' ह्या एका ऐतिहासिक कारणामुळे, PNB ची वाताहत भारतासाठी क्लेशकारक आहे – InMarathi

ह्या एका ऐतिहासिक कारणामुळे, PNB ची वाताहत भारतासाठी क्लेशकारक आहे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या आपल्या देशात एकच विषय चर्चिला जातो आहे आणि तो म्हणजे हिरा व्यापारी निरव मोदी ह्याने देशातील सर्वात सुरक्षित बँकेपैकी एक असलेल्या पिएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेला लावलेला चुना. जेव्हापासून हा घोटाळा उघडकीस आला आहे तेव्हापासून पीएनबीच्या शेअर्समध्ये उल्लेखनीय घसरण बघायला मिळत आहे.

काही जाणकारांच्या मते ह्या घोटाळ्याचा ह्या पीएनबी वर खूप मोठा परिणाम होऊ शकतो.

एकेकाळी जेथे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यसाठी लढणाऱ्यांची खाती ह्या बँकेत होती, आज त्याचं बँकेत भारतीय इतिहासातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा घडला आहे.

 

nirav-inmarathi
smedia2.intoday.in

जेवढी रंजक ह्या घोटाळ्याची कहाणी आहे, त्याहून अधिक रंजक या १२३ वर्ष जुन्या बँकेच्या स्थापनेची कहाणी आहे.

पीएनबी ह्या बँकेच्या आज देशात जवळपास ७ हजार ब्रांच, १० हजार एटीएम आहेत. तसेच जवळजवळ ७० हजार कर्मचारी आज ह्या बँकेत काम करत आहे.

ही बँक १९ मे १८९४ साली केवळ १४ शेअरधारक आणि ७ संचालकांच्या भरवश्यावर सुरु करण्यात आली होती. ज्या व्यक्तीने ह्या बँकेच्या स्थापनेत मोलाची भूमिका निभावली होती ते होते आपले स्वतंत्रता सेनानी लाल लजपत राय. स्वतंत्र भारत कसा असावा ह्याचे स्वप्न ते दिवस रात्र बघत राहायचे. त्यापैकीच एक म्हणजे भारतीयांची स्वतःची बँक. ज्यामुळे भारतातील पैसा भारतातच राहील.

 

PNB-inmarathi03
scroll.in

लाला लजपत राय ह्यांना एक गोष्ट सतावत होती की, ब्रिटीश बँका आणि कंपन्या चालविण्यासाठी भारतीयांच्या पैश्याचा वापर करत आहेत. ज्याच्या मोबदल्यात भारतीयांना कवडीमोल व्याज मिळत आहे, आणि त्यापासून होणारा सर्व नफा हा इंग्रजांना मिळायचा. त्यामुळे त्यांनी आर्य समाजाच्या राय बहादूर राज ह्यांच्याकडे एका लेखाद्वारे आपली भावना व्यक्त केली. तर तिकडे स्वतः राजा देखील अनेक दिवसांपासून ह्या विचारात होते की, भारतीयांची स्वतःची एक राष्ट्री बँक असायला हवी.

राय मुल राजा ह्यांच्या विनंतीवर लाला लजपत राय यांनी काही मोजक्या मित्रांना एक पत्र लिहिले. स्वदेशी भारतीय जॉइंट स्टॉक बँकेच्या स्थापनेच्या दिशेने हे पहिले पाउल होते. यावर लाला लजपत राय यांना सकारात्मक प्रतिक्रिया देखील मिळाली.

त्यानंतर लगेचच कागदी कारवाई सुरु झाली आणि इंडीयन कंपनी अॅक्ट १८८२ च्या अधिनियम ६ नुसार १९ मे १८९४ साली पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली. बँकेच्या प्रॉस्पेक्टस ट्रिब्यून आणि सोबतच उर्दू वर्तमानपत्र अख़बार-ए-आम आणि पैसा अखबार ह्यात प्रकाशन करण्यात आले.

