' गांधींपलीकडचे, कूस बदलत्या भारताचे दिशादर्शक : पंडित नेहरू – InMarathi

गांधींपलीकडचे, कूस बदलत्या भारताचे दिशादर्शक : पंडित नेहरू

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : शैलेंद्र कवाडे.

===

नेहरूंनी मागे सोडलेला भारत नावाचा देश, समाज आज यौवणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या देशाला एक नवी ओळख मिळाली, नवा जन्म मिळाला, १५ ऑगस्ट १९४७ साली, त्यावेळीही नेहरू होते. खरंतर, त्या स्थित्यंतराच्या चक्राला गती देणाऱ्यांपैकी एक पंडित नेहरू नक्कीच होते. गर्भश्रीमंत असलेले पंडित नेहरूसारखे सुविद्य, सुस्वभावी, राजस नैतृत्व महात्मा गांधी नावाच्या फकिराच्या ठायी आपला अभिमान विसरून लीन होते, हा भारतीय समाजासाठी एक आश्वासक संकेत होता, ही या संस्कृतीला आवडणारी गोष्ट होती.

संन्यस्त गुरूच्या पायी लीन होणारा कर्तृत्ववान शिष्य, हा वारसा थेट चाणक्याच्या काळापासून चालत आलेला आहे. नेहरूंचा राज्याभिषेक नैसर्गिकच होता.

पण गांधीजींवर असलेली अव्यभिचारी निष्ठा नेहरूंच्या विचारांच्या आड आली नाही. खेड्याकडे चला किंवा सूत कताई करत वेळ घालवा, असला भंपकपणा नेहरूंनी राज्यकारभार करतांना कधी केला नाही. नेहरू हे परंपरेचा मान राखत उगवत्या सूर्याकडे पाहणारे नेते होते. नेहरूंनीच या देशाला हाताला धरून शाळेत घातलं, त्या काळातील जगात कसं वागायचं ते नेहरूंनी सांगितलं.

आपल्या संस्कृतीत रुजलेला उदारमतवाद, अलिप्ततावाद नेहरूंनी जगभर नेला. जगभराच्या तत्वज्ञानाला भारतीय साज चढवून नेहरूंनी ते भारतात रुजवले.

 

neharu-inmarathi
post.jagran.com

भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र एकाच दिवशी उदयाला आली. एकच वारसा, एकच इतिहास असलेल्या या दोन समाजांत, दोन राष्ट्रात आज जो फरक आहे, त्याची फक्त दोन कारणं आहेत, पहिले कारण, भारतात टिकलेला हिंदू धर्म आणि दुसरे भारताला पहिली पंधरा वर्षे लाभलेले पंडित नेहरूंचे नैतृत्व. अन्यथा सगळे समान गुण दुर्गुण असलेले हे दोन भूभाग, आज जगभर वेगळ्या गोष्टींसाठी ओळखले गेलेच नसते.

एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा तशी नेहरूंनी ह्या देशाची नीती, त्याची विचारसरणी घडवली.

त्याच्या भविष्याची बेगमी केली, इथल्या सुदृढ संस्था आणि व्यवस्था घडवल्या. प्रचंड लोकसंख्या, त्यामानाने अल्प प्रमाणात असलेला भूभाग, साधनांची कमतरता हे सगळं असूनही या देशातील व्यवस्था, संस्था आजही टिकून आहेत, भले जराशा किडल्या असतील पण अजूनही मजबूत आहेत. भारतीयांना आजही देशाबद्दल जी आशा वाटते, त्याचा पाया नेहरूंनी रचला.

नेहरूंनी भारतीयांचे बलस्थान ओळखले, ते होते वाढत जाणारी लोकसंख्या. या लोकसंख्येला एका बलस्थानाचे रूप देण्यासाठी त्यांनी अनेक संस्थांचा पाया रचला. आज जगभर पसरलेली भारतीय लॉबी, याच संस्थांतून शिकून पुढे गेलीय. भारतीयांना ज्याचा अभिमान वाटतो, मग तो अणुबॉम्ब असो की इस्रो, आय आय टी असो की आय एस सी, त्या प्रत्येक गोष्टीला या पंडिताचा स्पर्श आहे. आजचा भारत हा नेहरूंच्या स्वप्नाकडे चाललेला भारत आहे.

 

i2.wp.com

नेहरूंनी देश चालवला, राज्यकारभार केला, अर्थातच ओघाने अनेक चुकाही केल्या. पण त्या चुका ह्या बहुदा, त्यांच्या बुद्धिनुसार, त्या क्षणी असलेला बेस्ट चॉईस असावा. गाडी चालवताना आपण प्रत्येक खड्डा चुकवू शकत नाही, अपघात टाळण्यासाठी काही खड्यांतून गाडी न्यावीच लागते. नेहरूंनीही तेच केले. हा देश त्या धक्क्यांतून सावरेल हा विश्वास असावा त्यांना.

प्रत्येक नैतृत्व हे त्या काळाचे प्रॉडक्ट् असते. नेहरू हे मध्ययुगीन मानसिकतेतून आधुनिकतेकडे कुस पालटू लागलेल्या भारतीय समाजाचे प्रॉडक्ट् होते. नेहरुवाद आज उपयुक्त आहे का याची चर्चा करण्यात अर्थ नाही कारण कदाचित नेहरूंनी स्वतःच आज वेगळ्या पद्धतीने राज्य चालवले असते.

युद्धासाठी चर्चिल आणि युद्धानंतर एडेन हा शहाणपणा जगभरचा समाज दाखवतोच. भारतीय समाजही त्याला अपवाद नाही.

त्याच वेळी, प्रत्येक समाजावर आपल्या पूर्वसूरींचे एक ऋण असते, ते ऋण फक्त त्यांना श्रद्धांजली वाहिल्याने किंवा त्यांची हेटाळणी केल्याने फिटत नाही. त्या महामानवांनी जो रस्ता दाखवला होता, तो आज योग्य आहे का, असल्यास आपण त्या रस्त्यावर आहोत का, याची चिकित्सा केल्याने ते फिटते. पंडित नेहरूंनी दाखविलेल्या रस्त्याची, आपापले चष्मे काढून चिकित्सा करण्याची आजही गरज आहे..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?