. गोष्टींच्या पूर्ततेसाठी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज असते हे सत्य हा चित्रपट सांगतो.

४) The polar Express (2004)

 

या चित्रपटाबद्दल लिहिण्यासाठी केवळ दोन शब्दच पुरेसे आहेत ते म्हणजे ‘टॉम हँक्स’. टॉम हँक्सच्या अभिनयाची जादू या चित्रपटाला खूप वरच्या पातळीवर नेऊन ठेवते. एका लहान मुलाचा जादुई प्रवास या चित्रपटात बघायला मिळतो.

ख्रिसमसच्या जादूवरुन एका लहान मुलाचा उडालेला विश्वास आणि तो विश्वास मिळवण्यासाठी उत्तर ध्रुवाची त्याला घडलेली सफर या चित्रपटात दिसते. ट्रेनने उत्तर ध्रुवाची चक्कर मारणाऱ्या या मुलाला बघून परत लहान व्हावंसं वाटतं.

हा चित्रपट पाहताना आपणही ‘द पोलर एक्सप्रेस’मधून फिरावं आणि  आपली टॉम हँक्सशी मैत्री व्हावी असं वाटत राहतं. मैत्री, धाडसीपणा आणि ख्रिसमसची जादू या चित्रपटात भरुन राहिली आहे.

५) Love actually (2003)

 

यामध्ये आठ वेगवेगळ्या कथा या एका समान धाग्याने बांधल्या गेल्या आहेत आणि तो धागा म्हणजे प्रेम.

लंडनमध्ये ख्रिसमसच्या आसपास घडणारी ही कथा आहे. या कथा वेगवेगळ्या असल्या तरीही एकमेकांशी संबंधित आहेत. ख्रिसमसच्या वेळेस प्रेम खुलवणारा हा चित्रपट बघायलाच हवा.

६) Elf  (2003)

  

एक लहान मुलगा सांताच्या बॅगमध्ये शिरतो आणि सांतासोबत उत्तर ध्रुवावर जातो. त्यानंतर काही वर्षानी सांताच्या परवानगीने तो न्यूयॉर्कमध्ये स्वतःच्या खऱ्या वडिलांना शोधण्यासाठी येतो. इतक्या वर्षांनी न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर माणसांमध्ये मिसळून त्याने केलेली गंमत या चित्रपटात आहे.

७) The Nightmare Before Christmas (1993)

 

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दिसणाऱ्या सांताक्लोजवरूनच या चित्रपटाच वेगळेपण लक्षात येतं. हा चित्रपट हॅलोवीनसाठी आहे की ख्रिसमससाठी असा प्रश्न पडतो पण, ख्रिसमसमध्ये बघण्यासाठी याहून जास्त वेगळा चित्रपट नाही एवढं मात्र नक्की.

हॅलोवीन शहराचा राजा, ख्रिसमस शहरात येतो आणि तिथल्या पद्धती स्वतःच्या शहरात नेऊ पाहतो. यात झालेला गोंधळ मजेशीर पद्धतीने या चित्रपटात दिसतो.

या चित्रपटातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्हिज्युअल्स. व्हिज्युअल्समुळे या चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.

८) National Lampoon’s Christmas Vacation (1989)

 

 

ख्रिसमस म्हटलं की मोठे प्लॅन्स येतातच. एका कुटुंबातील सदस्य असाच एक प्लॅन ठरवतात पण, त्या ऐवजी एक मोठं संकटच समोर उभं राहतं. ते नेमकं कोणतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. हा विनोदी चित्रपट आहे.

९) A Christmas Story (1983)

 

ख्रिसमस म्हणजे लहान मुलांसाठी सांताक्लोज आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या भेटवस्तू. दिग्दर्शक बॉब क्लार्कने सणांवर केलेला हा चित्रपट म्हणजे मास्टरपीस आहे.

नऊ वर्षाचा लहान मुलगा ‘राल्फी पार्कर’ याला ख्रिसमसच गिफ्ट म्हणून बंदूक हवी असते. यासाठी तो पालक, शिक्षक आणि खुद्द सांताक्लोजला सुद्धा ज्या कुशालीने समजावतो, त्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा,

 

१०) The Christmas Chronicles 2018

 

 

लहानपणीच वडील वारल्यामुळे ख्रिसमसची मज्जाच निघून गेल्यासारखं दोन लहान मुलांना वाटत. त्यानंतर ख्रिसमस सेलिब्रेट न करणाऱ्या भाऊ-बहिणीच गोड नातं यामध्ये दाखवलं आहे.

त्यातच सांताची गाडी तुटल्यानंतर हे दोघे भाऊ-बहीण ख्रिसमस वाचवण्यासाठी संपूर्ण रात्र सांतासोबत फिरतात. सांताची गाडी, जुने चर्च, बर्फ, गिफ्ट्स असा पूर्ण ख्रिसमस फील या चित्रपटात आहे.

त्यामुळे आता कोणतेही बाकीचे प्लॅन्स नसले तरीही ख्रिसमसच्या दिवशी आरामात घरी बसून या चित्रपटांचा आनंद घ्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?