' प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास : जगाला अद्ययावत शस्त्र पुरवणारा देश! – InMarathi

प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास : जगाला अद्ययावत शस्त्र पुरवणारा देश!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्राचीन काळी भारत हे जागतिक व्यापारातले एक महत्वाचे केंद्र होते हे सर्वांना ज्ञात आहेच. मसाल्याचा व्यापार हा सर्वात प्रमुख होता. त्यामुळे साहजिकच त्याबद्दल नेहमी बोललं-लिहिलं जात असतं.

परंतु असाच एक महत्वाचा व्यापार इतर देशांसोबत होत होता. तो म्हणजे पोलाद आणि त्यापासून बनवलेली शस्त्रे!

 

dagger
stainless steel tube mills

 

तमिळनाडूमध्ये जगातील सर्वोत्तम पोलाद बनविले जात होते. वूट्झ स्टील किंवा दमास्कस स्टील या नावाने ओळखले जाणारे हे स्टील जगात सर्वदूर प्रसिद्ध होते. प्रामुख्याने यापासून बनवलेली शस्त्रे त्यात विशेषतः तलवार, खंजीर यांचा समावेश होता.

 

damascusteel-inmarathi
ancientpages.com

 

युरोपच्या लोकांना हे ज्ञान परिचित झाले त्याच्या कितीतरी आधी पासून भारतीय कारागिरांनी यात नैपुण्य प्राप्त केले होते.

परंतु हे तंत्र आज ज्ञात नाही. असं का झालं?  काय आहे वूट्झ स्टील? हेच सांगणारा हा लेख….

नावात काय आहे?

हा पोलादाचा प्रकार परदेशात वूट्झ स्टील म्हणून ओळखला जात असे. हा ‘उरुख’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. दाक्षिणात्य भाषांमध्ये ‘उरुख’ हा शब्द वितळणे या अर्थाने वापरला जातो. तामिळ, तेलगू, कानडी या दाक्षिणात्य भाषांमध्ये थोड्या फार फरकाने हा शब्द वापरला जातो.

 

wootz-steel
my india my glory

 

त्यावरून पुढे  वूट्झ हा शब्द पुढे आला आणि वापरला जाऊ लागला. याव्यतिरिक्त दमास्कस स्टील या नावाने देखील या पोलादाची दखल घेतली जाते. दमास्कस म्हणजे आजच्या सीरियाची राजधानी असणारे शहर होय.

भारत आणि युरोपीय देश यांच्यात होणाऱ्या व्यापाराचे दमास्कस हे महत्वाचे केंद्र असलेले शहर होय. तेव्हा युरोपीय दृष्टीकोनातून  दमास्कस स्टील हा प्रचलित झाला आणि वापरला जाऊ लागला. वास्तविक दमास्कस मध्ये या प्रकारच्या पोलादाचे उत्पादन होत नव्हते.

मात्र केवळ महत्वाची व्यापारी पेठ असल्याने दमास्कस स्टील हे नाव जगभर वापरले गेले. याव्यतिरिक्त हे खास वैशिष्ट्य असलेले हे पोलाद उक्कू, हिंदवी स्टील, हिंदूवानी स्टील, तेलिंग स्टील आणि सेरीक आयर्न या नावानेही वेगवेगळ्या भागात ओळखले जात असे.

अरब जगतात देखील या पोलादापासून बनवलेल्या शस्त्रांची मोठी मागणी होती. जेव्हा या तलवारीने शत्रूचा शिरच्छेद केला जाई तेव्हा त्याला ‘जवाब ए हिंद’ असा वाक्प्रचार रूढ होता. म्हणजे शत्रूला भारतीय बनावटीच्या पात्याने दिलेले उत्तर होय.

 

steel
agnee steels

 

इतिहासात वूट्झ स्टील

वूट्झ स्टील हे प्राचीन काळातील एक आश्चर्यच मानले जाते. त्याचा उल्लेख भारतीय, अरबी, चिनी आणि रोमन इत्यादी भाषेमध्ये आढळतो. भारतात इसवीसन पूर्व सहाव्या शतकापासून हे पोलाद बनवले जात असल्याचे उल्लेख आहेत.

इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडर द ग्रेट याने राजा पोरस याला पराभूत केले. त्यावेळी राजा पोरस याने वूट्झ स्टील पासून बनविलेले शस्त्र दिल्याचे इतिहासात नमूद आहे.

 

raja porus
just shishir

 

दक्षिण भारतात चेरा या राजघराण्याचे राज्य असतांना या पोलादाचा जगभर प्रसार झाला. उत्तम दर्जाच्या पोलादामुळे शस्त्र बनविण्यासाठी यांस जगभर मागणी होती.

चेरा राजघराण्याचा उदय हा इसवी सन तिसऱ्या शतकात झाला तर बाराव्या शतकापर्यंत हे राजघराणे अस्तित्वात होते.

