' सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी – InMarathi

सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : संजय सदानंद भोंगे
समाज कार्यकर्ता, परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र मुंबई

===

आरोग्य सेवा ही मुलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ मध्ये आपल्या घटनेत, आरोग्य हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. आल्मा आटा जाहीरनाम्यात सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा देण्यात आली. त्याच आधारे यूनिवर्सल हेल्थ कवरेज हि संकल्पना या मांडली गेली आहे.

यूनिवर्सल हेल्थ कवरेज अर्थात सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा याचा अर्थ साध्या शब्दात, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवश्यकतेनुसार सर्व आरोग्य सेवा, सुविधा, त्याला कुठलाही आर्थिक ताण न सहन करावा लागता मिळायला हव्या हा आहे. म्हणजेच समाजातला जो व्यक्ती आरोग्य सेवांचा लाभ घेवू इच्छितो त्याला त्या मिळायला हव्यात, न की फक्त त्यांना जे या सुविधा मिळवण्यासाठी पैसे देवू शकतात.

तसेच या आरोग्य सुविधा या गुणवत्तापूर्ण असायला हव्यात आणि त्या मिळवण्या साठी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण सहन करायला लागू नये,

अश्या प्रकारच्या सर्वांगीण आणि सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा, जगभरातील सर्व नागरिकां पर्यत पोहचाव्या याच उद्धीष्टाने जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ या वर्षाच्या “जागतिक आरोग्य दिना” ची थीम “यूनिवर्सल हेल्थ कवरेज: एव्हरी वन एव्हरी व्हेअर”, म्हणजेच सर्वांगीण आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी हि घोषित केली आहे.

 

uhc-inmarathi
www.rockefellerfoundation.org

आपल्या देशातील सर्व राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही आपल्याकडून सर्वांसाठी आरोग्य आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपली वचनबद्धता जाहीर केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या माध्यमातून देशातील गावागावातून स्वास्थ्य सेवा पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हजारो आरोग्य कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत तन-मन लावून हे काम निष्ठेने करता आहेत.

जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, दर महिन्याच्या  तारखेला गर्भवती महिलांची तपासणी, या गर्भवती महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमातून मोफत तपासणी, प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका सेवा, मोफत प्रसूती, मोफत प्रसूती शस्त्रक्रिया, मोफत औषधे, रुग्णालयातील निवासा दरम्यान आहार, यातून माता आरोग्य सुरक्षा देण्याचे काम होते आहे. लसीकरणाचा इंद्रधनुष्य कार्यक्रम देशातील सर्व बालकांना निरनिराळ्या आजारापासून सुरक्षा देतोय, या कार्यक्रमात अनेक नवीन लसींचा समावेश करण्यात आलाय.

१०४ आणि १०८ रुग्ण वाहिका सेवा, माहेरघर योजना, टी बी मुक्त भारत अभियान, असंसार्गिक रोगांच्या निदान आणि उपचारासाठी चे कार्यक्रम आणि या सारखे इतर कार्यक्रम, हे सारे कार्यक्रम सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा देण्यासाठी आरोग्य विभाग कसे प्रयत्न करतो आहे त्याचेच उदाहरण आहे.

देशाच्या अर्थमंत्र्यांनी नुकत्याच प्रस्तुत केलेल्या अर्थ संकल्पात राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेतून 5 लाखाचा विमा देण्याचा निर्णय घेतला. टी बी रुग्णांना पोषक आहार मिळावा म्हणून निश्चित अशी रोख रक्कम देण्यात येणार आहे. देशात रुग्णांना मोफत डायलेसीस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या सर्वच योजनामधून देशातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. हृदय रोग हा वाढतो आहे. अनेक जणांना त्यावर उपचार घेता येत नाही कारण खर्च खूप येतो, पण देशात सर्वसामान्यांना औषधे कमी किमतीत कशी उपलब्ध करता येतील या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. अनेक औषधांच्या किमती या नियंत्रणात आणल्या गेल्या आहेत. हृदयरोगाच्या उपचारासाठी लागणारे स्टेंट कमी दराने उपलब्ध केले जात आहेत, अश्या प्रकारे जनतेच्या खिश्यावरील आरोग्य उपचारांच्या खर्चाचा ताण कमी केला जातो आहे.