 

PNB-inmarathi01
thelallantop.com

२३ मे ला संस्थापकांनी पीएनबी चे पाहिले अध्यक्ष सरदार दयाल सिंह मजीठीया ह्यांच्या लाहौर येथील निवास्थानी पहिली बोर्ड मिटिंग झाली आणि या योजनेला पुढे वाढविण्याचा संकल्प केला सर्व सभासदांनी केला. त्यासाठी त्यांनी लाहौरच्याच अनारकली बाजार येथिल पोस्ट ऑफिसच्या समोर असलेल्या प्रसिद्ध राम ब्रदर्स स्टोर्स जवळ एक घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला.

१२ एप्रिल १८९५ ला पंजाब येथील बैसाखी ह्या सणाच्या एक दिवस आधी बँके व्यवहारासाठी खुली करण्यात आली. पहिल्याच बैठकीत बँकेची सर्व मूळ तत्त्वे स्पष्ट करण्यात आली.

त्यातही ह्या १४ शेअरधारकांनी आणि ७ संचालकांनी बँकेतील शेअर्सचा खूप कमी हिस्सा घेतला.

 

PNB-inmarathi
thelallantop.com

लाला लजपत राय, दयाळ सिंह मिजीठीया, लाला हरकिशन लाल, लाला लालचंद्र, काळी प्रोसन्ना, प्रभू दयाल आणि लाला ढोलना दास हे सर्व बँकेच्या सुरवातीच्या काळात मॅनेजमेंट सोबत सक्रीय होते.

१९०० साली या बँकेने लहौरच्या बाहेर पाउल टाकत कराची आणि पेशावर येथे आपल्या ब्रांच उघडल्या. त्यानंतर चाळीस वर्षांनी म्हणजेच १९४० साली देहरादूनच्या भगवान दास बँकेशी विलय केला.

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि देशाचे पाकिस्तान आणि भारत असे दोन भाग पडले. तेव्हा या बँकेलाही लाहौर सोडावे लागले. त्यासाठी अनेक कागदी कारवाया झाल्या. ३१ मार्च १९४७ ला लाहौर उच्च न्यायालयाने बँकेला तीच हेडक्वार्टर लाहौर येथून दिल्ली येथे स्थानांतरीत करण्याची परवानगी दिली.

या बँकेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहेरू, इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या सर्वांनी खाते उघडले होते.

१३ एप्रिल, १९१९ मध्ये जालियानवाला बाग येथे नरसंहार झाला होता. जनरल डायर याने दिवसाढवळ्या ४०० हून जास्त लोकांची हत्या घडवून आणली होती. इंग्रज सरकारने ह्या संबंधी कारवाई करण्यसाठी एक हंटर कमिटी बनविली होती. पण सर्वांना माहित होते की ही कमिटी सरकार विरोधात कुठलाही रिपोर्ट देणार नाही. तेव्हा कॉंग्रेसने या नरसंहाराचा तपास करण्यासाठी आपली एक कमिटी बनविली होती. या कमिटीचे खाते देखील याच बँकेत होते.

 

IndiraGandhi-marathipizza

 

पीएनबीने बराच काळ खाजगी बँक म्हणून काम केले. पण जेव्हा इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या तेव्हा या बँकेला चांगले दिवस आले. त्यावेळी बँक ही देशाच्या विकासाचे एक महत्वाचे आणि मोठे माध्यम होते. बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती देखील होऊ शकत होती. इंदिरा गांधी यांच्या मते देशात बँकेचे नियंत्रण हे सरकारच्या हाती हवे. पण इंदिरा गांधींना त्यासाठी कायदा बनवून आणि मग तो लागू होणार, एवढा वेळ घालवायचा नव्हता. म्हणून त्या ‘बँकिंग कंपनीज ऑर्डिनन्स’ घेऊन आल्या.

त्यानुसार १९ जून १९६९ च्या मध्यरात्रीपासून देशातील १४ मोठ्या बँका या सरकारी बँका झाल्या. याचं १४ बँकांमध्ये पीएनबी देखील होती.

अशी ही भारतीयांच्या पैश्यांतून उभारली गेलेली बँक आज मोठ्या कठीण परिस्थितीत अडकून पडली आहे. या बँकेत झालेला घोटाळा बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरू शकतो. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असलेल्या या बँकेचे एका आर्थिक घोटाळ्यामुळे डबघाईला येणे दुर्दैवी आहे. आता ह्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पीएनबी मॅनेजमेंट किती सक्षम आहे हे तर येणारा काळच ठरवेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?