यावरून तामिळनाडू आणि आजच्या श्रीलंकेत या उद्योगाची भरभराट झाल्याचा काळ आणि चेरा राज्यकर्त्यांचा काळ एकच असल्याचे दिसून येते. एकोणाविसाव्या शतकापर्यंत भारतात अनेक ठिकाणी हे पोलाद बनविणारे कारखाने अस्तित्वात होते.

ज्यात तलवार आणि खंजीर बनविण्यासाठी कामगार आपले कसब पणाला लावीत. यांत लाहोर, अमृतसर, आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर, तंजावर, म्हैसूर, गोवळकोंडा या ठिकाणी हे कारखाने अस्तित्वात होते.

आज ते पूर्णपणे नामशेष झाले असून त्याबद्दल काही माहिती मिळत नाही. १८०४ मध्ये एका अभ्यासानुसार, वूट्झ स्टील मध्ये इंग्लंड मध्ये बनणाऱ्या पोलादापेक्षा अधिक कार्बन होता. इसवी सन १८२१ पर्यंत यूरोपमध्ये या शस्त्रांची दुरुस्ती होत नसे.

विज्ञान आणि वूट्झ स्टील

आज हा पोलादाचा प्रकार प्राचीन काळी कसा बनवला जात असे याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. ते ज्ञान पूर्णतः नामशेष झाले आहे. मात्र अनेक अभ्यासकांनी वेगवेगळे प्रयोग करून त्यामागील विज्ञान जाणण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी, अभ्यासक आजही त्यातील अनेक प्रक्रियांपासून अपरिचित आहेत. ते ती प्रक्रिया उलगडण्यासाठी निरनिराळे प्रयोग करत आहेत.

 

Forging_of_Damascus_Steel-inmarathi
commons.wikimedia.org

 

ती प्रक्रिया नक्की कशी असावी?

एका अनुमानानुसार लोखंडाला गरम करून त्यावर सतत घाव करत नंतर तो धातू मातीच्या भट्टीत लाकडाच्या सहाय्याने बंदिस्त करायचा. त्याला उष्णता द्यायची ती १४०० अंश सेल्सियस इतकी.

तप्त लोखंडासोबत असलेले लाकूड कार्बनमध्ये परावर्तित होते आणि कार्बन व लोखंड यांच्या एकत्रीकरणाने बनते ते पोलाद! मग ही भट्टी मंदगतीने थंड होते आणि मग पोलाद बाहेर काढला जातो. पुढे त्यापासून निरनिराळी शस्त्र बनत असत.

आता हे फक्त अनुमान आहे परंतु या प्रक्रियेत इतके काही बारकावे आहेत की, त्यामुळे यात अजून क्लिष्टता असणे साहजिक आहे. जरी हे पोलाद वेगवेगळ्या ठिकाणी बनत असले तरी त्यांची वैशिष्ट्ये समान होती. त्यात एकसमान असा आकृतिबंध आढळतो.

एकाचवेळी कडकपणा, मजबूतपणा, लवचिकपणा, टिकाऊपणणा यामुळे या पोलादाची घडण वैशिष्ट्यपूर्ण होती. आताच्या अभ्यासानुसार असेही पुढे आले आहे की,

यात सुपरप्लास्टिक वैशिष्ट्ये देखील आहेत. त्यामुळे जटिल आकारात सुद्धा या पोलादाचा वापर करता येतो. यांत कार्बनचे प्रमाण १-२% इतके असते.

अधुनिक धातुविज्ञानातही वूट्झ स्टीलने महत्वाची भूमिका बजावली आहे. जरी लोखंड आणि पोलाद यांचा शोध जुना असला, मानवजात त्याच्याशी परिचित असली तरी, पोलादनिर्मितीत कार्बनची भूमिका काय आहे याचा शोध लागायला १७७४ साल उजाडावे लागले.

 

steel making-inmarathi
thoughtco.com

 

स्वीडिश रसायन शास्त्रज्ञ टोबर्न बर्गमन हे वूट्झ स्टील मधील रहस्य शोधत असतांना त्यांना पोलाद आणि कार्बन यांच्यातील सहसंबंधाचा शोध लागला.

पुरातत्वशास्त्राच्या साहाय्याने देखील याबद्दल अधिक माहिती मिळवली जात आहे ज्यात मुख्यतः दक्षिण भारतातील नमुन्यांचा समावेश आहे.

श्रीमती श्रीनिवासन या भारतातील वूट्झ स्टीलच्या अभ्यासकांपैकी एक प्रमुख नाव आहे.

वैज्ञानिक आणि तांत्रिक वारसाच्या अशा पैलूंचे संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल जागरुकता वाढली पाहिजे. शिवाय पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासामध्ये यादृष्टीने अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्या नमूद करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?