' वैशाली- भारतीय भूमीवरचं जगातील पहिलं प्रजासत्ताक! – InMarathi

वैशाली- भारतीय भूमीवरचं जगातील पहिलं प्रजासत्ताक!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रजासत्ताक म्हणजे लोकांच राज्य! जिथे जनता ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. तर अशी ही लोकशाहीची आणि संविधानाची संकल्पना ख्रिस्तपूर्व ५०६ मध्ये अथेन्सच्या प्रजासत्ताकात सर्वप्रथम अवलंबण्यात आली असे म्हणतात. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्याही पूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकामध्ये भारतातील एका लहानग्या राज्यामध्ये प्रजासत्ताक अस्तित्वात होते. जेथे जनता आपला शासक निवडायची आणि आपले भवितव्य त्याच्या हवाली करायची.

vaishali-marathipizza01
http://travels.rebatours.in

ते राज्य म्हणजे आपल्या भारतातील वैशाली राज्य होय. जगातील सर्वात पाहिले प्रजासत्ताक राज्य वैशालीमध्ये होते यावर सर्व तज्ञांचे एकमत आहे. पण बहुतांश लोकांना या गोष्टीबद्दल माहिती नसल्याने अथेन्स राज्याला आधुनिक प्रजासत्ताकाची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते.
बिहार राज्यामध्ये वैशाली नामक पुरातत्व खात्याची एक साईट आहे. येथे उत्खनन करून या राज्याबद्दल संशोधन करण्यात आले होते. वैशाली हे नाव या राज्याचा ईक्ष्वाकु वंशीय राजा विशाल याच्या नावावरून ठेवण्यात आले असावे. या राजाचा उल्लेख रामायणासारख्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये आढळून येतो.

जैन आणि बौद्ध धर्मातील प्राचीन मजकूरांमध्ये वैशाली राज्याबाबत अतिशय ठोस माहिती आढळून येते. याच मजकुरांच्या आधारावर हे सिद्ध झाले की ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकातील वैशाली राज्यामध्ये प्रजासत्ताक पद्धती अस्तित्वात होती, जेथे लोक आपला प्रतिनिधी निवडायचे आणि त्यानुसारच वैशाली राज्याचा राज्यकारभार चालवला जायचा.

vaishali-marathipizza02
http://www.tourism-of-india.com

वैशाली सारख्या प्रजासत्ताक राज्याला उदयोन्मुख मगध राज्याचा धोका होता आणि पुढे व्हायचे तेच झाले. मगधचा शासक अजातशत्रू याने वैशाली राज्य आपल्या ताब्यात घेतले आणि वैशाली राज्याचे वैभव लयास गेले.

आता सध्या जी पुरातत्व खात्याची साईट आहे त्याच्या उत्तरेला ‘राजा विशाल का घर’ नावाचे एक ठिकाण आहे. हे एक प्रचंड गोलाकार ठिकाण असून ७०० लोक येथे बसू शकतील एवढे मोठे बांधकाम आहे. ही तीच जागा असावी जेथे वैशाली राज्यातील जनतेने निवडलेले प्रतिनिधी एखाद्या संसदेसारखी सभा भरून चर्चा करण्यास बसत असावेत आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेत असावेत.

vaishali-marathipizza02
http://www.mysteryofindia.com

इथे एक पाण्याचे कुंड वजा सरोवर आढळून येते. त्याला अभिषेक पुष्कर्ण म्हणतात. निवडून दिलेल्या प्रतिनिधींना याच पाण्याच्या साक्षीने अभिषेक घालून, त्यांना शपथ घायला लावून मगच संसदेमध्ये प्रवेश दिला जात असावा.

भारतीय संस्कृतीमधील हडप्पा आणि मोहंजोदारो नंतर नागरीकरणाचे दुसरे पर्व पाहताना त्यात वैशाली राज्याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या राज्यातील संस्कृतीचे पुढील काळात पूर्व भारतावर राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दूरगामी परीणाम झाल्याचे आढळून येतात.

बुद्ध संस्कृतीमध्ये वैशाली राज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी या राज्याचा जवळचा संबंध आढळून येतो. याच ठिकाणी भगवान बुद्धाने आपला शेवटचा संदेश अनुयायांना दिला होता आणि नंतर ते अवतार समाप्तीसाठी निघून गेले. त्यामुळे या जागेचे महत्त्व लक्षात घेऊन ख्रिस्तपूर्व ३ ऱ्या शतकामध्ये महान राजा अशोका याने उभारलेला अशोकस्तंभ आजही पाहायला मिळतो. तब्बल १८.३ मीटर उंच असलेला हा अशोक स्तंभ हा संपूर्ण एकच दगडात कोरलेला आहे.

vaishali-marathipizza04
http://www.mysteryofindia.com

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर दुसऱ्या बौद्ध परिषदेचे आयोजन वैशाली येथेच करण्यात आले होते.

भगवान महावीरांनी देखील आपल्या जीवनाची २२ वर्षे येथे व्यतीत केल्याने जैन धर्मियांसाठी देखील हे एक पवित्र स्थान आहे.

वैशाली राज्याबद्दल आणि तेथील प्रजासत्ताक पद्धतीबद्दल अधिक माहित हवी असल्यास जगदीश प्रसाद शर्मा यांचे “Vaishali The World’s First Republic” हे पुस्तक नक्की वाचावे. या पुस्तकामध्ये लेखकाने अगदी इत्यंभूत माहिती दिलेली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?