' 8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय? – InMarathi

8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

८०००९८०००९ हा नंबर तुम्हाला ओळखीचा वाटतोय का ? कधी तरी तुम्ही हा नंबर नक्कीच पहिला असाल. कदाचित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा नंबर पहिला असाल. त्यामध्ये या नंबरवर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन केले जाते. पण नेमका हा नंबर आहे तरी काय ? आणि त्याचा नक्की वापर कशासाठी केला जात आहे. तसेच त्याचा आपल्याला फायदा काय ? असे प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच निर्माण झाले असतील. चला तर मग अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जाणून घेऊया या नंबरचे महत्त्व आणि त्याचा उपयोग…

भारतातील नद्यांना संरक्षणासाठी सध्या सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाउंडेशन’ ने सुरु केलेल्या मोहिमेसाठी या फोन नंबरचा वापर केला जात आहे. ही मोहीम पर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान खाते यांच्या सल्ला मसलतीने सुरु करण्यात आलेली आहे. या क्रमांकारवर मिस्ड कॉल देऊन वापरकर्ते या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी नोंदणी करू शकतात. ज्यामुळे आपण नद्यांना सुरक्षित ठेवू शकतो.

8000980009 imp no.marathipizza
twimg.com

लोकांना या चळवळीत सामील करून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, नद्यांना स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेसाठी रॅली काढणे अशा प्रकारची कामे ही संस्था करते. नदी संवर्धनाची हि मोहीम सुरु राहावी या करता लोकसहभाग अतिशय गरजेचा आहे आणि तेव्हाच ह्या मोहिमेचा उद्देश सफल होऊ शकतो.

तथापि, हा नंबर पहिल्यांदाच एखाद्या मोहिमेसाठी वापरला जात आहे असे नाही. हा एक हस्तांतरणीय फोन नंबर आहे, जो पूर्वी कितीतरी वेळा वापरण्यात आलेला आहे. येथे अशी अनेक उदाहरणे आपण जाणून घेणार आहोत, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की, हा नंबर आधी देखील कित्येकदा वापरण्यात आलेला आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी

8000980009 imp no.marathipizza1
inuth.com

ऑक्टोबर २०१० मध्ये नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेचे नाव ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे होते. या चळवळीचा भाग बनण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले. मोदींनी सांगितले की, ज्या लोकांना या योजनेला पाठिंबा द्यायचा असेल, त्यांनी ८०००९८०००९ या क्रमांकावर कॉल करून आपला पाठिंबा असल्याचे दर्शवू शकता.

गुटखा मुक्ती अभियान

8000980009 imp no.marathipizza2
narendramodi.in

२०१२ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी गुटख्यावर बंदी आणण्यासाठी एक ट्वीट केले होते, त्यामध्ये त्यांनी ८०००९८०००९ या नंबरचा उल्लेख केला होता. तेव्हा मोदींनी असे म्हटले होते की, या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही या गुटखा मुक्त अभियानामध्ये सामील होऊ शकता, जेणेकरून युवकांना आपण गुटख्यामुळे होणाऱ्या कर्करोगापासून वाचवू शकतो.

१५ ऑगस्ट २०१२ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोदींनी गुटख्याची विक्री, साठवणूक, उत्पादन आणि वितरण यावर बंदी घालण्याची घोषणा केली. “ मी गुटख्याचा गुलाम होणार नाही, मी माझ्या मनाप्रमाणे जगणार.” याला पाठिंबा देण्यासाठी आणि तुमची एकता दाखवण्यासाठी ८०००९८०००९ या नंबरवर मिस्ड कॉल द्या. ही मोहीम २०१२ मध्ये गुजरातमध्ये चालवण्यात आली होती.

गुजरातच्या विधानसभा निवडणुका

२०१२ मध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या आधी देखील याच क्रमांकाचा वापर केला होता. ८०००९८०००९ हा नंबर त्यावेळी भारतीय जनता पार्टीसाठी खास तयार केलेला नंबर होता. ज्याच्यावरून लोक तत्कालीन गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधू शकत होते. या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर भाजप आणि त्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाविषयी नियमित अपडेट्स तुम्ही मिळवू शकत होतात.

हॉर्लीक्स न्युट्रीमीटर

8000980009 imp no.marathipizza3
wp.com

२०१२ मध्ये बँगलोरच्या व्हिव्हन्टा ताज येथे मुलांच्या पोषणाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हॉर्लीक्सच्या इम्युनिटी इंडीब्लॉगरची (आयबी) एक सभा घोषित करण्यात आली होती. तिथे उपस्थित असणाऱ्या एका लेखकाच्या ब्लॉगनुसार, जीएसकेचे मार्केटिंग हेड अमान खान म्हणाले की, तुम्ही मुलांच्या आहाराच्या सवयींमधील अंतर शोधण्याकरीता हॉर्लीक्स न्युट्रीमीटर डाऊनलोड करू शकता. त्या ब्लॉगनुसार, त्यांनी सांगितले की, ८०००९८०००९ या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही हे उपकरण घेऊ शकता.

असा हा ८०००९८०००९ क्रमांक लोकसहभाग  वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरण्यात आलेला आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?