 

youthkiawaaz.com

या सर्व गोष्टी करतांना आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक चांगली कशी होईल याचा प्रयत्न कायाकल्प योजनेच्या माध्यामातून होतोय. अनेकांना माहिती नसेल पण महाराष्ट्रातील अनेक तरुण पिढीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय. आय एस ओ प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेतून तावून सुलाखून त्यांनी आपल्या केंद्रामधून अधिक परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा चंग बांधला आहे. आजमितीस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ही आय एस ओ प्रमाणित झाली आहेत.

आरोग्य सेवा सुधारणे साठी होणाऱ्या या सततच्या प्रयत्नातून देशातील सर्व नागरिकांन यांचा लाभ मिळणार आहे. हे काम तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा सरकार आणी आरोग्य सेवा देणाऱ्या आपल्या आरोग्य कर्मचार्यांना आपण सारे सहकार्य करू. देशातील प्रत्येक नागरीका पर्यंत या निरनिराळ्या कार्यक्रमांची आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांची माहिती देवून त्यांना या सेवा घेण्यास प्रवृत्त करू.

आपले आरोग्य कर्मचारी देशातील विविध भागातून अत्यंत कठीण परिस्थितींचा सामना करत उत्कृष सेवा देण्या साठी प्रयत्नांची प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. अश्या परिस्थितीत त्यांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्या सोडवण्यासाठी गावपातळीवरील तरुण कार्यकर्ते, पंचायत सदस्य, महिला आणि महिला मंडळे यांची मदत मिळाली तर ते आरोग्य सेवा देण्याचे आपले काम अधिक प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेने करू शकतील.

आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जर आपल्याला सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर समाजातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याचा निश्चय करायला हवा.

समाजातील धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या नेत्यांपासून तर गावागावात काम करणाऱ्या प्रत्येक नागरीका पर्यत हि गोष्ट पोहचवायला हवी. शासनाने ग्राम, आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, रुग्ण कल्याण समिती सारख्या संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीवरील आरोग्य सुविधा अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या समित्यांच्या सदस्यांना प्रशिक्षणही दिले जाते आहे ज्याचा फायदा आरोग्य सुविधा उत्तम होण्यास होणार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्य सेवांच्या गरजांची माहिती स्थानिक पातळीवर धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या अधिकारी, नेते, पदाशिकारी यांना वेळच्या वेळी द्यायला हवी. सोशल मिडियाच्या माध्यामातून समाजाच्या आरोग्य विषयक गरजा, आरोग्य संवर्धक संदेश, आरोग्य विषयक कार्यक्रम, त्यांचे फायदे, त्या सेवा कुठे आणि कश्या मिळवायच्या या सर्व गोष्टींच्या माहितीचा प्रसार करायला हवा. सरकारच्या वतीने अशी माहिती नेशनल हेल्थ पोर्टल यावर उपलब्ध आहे, तिचा प्रसार व्हायला हवा.

मोठ्या शहरातील एम्स सारख्या रुग्णालयातील सेवा मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती मिळवून नोंदणी च्या सुविधा निर्माण झाल्या आहेत त्याची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत जायला हवी. अनेक मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून हि सरकार नागरिकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करते आहेच. महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र पण या माहिती च्या प्रवाहात सामील झाली आहेत. शासनानेच या प्राथमिक आरोग्य केंद्रांना फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर आपल्या केंद्रातील कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यास सांगितले आहेच. या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सर्वच जन त्यात सामील होतील.

आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी संस्थानां सुद्धा यात माहिती देवून सामील करून घेणे आवश्यक आहे. त्यातून ते धोरण ठरवणाऱ्या नेत्यांना आवश्यक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतात. हे फक्त आरोग्य कर्मचारी किंवा सरकारचे काम नाही तर ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मम्हणूनच आपण सगळ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साथीने, त्यांच्या प्रेरणेने, प्रोत्साहित होऊन देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळतील यासाठी प्रयत्न करायला हवेत.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?